

नागपूरकरांचा प्रश्न
नागपूर, ता. २६ : कोव्हिड रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णालयातील खाटा ‘फुल्ल’ झाल्या आहेत. डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे उपचारात अडसर निर्माण होतोय, या सर्व बाबींचा आणि व्यवस्थेचा आढावा महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज मेयोच्या दौऱ्यादरम्यान घेतला. डॉक्टरांची कमतरता बघता मनपाच्या सेवेतील काही डॉक्टर्स मेयो मध्ये सेवा देतील. त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली मात्र मनपाच्या आरोग्य विभागाचा एकदंरित ‘नावलौकिक‘ बघता मनपाचे डॉक्टर्स हे गरीब,गरजू जनतेसाठी असणा-या मनपाच्याच दवाखान्यात सेवा देतात का?असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शनिवारी (ता. २६) इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, सामाजिक कार्यकर्ता बबलू कुकरेजा उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मेयोमध्ये असलेली व्यवस्था, खाटांची स्थिती, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची स्थिती, ऑक्सिजनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला.
मेयोमध्ये उपलब्ध ६०० बेडसपैकी ४८० बेडस कोव्हिड रुग्णांसाठी राखीव आहेत. १५ बेडस किडनीचे आजार असलेल्या आणि कोव्हिड झालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. कोव्हिड झालेल्या गरोदर स्त्रियांसाठी १५ बेडस राखीव आहेत. एक ४० खाटांचा वॉर्ड कोव्हिडमधून बरे झालेले मात्र काही आजार झालेल्या रुग्णांसाठी राखीव आहे. तर संशयित रुग्णांसाठी सारीचे दोन वॉर्ड आहेत.
मेयोमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या सुमारे ७० डॉक्टरांची परीक्षा असल्याने त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची आवश्यकता आहे. मेयोने प्रशासनाकडे ७५ डॉक्टरांची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डॉक्टर्स देण्याचे आश्वासन दिले. त्यापैकी १५ डॉक्टर्स पाठविले, त्यापैकी ७ डॉक्टर्स रुजू झाले. मनपाने ९ डॉक्टर्स पाठविले. ते रुजू झालेत. जे अतिरिक्त डॉक्टर्स लागतील, त्याची पूर्तता मनपाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न .करण्यात येईल,असे आश्वासने महापौरांनी दिले आहे.
मात्र मनपाच्या दवाखान्यांचा एकंदरित कारभार बघता किती डॉक्टर्स हे प्रामाणिकपणे आरोग्य विभाग सांभाळतात आहे?हा संशोधनाचा विषय आहे. महापौरांचा हेतू चांगला असला तरी प्रशासनातील काही बेजवाबदार वैद्यकीय अधिकारी ज्यांना मनपाच्या दवाखान्यात बसून आयता गलेलठ्ठ पगार मिळतोय ते कशाला मेयोमध्ये कोविड रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी महापौरांचा शब्द पाळतील?अशी चर्चा आज मनपा कर्मचा-यांमध्ये ऐकू आली.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्याशी चर्चा झाली असून उद्या १५ डॉक्टर्स रुजू होतील असे त्यांनी सांगितल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. नागपूरकर जनतेला या यादीत डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार आदींसारखे तज्ज्ञ सर्जन डॉक्टर्स देखील मेयोमध्ये रुग्णांना सेवा देणार आहेत का?या यादीची प्रतिक्ष्ा आहे.
याशिवाय मनपाच्या दवाखान्यांमध्येच जिथे परिचारिकेंचा तुटवडा आहे,असे असताना मनपा मुख्यालयात अति.आयुक्तांनी ४-५ परिचारिकांना वेगळ्याच कामात गुंतवूण ठेवलं आहे!त्यांची देखील सेवा ही कोविड-१९ च्या महामारीच्या काळात जनतेला आपल्या आरोग्यासाठी मिळणार आहे का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आय.ए.एस. अधिकारी करणार व्यवस्थापन-
मेडिकल आणि मेयो रुग्णालयांचे संचालन व्यवस्थितपणे करण्यासाठी दोन्ही रुग्णलयांची जबाबदारी आय.ए.एस. अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. रुग्णालयातील अधिकारी आरोग्य सेवेचे व्यवस्थापन बघतील तर प्रशासनाने जबाबदारी दिलेले अधिकारी मनुष्यबळाचे व्यवस्थापन बघतील, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
