

१९ वर्षांपूर्वी झालेल्या बापाच्या हत्येचा घेतला बदला
नागपूर,ता.२७ सप्टेंबर: उपराजधानीत काल शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी धरमपेठ येथील भोले पेट्रोल पंपजवळील सिग्नलवर दूपारी ४ वा.घडलेल्या थरारक हत्याकांडातील चार अाराेपींना अवघ्या २४ तासात अटक करण्यात पोलीसांना यश आलं आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे(३०)रजत राजा तांबे(२२)आसिम विजय लुडेरकर(२८) तिघेही राहणार इमामवाडा आणि भरत राजेंद्र पंडित(२२)इंदिरानगर,जाततरोडी,अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी तिघांना रामटेक परिसरातून तर एकाला नागपूरातून अटक केली आहे. अनिकेत उर्फ अभिषेक(रा.झिंगाबाई टाकळी)असे फरार आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी चेतन हजारे याचे वडील सुनील हजारे यांचा २००१ मध्ये बाल्या बिनेकरने खून केला होता. त्यावेळी चेतन हा केवळ १५ वर्षांचा होता.काही वर्षातच चेतन हा गुन्हेगारी जगतात आला. त्याने जम बसवितानाच बाल्याचा खून करुन बापाच्या हत्याकांडाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी तो गेल्या अनेक महिन्यांपासून रेकी करीत होता.
शेवटी बाल्याला संपवण्यासाठी शनिवार दिवस उजाडला. शनिवारी दुपारी ४ वा. भोले पेट्रोल पंपजवळीत सिग्नलवर चेतनने आपल्या ६ साथीदारांसह बाल्याला अडवले. त्याच्यावर पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पिस्तूल जाम झाल्याने गोळी चाललीच नाही. यामुळे घटनास्थळावर माऊजरची मॅगजीन पडली होती. आरोपींनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन बाल्या बिनेकरच्या शरिराची चाळण केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.
हत्याकाडांनंतर दोन तासातच गुन्हे शाखेचे युनिट क्र. १ चे पोलिस निरीक्ष् क संतोष खांडेकर, हवालदार प्रकाश वानखेडे,दत्ता बागूल, नरेश सहारे, आशिष देवरे,अरुण चहांदे,राहूल इंगोले आणि मंगेश मडावी यांनी हत्याकांडातील आरोपी आसिम विजय लुडेरकर या आरोपीला अटक केली. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने इतर आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर गुन्हे शाखेने मुख्य अारोपीसह तीन आरोपींना अटक केली.




आमचे चॅनल subscribe करा
