

शहरातील मोठ्या इमारती, हॉटेल, हॉस्पीटल, कारखाने व दुकानांना नोटीस देऊनही अंमलबजावणी नाही
नागपूर, ता. ६ : नागपूर शहरात आग प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजनेकरिता मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे शहरातील मोठ्या इमारती, हॉटेल, हॉस्पीटल, कारखाने व दुकानांना नोटीस देऊनही त्याची तामील न करणाऱ्या प्रतिष्ठानांविरुद्ध अग्निशमन विभागाने न्यायालयात फौजदारी प्रकरणे दाखल करण्यास प्रारंभ केला.
आगप्रतिबंधक व जीवसंरक्षण कायद्यांतर्गत मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे कलम ५,६ व ८ अन्वये नोटीस तामील करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित नोटीसदारांनी कायद्यात नमूद उपाययोजना सदर परिसरात केल्या नाहीत. यामुळे शहरातील लोकांच्या जीवाला तसेच संपत्तीला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोटीसीची अवधी संपल्यानंतरही संबंधित प्रतिष्ठानांनी त्यावर अंमल न केल्याने मनपाचे अग्निशमन विभाग प्रमुख राजेंद्र उचके यांनी मनपाच्या कोर्ट क्र. १ व २ मध्ये खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यापैकी मे. मॅजिक फूड कोर्ट, जरिपटकाचे संचालक संजय कुकरेजा यांना २३ ऑक्टोबर २०२० रोजी, मे. नरेश ठाकूर, राणी दुर्गावती चौक यांना २१ जानेवारी २०२१ रोजी चिखली येथील मे. हसमुखभाई पटेलचे संचालक ललितभाई जेठाभाई पटेल यांना ९ मे २०१९ रोजी, मे. कालका एंटरप्राईजेस चिखलीचे संचालक पोपटलाल रतन पटेल यांना २० जानेवारी २०२१ रोजी, हॉटेल हेरिटेज सिव्हील लाईनचे संचालक हरमिंदरसिंग खंडुजा यांना १२ जानेवारी २०१८ रोजी नोटीस पाठविण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध समन्स काढण्यात आले असून तक्रारींवर गुन्हे सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा व ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
न्यायालयात मनपातर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी तक्रार दाखल केली. विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक विधी अधिकारी अजय माटे यांनी युक्तिवाद केला.




आमचे चॅनल subscribe करा
