फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभाजप आमदाराने दिली कार्यकर्त्या ऐवजी हॉटल व्यवसायिकाला उमेदवारी!

भाजप आमदाराने दिली कार्यकर्त्या ऐवजी हॉटल व्यवसायिकाला उमेदवारी!

Advertisements
भाजपची झाली ‘काँग्रेस’: भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच प्रभागात दोन -दोन एबी-
फॉर्म

महापौद पदाचे उमेदवार अविनाश ठाकरे,संजय बंगाले यांचेही कापले तिकीट
नागपूरात फडणवीसांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा:आमदार पूत्र कुंभारेंच्या मुलाला उमेदवारी!
भाजपमध्ये उमेदवारीवरुन प्रचंड असंतोष तरीही भाजपचा १२१ जागा जिंकण्याचा दावा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.३० डिसेंबर २०२५: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज आपली १५६ उमेदवारांची उमेदवारी यादी जाहीर केली असून या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, दूपारी ३ वाजेपर्यंत अंतिम दिवस असल्याने आपापल्या झोन कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला मात्र,यंदा भाजपच्या उमेदवारांना घेऊन भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष असून निष्ठावंतांना डावलून भाजपच्या शहरातील आमदारांनी व पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या ‘हितचिंतकांना’मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली असल्याचा उघड-उघड आरोप केला जात आहे.
प्रभाग क्र.३१ मध्ये तर भाजपच्या एका आमदाराने निष्ठावंताना डावलून एका हॉटल व्यवसायिक उर्फ ठेकेदारालाच उमेदवारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या हॉटेल मालकाच्या शाकाहारी जेवणाचे तब्बल ७ लाखांचे बिल या आमदारावर थकीत आहे तर सुसंस्कारी भाजपाच्या या आमदारावर याच हॉटेल मालकाचे मांसाहारी जेवणाचे बिल देखील लाखांमध्ये असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले!
महत्वाचे म्हणजे भाजपसारख्या पक्षासाठी सर्वाधिक ‘महनीय’असलेल्या  रेशिम बाग वॉर्डातून यंदा अशी उमेदवारी देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करीत ज्या ठेकदाराचे लाखो रुपये आमदारावर ‘उधार’ आहेत तो उद्या नगरसेवक झाल्यावर प्रभागाच्या जनतेच्या मूलभूत गरजा सोडवेल की उधारीच्या पंधरा लाखांचे, पंधरा कोटी कमाई करण्यावर भर देईल?असा सरळ सवाल आता विचारला जात आहे.प्रभाग क्र.३१ हा आमदार मोहन मते यांच्या मतदारसंघात येतो,हे विशेष.
अमोल तिडके हा भाजपचा ‘कट्टर’कार्यकर्ता २००५ पासून या प्रभागात इमाने इतबारे भाजपचे काम करीत आहे.त्याने रेशिम बाग वॉर्डात २००५ ते २००७ दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पदही भूषवले आहे.याशिवाय २००७ ते २००९ मध्ये दक्षिण नागपूरचे भाजप युवा मोर्चाचे महामंत्री,२००९ ते २०१२ मध्ये दक्षिणनागपूरच्या युवा मोर्चाचे पुन्हा अध्यक्ष पद,प्रभाग क्र. ४७ मध्ये २०१२ ते २०१५ भाजपचे प्रभाग संयोजक,२०१७ ते २०१९ मध्ये प्रभाग क्र. ३१ मध्ये भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष पद तर २०१९ ते २०२३ मध्ये पुन्हा एकदा भाजप युवा मोर्चा महामंत्री म्हणून पद भूषवले आहे.
आज अमोल तिडके यांचे वय ३८ वर्ष आहे मात्र,२०१२ मध्येच जेव्हा अमोल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती तेव्हा भाजप-शिवसेना युतीमध्ये हा वॉर्ड शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेचे शेखर सावरबांधे यांच्यासाठी काम करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी अमोल तिडकेंना दिले.पक्षाचा आदेश शिरोधार्ह्य मानून पक्षाचे काम त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले व सावरबांधे  बहूमताने निवडून आले.
२०१७ मध्ये पुन्हा एकदा त्यांना पक्षाने यंदा उमेदवारीचे अभिवचन दिले व कामाला लागण्याची सूचना केली मात्र,पुन्हा एकदा सतीश होले व कृष्णा भोयर या पक्षाच्या दिग्गज उमेदवारांना विजयी करण्याची जवाबदारी पक्षाने या युवा कार्यकर्त्यावर सोपवली.स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल तिडकेंना सांगितले की ‘तू अद्याप खूप तरुण आहेस,पुढे तुला खूप संधी असणार आहे’ असे वचन दिले होते,मात्र,आता २००५ ते २०२० तब्बल वीस वर्षांची पक्षनिष्ठा व प्रामाणिक कार्य पुन्हा एकदा भाजप आमदाराने गुंडाळून, त्यांच्या मर्जीतल्या हॉटेल व्यवसायिकाला तिकीट मिळवून दिल्याचा गंभीर आरोप या प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांनी केला.मी आता ३८ वर्षाचा झालो असून फडणवीस यांच्या मते मी वयाच्या नेमक्या कोणत्या वर्षी उमेदवारीस पात्र आहे?या पक्षात माझं भविष्य तरी काय आहे?असा मार्मिक सवाल तिडके करतात.
२०१४ मध्ये सुधाकर कोहळे यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या ज्या आमदाराने पक्षासोबत गद्दारी करुन २५ ते ३० अपक्ष उमेदवार उभे केले, पक्षाशी गद्दारी करणा-या त्याच आमदाराच्या दबावाखाली प्रभाग क्र. ३१ ते तिकीट वाटप झाले असल्याचा गंभीर आरोप भाजप कार्यकर्ते उघडपणे करीत आहेत.
भाजपच्या इतिहासात पहील्यायंदा एकाच प्रभागात दोन-दोन एबी-फॉर्म-
अनेक कार्यकर्त्यांना भाजपची घोषित उमेदवारी यादी बघून मानसिक धक्का बसला आहे.आमच्या अगदी लहानपणापासून आम्ही काँग्रेस पक्षाला दोन-दोन एबी-फॉर्म वाटताना पाहिले आहे मात्र,भाजपसारख्या अतिशय शिस्तबद्ध समजल्या जाणा-या पक्षाला यंदा अनेक प्रभागात एकाच जागेसाठी दोन-दोन एबी-फॉर्म वाटण्याची वेळ यावी याचा अर्थ भाजप आतून घाबरला आहे का?असा सवाल आता विचारला जात आहे.प्रभाग क्र.१३ मध्ये ऋतीका मसराम/रुपाली राजेश वरठी यांना एकसाथ १३(ब)अनुसूचित जमाती प्रवर्गातून एबी फॉर्म देण्यात आले.प्रभाग क्र.१८ मध्ये १८(अ)ओबीसी प्रवर्गासाठी सुधीर (बंडू) राऊत/धिरज चव्हाण यांना एकसाथ एबी फॉर्म देण्यात आले.प्रभाग क्र ३१ मध्ये ३१(ड)खुला वर्ग महिला प्रवर्गात मानसी निखिल शिमले/ अंबीका महेश महाडीक या दोन्ही महिला उमेदवारांना एकसाथ एबी-फॉर्म देण्यात आला.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवरी असून सकाळी ११ ते दूपारी ३ दरम्यान यातील एक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील,यानंतर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल मात्र,भाजपने यंदा एकाच जागेसाठी अनेक प्रभागात दोन-दोन बी-फॉर्म वाटून दोन उमेदवार एकसाथ उभे केले.भाजपच्या या कृतीवर कार्यकर्तेच आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.या कृतीतून भाजपनेच आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना भाजपच्या इतिहासात पहील्यांदा ‘ऑप्शन’दिले आहे,’हा किंवा तो’निवडून द्या!
महत्वाचे म्हणजे भाजपच्या निष्ठावंतांनीच यंदा मोठ्या प्रमाणात बंडखोरी केलेली दिसून पडतेय.माजी नगरसेवक श्रद्धा पाठक,माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे यजमान विनायक डेहनकर यांनी भाजपच्या ‘अधिकृत’उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे.
नागपूरात फडणवीसांच्या आदेशाला वाटाण्याचा अक्षता-
केंद्रीयस्तरावरुन महाराष्ट्रात आदेश धडकले,महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपने खासदार,आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असल्याने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळवली यासाठी पक्षाच्या खासदार-आमदारांच्या कोणत्याही नातेवाईकाला तिकीट देऊ नये,असा निर्णय परवा मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला होता मात्र,मध्य नागपूरचे तीन टर्मचे आमदार राहीलेले माजी आमदार विकास कुंभारे यांच्या मुलाला भाजपने फडणवीसांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावित उमेदवारी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
महत्वाचे म्हणले याच आमदार पूत्राचे ऐन करोनाच्या जीवघेण्या महामारीच्या काळात गोवा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये मित्रांसोबत मद्याचे प्याले रिचवताना व टेबलरवर चढून नृत्य करतानाचे व्हिडीयोज नागपूरात चांगलेच व्हायरल झाले होत!करोना महामारीच्या काळात जेव्हा लॉकडाऊनमुळे लाखो नागपूरकरांची उपासमार घडत होती,दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होती त्यावेळी या ’पार्टी विथ डिफरेन्स’ पक्षातील तत्कालीन आमदार विकास कुंभारे यांच्या पुत्रानी जणू सर्वसामान्य,गरीब,गरजू,शोषित,वंचितांची क्रूरपणे थट्टाच केली होती.या आमदार पूत्राच्या या कृतीवर प्रचंड रोष नागपूरात उफाळला होता.त्याच आमदार पूत्राला श्रेयस विकास कुंभारेला,प्रभाग क्र.८ (मोमिनपुरा,गोळीबार चौक,टिमकी)मधून  नागपूरचा भावी नगरसेवक होण्याची संधी देऊन भाजपने नागपूरकरांना मोठ्या प्रमाणात ‘उपकृत‘केल्याची टिका समाज माध्यमात उमटली आहे.
नागपूरातच नव्हे तर विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या घरात देखील एक सोडून तीन-तीन उमेदवारी भाजपने बहाल केली आहे.परिणामी,काँग्रेसवर ’घराणेशाही’तून कडाडून टिका करणा-या भाजपचे तोंड या कृतीमुळे चांगलेच पोळलेले दिसून पडतंय.
भाजपच्या आणखी एका पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूत्राने रोहित खोपडे याने उमेदवारी न मिळाल्याने फेसबूकवर पोस्ट टाकून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.मात्र,अवघ्या काही वेळातच ती पोस्ट डिलीट केली.

(छायाचित्र :सौजन्य एमव्हीएम)

काँग्रेसमधून भाजपात ‘आयात’करण्यात आलेल्या दर्शनी धवड,मनोज साबळे व निकोसे यांनाही भाजपने उमेदवारी देऊन कृतकृत्य केल्याने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये तीव्र रोष आहे.अनेक इच्छूक कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराकडे धाव घेतली तर अनेकांनी महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे वाहनच अडवून आपली व्यथा मांडली.कार्यकर्त्यांची नाराजी बघता बावणकुळे यांचा चेहरा बघण्यासारखा होता.

भाजपच्या आमदारांंसह तिकीट वाटपात मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके व विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.याच नियोजनातून स्थायी समितीचे माजी सभापती व भाजपच्या महापौर पदाचे दोन अत्यंत महत्वाचे दोन वरिष्ठ चेहरे असलेले अविनाश ठाकरे व संजय बंगाले यांचे तिकीट कापण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.अविनाश ठाकरे यंदा नगरसेवक म्हणून लढण्यास इच्छूक नाहीत ही खोटी अफवाह मोठ्या प्रमाणात पसरविण्यात तिकिट वाटपातील भाजप पक्षश्रेष्ठींना चांगलेच यश मिळाले मात्र,अविनाश ठाकरे हे निवडणूक लढण्यास इच्छूक होते मात्र,त्यांचे तिकीट हेतूपुरस्सर कापण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांनी माध्यमकर्मींना आज प्रतिक्रिया देताना सांगितले.‘नाकापेक्षा मोती जड‘या धारणेतून ठाकरे हे पुढे जाऊन भाजपच्या विद्यमान आमदारांसाठी तगडे आव्हान निर्माण करु शकतात,या आशंकेतून त्यांचे तिकीटच कापण्यात आले.महत्वाचे म्हणजे प्रभाग क्र.३५ मध्ये अगदी चिंचभवन पासून तर मनीषनगर,जोगीनगर,बोरकुटे ले आऊटपर्यंत भाजपला तळागळापर्यंत पोहोचविण्याचे काम अविनाश ठाकरे यांनी एकेकाळी खूप प्रामाणिकपणे केले होते.ते अखिल भारतीय माळी समाजाचे नेतृत्व करीत असून महानुभव पंथांचे मोठे कार्य करणारे असल्याने ओबीसी व महानुभव पंथियांना भाजपसोबत जोडण्यात त्यांची भूमिका दूर्लक्षीत करण्यासारखी निशिचतच नव्हती मात्र,ते भाजपचे ‘होयबा’पदाधिकारी झाले नसते,याच भावनेतून त्यांचे तिकीट कापण्यात आल्याची नाराजी त्यांच्या अनेक समर्थकांनी व माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी माध्यमकर्मींकडे व्यक्त केली.परिणामी, महापौर पदापर्यंत अविनाश ठाकरेंनी पाेहोचू नये यासाठी तिकीट नाकारणा-या पक्षश्रेष्ठींना ते आमदार म्हणून विधान परिषदेत तरी कसे चालतील?असा रोख सवाल ते करतात!प्रभाग क्र. ३५ मध्ये भाजपने संदिप गवई,पूजा भुगावकर,विशाखा मोहोड व खुल्या प्रवर्गताून अविनाश ठाकरे यांच्या जागेवर रमेश भंडारी यांना उमेदवारी दिली आहे.रमेश भंडारी हे भाजपचे फार जुने कार्यकर्ते असले तरी सत्तेचे राजकीय अनुभव त्यांना नाही,असे सांगितले जात आहे.
फडणवीसांच्या गोटातील व अतिशय जवळचे मानले जाणारे संजय बंगाले यांच्याही उमेदवारीवर याच भावनेतून फूली मारण्यात आल्याचे कार्यकर्ते सांगतात. आतापर्यंत काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात गटबाजीचे आरोप होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थासारख्या निवडणूकीत भाजप देखील त्याच वाटेवर गेल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
असे असले तरी दटके यांच्या जवळपास ४३ समर्थकांचेही तिकीट यंदा कापण्यात आल्याची माहिती समोर आली.यात वर्षा ठाकरेंसह अनेक नगरसेवकांची नावे आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये विधान सभा निवडणूकीत मध्य नागपूरातून नागपूरातील भाजपच्या दोन्ही कद्दावर नेत्यांच्या मनात दटके यांचे नाव आमदारकीसाठी नसताना, दटके यांनी उमेदवारीसाठी आपले बळ दाखवले होते.ही बाब दोन्ही नेत्यांना खटकली होती.परिणामी,मनपात दटके यांचा प्रभाव कमी करण्यासाठी दटके यांच्या समर्थकांच्या नावावर फूली मारण्यात आल्याचे बोलले जात आहे.ज्यांना भाजपच्या तिकीट निर्धारण समितीने ‘कामाला लागा रे’ची आगाऊ सूचना केली होती,त्यातील अनेकांचे ‘काम’ हिरावून घेण्यात आले आहे!यंदा भाजपने फक्त ३० टक्के जूने व ७० टक्के नव्यांना उमेदवारी दिली आहे.
नऊ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये देखील भाजपने अनेक नवख्या नगरसेवकांना उमेदवारी दिली होती ज्यातील अनेकींना स्वाक्षरीचेही व्यवस्थित भान नव्हते.मात्र,नगरसेवक होताच विविध कामातील कंत्राटदारांना ’माझी टक्केवारी’साठी त्या नगरसेवक व नगरसेविकांचे फोन जाऊ लागले,यंदा देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचा थेट आरोप भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते आता करीत आहेत.
प्रभाग क्र.१६(ड)चे अध्यक्ष गजानन भिमराव निशितकर यांनी शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्याकडे आज प्रभाग क्र. ड चे अध्यक्षपद,सक्रिय सदस्य व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुपुर्द केला आहे.ते गेले ३० वर्षांपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.त्यांच्या प्रभागात यंदा बाहेरच्या प्रभागातील उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.हीच किमया पक्षाने अविनाश ठाकरे यांच्याही प्रभागात साधली असून इतर प्रभागातील दोन उमेदवारांना त्यांच्या प्रभागात उमेदवारी देण्यात आली आहे.परिणामी,भारतीय जनता पक्ष मनमानेल त्या पद्धतीने मतदारांवर कश्‍याप्रकारे इतर प्रभागातील उमेदवार लादत आहे,यावर देखील समाज माध्यमात खंमग चर्चा झडत आहे.
यंदा भाजपच्या अनेक निष्ठावंतांचे उघड नाराजीनाट्य घडत असतानाही आमदार दटके यांनी भाजप यंदा १२१ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे!
थोडक्यात, भाजपने संघाच्याच प्रभागात जे उमेदवार दिले ते बघता भाजप आता संघाचेही ऐकत नाही,भाजप आता काँग्रेससारखीच ‘प्रा.लि.कंपनी’ झाली असल्याची बोचरी टिका दुखावलेले निष्ठावंत करीत आहेत.
……………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या