फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणमतदानाच्या तीन दिवस आधी देखील कामठीत मतदार नोंदणी!

मतदानाच्या तीन दिवस आधी देखील कामठीत मतदार नोंदणी!

Advertisements
अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावरही ही किमया निवडणूक आयोगाने साधली:काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

राहूल गांधींनी कामठीचं विश्‍लेषण हवेत नाही दिले:सुरेश भोयर
जिल्हाधिकारींनी मतदार यादीत नियमबाह्यरित्या १५ दिवसात  १२ हजार नावे ऑन लाईन पद्धतीने समाविष्ट केली!
ओळखपत्रे न तपासता छत्तीसगड,मध्य प्रदेशचे कामगार,मजूर हे देखील कामठीचे मतदार!
लोकसभेच्या पराभवानंतर अवघ्या चारच महिन्यात कामठीत ३५ हजार मतदारांची नोंदी
काँग्रेसचा लढा निवडणूक आयोगाशी, भाजपशी नाही
नागपूर,ता.९ जून २०२५: काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी नुकतेच गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निवडणूकीत ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून मतदानाची चोरी तसेच निवडणूक आयोगाची भूमिका यावर कडाडून प्रहार केला.या निवडणूकीत सामना निश्‍चिती(मॅच फिक्सिंग)झाल्याचा आरोप केला.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्याच्या कामठी मतदारसंघातील मतदार यादीतील घोळाचे उदाहरण दिले होते.यानंतर भाजपचे नेते,महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे जे  काँग्रेसचे उमेदवार व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश भोयर यांना पराभूत करुन विजयी झाले, त्यांनी राहूल गांधीना कामठी मतदारसंघाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले होते.यावर आज प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत, सुरेश भोयर यांनी,राहूल गांधींनी कामठी मतदारसंघाचे विश्‍लेषण हवेत केले नसल्याचे विधान केले व निवडणूक आयोगावर परखड आगपाखड केली.
कामठी मतदारसंघात निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.लोकसभेच्या दारुण पराभवानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरुन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदी घडवून आणण्यात आल्या.महत्वाचे म्हणजे फक्त आधारकार्डच्या आधारावर ऑन लाईन पद्धतीने कामठीत १५ दिवसात १२ हजार मतदारांची नोंद केली.यासाठी कायद्यानुसार इतर कोणतीही कागदपत्रे तपासली गेली नाही.हे बोगस मतदार महाराष्ट्रातील नसून चक्क छत्तीसगड,मध्यप्रदेश तसेच इतर राज्यातून उदरनिर्वाहसाठी आलेले कामगार व मजूर वर्ग असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
जून २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत कामठी मतदारसंघामध्ये ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते.त्यानंतर अवघ्या चारच महिन्यात महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक पार पडली.त्यावेळी कामठी शहरात मतदारांची संख्या ही ५ लाख,०१ हजार ७७० एवढी झाली.या कालावधीत ३५ हजार ५३९ मतदार संख्या वाढली.ही वाढ कश्‍या पद्धतीने करण्यात आली हे निवडणूक आयोगाला चांगल्याने माहिती आहे,असा टोला त्यांनी हाणला.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी विधानसभेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली,ही बाब निवडणूक आयोगाला देखील माहिती आहे.त्यावेळी कामठी मतदारसंघात २३ हजार मतदारांची संख्या वाढली होती.२९ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने देखील मतदारांची एकूण संख्या ४ लाख ८८ हजार अशी प्रसिद्ध केली होती.
मात्र,अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर देखील व मतदानाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वीपर्यंत १२ हजारच्या वर मतदारांची संख्या कामठी मतदारसंघात वाढली!याचा अर्थ अवघ्या १५ दिवसांत निवडणूक आयोगाने १२ हजार मतदारांची ती देखील ऑन-लाईन नोंदणीचा विक्रम गाठला,यात मतदारांचे आधारकार्डशिवाय इतर कोणतीही अत्यावश्‍यक कागदपत्रे तपासलीच गेली नाही,मूळात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर देखील निवडणूक आयोगाने मतदानाच्या तीन दिवस आधीपर्यंत मतदारांची नोंद केली,असा सरळ आरोप याप्रसंगी सुरेश भोयर यांनी केला.
माहितीच्या आधारावर निवडणूक आयोगाकडे या वाढीव १२ हजार मतदारांची माहिती मागितली असता ती देण्यात आली नाही!हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा व लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे भोयर म्हणाले.याचा अर्थ निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंद फक्त एका पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार व माजी मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना फायदा पोहोचवण्यासाठी व काँग्रेसचा उमेदवारला पराभूत करण्यासाठी केली,असा आरोप ते करतात.
कामठीत ५०० बूथ होते ज्यावर ५ लाख १ हजार मतदान झाले.३५ हजार वाढीव मतदान झालं.एकट्या नागपूर तालुक्यात साढे सतरा मतदार वाढले,पंचायत मधील मतदारांची संख्या ही देखील लक्षणीय होती.बिडगांव नगर पंचायतमध्ये २ हजार १६१,बहपूर खरबी मध्ये ५ हजार ८४,बेसा पिपळा मध्ये ३ हजार ६६७,नरसाळा हुडकेश्‍वरमध्ये ४ हजार ७१२ महादूला मध्ये ६७७,मौदा इत्यादी अश्‍या प्रत्येक बूथवर वाढीव मतदान झाले.कामठी नगरपालिकाही ‘अ‘दर्जाची नगरपालिका असून ३ हजार २६ मतदार वाढले होते.मूळात लोकसभा निवडणूकीनंतर अवघ्या चारच महिन्यात कामठीत अश्‍या किती इमारती उभ्या झाल्या की ज्यात हजारो मतदार वाढले?असा प्रश्‍न त्यांनी केला.
लोकशाहीची आणखी क्रूर थट्टा करीत निवडणूक आयोग माहिती अधिकारात ‘माहिती उपलब्ध नाही’असे उत्तर देते.आमचे नेेते राहूल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूकीविषयी सत्य परिस्थिती सांगितली.भाजप नेते काँग्रेसने १७ हजार मते टाकली असा आरोप करते मात्र,१७ हजार हा आकडा त्यांच्याकडे आला कुठून?याचे उत्तर ते देत नाहीत.निवडणूक आयोगाने हा १७ हजार मतदारांचा आकडा स्पष्ट करुन दाखवावा,असे आव्हान त्यांनी केले.महाराष्ट्राची ही पहिली निवडणूक आहे ज्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर देखील मतदानाच्या तीन दिवस आधी मतदार नाेंदी होत राहीली!
मला स्वत:ला १ लाख ३४ हजार मत मिळून देखील पराभूत व्हावे लागले.२०१९ मध्ये देखील मी कामठी मतदारसंघातून १ लाख ४० हजारच्या जवळपास मते घेतली होती.यावेळी बोगस मतदारांकरवी माझा पराभव करण्यात आला,असा आरोप त्यांनी केला.
आता बिहारमध्ये निवडणूका आहे,त्यात भाजप महाराष्ट्राची पुनरावृत्ती करेल का?असा सवाल केला असता,यश-अपयश ही बाब गौण असून आमचा लढा हा भाजपशी नसून निवडणूक आयोगाशी असल्याचे ते म्हणाले.हरियाणाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने हीच खेळी खेळली होती,याकडे त्यांनी लक्ष वेधले.आज ना उद्या सत्य हे बाहेर येईलच,असा  दावा त्यांनी केला.
महाविकासआघाडीतील काँग्रेसचे १६ उमेदवार विजयी झाले मग बोगस मतदार वाढीचा दावा कसा करता?ते कसे विजयी झाले?असा सवाल केला असता,काँग्रेसचे जे उमेदवार ७० -८० हजार मतदान मिळणारे होते ते विजयी झाले मात्र,ज्या उमेदवारांकडे २० ते २५ हजार मतदानाचे मार्जिन होती त्यांना निवडणूक आयोगाने बोगस मतदानातून पराभूत केले,असे भोयर यांनी सांगितले.वडेट्टीवार यासारखे मजबूत नेते यांना देखील १५ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवावा लागला,याकडे त्यांनी लक्ष वेधले.मी स्वत: २८ हजार मताधिक्याने विजयी झालो असतो असा दावा त्यांनी केला.
राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंगच्या केलेल्या आरोपावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने,मतदानाच्या दुस-या दिवशी ‘आरो’ म्हणजे निर्णय अधिकारी तसेच ‘इओ’ म्हणजे निवडणूक निरीक्षक यांच्या समोर झालेल्या परिक्षणादरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी मतदानाबद्दत कोणतेही आक्षेप नोंदवले नाही असे उत्तर दिले.याशिवाय मतदर यादी यांचे फेरनिरीक्षण जेव्हा केले जाते त्याची अंतिम प्रत सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांना प्रदान केली जाते,काँग्रेसने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर ठोस तक्रार नोंदवलीच नाही,असे निवडणूक आयोगाचे म्हणने आहे,यावर प्रश्‍न केला असता,आम्ही मतदार यादी व मतदानासंबंधीचे संपूर्ण विश्‍लेषण देशाच्या सर्वोच्च न्यालयात दिले आहे,निवडणूक आयोग तद्दन खोटे बोलत असून आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे,असे ते म्हणाले.
…………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या