

विकास कुंभारे यांचा ३,७४१ मतांनी निसटता विजय
डॉ.ममता खांडेकर
(Seniour Journalist)
नागपूर: मध्य नागपूरात काँग्रेसने युवा सळसळत्या तरुणाईला बंटी शेळकेला, जाती-पातीचे राजकारण झुगारुन पक्ष्ाची उमेदवारी दिली, या संधीचे बंटी शेळेके याने सोने केले. शेवटच्या अंतिम फेरीपर्यंत म्हणजे २२ सा व्या फेरीपर्यंत बंटी शेळके यांने मुरललेल्या व सहा वेळा निवडणूकीचा अुनभव असलेले विकास कुंभारे यांना अतिशय कडवी लढत देत, त्यांना ‘निसटत्या’विजयावर समाधान मानायला मजबूर केले. पोस्टल बॅलेटमधील मतांमध्ये देखील शेळके यांना ११६ तर कुंभारे यांना १२८ मते मिळाली यावरुन ‘मध्य’ची लढत कुंभारे यांच्यासाठी किती जीवश्चं-कंठश्चं आली होती याचा प्रत्यय येतो. कुंभारे हे विजयी उमेदवार घोषित झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्ष्ासमोरच शेळके व कुंभारे यांची गळाभेट झाली,त्यावेळी शेळके यांना प्रतिक्रिया विचारली असता,‘ऐन दिवाळीत मी संक्रातीचा पंतग उडवला’अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
याचा अर्थ कुंभारे यांना जल्लोषाचे फटाके फाेडूच दिले नाहीत,तर विजयाची रॅलीही काढण्याची संधी शेळके यांनी दिली नाही. ऐन दिवाळीत संक्रांतीची पतंग उडवून दाखवली.शेळके यांना मध्यमधून मतदारांनी भरभरुन मते दिली, शेळके यांना मध्य मधून एकूण ७१,४ ०९ मते मिळाली तर कुंभारे यांना ७५,१५० मते मिळाली, त्यांच्यातील विजयाचे अंतर फक्त ३,७४१ होते. विकास कुंभारे यांनी निवडणूकीच्या पूर्वी मतदारसंघातून २८ हजार मतांचे मताधिक्य घेणार असल्याची ‘दर्पोक्ती’ केली होती,या मतदार संघातील हलबा समाजाची मते हीच त्यांची ताकद होती मात्र शेळके यांनी संपूर्ण मतदार केंद्रातूनच कुंभारे यांची मते खेचल्याचे सिद्ध झाले.
पहील्या फेरीपासून बंटी शेळके यांनी चांगलीच लीड घेतली होती,मधल्या काही फेर्यांमध्ये कुंभारे यांनी मताधिक्य वाढवले मात्र शेवटच्या ७ ते ८ फेर्यांमध्ये पुन्हा शेळके यांनी चांगलीच लीड घेऊन कुंभारे यांना चांगलाच घाम फोडला. १५ व्या फेरीनंतर कुंभारे हे १० हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा होती मात्र शेवटच्या ८ फेर्यांनी सर्व गणित चुकवले आणि कुंभारे यांचा विजयाचा रथ ३,७४१ मताधिक्यावरच थांबला.
एमआयएमने केला घात-
मध्यमधून एमआयएमकडून अब्दूल शारिख पटेल हे उभे होते. मोमिनपुरात प्रचारादरम्यान एमआयएमचे सर्वेसर्वा ओवैसी यांची प्रचार सभा झाली होती,यात त्यांनी उघडपणे ‘चचा लिख लो,काँग्रेस अब जिंदा होनेवाली नही’ असे आवाहन करीत काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान, असे मतदारांना बजावले होते,याचा परिणाम पटेल यांना मिळालेल्या मतांमध्ये दिसून पडतो. पटेल यांना मध्य मधून एकूण ८,५६० मते मिळाली आणि याच मतांनी शेळके यांच्या विजयाचे गणित बिघडवले. ही मते काँग्रेसकडे परिवर्तीत झाली असती तर कुंभारे यांचा पराभव अटल होता.
मतदारांचे आभार मानायला उद्या मोमिनपुऱ्यात आभार पदयात्रा- बंटी शेळके
मतदारांनी मतांचे जे भरभरुन दान माझ्या पदरात घातले ते बघून मी भारावून गेलो आहे. त्यांचे आभार मानायला मी उद्या शुक्रवारी जुम्म्याच्याच दिवशी सकाळी ११ वा. आभार पदयात्रा काढणार असल्याचे ते म्हणाले. यूथ काँग्रेसने या निवडणूकीत खूप परिश्रम घेतले आणि ज्येष्ठ नेते, (सिनीअर नेते नाही) त्यांनी खूप सहकार्य केल्याचे ते म्हणाले.मोठ-मोठे नेते जे स्वत:ला कार्यकर्त्या समजतात मात्र ते कार्यकर्ता नसून ते नेते आहेत त्या नेत्यांच्या जोरावर मी ही निवडणूक लढलो, काँग्रेस पक्ष्ाच्या ‘सीनिअर’ नेत्यांच्या जोरावर नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.युवा काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी स्वत:हून बूथ लावले, खूप परिश्रम घेतले मात्र आम्ही थोडसं कमी पडलो,अशी कबूली त्यांनी दिली. या पुढे ही आजपर्यंत जे मी करत आलो त्याच पद्धतीने सकारात्मक पद्धतीने मी आपला विरोध दर्शवत राहणार असल्याचा इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला.े
गांधी सागर तलावाचा विकास करणार-कुंभारे
मध्य नागपूरच्या मतदारांनी मला पुन्हा एकदा विकासाची संधी दिली या संधीचे मी पुन्हा सोने करेल,माझ्या कामात सर्वात पहीले प्राधान्य हे गांधी सागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी जे १७ कोटींचे अनुदान मिळाले आहे त्याचा उपयोग करील याशिवाय पोलिस क्वार्टसची समस्या लवकरच मार्गी लावील, इतवारी,महाल यासारख्या अतिशय वर्दळीच्या भागातील पार्किंगची समस्याकडे लक्ष् देणार आहे. याशिवाय माझ्या कार्यकर्त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो निश्चितच सार्थकी लावेल.शेळके यांनी दिलेल्या ‘टफ’फाईट बद्दल कुंभारे यांना विचारले असता, निश्तिच शेळके यांनी अतिशय ‘टफ’फाईट दिली,मी तर म्हणेल आजपर्यंत मी सहा वेळा निवडणूकीला सामोरे गेलो मात्र इतकं कडवं आव्हान मी अनुभवलं नाही,अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
मताधिक्य सोडा इथे गळ्यापर्यंत आलंय-
मिडीया रुममध्ये कुंभारे यांचे निकटतम् नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी चक्कर मारला असता त्यांना १८ व्या फेरीनंतर कुंभारे यांच्या अतिशय कमी झालेल्या मताधिक्याबाबत छेडले असता, अहो मताधिक्य सोडा,येथे गळ्यापर्यंत आलंय, विजय म्हत्वाचा मग तो कितीही मतांनी असू दे, अशी त्यांची प्रार्थना होती, एकंदरित भाजपचे जे ज्येष्ठ नेते कायम हवेत उडायचे त्यांना मध्यच्या मतदारांनी अचानक जमीनीवर आणल्याचा तो प्रत्यय होता. खरे आहे शेवटी ‘जो जिता वो सिंकदर‘याचीच प्रचिती त्यांच्या ताणलेला चेहर्यावरणं दिसून आले.
तीन ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड-मताधिक्य आणखी झाले असते कमी
५२,७५ आणि ७६ या क्रमांकाच्या ईव्हीएम मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे या मशीनमधली मते मोजण्यात आली नाही. बंटी शेळके यांनी यावर आक्ष्ेप नोंदवणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दूपारी सव्वा चार वाजता केला होता. आक्ष्ेपांचे निराकरण होण्यासाठी त्यांनी दोन तासांचा वेळ मागितला होता मात्र त्यांना ५ वा.५ मिनिटांपर्यं अर्धा तासांचा वेळ देण्यात आला. या तिन्ही क्रमांकांच्या ईव्हीएम मशीन्स या मोमिनपूरा भागातील असून यात काँग्रेस पक्ष्ाचीच मते असल्याचा दावा करण्यात आला मात्र,कुंभारे यांच्या विजयाचे अंतर पाहता ते ३,७४१ मतांनी विजयी झाले असल्याने या तिन्ही ईव्हीएम मशीन्समधून जास्तीत जास्त १३०० मतांचा फरक राहीला असता,एवढ्या मतांने विजयी उमेदवार पराभूत होण्याची शक्यता नसल्याने शेळके यांचा अर्ज रद्द करण्यात आला. या मशीन्समधील मते मोजल्या गेली असता कुंभारे यांचे विजयाचे मताधिक्य हे आणखी कमी झाले असते. साधारणत: दोन हजारच्या जवळपास मतांनीच त्यांना विजय स्वकीरावा लागला असता.
काय होती कारणे-
काँग्रसेच्या उमेदवाराला हलक्याने घेतले
पारंपारिक हलबा मतांवरच निर्भर
पाच वर्षांच्या कारभारात अनेकदा पक्ष्ाच्या विरोधातच घेतल्या पत्र परिषदा
हलबा मतांमुळे इतर जातीच्या मतदारांनाकडे दूर्लक्ष्
सुधाकर कोहळे यांचे कापलेले तिकीट,त्यांच्या समर्थकांचे सहकार्यच नाही
शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांचे समर्थक नाराज
तरुण मतदार यांची जाती-पातीच्या राजकारणावर असलेली नाराजी
मध्य मध्ये मोठ्या संख्येने असणारा व्यापारी वर्ग नाराज
मुस्लिमांच्या मतांकडे केलेले दूर्लक्ष्
पुढील निवडणूकीत आता भारतीय जनता पक्ष्ाच्या या उमेदवाराला नव्याने रणनीती तयार करुन,जाती-पातीच्या राजकारणापलीकडे,सर्वसमावेशक विकासाची दूरदृष्टि घेऊन कामाला लागण्याचा संदेशच जणू मध्यच्या मतदारांनी दिला असल्याचे बोलले जाते.
मध्य नागपूर
पोस्टल बेलेट निकाल
एकूण 348
अवैध 90
वैद्य 258
शेळके 116
कुंभारे 128
एमआयएम 2
खऱ्या लोकशाहीचा विजय-
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्ष्ातून बंटी शेळके बाहेर पडताच कुंभारे हे आपले प्रमाणपत्र घेण्यास तिथे अाले, त्यांना पाहताच शेळके यांनी आधी त्यांना वाकून नमस्कार केला व कडकडून गळाभेट घेतली,छायात्रिकारांना खास पोज देत, कुंभारे भाऊंपेक्ष्ा माझा फोटो जास्त चांगला आला पाहिजे, असे म्हणत या युवा नेत्याने आपला निसटता पराभव देखील अतिशय दिलदार मनाने स्वीकारला. निवडणूक संपली की मतभेद ही संपतात,हेच खरे. हे दृष्य म्हणजे भारतातील लोकशाहीचा खरा विजय झाला,अशी प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटली.




आमचे चॅनल subscribe करा
