
राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
नागपूर सुधार प्रन्यासने आमदार कृष्णा खोपडेंच्या दबावात मंदिर प्रशासन,बौद्ध विहाराला दिली तीन दिवसात पाडण्याची नोटीस1
नागपूर,ता.१६ मे २०२४: वाठोडा येथील गिडडोबा नगरमधील एका ले-आऊट मधील मुख्य मार्गावरच अतिक्रमण करुन दोन दुकाने काढण्याच्या अतिक्रमणाला तेथील काही जागरुक नागरिकांनी विरोध केला.सुरवातीला नागपूर महानगरपालिका व त्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासमध्ये तक्रार दिली असता, ते अतिक्रमण पाडून टाकण्यात आले.यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी विशेष पाठपुरावा सदर दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केला होता.आभा पांडे यांच्या पुढाकाराने ते अतिक्रमण पाडण्यात आल्यानेच पूर्व नागपूरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खाेपडे यांनी द्वेषापायी या भागातील हनुमानाचे मंदिर तसेच बौद्ध मठ तीन दिवसात पाडण्याची नोटीस नासुप्र करवी संबंधितांना पाठविल्याने भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे धर्मविरोधी असून त्यांच्याच आदेशाने हनुमानाचे मंदिर व बौद्ध मठ तीन दिवसात पाडण्याची नोटीस नासुप्रने बजावली असल्याचा गंभीर आरोप आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत आभा पांडे यांनी केला.
दिनांक ११ मार्च २०२४ रोजी वाठोडा येथील स्थानिक रहीवाशींनी मनपाला मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण करुन दोन दूकाने काढण्याचा घाट घातला असल्याची तक्रार केली.मनपाने नासुप्रच्या विभागीय अधिका-यांना(पूर्व) संबंधित तक्रार पाठवली.नासुप्रच्या अधिका-यांनी तक्रारीची दखल घेऊन त्या ठिकाणचे निरीक्षण केले मोजणी केली व संबंधित तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल नासुप्र सभापतींना पाठवण्यात आला.या अहवालाच्या आधारावर नासुप्र सभापती मीणा यांनी पांधण रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले व हा रस्ता पुन्हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
मात्र,मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणारे लोकेश मुरारी यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडे नासुप्रच्या या कारवाई विराेधात तक्रार केली.यावर खोपडे यांनी नासुप्र अधिका-यांना खडसावत,मी या मतदारसंघाचा आमदार असताना मला न विचारता कारवाई कशी काय केली?अशी विचारणा केली.सूड बुद्धिने पेटलेल्या आमदारांनी याच ले-आऊटच्या आतील भागात असणारी दोन्ही धार्मिक स्थळे,हनुमान मंदिर व बौद्ध मठाला तीन दिवसात जमीनदोस्त करण्याचे आदेश,नोटीसद्वारे नासुप्रच्या अधिका-यांवर दबाव टाकून दिल्याचा आरोप याप्रसंगी आभा पांडे यांनी केला.
मूळात ५१(१)ची नोटीस ही ३० दिवसांची असते मात्र,या नोटीसमध्ये नासुप्रच्या अधिका-यांनी दोन्ही धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यासाठी फक्त ३ दिवसांची मुदत देऊन कायद्याचे सर्रास उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.नोटीसमध्ये मंदिर कमेटीचे अध्यक्ष यांचे नाव देखील चुकीचे टाकले.ज्यांच्या नावाने नोटीस काढली ते अध्यक्षच नाहीत.महत्वाचे म्हणजे नासुप्रने या नोटीसमध्ये स्वत: नमूद केले आहे की,ही दोन्ही धार्मिक स्थळे अतिक्रमणात नाहीत,ना ते फूटपाथवर आहेत ना या धार्मिक स्थळांमुळे वाहतूकीला अडथळा पाेहोचत आहे.ही दोन्ही धार्मिक स्थळे खासगी जागेवर असल्याचे नासुप्रनेच नोटीस मध्ये नमूद केल्यावरही मग कोणत्या आधारावर ही दोन्ही धार्मिक स्थळे पाडण्यासाठी नासुप्रतर्फे नोटीस बजावण्यात आली?असा सवाल त्यांनी केला.
न्यायालयाच्या आदेशानुसार २०१६ मध्ये मनपा व नासुप्रतर्फे अतिक्रमणीत ज्या धार्मिक स्थळांची यादी प्रशासनाने न्यायालयात सादर केली होती त्यात देखील या दोन्ही धार्मिक स्थळांची नावे नाहीत.याच अर्थ मनपा व नासुप्रनुसार ही दोन्ही धार्मिक स्थळे तेव्हा देखील वैधच होती मग,अचानक नोटीस बजावण्यात का आली?नासुप्रची ही कारवाई नागरिकांच्या तक्रारींवर न होता फक्त पूर्व नागपूरचे आमदार यांच्या द्वेषमूलक मानसिकतेतून होत असल्याची खरमरीत टिका त्यांनी केली.
महत्वाचे म्हणजे या संपूर्ण ले-आऊटचा खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या ठिकाणच्या संपूर्ण मालमत्तेवरच न्यायालयाने स्थगनादेश दिला आहे.तरी देखील भाजपच्या आमदारांना या ठिकाणच्या धार्मिक स्थळे पाडण्याची घाई झाली असून त्यांच्या आदेशानुसार कारवाई झाल्यास तो न्यायालयाचा देखील अवमान ठरेल,असा इशारा त्यांनी दिला.
या ही पेक्षा महत्वाचे म्हणजे नासुप्रने दिलेल्या नोटीसमध्ये तारखेचा उल्लेखच नाही.ज्या दिवशी अतिक्रमण करणा-याचे दूकान तुटले त्याच्या दुस-याच दिवशी नासुप्र अश्या कारवाईचा आदेश देते,याचा काय अर्थ आहे?पूर्व नागपूरचे आमदार हे अतिक्रमणाला संरक्षण देत आहेत का? असा सवाल त्यांनी केला.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा सर्वाधिक वेळ नासुप्रमध्ये जात असतो.त्या ठिकाणी बसून ते पूर्व नागपूरातील भूखंडांचे श्रीखंड वाटत असल्याचा आरोप केला जातो,यात तथ्य आहे का?असा सवाल केला असता,नागपूरकर नागरिकांमध्ये अशी चर्चा निश्चितच असल्याचे त्या म्हणाल्या.एखाद्या लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील खड्डेयुक्त रस्ते,तुंबलेल्या गडर लाईन्स,बंद पडलेले पथ दिवे,सरकारी शाळांची दूर्दशा,आरोग्य केंद्रे इत्यादी नागरिकांचे जीवनमान सुधरवणारे प्रश्न सोडविण्या ऐवजी फक्त भूखंडाचे प्रश्न सोडवणे महत्वाचे वाटत असेल तर मतदारांनी अश्या लोकप्रतिनिधीचा विचार करावा,असा सूचक इशारा त्यांनी दिला.
ही धार्मिकस्थळे सोसायटीच्या जागेवर असून हिंदू व बौद्ध सण या ले-आऊटमध्ये गुण्या गोविंदाने साजरी होत असतात.पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार हे चांगले वातावरण खराब करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.उद्या या धार्मिक स्थळांवर आम्ही तीव्र स्वरुपाचे निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याच ले-आऊटमधील तुलसीनगरमधील नाल्यावरील आरएलमध्ये बदल करुन पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणण्याचे काम कोणाच्या सांगण्यावरुन झाले?असा प्रश्न त्यांनी केला.नासुप्रमध्ये बसून भूखंडाचे श्रीखंड लाटण्यासाठी,नागरिक व नागपूर शहराला धोकादायक व नुकसान पाहोचविणारे अविचारी निर्णय घेतले जात असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.अवैध बांधकामांच्या संबधात भाजप आमदारांचा अहंकार खपवून घेतला जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
राज्यात भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवारांची युती असतानाही तुम्ही भाजपच्या आमदारांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आहात,येत्या निवडणूकीत राष्ट्रवादीतर्फे तुम्ही पूर्व नागपूरचे उमेदवार असणार का?असा सवाल केला असता,विधान सभेच्या निवडणूका अद्याप खूप दूर असल्याचे त्या म्हणाल्या.सत्याचा प्रश्नावर माझा लढा सतत सुरु असतो त्यात पक्ष मध्ये येत नाही.महायुतीचा धर्म जिथे पाळायचा तिथे मी पाळला आहे.महायुतीचे नागपूरातील उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरींसाठी मी सोशल मिडीयावर भरपूर प्रचार केला आहे.नागरिकांच्या समस्यांना निवडणूकांशी जोडून वेगळ्या वळणावर नेणे योग्य नसल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.माझा निषेध सत्यासाठी आहे,असे उत्तर त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेला हनुमान मंदिर कमेटीचे अध्यक्ष गजानन पराडे,बाैद्ध विहाराचे संघपाल माटे,प्रशांत अग्रवाल तसेच वाठोला परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
……………………….
.




आमचे चॅनल subscribe करा
