

पर्यावरणप्रेमींना पडला प्रश्न
सांडपाणी प्रकल्पापर्यंत पाणी नेता कसे?
चार फूटांवरील गणपती विसर्जन कोराडी,कन्हानमध्ये:मनपा आयुक्तांची पर्यावरण रक्षणाची ‘कल्पकता’ दिसली!
कोराडीत माणसे राहत नाही का?पर्यावरणवाद्यांचा संताप
बावणकुळेंवर विक्रेत्यांचा रोष!
नागपूर,(nagpur)ता.१० सप्टेंबर २०२२:दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वांचे लाडके गणराया वाजत-गाजत आले. दहा दिवस भक्तांचा पाहूणचार घेतला मात्र आता आपल्या शिवलोकात परतीची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे भू-लोकातील ‘प्रशासकीय धोरणांच्या’ शाश्वत नियमाप्रमाणे यंदाही हा मंगलमूर्ती उदास होऊन परतला,शहरातील तलावात यंदा मूर्ती विसर्जनाची पूर्ण व तितकीच कठोर बंदी असल्या,ने चार फूटांच्या वर उंची असणा-या विविध मंडळांच्या शेकडो गणरा-यांना शहरालगत कोराडी व कन्हान नदी पात्रात शिरवण्याचे धोरण मनपाचे उच्च विद्याभूषित सनदी अधिकारी राधाकृष्णन.बी व स्वत: वैद्यकीय अधिकारी असणारे व आरोग्याची नस ओळखणारे जिल्हाधिकारी डॉ.विपीन विटनकर यांनी राबवले.
कोराडी तलवाचे दोन भाग असून एक भागातील पाणी वीजनिमिर्तीसाठी महाजनको पंपिंगसाठी उचलत असते.दुस-या बाजूला साचलेले पाणी आहे त्यात कोराडी परिसरातील अनेक फूल व फळ विक्रेते बाराही मास शिंगाडे तसेच कमळांची शेती करुन आपल्या कुटूंबियांचे भरणपोषण करतात.यावेळी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या ‘कल्पक’ धोरणेतून कोराडी तलावात गणपती विसर्जनाची योजना राबविण्यात आल्याने येथील नागरिकांनी तसेच पर्यावरणवाद्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला.याशिवाय या तलावातील हक्काचे व नैसर्गिक अधिवास असणा-या जीव जंतूंचे काय?त्यांनी कोणत्या मंत्र्या-संत्र्यांकडे दाद मागावी?असा सवाल समाज माध्यमात उमटला.
काही सनदी अधिकारी फक्त ‘होयबा’श्रेणीतील असून, सरकार तसेच मंत्र्यांच्या आदेशाला ‘होय’उत्तर देण्यासाठी व माना डोलवण्यासाठीच पदावर असतात,असा संताप समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे.नागपूर शहराच्या बाहेर गणपती मूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेऊन मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी यांनी जरी शहरातील तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी आपली पाठ थोपटून घेतली असली तरी,कोराडी परिसरात माणसे राहत नाही का?की तिथे ढोर-डूकरे राहतात?असा संताप मनपा आयुक्तांवर आता व्यक्त केला जात आहे.

नागपूरातील गणपतींच्या विसर्जनामुळे कोराडी तलावाचा श्वास कोंडला जाणार नाही का?शहराच्या बाहेर आहे म्हणून हे सनदी अधिकारी गणपती मूर्तींना शहरा बाहेर‘फेका’या मानसिकतेने काम करीत आहे का?असा रोखठोक सवाल पर्यावरणवादी आयुक्तांना विचारत आहेत.आयुक्तांनी फक्त आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले.स्वत:चे शहर स्वच्छ राखले,कोराडीचा तलाव प्रदुषित केला,असा रोष आता मनपा आयुक्तांवर व्यक्त केला जात आहे.
मनपातर्फे काेराडी तलावाजवळ ६० फूट खोल व १५० फूट रुंद कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला असून काल शुक्रवार रोजी या कृत्रिम टँकमध्ये २०८ तर आज शनिवारी रात्री ९.३० वाजेपर्यंत ५३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले असल्याचे पत्रक मनपाने जारी केले मात्र नागपूर शहरात हजारो गणेश मंडळांनी पाेलिस विभागात नोंदणी केली होती,त्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन नेमके कुठे झाले?कोणत्या पाण्यात झाले?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काही सनदी अधिका-यांचा, पाण्यासारख्या मूलभूत स्त्रोत्राकडे बघण्याचा दृष्टिकोणच ‘दूषित’असल्याची टिका करीत, तलाव हे फक्त सौंदर्यीकरण व कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण आहे, असाच त्यांचा समज असल्याचा आरोप पर्यावरणवादी करतात.सनदी अधिका-यांनी जनजागृतीवर अधिक भर दिल्यास येत्या काही काळात गणेशउत्सवाचे रुप पालटेल असा विश्वास ही ते व्यक्त करतात.

विविध मंडळांनी दर वर्षी एकच भव्य गणेशाची कोणत्याही धातूची मूर्ती आपल्या मंडपात बसवावी.त्यासोबतच लहान आकारची मूर्ती दर वर्षी विकत आणून त्याची प्रतिष्ठापणा करावी.अनंत चतुदर्शीला या लहान मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे.या शिवाय ‘ट्री’गणेशाच्या संकल्पनेला प्रोत्साहन द्यावे.या गणेशाच्या मूर्तीच्या आत बिजे असतात.विसर्जनानंतर त्यातून झाड निर्मित होतात.
आधीच औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फूटल्याने या परिसरातील शेकडो गावांना प्रदुषणाने विळखा घातला आहे.त्यात गणेश मूर्तींवरील पेंट,केमिकल,सजावटीचे साहित्य,प्लास्टिक,थर्माकोल काच,चिखल,यामुळेही तलावांचा श्वास कोंडतो आहे.धार्मिक सणे ही प्रत्येक भाविकासाठी संवेदनशील बाब असली तरी आता वेळ आली आहे सद् सद् विवेकबुद्धी वापरण्याची.संकल्प केला तरच २०५० च्या भावी पिढीसाठी शहरातील व ग्रामीण भागातील नैसर्गिक जल स्त्रोते आपण वाचवू शकतो,अशी अपेक्षाही पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात.
कृत्रिम तलावांच्या पाण्याचे काय करता?
मनपाच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ.गजेंद्र महल्ले यांना याबाबत विचारले असता भांडेवाडी येथील एसटीपी प्लान्टमध्ये ते पाणी पुर्नप्रक्रियेसाठी नेले जाते,असे सरकारी उत्तर देऊन ते मोकळे झाले मात्र मनपाने रबराचे एकूण ४० तलाव,लोखंडी सेंट्रिंगचे २७९ तलाव,२९ खड्डयांचे कृत्रिम तलाव तसेच ८ फिरती विसर्जन केंद्रे भाविकांना गणपती विसर्जनासाठी उपलब्ध करुन दिली,या सर्व पाण्याची उचल मनपा नेमकी कशी करते?हे पाणी उचलून टँकरमध्ये भरल्या जातं का?यासाठी मोटार लावता का?कोणत्या यंत्राने या कृत्रिम तलावामधील पाणी उचलल्या जातं?भांडेवाडीपर्यंत हे पाणी नेण्यासाठी कोणती यंत्रणा मनपाकडे कार्यरत आहे?खरंच भांडेवाडीपर्यंत घेऊन जातात की गणपती विसर्जनाचे हे पाणी नाग नदीत फेकून दिल्या जातं?भांडेवाडीत तर दररोज ३६० एमएलडी पाण्यावरच पुर्नप्रक्रिया होते मग गणेश विसर्जनासाठी वापरण्यात आलेल्या उर्वरित पाण्याचे मनपा काय करते?
सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व कृत्रिम तलाव मनपा रिकामी कशी करतात?भांडेवाडीपर्यंत हे पाणी जर टँकरद्वारे नेले जात असेल तर कृत्रिम तलावांचे पाणी टँकरमध्ये भरण्याची प्रक्रिया नेमकी कशाने होते?असे अनेक सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करतात व मनपाकडे भाविकांच्या श्रद्धेचे व विश्वासाचे ‘पाणी-पाणी’करणारी ‘अदृष्य’यंत्रणा असल्याचीही खोचक टिका ते करतात.
मनपाच्या कारभारावर बोलायचेच असल्यास, सर्वोच्च न्यायालयापासून तर राज्य सरकारपर्यंत सर्वांनी पीओपी (Ganesh)मूर्तींवर बंदी घातली आहे,तरीही मनपाच्या कृत्रिम तलावात यंदा ७१७ पीओपीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन झाले.शहरातील पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर मनपाचा किती वचक आहे,या वरुन हे सिद्ध होतं.नागरिकांचाही यात तितकाच दोष असून पर्यावरण संरक्षण ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येकाची असल्याचे ते सांगतात.
त्याच बरोबर संपूर्ण शहराचे सिवेज ज्या नाग नाल्यात सोडले जाते,आपले लाडके बाप्पा विसर्जनानंतर जर अश्या नाग नाल्यात प्रवाहीत होत असतील तर भाविकांनी देखील यांचा विचार करने गरजेचे आहे.आपल्याच घरातील लहान बादलीत आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करा व त्या मातीचा उपयोग आपल्या अंगणातील झाडांसाठी करा,अशी आग्रहाची विनंती देखील पर्यावरणप्रेमी भाविकांना करतात.
कृत्रिम तलावांमध्ये शेवटी आपल्याच पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा उपयोग केला जात असल्याचा दावा ही ते करतात.आम्ही कोणत्याही सरकारच्या किवा मंत्र्यांच्या विरोधात नाही मात्र ‘धोरणांच्या’विरोधात नक्कीच आहो,असे सांगून भारतीय जनता पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळेंवर कोराडी परिसरातील नागरिकांनी चांगलाच रोष ही व्यक्त केला.
बावणकुळे यांच्याच सांगण्यावरुन राज्य सरकारने यंदा र्निबंधमुक्त सणवार साजरे करण्याचा संकल्प सोडला असल्याचा दावा केला जात आहे मात्र त्यासोबतच पर्यावरणाचाही विचार करने गरजेचे होते.कृत्रिम तलाव किवा कोराडी तलावात गणपती मूर्तींचे विसर्जन हा काही ‘शाश्वत’ उपाय होऊ शकत नाही.कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करुन तलावांचे रक्षण केले,अशी पाठ थोपटून घेण्यातही काहीही हासिल नाही.नागरिकांना नियोजिनाविषयी दरवेळी मनपातर्फे अर्धवट माहिती देऊन ‘अंधार’झाकून ठेवला जातो,अशी टिका ते करतात.
कोराडी (Koradi)नदी तसेच काही प्रमाणात कोलार नदीत मूर्ती विजर्सनांचा जो ‘उच्छाद’यंदा दिसून पडला,कोलार हे आधीच फ्लाय ऍशच्या नियमित विसर्जनाने प्रदूषित झाले आहे, त्यामुळे नागपूर शहराचा पाणीपुरवठा नियमितपणे विस्कळीत होतो आणि आता प्रदूषणात भर घालणे म्हणजे गणपती विसर्जन! कोराडी तलाव देखील प्रदूषित होईल कारण या तलावाचा वापर कमळ आणि शिंगाडे लागवडीसाठी केला जातो. या उपक्रमांचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होणार आहे आणि हे नागपुरातील नागरिकांचे पिण्याचे पाणी प्रदूषित होते!त्यामुळे बारेगावं नदी,बिना नदीचा संगम,पेंच,कन्हान,नागपूर शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या सर्वच स्तरावर जल प्रदुषणाला ‘मुुक्तहस्ताने’ आमंत्रित करण्यात आलं आहे,असा आरोप ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या’ अध्यक्षा लीना बुधे यांनी केला.
कोराडी तलावात आधीच राख टाकली,त्यात औष्णिक वीज केंद्रामुळे होणारे प्रदुषण,त्यात कोळसा खाणींचे प्रदुषण, त्यात वीट भट्ट्यांमुळे होणारे प्रदुषण ,त्यात आणखी नागपूर शहरातील गणेश मूर्तींच्या विसर्जनातून निर्माण होणारे प्रदुषण,याचा अर्थ चंद्रशेखर बावणकुळे यांना कोराडी अर्थात त्यांच्याच मतदारसंघात ‘माणसे’ राहत नाही असा त्यांचा समज आहे का?असा सवाल आता या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणा-या लोकप्रतिनिधीला येथील पर्यावरणप्रेमी करीत आहे.
( छायाचित्रे: कोराडी नदीत भाविकांद्वारे गणपती विसर्जन करताना)
……………………………………………




आमचे चॅनल subscribe करा
