Advertisements

अवंतिका लेकुरवाळे यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
बिडगांव नगर पंचायतमध्ये साढे तीन हजार बोगस मतदार प्रकरण
नागपूर,ता.५ डिसेंबर २०२५: बिडगांव नगरपंचायतमध्ये बोगस मतदानाच्या आधारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केला असून, भाजपचे नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांनी बिडगांवमध्ये येऊन दादागिरी केली,जी आम्ही हाणून पाडली,परंतु सत्ताधा-यांनी आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल केल्याची माहिती आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली.
२ डिसेंबर रोजी बोगस मतदानाला रोखण्याचे चोख काम आमचे प्रत्येक उमेदवार,प्रतिनिधी व समर्थकांनी, सैनिकांप्रमाणे केल्याचे अवंतिका यांनी सांगितले.यावेळी आम्ही भाजपच्या बोगस मतदानाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धारच केला होता.मैदानात निष्पक्ष लढाई झाली पाहिजे.लोकशाहीत निवडणूका या पारदर्शीच पार पडल्या पाहिजे.यात आमचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे,पराभव झाला तरी आम्हाला तो स्वीकार्य आहे.परंतु,कुटील करकारस्थाने करुन भाजपला विजयी होऊ द्यायचं नाही,हा प्रण आम्ही सर्वांनी केला व त्याप्रमाणे २ डिसेंबरला भाजपच्या बोगस मतदानाला आम्ही थांबवले.
परंतु बिडगावमध्ये वार्ड क्र.६ मध्ये जे बोगस मतदान होत होते त्याला आम्ही रोखले व बोगस मतदारांना परत पाठवले.भंडारा जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मिट्टेवाणी या गावात होत होते आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमन्या या गावाचं देखील बोगस मतदान आम्ही रोखलं.या मतदारांना परत पाठविले असता भाजपच्या नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकाने,जो भाजपचा पदाधिकारी आहे की ‘गुंड’आहे,ही शंका आम्हाला आहे,कारण अश्या प्रकारे ग्रामीणचं मतदान सुरु असताना,नागपूर शहरातील भाजपच्या नगरसेवकाने मतदान केंद्रात शिरुन बाहेरच्या बोगस मतदारांना,निवडणूक कर्मचा-यांना दमदाटी करुन मतदान करण्यास भाग पाडले,असा आरोप लेकुरवाळे यांनी केला.
परिणामी,या अन्याया विरोधात आम्ही आवाज उचलला,त्यांचे बोगस मतदान होऊ नये यासाठी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी व समर्थकांनी आक्रमकरित्या त्या मतदान केंद्रावर आवाज उचलला मात्र,त्यांनीच आमच्यावरच गंभीर गुन्हे दाखल केले.मात्र,ज्या बाल्या बोरकरने बोगस मतदान घडवून आणले,प्रशासनाने ते उघड्या डोळ्याने स्वीकारले,त्या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल का केले जात नाही?असा सवाल त्यांनी केला.बिडगांव नगरपंचायतमधील १७ ही वार्डामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात बोगस मतदान घडवून आणले असा गंभीर आरोप याप्रसंगी त्यांनी केला.आम्ही बोगस मतदान थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र,दडपशाहीतून आमच्यावरच गंभीर कलमा लावण्यात आल्या.
दिनांक ६ जून २०२५ ते १६ जून २०२५ रोजी कामठी तालुक्यातील निवडणूक अधिकारी यांना ४ हजार ७०० मतदार हे बाेगस मतदार असल्याचे पुराव्यानिशी आम्ही यादी सोपवली.याबाबत लेखी तक्रार दिली,तसेच अर्ज क्र.७ ही भरुन देण्यात आला.मात्र,निवडणूक प्रशासनाने नियमानुसार या मतदारांची कोणतीही चौकशी केली नाही,त्यांना कुठलीही नोटीस जारी केली नाही तसेच सदोष मतदार याद्याही दुरुस्त केल्या नाहीत.बिडगांव नगरपंचायतच्या प्रारुप मतदार याद्या या ८ ऑक्टोबर २०२५ राेजी प्रसिद्ध झाल्या होत्या.यावर आक्षेप घेण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२५ होती.यावेळी तीन हजारपेक्षा अधिक आक्षेप काँग्रेसने नोंदवले.मतदार हे त्यांच्या रहिवासी वार्डात न राहता वार्डांतर्गत विखुरण्यात आले,तसेच बिडगांव नगरपंचायत अंतर्गत राहत नसलेले बाहेरचे मतदार प्रचंड प्रमाणात घुसवण्यात आले.सुनावणीच्या दिवशीही हे सर्व आक्षेप पटवून दिल्यानंतरही निवडणूक अधिका-यांनी त्रुटी दूर करण्याचा प्रयत्नच केला नाही.
माझ्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार आल्यानंतर बिडगांव नगरपंचायतच्या कार्यकारी अधिका-यांना मी भेटले.त्यांनी पुरवणी यादीच्या माध्यमातून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे ‘खोटे’ आश्वासन दिले.रहिवाशी पुरावा पाहिल्याशिवाय मतदान करु देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले होते.याचे पुरावे व संपूर्ण रेकॉर्डिंग आमच्याकडे उपलब्ध असल्याचे लेकुरवाळे यांनी सांगितले.परंतु,त्यांनी शेवटपर्यंत याद्या दुरुस्त केल्याच नाही कारण,सत्ताधा-यांच्या दबावातून त्यांना याद्या दुरुस्त करायच्याच नव्हत्या,असा आरोप त्यांनी केला.
बिडगांव नगरपंचायत अंतर्गत बोगस मतदार आमच्या प्रत्येक प्रतिनिधीने व उमेदवाराने हायलाईट करुन ठेवले होते व रहिवाशी ओळख पत्राची खात्री पटल्याशिवाय मतदान होऊ द्यायचे नाही व भाजपाचे बोगस मतदानाद्वारे निवडणूक जिंकण्याचे षडयंत्र उधळून लावायचे असा निर्धार आम्ही केला होता.याप्रमाणे सर्व मतदान केंद्रांवर दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व सुरळीत सुरु होते.बाहेरच्या मतदाराचे ओळखपत्र तपासून बिडगांव अंतर्गत राहत नसल्यास बोगस मतदारांना परत पाठवणे सुरु होते.
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निहाल रमेश चिकाटे,यांचा मुलगा याचे मतदान घर क्र.२७ यादी भाग क्र. २६७ तरोडी बुथ येथे असून, बिडगाव नगर पंचायत अंतर्गत घर क्र.२२१ यादी भाग क्र.२६५-१ नागेश्वर नगर-ए बिडगाव मतदान केंद्र खोली क्र.२ फिनिक्स पब्लिक शाळा,आराधना नगर बिडगाव येथे व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खोली क्र.३ अश्या तिन्ही ठिकाणी मतदान यादीत नाव होते!त्याने बिडगाव नगर पंचायतला दोन्ही ठिकाणी मतदान केले.याशिवाय वार्ड क्र.६ च्या बूथवर आठ ते दहा बोगस मतदान रहिवासी पुरावा नसल्याने, चंद्रकला बिसने,किशोर बिसने,आदित्य बिसने,रवींद्र पाटील तसेच हौशीलाल पटले यांना परत पाठवले कारण या पैकी चंद्रकला,किशोर तसेच आदित्य बिसने हे भंडारा जिल्हा,तुमसर तालुका मिट्टेवाणी या गावातील रहिवासी होते.ते कधीही बिडगांव नगर पंचायतमध्ये वास्तव्यास नव्हते.
परिणामी, काँग्रेसच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मतदानाला प्रखर विरोध केला.त्यांचा रहिवासी पुरावा तपासण्याची विनंती केंद्र प्रमुख डोये यांना केली मात्र,बाल्या बोरकर यांनी बिडगावचे सीओ यांच्या सहित मतदान केंद्रावर येऊन केंद्र प्रतिनिधीला दमदाटी केली व ’तुझ्या अंगात रंगदारी आली आहे का?सगळी रंगदारी उतरवून देऊ’या शब्दात प्रतिनिधी टिकेश बोपचे याला दमदाटी केली.परिणमी सीओ नगरपंचायत बिडगाव यांनी त्या बोगस मतदारांचे कोणतेही ओळखपत्र न पाहता .त्यांना मतदान करु दिले,असा आरोप लुकरवाळे यांनी केला.
ही माहिती जेव्हा मतदान प्रतिनिधीने उमेदवार छाया गौतम व बबिता गौतम यांना दिली,त्या मतदान केंद्रात पोहोचल्या व बोगस मतदान कसे होऊ दिले?अशी विचारणा केली असता,तेथील पोलिस कर्मचा-याने त्यांना हात धरुन बाहेर ढकलले.लेकुरवाळे यांनी देखील सीओ यांना बोगस मतदानाविषयी विचारले असता,मतदार यादीत नाव असल्याने रहिवाशी पुरावा न तपासता मतदान करु दिले,अशी मखलाशी सीओ व निवडणूक अधिकारी अमित घाडगे यांनी केली.
त्याच वेळी नागपूर वाडी येथील एक महिला मतदार मतदान करण्यासाठी पोहोचली.ही महिला बिडगांव नगर पंयाचत अंतर्गत रहिवाशी नव्हती.परिणामी,उमेदवार व लोकांनी बोगस मतदान होऊ देणार नसल्याची घोषणाबाजी केली.आपली डाळ शिजत नसल्याचे बघून माझ्यावर व कुंदा राऊत यांच्यावर सूड भावनेतून गंभीर कलमा लावल्या ज्यात त्वरित अटक होऊ शकते,अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र,अटक होण्याची आम्हाला भीती नाही,आमच्यावरील गुन्हेही मागे घेऊ नका कारण सत्याच्या लढाईत तुरुंगात जायला आम्ही घाबरत नाही,सत्याचा लढा लढत असताना कलम १८९ व १९० माझ्यावर लावण्यात आले,तरी देखील मी आज पोलिस ठाण्यात गेले,पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात गेली,परंतू ज्यांनी गुन्हे केले,ज्यांनी दडपशाही केली,त्यांनी लोकशाहीला टांगनीला टांगले,अशा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी बाल्या बोरकर यांच्यासह पारदर्शी निवडणूक न घेता,बोगस मतदान करण्यात ज्या प्रशासकीय अधिका-यांचा हात आहे,त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे,अशी मागणी लेकुरवाळे यांनी केली.
………..
या आरोपांशी माझा काही संबंध नाही,त्यांना कोणतेही काम नाही,आम्हाला खूप काम आहेत.बिडगांवला मी गेलो होतो,मात्र,माझ्यावरील आरोप खोटे आहेत.
नरेंद्र बोरकर
माजी नगरसेवक,
नागपूर महानगरपालिका
……………………………..
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्यूब चॅनलवर)
Advertisements

Advertisements

Advertisements
