

नागपूर,ता. ७ सप्टेंबर: जिंदगी जीत ली है जो तुम ने
मुझसे आकर खिताब ले जाओ।
सब के उलझे हुए सवालो का
एक मुकम्मल जवाब ले जाओ।
मेरे अंदर ही सारे मौसम है
चाहे जो बे-हिसाब ले जाओ।।
ही गजल आहे नागपूरचे प्रसिद्ध गझलकार शिरीष नाईक यांची.त्यांच्या गजलेतील हे काही मक्ते नागपूरातील जमीअत उलमा मुस्लिम समाज यांच्या पारलौकीक सेवाकार्यावर अगदी चपखळ बसतात. गेल्या चार महिन्यापासून कोविडसारख्या महामारीच्या काळात जाति-धर्म,लिंग भेदापलीकडे या संस्थेतील सदस्य हे करोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या मृतदेहांवर त्यांच्या-त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करीत आहेत.

सध्या देशात करोना महामारीने भयंकर गोंधळ माजला आहे. नातेवाईक,शेजारी तर सोडा ज्यांच्यासोबत अख्खी हयात घालवली ते कुटुंबिय देखील करोना पुढे हतबल झाले आहेत. करोना बाधित मृतदेह कुटुंबियांना देखील दूरुन बघायला मिळतात आहेत.अश्या जीवघेण्या दू:खाच्या वेळी जमीअत उलमा जिला नागपूरची चमू ही कोविड-१९ च्या शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे सर्वच जाती धर्माच्या मृतदेहांना ,अंत्यसंस्कारासाठी, दहनघाट तसेच कब्रिस्तानात घेऊन जाण्याचे पुर्ण्यकर्म संचित करीत आहेत.
जमीअत उलमाचे अध्यक्ष् हाफिज मसऊद अहमद हुस्सामी, सिराज अहमद(माजी नगरसेवक) व जावेद अख्तर यांच्या नेतृत्वात हे सेवाकार्य गेल्या चार महिन्यांपासून नागपूरात अविरत सुरु आहे. मुस्लिम समुदायाचे मृतदेह ते मुस्लिम कब्रस्तानात दफन करतात तर हिंदू मृतदेह हे अत्यंसंस्कारासाठी दहनघाटावर घेऊन जात आहेत.हिंदू पुरुषांवर अंत्यसंस्कार हे गंगाबाई घाटावर तर हिंदू महिलांवर मानेवाडा दहनघाटावर अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत.जरिपटका येथील क्रिश्चियन कब्रस्तानात क्रिश्चियन समाजाच्या मृतकांवर विधिवत रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार पार पाडले जातात.

संपूर्ण मानव जातीवर कोविड नावाने कोसळलेल्या या महामारीमुळे मानव जातीच्या अस्तित्वावरच, आभाळा एवढे संकट कोसळले आहे.अश्यावेळी जात-पात,भाषा,धर्म,लिंगभेद,प्रांत यांच्यासारख्या भेदांना दूर सारुन मानवतेसाठी धावून जाण्याची हीच वेळ असल्याचे जावेद अख्तर सांगतात. हीच खरी मानवता आहे.जावेद अख्तर,सिराज अंसारी,मो.जैद अंसारी,मो.इलियाज,जुबैर कबीर(बंटी)मो.जावेद,मो.फारुक,मो. इरशाद(पप्पी),शहजाद अख्तर,मो.अतहर,मो.इम्तियाज राजू,शोएब खान,अशफाक बाबा,उमर खान,एजाज अहमद,इमरान अहमद आदी तरुणाई, मानवतेच्या या पारलौकिक कामात आपले संपूर्ण सहकार्य देत आहे.
क्या पता कब मौत का पैगाम आ जाये
जिंदगी की आखिरी कब शाम हो जाये
मैं तो ढूंढता हूं ऐसे मौके को ऐ दोस्त
की मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाये…
मृत्यूनंतर घरातील आप्त-स्वकीय यांना किमान दहनघाट तसेच कब्रिस्तानात सुखरुप घेऊन जाताना बघून नागपूरातील अनेक कुटुंबियांचे हात यांच्या या महान कार्यासमोर आपोआप जुळले आणि…येथेच जीवनाचे सार्थक झाले असे जमीअत उलमाच्या संस्थेतील या फरिश्तांचे म्हणने आहे.
‘सत्ताधीश’चा त्यांच्या या महान कार्याला मनापासून सलाम.




आमचे चॅनल subscribe करा
