फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजभाजप नगरसेवकांची वारी..गुजरातच्या रमणीय तीरी!

भाजप नगरसेवकांची वारी..गुजरातच्या रमणीय तीरी!

Advertisements


भाजपचे १०२ नगरसेवक नागपूरच्या बाहेर: नागरिकांसाठीही नॉट रिचेबल

पाच मुख्य पदाधिकारी शहरात सांभाळणार ‘पक्षीय’निवडणूक व्यवस्था

विधान परिषदेची एक ‘सीट’झाली आता प्रतिष्ठेचा प्रश्‍न

नागपूर,ता. २९ नोव्हेंबर २०२१: भारत या देशात निवडणूका येतात,संपतात,निकाल लागतात,पुन्हा कोणत्यातरी राज्यात निवडणूकीचा बिगूल वाजतो, पुन्हा निवडणूका होतात,संपतात,देशपातळीपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत हा देश सतत कुठे ना कुठे ‘निवडणूकीचा फील’अनुभवत असतो,अशीच एक निवडणूक येत्या १० डिसेंबर रोजी नागपूरात विधान परषदेच्या एका जागेसाठी होऊ घातली आहे मात्र वरिष्ठ सदनातील या निवडणूकीने आता ‘राष्ट्रीय’ पातळीवरचे ’नियोजन’(साम,दाम,दंड,भेद)गाठल्यामुळे ,महाराष्ट्राच्या उपराजधानीत मागील दोन दिवसांपासून याच निवडणूकीची सातत्याने चर्चा आहे.

आज सोमवारी यात आणखी भर पडून, भारतीय जनता पक्षाच्या आता, एकूण १०२ नगरसेवकांनी नागपूरला ‘टाटा बाय-बाय’करीत परराज्यवारीसाठी विमान गाठले आणि भूर्रकन उडून गेलेत.भाजपच्या या नगरसेवकांची वारी गुजरातच्या अरेबियन सी च्या रमणीय तीरी पोहोचली असल्याची माहिती आहे.

भाजपच्या एकूण १०९ नगरसेवकांपैकी आता महापौर दयाशंकर तिवारी,माजी महापौर संदीप जोशी,शहराध्यक्ष प्रवीण दटके सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे,सुनील अग्रवाल हे पदाधिकारी नागपूरात येत्या निवडणूकीत ‘पक्षीय ’नियोजन करण्याकरिता थांबले असल्याची माहिती आहे.या निवडणूकीत एकूण ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत,भाजपचे अधिकृत उमेदवार असणारे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी ‘एकी‘करुन तगडे आव्हान उभे केले आहे.

सर्वात पहीला झटका तर त्यांनी भाजपच्या एका स्वयंसेवकालाच ‘फितूर’करुन दिला.डॉ.रविंद्र भोयर हे गेल्या ३४ वर्षांपासून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राहीले आहेत मात्र एवढ्या दशकात, पक्षात ‘समर्पण’भावनेने कार्य केल्यानंतर देखील पक्षातील श्रेष्ठींनी त्यांना एकदाही आमदारकीची तिकीट दिली नाही,उलट त्यांच्यानंतर पक्षात आलेल्यांना आमदार केले,याचे शल्य डॉ.भोयर यांना चांगलेच बोचत होते.

यावेळी देखील त्यांनी विधीमंडळाच्या वरिष्ठ सदनात जाण्याची ईच्छा शहराध्यक्षांकडे प्रकट केली होती मात्र संधी पुन्हा एकदा ‘खास मर्जीतल्या’माणसाला मिळताच त्यांनी विद्रोहाचा झेंडा हातात घेतला.एका समर्पित स्वयंसेवकाने ’काळी टोपी’ बाजूला सारत ४८ तासांमध्ये विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याने ‘गांधी टोपी’ डोक्यावर धारण केली,एवढंच नव्हे तर या उमेदवारासाठी काँग्रेसनेही आपले संपूर्ण ’पारंपारिक’मदभेद बाजूला सारले व गटातटात विखुरलेले काँग्रेस नेते एकजूट झाले.

टोपी खालील मेंदूत असणारी विचारधारा आणि ह्दयात असणारी विचारधारेप्रतिच्या निष्ठाेला,उमेदवारी आणि आमदारकीसमोर ‘काडीचेही मोल’ नसल्याचे नागपूरकरांनी पुन्हा एकदा या निवडणूकीच्या निमित्ताने अनुभवले.

डॉ.भोयर यांचा हा पक्षद्रोही पवित्रा बघता भाजपला ही ‘सावध पवित्रा’घेणे भाग होते अखेर भोयर हे ३४ वर्ष भाजपायीच होते,त्यांचे अनेक नगरसेवकांसोबत सलोख्याचे संबंध होते,यामुळेच आपल्या नगररसेवकांना आता रंगलेल्या ’खरेदी-विक्री व मनपंसद बोली’च्या घोडेबाजारात अडकविण्यात येईल या भीतीने भाजपने आपल्या सर्व नगरसेवकांची वारी गुजरातच्या तीरी नेली,विरोधकांसोबतच आपल्या नागरिकांसाठी देखील ‘नॉट रिचेबल’केली.

सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी भाजपला कोणतीही भीती नसल्याचे स्पष्ट करीत, काँग्रेस भाजप नगरसेवकांची प्रतिमा मलिन करीत असल्याचा आरोप केला.येत्या मनपाच्या निवडणूकीत याचा परिणाम भाजप नगरसेवकांच्या प्रतिष्ठेवर होऊ शकतो यामुळे हा सावध पवित्रा उचलला गेला असल्याचे समर्थन त्यांनी केले.

एका नगरसेविकेचे बाळंतपण तसेच एका नगरसेविकेची ह्दय शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना या वारीतून सूट मिळाली आहे. सत्तापक्ष नेते यांनी सांगितल्याप्रमाणे हे नगरसेवक पाच ठिकाणी गेले आहेत.काल नगरसेविकांचा गट रवाना झाला तर आज नगरसेवकांचा गट वारीसाठी निघाला.यात २० टक्के नगरसेवक हे सिंगल निघाले तर ८० टक्के नगरसेविका या कुटुंबासह निघाले.

जे नगरसेवक सिंगल निघाले त्यांना अनेक कौटूंबिक अडचणी होत्या यात मुलांच्या परिक्षेचा प्रश्‍न होता,कोणाच्या घरी लग्नकार्य होतं.अर्थातच जे नगरसेवक सिंगल निघाले ते आता नागपूरकर नागरिकांचे गडर,चेंबर,रस्ते,खड्ड्यांचे सुख-दूखं विसरुन १० डिसेंबरपर्यंत ‘जीवाची मुंबई प्रमाणे जीवाचा गुजरात’करुनच परतणार आहेत,यात शंका नाही.

सत्ता पक्ष नेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नगरसेवकांचे दोन गट काश्‍मीरला,एक गट उत्तराखंडला,एक गट मध्यप्रदेशला,एक गट गोव्याला गेला आहे मात्र सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे भाजपच्या संपूर्ण नगरसेवकांना गुजरात(भाजपसाठी देशातील सर्वात सुरक्षित स्थळ)मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती आहे!

हे नगरसेवक आता ऐन मतदानाच्या दिवशीच उपराजधानीत अवतरतील,यामुळे काँग्रेसेचे ‘किंग मेकर ’व विद्यमान क्रीडा मंत्री सुनील केदार हे भाजपचे नगरसेवक आता नॉट रिचेबल झाल्याने ‘सतरंज की बिसात पर’आता कोणत्या सोंगट्या टाकतात याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या