फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणभ्रष्ट अधिका-यांमुळे शहराचे आरोग्य धोक्यात:आ.विकास ठाकरे यांचा घणाघात

भ्रष्ट अधिका-यांमुळे शहराचे आरोग्य धोक्यात:आ.विकास ठाकरे यांचा घणाघात

Advertisements

चिकन गुनिया,डेंग्यूने नागरिक हवालदिल:जनता त्रस्त अधिकारी मस्त
सिमेंट रोड,मलाई खाण्याचा धंदा
नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२४: महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या भोंगळ कारभारामुळे पावसाळ्यात संपूर्ण नागपूर शहराचे रुपांतर तलावात होत असताना दिसून पडतंय.गेल्यावर्षी २३ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील अनेक रस्त्यांवर बोट चालवावी लागली होती.१२०० कोटींच्या वर अवघ्या काही तासाच्या पावसामुळे नागरिकांचे व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले होते.त्यावरुन कोणताही बोध न घेता,सिमेंट रस्ते बनविण्याचा उद्योग सुरुच आहे,इतकंच नव्हे तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने संपूर्ण शहराचे आरोग्य चिकन गुनिया व डेंग्यू,मलेरियाने धोक्यात आणल्याचा घणाघाती आरोप आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत, पश्‍चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला.याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव व सोशल मिडीया प्रमुख  विशाल मुत्तेमवार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी मनपा प्रशासनावर विकास ठाकरे यांनी चांगलेच आसूड ओढले.या पूर्वी २०१८ मध्ये नागपूर शहर असेच पाण्यात तुंबले होते,त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा सर्व माध्यमांवर झाली होती.नुकतेच २० जुलै २०२४ रोजी पुन्हा नागपूर शहर पाण्याखाली तुंबले व मनपा प्रशासनाचे पावसाळी नियोजनाचे पितळ उघडे पडले.या विरोधात नागपूर शहर(जिल्हा)काँग्रेसने यल्गार पुकारला असून त्या विरुद्ध‘स्वाक्षरी’मोहिम राबविण्यात येणार असल्याचे आ.विकास ठाकरे यांनी सांगितले.
शहरातील स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व्यवस्थाच जीर्ण झाली आहे.जिथे कुठे ती होती त्यात इतक्या वर्षांपासूनची माती,कचरा,रस्त्यांच्या बांधकामांचे सिमेंट घट्ट बसल्यामुळे पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमताच त्यांच्यात उरली नाही.त्यात शहराच्या अगदी गल्ली बोळ्यात सातत्याने नियोजनशून्य सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनतच आहेत.त्या रस्त्यांची उंची देखील एक ते दीड फूट असल्याने पावसाचे पाणी सरळ नागरिकांच्या घरात घुसत आहे.वारंवार नागरिकांनी का जिवित आणि वित्त हानी सहन करावी आणि किती वेळा?असा प्रश्‍न विकास ठाकरे यांनी केला.
नेते सांगतील,त्यानुसार मनपा,नासुप्र तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नाचत असल्याची जहाल टिका याप्रसंगी त्यांनी केली.सिमेंट काँक्रिटचे रस्ते नागरिकांनी मागितले का?याचा कोणाताही विचार न करता शंकर नगरसारख्या भागात कंत्राटदाराने जबरदस्ती सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवलाच,त्याचे परिणाम तेथील नागरिकांना २० जुलैच्या पावसात भोगून द्यावे लागले.हा कोणता अट्टहास आहे प्रशासन व कंत्राटदारांचा?असा सवाल त्यांनी केला.अनेक ठिकाणी चांगले डांबरी रस्ते खोदून त्यावर सिमेंट रस्ते बांधण्यात आले!पुन्हा ते अमृत योजनेसाठी तोडले आता शहरभरचे सिमेंट रस्ते गॅसची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदतील.
यावरही खोदलेले रस्ते दुरुस्त न करता,त्यावर माती,गिट्टी टाकून कंत्राटदार दुसरीकडे रस्ता बांधण्यात सुरु होतात,शेकडो अपघात शहरात सिमेंट रस्त्यांमुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.एकीकडे जनता बेेहाल तर दूसरीकडे नेत्यांचे कंत्राटदार आणि प्रशासनाचे अधिकारी मालामाल,असा राजरोस कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.उरले सुरले ड्रेनेज सिस्टिम, शहरभर पसरलेल्या महामेट्रोच्या पिल्लरने गडर लाईन्स नेस्तनाबूत केल्याचा आरोप त्यांनी केला.
तातडीने शहरात स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टिमचे तांत्रिकरित्या ऑडीट करुन ते कुठे सुरु होतात आणि त्यातून कुठे पाणीचा निचरा होतो,हे शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली.त्यासोबतच जलप्रवाह मार्गातील सर्व अडथळे व अतिक्रमण कठोरतेने काढून तसेच शहरातील प्रत्येक भागात प्राधान्यक्रमााने स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिमची निर्मिती करण्याची मागणी त्यांनी केली.ड्रोनच्या मदतीने शहराचे हायड्रोलॉजी एनालिसीस आणि रिमोट सेंसिंग मॅपिंगद्वारे शहरातील पाण्याच्या प्रवाहाबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते,तसेच मागील वीस वर्षांच्या डेटाच्या सहाय्याने शहरात किती पाऊस झाल्यास कोणकोणत्या भागात प्रभाव पडू शकेल,याचे नियोजन आधीच करता येईल,असे त्यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रिटचे जाळे विणून शहरातील नागरिकांना काय फायदा झाला?असा सवाल करीत या नियाेजनशून्य रस्त्यांनी शहराचे अतोनात नुकसान केले असून अपघातात अनेकांचे दोन वर्षात ६०० च्यावर नागरिकांचा अपघातात प्राण गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
याला जबाबदार कोण?असा सवाल त्यांनी केला.
शहरात स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे,दहा-दहा दिवस कचरा उचलल्या जात नाही.शहराचे आरोग्यच पार बिघडले आहे.दहा वर्षात हाच विकास साधण्यात आला,घरा-घरात पाणी आणि घराघरात रुग्ण!फक्त विराेधकांवर टिका करण्याचा आमचा उद्देश्‍य नसून ,उपाय शोधण्याचे आवाहन आम्ही करतो.शहरातील तज्ज्ञांची मदत घ्या.शहरातील श्‍मशान घाटांची अवस्था देखील अतिशय दयनीय असल्याचे त्यांनी सांगितले.अंत्ययात्रेत शे-पाचशे लोक श्‍मशान घाटांवर असतात,किमान एक तास त्यांना उभेच राहावे लागते.त्यातही श्‍मशान घाटांवर इतकी अस्वच्छता आहे की डासांचा उपद्रव त्यांना स्वस्थ उभे ही राहू देत नाही.महिनो ना महिने श्‍मशान घाटातील कचरा उचलल्या जात नाही.घरी परतताना ते डेंग्यू,चिकन गुनियाच सोबत घेऊन येत असल्याची टिका विकास ठाकरेंनी केली.
अंबाझरी समोरील पूल चार वर्षांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता,आता तो अरुंद झाल्यामुळे अंबाझरी ओव्हर फ्लोचे पाणी तुंबत असल्याचा निष्कर्ष काढून तो पुन्हा तोडून रुंद बांधला जात आहे.हा जनतेचा पैसा असून वाट्टेल तसा उधळल्या जात असल्याचे ठाकरे म्हणाले.मनपा,नासुप्र किवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांना शहराचे शास्त्रशुद्ध नियोजन देखील करता येत नसेल तर पगार कशाचा घेतात?असा सवाल त्यांनी केला.
अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासनाने आता १० कोटींचा निधी मंजूर केला आहे,याकडे लक्ष वेधले असता,ते पैसे स्मारक तोडणा-या प्रकल्पाच्या विकासकाकंडून वसूल करावे असे ठाकरे म्हणाले.पाचपावलीत अम्ली पदार्थाच्या कारखान्यावर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनाच्या पथकाने छापा टाकून ७४ कोटी रुपयांचे  ५० किलो एमडी व ते बनवण्यासाठी १०० किलोचा कच्चा माल जप्त केला.गृहमंत्र्यांच्या शहरात झालेल्या या कारवाईकडे कसे बघता?असा सवाल केला असता,हे पोलिस विभागाचे कार्य आहे,ते करीत आहेत की नाही हे बघणे गृहमंत्र्यांचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात जुआ,सट्टाचे देखील प्रमाण वाढले आहे.याबद्दल गृहविभागाला विचारणा केली जाईल प्रसंगी विधान सभेत लक्षवेधी लाऊ,असे ठाकरे म्हणाले.शहरात सर्वदूर ‘ओयो‘हॉटेल्सने देखील धुमाकूळ घातला असून,पोलिसांकडून त्या हॉटेल्सच्या रजिस्टरची कोणतीही तपासणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.शहरात कोणताही उद्योपती आला व हॉटेलमध्ये थांबला तरी आधारकार्ड बघूनच त्याच्या नावाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते.सेमिनरी हिल्समधील आेयो हॉटेलमध्ये नागरिकांनी रंगेहात जाेडप्याला पकडले तरी पोलिसांनी त्या हॉटेलचे रजिस्टर तपासण्याची तसदीही घेतली नाही,असा आरोप त्यांनी केला.
नागपूरातील ६ विधानसभेच्या जागेसाठी ७१ इच्छूकांनी अर्ज केला,काँग्रेस कमेटी उमेदवारांची निवड कशी करेल?असा प्रश्‍न केला असता,हायकमांडचे स्पष्ट निर्देश आहेत,ज्यांना तिकीट नाही मिळाले त्यांनी पक्षासाठी व उमेदवारासाठी एकोप्याने काम करावे,येत्या ८ दिवसात नागपूरातील उमेदवाराचंी निश्‍चिती होईल,असे उत्तर त्यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना विशाल मुत्तेमवार म्हणाले की,येत्या काही काळात शहराची लोकसंख्या ही ५० लाखांच्या वर जाईल,त्या अनुषंगाने शाश्‍वत विकास शहराचा साधला जात नाही आहे.स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व्यवस्था ही या शहराची सर्वात निकडीची गरज बनली आहे.सखल भाग कोणता आहे याची टोपोग्राफीद्वारे माहिती काढायला हवी.अनेक ठिकाणी नाल्यांवर अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे,शहराचा श्‍वास आता गुदमरतोय,शहराच्या नियोजित व शाश्‍वत विकासासाठी आम्ही हस्ताक्षर मोहिम राबवित असून ते आम्ही प्रशासन व नेत्यांना देऊ.जनतेच्या मनात काय आहे हे सांगू.इतकंच नव्हे तर निवेदनासोबतच आम्ही उपाययोजना देखील सूचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे दरवर्षी शहराचे रुपांतर कृत्रिम जलाशयात होत असून त्या विरोधात सुरु असलेल्या आमच्या अभियानात सहभागी होण्यासाठी ०७१२-७१९१२३२ या क्रमांकावर मिसकॉल द्या किवा https:/chng.it/LNvWH25gnb लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पिटीशन साईन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या