फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपातील आय.टी.क्रॉफ्टवर होणार आणखी तीन कोटींची उधळण!

मनपातील आय.टी.क्रॉफ्टवर होणार आणखी तीन कोटींची उधळण!

Advertisements

नगर रचना विभागात गुन्ठेवारी संगणकीय प्रणाली देखभालीचे गौडबंगाल

नागपूर,ता. १३ ऑक्टोबर: महानगरपालिकेला गेल्या तेरा वर्षात सत्ताधा-यांनी प्रत्येक प्रकल्पासाठी जेवढे ओरबाडता येईल तेवढे ओरबाडले असले व मनपा ही आर्थिकरित्या पूर्णपणे देशाच्या अर्थव्यवस्थेसारखीच पूर्णपणे डबघाईला आली असली तरी कोविडसारख्या शतकातील महामारीपासून देखील सत्ताधा-यांनी कोणताही बोध घेतला नसल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे नगर रचना विभागात गुन्ठेवारी संगणकीय प्रणालीच्या देखभालीच्या नावाखाली ‘आय.टी.क्राफ्ट’ या सध्या मनपाच्या जनसंपर्क विभागाशी संलग्न असणा-या खासगी एजंसीला पुन्हा तीन वर्षांसाठी दोन कोटी ९ लाख ८५ हजार १२० चा कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्थायी समिती सभापती पिंटू झलके यांनी नुकतेच ९ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या बैठकीत या संबधीची निविदा मंजूर करण्यासाठी आली असल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे आय.टी.क्राफ्ट या एजंसीला ऑक्टोबर २०१६ पासून मासिक ४ लाख ७० हजार रुपयांवर जनसंपर्क विभागाला सहाय्य करण्यासाठी मान्यता देण्यात आली . हा तीन वर्षांचा करार २०१९ मध्ये संपुष्टात आला असताना पुन्हा एका वर्षाचा वाढीव करार करण्यात आला. हा करार पुढील वर्षी मार्च २०२१ मध्ये संपुष्टात येणार आहे.परिणामी मनपातील एका खास सत्ताधारी नेत्याच्या आश्रयाखालील असणा-या या एजंसीला मार्चमधील करार संपुष्टात येण्याआधीच नगररचना विभागात पुन्हा तीन वर्षांसाठी तीन कोटींच्या करारावर काम देण्याचा या नेत्याने घाट घातल्याचे समाेर आले आहे.

जनसपंर्क विभागाला सहाय्य करण्यासाठी या एजंसीसोबत झालेल्या करारात पत्रकारितेच्या क्ष्ेत्रातील एकूण ६ अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्याची अट होती. मात्र सुरवातीला फक्त दाखवण्यापूरती काही अनुभवी माणसे नेमण्यात आली व काही महिन्यातच त्यांना कामावरुन काढण्यात आले व ज्यांना पत्रकारितेतील साधी बातमीही लिहता येत नाही,अश्‍या ज्यूनिअर माणसांची नेमणूक करुन या एजंसीने करारातील अटींचे उल्लंघन केले.या एजंसीचा मुख्य स्ट्रेटेजिक हेड तर मनपा मुख्यालयाच्या कार्यालयात बसून स्वत:चे खासगी न्यूज पोर्टल चालवतो,त्यात सर्वाधिक बातम्या या माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याच असतात,परिणामी मुंढे गेले तरी या स्टे्टेजिक हेडच्या ‘हेड’ मधून मुंढेंचा करिष्मा उतरलाच नाही का?अशी कुजबुज मनपाचे कर्मचारी करतात!

याशिवाय याच अाय.टी.क्राफ्ट एजंसीला महामेट्रोच्या जनसंपर्क सांभाळण्याचा देखील कंत्राट मिळवून देण्यात आला.त्यामुळे आय.टी.क्राफ्ट एंजसीची माणसे ही मनपा मुख्यालयातील ४ थ्या मजल्यावर बसून मनपाचीच वीज,संगणक,कोरी कागदे,कूलर,पंखे वापरुन हे कर्मचारी महामेट्रोच्या जाहीरातींसाठी डिझाईन तयार करीत बसतात,तेथील उपक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका बनवण्याचे काम केले जाते.
या एजंसीला मूळात मनपाच्या संपूर्ण उपक्रमांचे सोशल मिडीयाचा वापर करुन प्रसिद्धी देण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना मनपाच्या सोशल मिडीयाशी जोडण्याचा करार करण्यात आला होता मात्र ही एजंसी सर्व बैठकींचे वृतांत लिहून ते सर्व वृत्तपत्रांना ई-मेलनी पाठवते.मूळात बैठकींचे वृत्त पाठवणे हे काम मनपाच्या जनसंपर्क विभागाचे असून यासाठी या विभागातील १० माणसे एक लाख पासून तर ७० हजार रुपये दर महा पगार उचलतात,मग आय.टी.क्राफ्ट एजंसीची सहा माणसे यांना दर माह ४ लाख ७० हजार रुपये देणे मनपाच्या सत्तसाधा-यांना कोणत्या हिशोबाने परवडत आहे?असा सवाल गेल्या चार वर्षापासून विरोधी पक्ष्ातील नगरसेवक सातत्याने सभागृहात विचारत आहेत.

नगरसेवग संदीप सहारे यांनी अनेकदा सभागृहात आय.टी.क्राफ्ट ही एजंसी गुंडाळण्यात यावी,या एजंसीने करारातील एकाही अटीचे पालन केले नाही,तरी देखील ती फक्त एका सत्ताधारी नेत्याचे ‘महाल कनेक्शन’असल्यामुळे पोसल्या जात असल्याचे आरोप केले,यावर महापौर संदीप जोशी यांनी सभागृहात पुढील सभेत अहवाल सादर करण्याची सूचना केली होती,मात्र ती पुढील सभा आणि सभेच्या पटलावर आय.टी.क्राफ्टची कुंडली कधीच ठेवल्याच गेली नाही,हे विशेष!

करोना महामारीमुळे एकीकडे एकेका बेडसाठी,ऑक्सीजनसाठी आणि वेंटिलेटरसाठी शेकडो नागरिकांनी भर रस्यात दम तोडला आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.ज्याचा सोबत आयुष्य काढले तोच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देखील नगारिकांना उपलब्ध झाला नाही,दूसरीकडे या दाहक वास्तवतेतून कोणताही बोध न घेता अद्यापही सत्ताधारी तीन कोटींचा व्यय पुन्हा नगर रचना विभागात गुन्ठेवारी संगणकीय प्रणालीच्या देखभालीच्या नावावर ओरबडण्यास आतूर झाल्याचे विदारक दृष्य उमटले आहे.

हे तीन कोटी म्हणजे, साढे पाच लाख रुपये महीन्याचे अश्‍या खासगी एजंसीवर खर्च करण्याऐवजी व त्यातून आपले ‘कमिशन’आेरबडण्याऐवजी त्या सत्ताधारी नेत्याने मनपाच्या रुग्णालयात खाटा,ऑक्सीजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी,गुन्ठेवारी प्रणालीच्या देखभालीसाठी मनपातील अभियंतांच्याच बुद्धिमत्तेचा उपयोग करावा,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
मार्च-२०२१ मध्ये या एजंसीचा करार संपताच व मागीच चार वर्षापासून ही एजंसी व एजंसीचे सहा कर्मचारी मनपा व नागपूरकर नागरिकांवर चांगलाच बोजा ठरले असताना पुन्हा याच एजंसीला मागच्या दारातून मनपाच्या नगर रचना विभागात तीन वर्षांसाठी प्रस्थापित करुन तीन कोटींचा बोजा नागपूरकरांवर पुन्हा लादण्याच्या या कृत्याचा सभेत निषेध केला जाईल तसेच वेळ पडल्यास या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल,असे नगरसेवक संदीप सहारे म्हणाले.

करोनाच्या काळात आधीच मनपाच्या कृतीशून्यतेमुळे नागपूरकर जनता सत्ताधा-यांवर संतापली आहे,त्यात पुढील निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर येऊ की नाही,या भीतीने त्यांच्याच एजंसींना वेगवेगळ्या विभागात आधीच कंत्राट देऊन ठेवणे,हे कोणत्या तत्वात बसतं?असा सवाल ते करतात. गेल्या तेरा वर्षात सत्तसाधा-यांनी वेगवेगळ्या एजंसीमार्फत नागपूरकर जनतेची पुरती वाट लावली आहे.मग तो कच-याचा प्रश्‍न असो,सिमेंट रस्ते असो,स्ट्रीट लाईट्स असो,मालमत्ता कर असो, किवा पाण्याचा प्रश्‍न असो,सर्व काही खासगी कंत्राटदारांना देऊन ’आपण सगळे भाऊ..सगळे मिळून खाऊ’या वृत्तीने मनपाच कंगाल केली.

मनपाचा आस्थापना खर्च ५० टक्क्यांच्या वर-
राज्यातील नागपूर महानगरपालिका ही अशी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिचा आस्थपना खर्च म्हणजे कर्मचारी,अधिका-यांच्या पगारावरच ५० टक्क्यांच्या वर खर्च केला जात आहे!माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात निर्धारित २ हजार ५२३.८२ कोटींच्या महसूली लक्ष् पैकी केवळ ३० टक्के म्हणजे फक्त ८७६ कोटी तिजोरीपर्यंत पोहोचले होते.अश्‍यावेळी स्थायी समिती सभापती पिंटू झलके आता बजेट सादर करणार आहेत त्यात इतर खर्चांसोबतच नगर रचाना विभागात गुन्ठेवारी संगणकीय प्रणालीचे देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली ३ कोटींचे बजेट आय.टी.क्राफ्टसाठी निर्धारित करीत असल्यामागे कोणाचे कमिशन दडले आहे,यावर बराच खल मनपाच्या काही प्रशासकीय अधिका-यांमध्ये झाला.येत्या २० तारखेच्या सभेत या कराराला मंजूरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आय.टी.क्राफ्टचे दोन्ही संचालक यांचे या सत्ताधारी नेत्याशी अतिशय जवळचे व मधूर ’महालकर ‘संबंध असल्याने गेल्या चार वर्षांपासून नागपूरकर जनतेवर कोट्यावीधीचा बोजा आधीच पडला असताना पुन्हा याच एजंसीला मागच्या दाराने मनपात आणण्याचा, तीन कोटींचा घाट घातल्यास नागपूरकर जनता येत्या निवडणूकीत याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नसल्याचे संदीप सहारे यांनी खास ‘सत्ताधीश’जवळ मनोगत व्यक्त केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या