

सामाजिक समरसतेसाठी काँग्रेसची ’भारत जोडो यात्रा’
पक्षाची नव्हे तर देशाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी यात्रा
नागपूर,ता.५ सप्टेंबर: देशाच्या संविधानापेक्षा ना व्यक्ती श्रेष्ठ आहे ना संस्था,ना राजकीय पक्ष ना सरकार,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला आदर्श असे संविधान दिले असतानाही,केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील स्वायत्त संस्थांना सातत्याने दाबण्याचे,विरोधकांना नष्ट करण्याचे कृत्य सुरु असून, मोदी काळात देशाचे संविधान धोक्यात आले असल्याचे खळबळजनक विधान, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्या व हरियाणा विधान सभेच्या आमदार गीता भुक्कल यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केले.
याप्रसंगी मंचावर पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे,सोशल मिडीयाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना गीता भुक्कल यांनी काँग्रेस श्रेष्ठी व पक्षाचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्याद्वारे ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते जम्मूकाश्मीरपर्यंत काढण्यात येणा-या ’भारत जोडो’यात्रेची सविस्तर माहिती दिली.या देशातील व्यापारी वर्ग,मध्यम वर्ग,महिला वर्ग,शेतकरी,बेरोजगार तरुणाई,डॉक्टर,वकील इत्यादी सगळेच मोदी काळात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे भरडले जात असून, राहूल गांधी यांच्या या यात्रेत या सर्व वर्गांनी उस्फूर्तरित्या सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोदींनी सत्तेत येताच सत्तेचे केंद्रिकरण केले.राज्यांच्या संवैधानिक हक्कांना व संघ राज्य पद्धतीलाच सुरुंग लावण्याचे कार्य केले.ज्या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार नाही त्या राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले जात आहे.देशातील दलित,आदीवासी,मागास वर्गांच्या संवैधानिक कर्तव्यांप्रति, मोदी सरकार मागे हटत असल्याचा घणाघाती आरोप करीत,त्यांना पाणी,जमीन,वने यांच्यापासून परावृत्त करुन, संविधानाने त्यांना बहाल केलेल्या हक्कांची पायमल्ली केली जात असल्याचे त्या म्हणाल्या.
देशात उच्चांकाला पोहोचलेली महागाई,महिलांविरोधातील गुन्हेगारी,देशात गंभीररित्या उभी ठाकलेली बेराेजगारी,लोकशाही मुल्यांची होणारी पायमल्ली या सर्वांच्या विरोधात दिल्लीतील रामलीला मैदानात राहूल गांधी यांनी यशस्वी रणशिंग फूंकले.येत्या ७ सप्टेंबरपासून संपूर्ण देशात ३० ठिकाणी ‘भारत जोडो’यात्रा निघणार असून ३ हजार ५७० किलोमीटर या यात्रेचा प्रवास असणार आहे.एकूण १५० दिवस ही यात्रा सुरु राहणार असून,या यात्रेची गरजच काय?असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, मात्र देशात आज जो काही माहोल आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना निवडणूकी पूर्वी जी वचने दिली होती,त्या वचनांची पूर्तता त्यांनी केली नाही,हेच आम्हाला जनतेला सांगायचे असल्याचे त्या म्हणाल्या.
त्यांच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात ‘आर्थिक असमानता’निर्माण झाली.यामुळे देशातील गरीब हा आणखी गरीब झाला तर श्रीमंतांच्या श्रीमंतीत सातत्याने भरच पडत आहे,अशी टिका त्यांनी केली.मोदी यांच्या कार्यकाळात ‘सामाजिक भेदभाव’ पराकोटीला पोहाचला.धर्म,जातिच्या नावावर विभाजन करण्याचे काम नियोजनबद्धरित्या केले जात आहे.राजकारणाच्या क्षेत्रात पराकोटीचे सत्तेचे केंद्रिकरण झाले,असा आरोप त्यांनी केला.
आज देशाची आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावली असून,दिल्लीच्या सीमेवर तर देशभरातील शेतक-यांनी वर्षभर आंदोलन केले.संसदेला विश्वासात न घेता मोदींनी हूकूमशाही पद्धतीने ‘कृषि विषयक तीन काळे कायदे’देशावर लादले.यानंतर देशवासीयांची क्षमा मागून ते परत घेतले मात्र जवळपास ७०० शेतक-यांचा दूर्देवी मृत्यू या आंदोलनात झाला.आज देशात सुशिक्ष्त तरुणाई बेरोजगार होऊन फिरत आहेत.हातांना काम नसल्यामुळे देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.मोदींच्या काळात शेतकरी दु:खी,तरुणाई दु:खी झाली असून काँग्रेस पक्षाने देश चालवताना, देश हितासाठी जी सार्वजनिक संपत्ती निर्माण केली,तीच विकण्याचा सपाटा मोदी सरकारने सुरु केला असल्याची परखड टिका गीता भुक्कल यांनी याप्रसंगी केली.
जात,धर्म,भाषा,खाण्यापिण्याची पद्धत,वेशभूषेचे राजकारण करुन देश विभाजित केल्या जात आहे.मोदी काळात महिला वर्ग सर्वाधिक असुरक्ष्त असून लोकसंख्येच्या ५० टक्के प्रमाण असणा-या महिलांच्या कर्तृत्वाचा कोणताही उपयोग मोदी काळात होत नाही.देशाच्या एकोप्याला सातत्याने मोदी सरकारच्या काळात कमजोर केल्या जात आहे.
जे शेजारी देश भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध राखून होते,तेच आता मोदी काळात भारताला डोळे दाखवित असल्याचा आरोप त्यांनी केला.देशातील राजकारणी नेत्यांना त्रास दिल्या जात आहे.संसदेत त्यांना बोलू दिले जात नाही.जे बोलतात,त्यांच्यावर मोदी काळात लाठीचार्ज होत आहेत,खोटे खटले दाखल होत आहेत.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणा-या प्रसार-प्रचार माध्यमांना देखील भाजपने दाबून ठेवले आहे,असा घणाघाती आरोप करीत, जे दबत नाहीत त्यांना योजनाबद्धरित्या दाबले जात आहे,अशी टिका त्यांनी केली.
काँग्रेस पक्ष ’संसद से सडक तक’ही चर्चा पोहोचवणार असून संविधानापेक्षा कोणतीही व्यक्ती उच्च नाही.संस्था,राजकीय पक्ष संविधानापेक्षा श्रेष्ठ नसल्याचे त्या म्हणाल्या.राहूल गांधी म्हणूनच ‘भारत जोडो’यात्रेवर निघाले आहेत.‘ही यात्रा म्हणजे काँग्रेस पक्ष स्वत:ची प्रतिष्ठा वाचविण्यासाठीची यात्रा आहे’असा उपहास केला जात आहे मात्र काँग्रेस पक्ष हा नीती मुल्यांवर चालणारा पक्ष असून, आम्ही ‘काँग्रेसची नव्हे तर देशाची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी’ ही यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात जाती,धर्मांची नव्हे तर एकतेची गोष्ट बोलली जावी अशी आमची भूमिका असून, मोदी काळात देशातील गरीबांना त्यांचा कोणताही हक्क मिळत नसून देशातील प्रत्येकच वर्ग मोदींच्या सत्ताकाळात स्वत:लुबाडलेला अनुभव करीत आहे,अशी टिका त्यांनी केली.
आपला देश हा ‘अनेकता में एकता’जपणारा देश आहे.या देशातील सामाजिक समरसता जपण्यासाठीच काँग्रेस पक्ष राहूल गांधींच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’यात्रा काढत आहे.या यात्रेचे स्लोगन ‘एक तेरा कदम एक मेरा कदम मिल जाये, जुडे जाये मेरा वतन’हे असून देशातील ही एक ऐतिहासिक यात्रा असणार आहे.आजपर्यंत देशात कधीही एवढी प्रदीर्घ व एवढ्या लांबीची यात्रा काढण्यात आली नाही.देशातील १२ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा मार्गक्रमण करेल.
दोन आठवड्यांनंतर महाराष्ट्रातून या यात्रेचे मार्गक्रमण होईल.याचे नियोजन पक्षातील श्रेष्ठी नेते जयराम रमेश,दिग्विजय सिंह करणार असून या यात्रेत बसेस किवा इतर वाहनांचा उपयोग होणार नसून, एका मोठ्या कंटेनरमधूनच या यात्रेचा प्रवास होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.११८ पदयात्री यात सहभागी होणार असून यात ३१ महिला आहेत.ही यात्रा प्रवासादरम्यान कोणत्याही हॉटेलवर थांबवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रेत कायम १०० अतिथी राहतील.ज्या राज्यातून ही यात्रा जाईल तेथील ३०० जण अशी कायम ही यात्रा असणार आहे.राहूल यांच्या समवेत पक्षाने निवडलेले ११७ लोक पूर्णवेळ असतील.दररोज २२ ते २३ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार असून सकाळी ७ ते १०.३० तसेच सायंकाळी ३.३० ते ६.३० दरम्यान ही यात्रा प्रवास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.या संपूर्ण यात्रेची माहिती www Bharatjodo.in या बेवबसाईटवर उपलब्ध आहे.या यात्रेत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ४० हजार लोकांनी नोंदणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता तमिळनाडूच्या पेरुम्बदूरमधून स्वर्गीय राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन यात्रेचा प्रारंभ होईल.या वेळी मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन उपस्थित राहणार आहेत.या शिवाय महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद स्मारकांचे दर्शन घेत यात्रा पुढे जाईल.
आम्ही ‘मन की बात’ सांगायला नव्हे तर ऐकायला यात्रेत निघालो आहोत असा टोला त्यांनी याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांना हाणला.या देशाच्या तिरंगाची शान उंच ठेवण्याचे काम आम्ही करीत आहोत असे त्या म्हणाल्या.
विरोधक काँग्रेसच्या या यात्रेला ‘भारत जोडो नव्हे तर भारत तोडो‘यात्रा असल्याची टिका करतात या शिवाय काँग्रेसची ही यात्रा राहूल गांधी यांना पुर्नस्थापित करण्यासाठी असल्याचे सांगतात,या बाबत प्रश्न विचारला असता,ही यात्रा म्हणजे आमचा राजकीय अजेंडा नव्हे असे सांगत गीता यांनी, आम्हाला सामाजिक आणि आर्थिकस्तरावर या देशाला वाचवायचे असल्याचे त्या म्हणाल्या.आम्हाला आमच्या धोरणांसाठी विरोधकांच्या सल्ला घेण्याची गरज भासत नाही.भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जनतेमध्ये जाऊन जनतेच्या समस्यांचे समाधान सांगावे,असे आव्हान त्यांनी केले.‘अग्निपथ‘सारखी धोरणे देशात लादून देशातील सुशिक्ष्त तरुणांना दर चार वर्षांनंतर बेरोजगार करण्याचे धोरण राबविले जात आहे.देशातील सामाजिक संस्था सशक्त करण्या ऐवजी त्या कमकुवत केल्या जात आहे.देशातील महिलांचे सशक्तीकरण करण्या ऐवजी त्यांना दुर्बल बनविले जात असल्याची जहाल टिका या वेळी गीता यांनी केली.
राष्ट्रीय सेवक संघाने कधीही देशाचा तिरंगा स्वीकारला नाही काँग्रेसने मात्र या तिरंगाला गौरव प्रदान केला असल्याचे त्या म्हणाल्या.
केंद्रिय सत्ता स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करतात असा आरोप काँग्रेस नेहमीच करते मात्र छत्तीसगडचे पोलिस हे एका हिंदी वृत्त वाहीनीच्या वृत्त निवेदकाला पकडण्यासाठी आपल्या राज्याची हद्द ओलांडून चक्क नोएडा गाठते,काँग्रेसशासित प्रदेशही मोदींच्याच धोरणांवर चालते का?या प्रश्नावर बोलताना राज्याच्या न्यायिक अधिकारांवर कोणीही बाधा आणू नये,असे उत्तर देऊन त्यांनी वेळ मारुन नेली.




आमचे चॅनल subscribe करा
