Advertisements

म्हाळगी नगर चौकात सावजी भोजनालयात मद्यपींचा उन्माद
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सर्रास बेकायदेशीर‘झिंग’
नागपूर,ता.१३ ऑक्टोबर २०२५: कायद्याचे राज्य असावे,अशी देशाच्या संविधानाने अपेक्षा व्यक्त केली आहे.निदान मुख्यमंत्र्यांचे शहर तरी कायद्याने चालावे अशी नागरिकांची रास्त अपेक्षा असते.मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदे पाळले जावेत व कायद्याचे उल्लंघन करण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये,जे कायदे पाळत नाहीत किंवा जे कायदे मोडतात,त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार ज्या पोलिस विभागाला आहे,त्याच पोलिस ठाण्याच्या अगदी एका मिनिटाच्या अंतरावर एखाद्या भोजनालयात सर्रास बेकायदेशीर मद्य प्राशनाचा प्रकार घडत असेल, तर हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिवितेच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा ठरतो.शहराचे अगदी वर्दळीचे ठिकाण म्हणजे म्हाळगी नगर चौकात नरेंद्र सावजी भोजनालयातील अशीच घटना काल रात्री उघडकिस आली असून,महत्वाचे म्हणजे भोजनालयात जेवणाच्या आस्वादासोबत मद्याचे प्याले पोटात रिचवताना एका दारुड्यानेच दुस-या दारुड्याचा गंमतीमध्ये तयार केलेला व्हिडीयो समाज माध्यमावर व्हायरल केल्याने हे ‘बेकायदेशीर’कृत्य उघडकीस आले.
एकीकडे नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या जिवितेच्या सुरक्ष्ततेसाठी ‘ऑपरेशन यु टर्न’ हा प्रभावी उपक्रम शहरात राबविला जात आहे.मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-यांवर या उपक्रमामुळे चांगलाच जरब बसला असताना,अश्या सावजी भोजनालयातून सर्रास मद्य प्राशन करुन बाहेर पडणारे मद्यपी बैलबंडीने तर घरापर्यंत पोहोचणारे नसतात,चारचाकी,दुचाकीनेच घर गाठत असतात,अश्या वेळी विना परवाना मद्य देणारे हॉटेल्स,सावजी भोजनालये यांच्यावर मात्र पोलिसांची कृपादृष्टि संशयास्पद ठरते.म्हाळगी नगर चौकात सावजी भोजनालयात ग्राहकांना बेकायदेशीररित्या मद्य दिले जात अाहे,ही बाब हाकेच्या अंतरावर असलेल्या हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली?हा व्हिडीयो व्हायरल झाला नसता तर,‘तेरी भी चूप मेरी भी चूप’प्रकार घडतच राहीला असता,अश्या वेळी अश्या उन्मादी मद्यपींच्या वर्तनावर जरब कशी बसेल?असा सवाल आता नागपूरकर नागरिक करीत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी विटा पोलिस ठाण्यातील पोलिसांना चांगलेच खडसावत,पोलिसांना आपल्या वर्दीविषयी काय वाटते?अशी विचारणा केली होती.वर्दी मिळाली म्हणजे काही दैवीशक्ती मिळाली,असे त्यांना वाटते का?आपण उत्तर ध्रुव व दक्ष्ण ध्रुवावर असल्यासारखे आहोत का,की जणू काही अनेक महिने सूर्यच उगवणार नाही,रात्रीच्या वेळी घरात घूसून कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता का पडली?असा सरळ प्रश्न एका प्रकरणामध्ये न्यायालयाने पोलिसांना विचारला.हीच बाब नागरपूरच्याही घटनेला लागू होण्यासारखी आहे,पोलिसांना आपल्या वर्दीविषयी काय वाटते?अवघ्या एका मिनिटाच्या अंतरावर एखाद्या सावजी भोजनालयात बेकायदेशीर मद्य विक्री होते,मद्य प्राशन केलं जातं,अश्या वेळी पोलिसांच्या भरारी पथकालाही याची माहिती मिळत नाही! गृहमंत्र्यांच्या शहरात गृहमंत्र्यांच्याच पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवर व विश्वासहर्तेवर ही घटना प्रश्न उपस्थित करते.

दारुड्यांचा’आनंददायी’व्हिडीयो व्हायरल झाल्यावर ‘झोपी गेलेला जागा झाला’हे नाट्यरंग रंगले.राज्य उत्पादन शुल्क विभागही जागा झाला.मद्ययुक्त पदार्थावरील उत्पादन शुल्क वसूल करणे आणि त्यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हा विभाग करीत असतो.हूडकेश्वर पोलिस,एनडीपीएस पथक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या या भोजनालयावर कारवाई केली.या दरम्यान प्रत्येक टेबलवर मद्याच्या बाटल्या होत्या.अनेक टेबलवर उघडपणे मद्य प्राशन केले जात होते तर काही टेबलवर स्टीलच्या ग्लासमध्ये प्लास्टिकचा मद्य भरलेला ग्लास लपवून मद्याचा आनंद लृटला जात होता. सावजी भोजनालयातील एका दारुड्याला हेच ‘अप्रूप’ मोबाईलमध्ये कैद्य करण्याचा व रहस्य सांगण्याचा मोह आवरला गेला नाही व या तिन्ही प्रशासकीय खात्याच्या कार्यक्षमतेचे बिंग फूटले.
हुडकेश्वर पोलिसांनी सावजी भोजलनायाचे संचालक नरेंद्र मधूकरराव डोरलीकरविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायद्याच्या कलम ६८ अन्वये तसेच भोजनालयात बेकायदेशीररित्या मद्य प्राशन करीत बसलेल्या ग्राहकांच्या विरोधात कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला.या कायद्यांतर्गत बेकायदेशीर मद्यविक्री केल्यास २५ हजार ते ५० हजार रुपये दंड तसेच ३ ते ५ वर्षे तुंरुगाच्या शिक्षेचे प्रावधान आहे.
हा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.रात्री-अपरात्री घडणा-या अपघातात अश्या मद्यपी ग्राहक वाहनचालकांचे प्रमाण लक्षणीय आहे. रामझुल्यावरील रितू मालूचे प्रकरण हे समाजमन सुन्न करणारे आहे .या प्रकरणात तर न्यायालयाने पोलिसांचीच चौकशी करण्याचे आदेश दिले तर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे एकुलते एक सुपुत्र संकेत बावणकुळे यांच्यासह दोन मित्रांनी धरमपेठेतील लाहोरी बार मधून मद्य प्राशनानंतर रामदासपेठेत घातलेला ‘ऑडी’चा थरार अद्याप नागपूरकर विसरलेले नाहीत.तीन कोटींची ऑडी पंधरा दिवसांपूर्वीच संकेत बावणकुळेंच्या सेवेत हजर झाली होती…!पंधरा दिवसात ती सीताबर्डी पोलिस ठाण्यात जमा झालेली दिसून पडली.या प्रकरणाच्या तपासात तर लाहोरी बार मधील सीसीटीव्ही फूटेजच गायब झाले.शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरात येऊन सीताबर्डी ठाण्यात ठाण मांडून घटनेचा निषेध ही केला.मात्र,राजकीय पातळीवरील राजकारणा पलीकडे या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.
अश्या घटना मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या शहरात घडू नये याची संपूर्ण जवाबदारी पोलिस विभागाची असून हाकेच्या अंतरावरील भोजनालयात जर बेकायदेशीर मद्य विक्रीचे धाडस भोजनालयाचा मालक खुलेआम करीत असेल तर त्याची जागा सभ्य समाजात नसून तुरुंगातच असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
