
आयुक्तांचे पंधरा दिवसात कारवाईचे ‘कोरडे’ आश्वासन
नागपूर,ता.५ ऑक्टोबर २०२१: गेल्या बारा वर्षांपासून शहरातील दिव्यांगांच्या संघटनेनी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे हक्काचे व्यवसायकि स्टॉल उपलब्ध करुन देण्याची मागणी नागपूर महानगरपालिकेला केली आहे मात्र एक दशक उलटलं असलं तरी एवढ्या संवदेनशील बाबीवर मनपा प्रशासनाची नीती ही कायमच ढूलमूल राहीली आहे,याचीच परिणीती वारंवार दिव्यांगाच्या आंदोलनात होताना दिसते तसेच अनेकदा स्वकष्टाने उभारलेले दिव्यांगांचे फूटपाथवरील स्टॉल मनपाच्या अतिक्रमण विभागाद्वारे वारंवार उधवस्त होतानाही दिसतात,अश्याच एका दिव्यांगाचे स्टॉल मनपाच्या अतिक्रमण विभागाने तोडल्यानंतर तो दिव्यांग बंधू अतिक्रमण विभागाचे प्रमुख अशोक पाटील यांच्याकडे २७ ऑगस्ट २०२१ रोजी दाद मागायला गेले असता अशोक पाटील यांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याची ऑडीयो क्लिप माध्यमांध्ये आज चांगलाच व्हायरल झाली.
मागील चार दिवसांपासून सिव्हिल लाईन्स येथील फूटपाथवरील दिव्यांगांच्या स्टॉल्सवर मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जात आहे.या विरोधात दिव्यांगांच्या संघटनेने संविधान चौकात उपोषणाचा निर्धार केला.याच आंदोलनात, ज्या दिव्यांग बंधूला अशोक पाटील यांनी शिवीगाळ केली ते देखील आले होते,काल त्यांनी तो आॅडीयो ‘विदर्भ विकलांग संघर्ष समिती’च्या पदाधिका-यांना ऐकवला.ते संभाषण ऐकून दिव्यांग बांधव चांगलेच पेटून उठले.
ज्यांना शिवीगाळ झाली तो दिव्यांग बांधव हा बुजरा स्वभावाचा असल्याने तसेच तो एका नव्या दिव्यांग संघटनेचा सभासद असल्याने त्यांना त्यावेळी एका जवाबदार पदावरील मनपा अधिका-याने केलेल्या अर्वाच्य शिवीगाळ विरोधात नेमके काय करावे,हे माहिती नव्हते.आपल्या न्याय हक्कासाठी दाद मागायला जाणे हा काही गुन्हा नव्हता.मात्र मनपा प्रशासनाच्या काही अधिका-यांना खुर्चीची आणि शासकीय नोकरीची मगरुरी इतकी आहे, की चौथा मजल्यावर दाद मागायला आलेल्या एका हतबल,निराश दिव्यांग बांधवाशी माणूसकीचे सर्व परिमाप ओलांडून अशोक पाटील यांनी ज्या भाषेत संभाषण साधले,ते ऐकून अश्या नोकरशाहीला खुर्चीवर बसण्याचा व जनसेवेचा लाखोंचा पगार घेण्याचा तरी अधिकार आहे का?असा संताप मनात डोकावतो.
अनेक दिव्यांगांनी स्टॉल उभारले, ते इतरांना विकले किवा दहा हजार रुपये महिन्याने भाड्याने दिले हे कायद्यात बसत नाही,तरीही शहरात हजारो धनदांड्यांनी तर मनपाच्या मोक्याच्या जागाच अतिक्रमण करुन लाटल्या आहेत,त्यावर सुपर स्पेशिलीटी दर्जाचे रुग्णालये उभारले,रुग्णांना लृटून बक्कळ पैसा ही कमावतात आहेत, मग अशोक पाटील त्यांच्यासोबत देखील याच भाषेत,याच स्वरात,याच मगरुरीत आणि अश्याच अर्वाच्य शब्दात संभाषण साधतील का?अशी ही नोकरशाही ही, स्टेटस,रुतबा आणि पाकीटातले वजन बघूनच समोरच्या अतिक्रमणधारकांशी संवाद साधत असतात,असे आत म्हटले जात आहे.
काल पासून शहरातील दिव्यांगांनी संविधान चौकात आंदोलन सुरु केले त्यात ही त्यांनी हीच मागणी केली आहे ज्यांनी इतरांना स्टॉल विकले किवा भाड्याने दिले त्यांच्यावर मनपाने निश्चितच कारवाई करावी मात्र ज्यांनी पदरातला पैसा खर्च करुन आपली व कुटुंबियांची पोटाची खळगी भरण्यासाठी स्टॉल उभारलेत, त्यांचे स्टॉल असे उधवस्त करण्यात येऊ नये,एवढीच त्यांची मागणी अाहे,फूटपाथावर दिव्यांगांच्या स्टॉल्सला देखील न्यायालयाने परवानगी नाकारली असल्यास पर्यायी जागांचा शोध घेऊन हक्काची जागा उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी दिव्यांग बांधव मनपा प्रशासनाला करीत आहेत.
मात्र हेकेखाेर मनपा प्रशासन ना तर दिव्यांगांना जागा उपलब्ध करुन देते, दूसरीकडे संपूर्ण शहरात कारवाई करुन दिव्यांगांचे स्टॉल्स उधवस्त करण्याचा ‘अतिपराक्रम’गाजवत असतानाच दिसते.
संदीप जोशी यांची मध्यस्थी ही नाकाम-
गेल्याच वर्षी संदीप जोशी महापौर पदी असताना त्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नाला गांर्भीयाने घेत प्रशासनाला धारेवर धरले होते.अतिक्रमण विभागाचे प्रमुख अशोक पाटील व कांबळे यांना धारेवर धरत ‘दिव्यांग बंधू तुम्हाला काय फूटबॉल वाटतात का?’असा जाब विचारला होता.कधी त्यांना इकडे जात कधी त्यांना तिकडे जा म्हणून झूलवत राहता,असे म्हणत दिव्यांगांच्या स्टॉल्ससाठी दिव्यांगांच्या संघटनांनी व मनपा प्रशासन दोघांनीही मिळून पर्यायी जागांचा शोध घेण्याची सूचना त्यांनी पाटील यांना दिली होती.
संटनेचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे यांनी ६३ जागांचा शोध देखील घेतला होता,त्याची यादी ही त्यांनी प्रशासनाकडे दिली मात्र मनपातर्फे माजी महापौरांची सूचना गांर्भीयाने घेण्यातच आली नाही,पुढे लगेच करोनाचा उद्रेग नागपूरात झाला व गेल्या पावणे दोन वर्षांपासून पुन्हा हा विषय थंड बसत्यात गेला.
एकीकडे नियतीने त्यांच्यासोबत शारिरीक अपंगत्व देऊन थट्टा तर केलीच मात्र दुसरीकडे मनपा प्रशासनातील हेकेखोर नोकरशाही ही देखील त्यांच्या प्रश्नांना,त्यांच्या जीवन-मरणाच्या समस्यांना, गांर्भीयाने घेणे तर दूर वरुन आई-बहीणीच्या अर्वाच्य शिव्या देऊन त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवताना दिसते.
म्हणूनच तीन दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स येथील दिव्यांगांच्या स्टॉल्सवर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा हा प्रश्न उफाळून आला,त्यात संघटनेच्या हाती अशोक पाटील यांच्या अर्वाच्य शिवीगाळची ऑडीयो क्लिप लागली त्यामुळे दिव्यांगांचे आंदोलन आज संविधान चौकात चांगलेच पेटले.

अशोक पाटील यांची प्रतिकात्मक तिरडी नेली मनपावर-
आपल्या मधील एका दिव्यांग बांधवाला ऑगस्ट महिन्यात विनाकारण आई बहीणीच्या शिव्या देणा-या अशोक पाटील यांची प्रतिकात्मक तिरडीच संविधान चौकातून मनपा मुख्यालयात आंदोलनकारी दिव्यांग बांधवांनी आज नेली.आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या कक्षासमाेरच आंदोलनकारी उपोषणकर्ते आशिष आमदरे,बाबु नंदिपाटी,एकनाथ भजभुजे, आरिफ मुनाफ शेख,सुखदेव दुधलकर यांनी इतर दिव्यांग बांधवांसोबतच ठिय्या मांडला.
अशोक पाटील यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.पाटील यांनी जी आई-बहीणीची शिवी दिव्यांग बांधवाला दिली,तसेच प्रतिउत्तर आम्हालाही देता येईल म्हणून आयुक्तांना ठणकावले.दिव्यांगांचा संताप बघता पोलिसांना पाचारण करण्यात आले.
आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांसोबत बाहेर येऊन संवाद साधला,फूटपाथवर अतिक्रमण करुन वसवलेली दूकाने तर हटवलीच जातील असे सांगत ऑडीयो क्लिप माझ्या स्वीय सहायकाला देण्याची सूचना करीत येत्या १५ दिवसात पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
मजेदार बाब म्हणजे आयुक्तांच्या स्वीय सहायकांनी ती ऑडियो क्लिप स्वत:च्या व्हॉटस ॲपवर घेण्यास नकार दिला,एवढंच नव्हे तर आयुक्त कक्षातील इतर चार कर्मचा-यांकडे त्यांना टोलवले.यामुळे आधीच संतापलेल्या आंदोलनकर्त्यांचा आणखीनच पारा चढला,त्यांचे रोद्ररुप पाहून शेवटी आयुक्तांच्या स्वीय सहायकाने गपगुमान आपल्याच प्रशासनातील एका ‘जवाबदार’अधिका-याची ती अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ असणारी ऑडीयो क्लिप स्वत:च्या व्हॉटस ॲपवर घेतली.
महापौरांचा दिव्यांगावर विशेष रोष!
दिव्यांग संघटनेच्या एका पदाधिका-याने महापौर दयाशंकर तिवारी यांचा दिव्यांगांवर विशेष रोष असल्याची धक्कादायक बाब सांगितली.दयाशंकर तिवारी महापौर पदी नसताना गाेपीनाथ बाेवक नावाच्या एका दिव्यांग बांधवासोबत त्यांचा चांगलाच वाद झाला होता.आज ते गृहस्थ हयातीत नाही.या वादात चांगलीच शिवीगाळ देखील झाली होती.महापौरांनी जरी त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगांसाठी अनेक योजनांची घोषणा केली असली तरी अद्याप फेब्रिकेशन किवा शहरातील इतर स्वयंसेवी संस्था शहरातील दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी पुढे येण्यास धजावत नसल्याचे ते सांगतात.उलट बैठकीत महापौर हे दिव्यांगांवरच्या रोषातूनच गोपीनाथ यांच्यावर दिव्यांगांच्या आर्थिक शोषनाचा आरोप करतात,असा आरोप त्यांनी लावला.
गोपीनाथ यांच्यासोबतच्या वादानंतरही एक-दाेन दिव्यांग बंधू हे दयाशंकर तिवारी यांच्याकडे कारवाईसाठी समोर गेले.यावेळी या दोन्ही दिव्यांगांनी गोपीनाथ यांचा उल्लेख ‘सर’म्हणून केला.यामुळे तिवारी हे चांगलेच भडकले.तुम्ही गोपीनाथ यांना ‘सर’कसे म्हणू शकता?अशी चीड त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या सत्ताकाळातील एका जवाबदार पदावर असणा-या पदाधिका-याला ही ‘सूड नीती’शोभनीय नव्हती,असे दिव्यांगाचे हे पदाधिकारी सांगतात.तिवारी यांच्या द्वेषनीतीमुळेच त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात दिव्यांगांच्या स्टॉल्सला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप या पदाधिका-याने केला.एकाच फूटपाथवर सर्व अतिक्रमणीत दूकाने असताना आजूबाजूची दूकाने सोडून फक्त दिव्यांगांचीच दूकाने उधवस्त केली जात असल्याचे ते म्हणाले.
दिव्यांगाना २०० स्वे.फूटाची जागा व्यवसायासाठी देण्यात यावी असा शासनाचाच अध्यादेश असताना ते तुम्ही देत नाहीत,दुसरीकडे आम्ही आमच्या स्वकष्टाचा पैसा खर्च करुन स्टॉल लावतो तो ही तुम्ही अतिक्रमणाच्या नावाखाली उधवस्त करता,माजी महापौर संदीप जोशी यांनी आमच्या समस्यांवर धोरण निश्चित केले आहे,असे जेव्हा आम्ही विद्यमान महापौरांना सांगायला जातो तर ते….त्यांनाच जाऊन भेटा…असे सांगतात!
मग तुम्ही संदीप जोशी यांच्या खूर्चीवर बसलेच कशाला?असा प्रश्न हे दिव्यांग बांधव विचारतात.
महापौर आयुक्तांकडे पाठवतात,आयुक्त अति.आयुक्तांकडे पाठवतात,अति.आयुक्त राम जोशी म्हणतात,फूटपाथवर अतिक्रमण आहे तर कारवाई तर होणारच,आता एकच मार्ग उरला आहे,मुंबईच्या मंत्रालयात आमचे दिव्यांग बंधूच आयुक्त आहेत त्यांना जाऊन भेटणार तसेच दोन महिन्यानंतर नागपूरात हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनात देशातील शेतक-यांच्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन उभारणार,आमचे आंदोलन ही हे ‘नॉन स्टॉप’असणार आहे,असा इशारा हे दिव्यांग बांधव सरकारला देत आहेत.
अशोक पाटील यांच्या विरोधात पोलिसात तक्रार-
अशोक पाटील यांच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली मात्र एका शासकीय अधिका-याच्या विराेधात आमच्याकडे पुरावे असून देखील सदर पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यास पोलिस धजावत नसल्याचे दिव्यांग आंदोलनकारी सांगतात.आम्ही आधी वरीष्ठांना विचारु अशी टोलवाटोलवी पोलिसांनी केली.
आमच्याकडे पुरावा आहे आम्ही चुकीची तक्रार देत नाही आहोत तुम्हाला तक्रार नोंदवावीच लागेल,असा संताप दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला.सदर पोलिस ठाण्यात फिर्यादींनाच अपराध्यासारखी वागणूक मिळाली असल्याचे पुढे आले.अखेर पोलिसांनी त्यांच्या रजिस्टरवर नोंद घेतलीच नाही त्यामुळे आम्ही आमच्या लेटरहेडवर अशोक पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंदवली व एक ‘ओसी‘ची प्रत आमच्याकडे ठेवली.ही प्रत देखील पोलीस देण्यास तयार नव्हते अशी धक्कादायक बाब हे दिव्यांग बांधव सांगतात.
पोलिस जुआ,दारुच्या अड्ड्यांवर धाड टाकतात तेव्हा वरीष्ठांना आधी विचारुन टाकतात का?मग एका शासकीय अधिका-याने शिवीगाळ केल्याचे पुरावे असताना देखील तक्रार नोंदवण्यास का नकार दिला?असा प्रश्न ते उपस्थित करीत आहेत.




आमचे चॅनल subscribe करा
