

मनपाच्या गाळ्यांची परस्पर विक्री लाखांमध्ये!
सक्करदरा बाजारातील गाळ्याला ठाेकले टाळे:इतरांचे व्यवहार मात्र ‘जैसे थे’
बेकायदेशीर व्यवहारात होतकरु तरुण ठरला बळीचा बकरा
सतीश होले यांनी सभेत उपस्थित केला प्रश्न:बाजार विभागाने काढला तरुणावर रोष!
नागपूर,ता. १९ सप्टेंबर २०२१: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भारतवासीयांना कितीही कंठशोष करुन आश्वासन दिले असले की ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’तरीही त्यांच्याच पक्ष्ाची सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेपर्यंत त्यांच्या आवाजाची गंूज पाहोचणे दुरापस्तच आहे. अद्याप ही शहरवासीयांसाठी भ्रष्टाचाराच्या बाबतीत ‘दिल्ली बहोत दूरच’असल्याचा प्रत्यय मनपाच्या अनेक भ्रष्ट कारभारातूनयेतच असतो.त्यात आणखी एका ‘वर पासून तर खालपर्यंत ’भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रकरणाची भर पडली असून सक्करदरा येथील राष्ट्रीय गांधी र्मोकेट मधील गाळा क्र.२६ बाबतच्या घटनेमुळे अश्या या संपूर्ण भ्रष्ट कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

आनंद चंद्रकांत बोपुलवार या तरुणाने हे गाळे ‘संजय मेहर’ यांच्याकडून तब्बल १२ लाख रुपये देऊन ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिखापढी करुन विक्रीपत्र करुन घेतले. यात ही सर्वात मोठा घोळ म्हणजे हे गाळे भाडेतत्वावर मूळ ‘शंकर पजई’ या इसमाला मनपाच्या बाजार विभागातर्फे आवंटित झाले होते,त्याने संजय मेहर यांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते गाळे त्यांना त्याची गरज नसल्याचे सांगून १५ लाख रुपयांना विकले होते!हे विक्री पत्र बघून आनंद या तरुणाने असे गाळे विकत घेता येेते असा समज करुन हा व्यवहार केला होता.
या गाळ्यात ‘आंनद हेअर सलून’चालविणा-या या तरुणाने पजई यांना गाळ्यांची मूळ कागदपत्रे मागण्याचा तकादा लावला होता मात्र मूळात पजई यांच्याकडेही या गाळ्याची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने त्यांनी टोळवाटोळवी चालवली होती.

करोनाच्या विळख्याने आधीच हवालदिल झालेला हा लहान दूकानदार यामुळे आणखीनच धास्तीत गेला.अश्यावेळी आनंद यांच्या एका मित्राने त्याला धीर देत भाजप नगरसेवक सतीश होले यांच्याकडे या गाळ्यासंबधी मित्राची मदत करण्याची विनंती केली.या प्रकरणामुळे सक्करदरा येथील तब्बल ६० ते ७० गाळे आणि ५० ओटे यांचा गौडबंगाल होले यांनाही कळताच त्यांनी १९ जुलै २०२१ रोजी निगम सचिवांकडे गाळे वाटपाच्या संदर्भात माहिती मागितली.
हा प्रश्न त्यांनी सभेत लावून धरला.एवढंच नव्हे तर शहरभर पसरलेल्या बाजार विभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या प्रश्नावर त्यांनी ३ दिवस मनपाच्या परिसरात आंदोलन देखील केले.सक्करदरा येथील कमला नेहरु महाविद्यालयाला अगदी लागून असणा-या या गाळ्यांच्या परवानाधारकांच्या नावांमध्ये खूप मोठा घोळ असून सत्ताधारी भाजपच्याच एका ‘गब्बर’नेत्याने आपल्या स्वीय सहायक तसेच वाहन चालकाच्या नावाने परवाने मिळवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मात्र एवढी वर्षे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप‘असणा-यांमध्ये या तरुणाच्या या आततायी धोरणामुळे चांगलीच दहशत पसरली. यामुळे मनपाच्या बाजार विभागाच्या अधिका-यांचा रोष या तरुणावर ओढवला,त्यांना तातडीने तो या गाळ्यामध्ये ‘अवैध’रित्या व्यवसाय करीत असल्याची ‘उपरती’ झाली व त्यांनी चार महिन्यांपूर्वी या तरुणाला एका महिन्याच्या नोटीसवर तात्काळ गाळे रिकामे करण्याची तंबी दिली.महत्वाचे म्हणजे कोविड नियमाप्रमाणे दूपारी ४ वाजेपर्यंतच दूकाने उघडी ठेवण्याची वेळ असताना आणि एक महिन्याचा अवधी दिला असताना ही २५ साव्या दिवशीच दूपारी ४ वा.नंतर बाजार विभागाने कुलूपावर कुलुप ठाकेले!
दुस-या दिवशी आपल्या गाळ्याला मनपाच्या बाजार विभागाचे कुलूप लागलेले बघून हा तरुण हताश झाला,यानंतर त्याने हनुमान नगर झोन कार्यालय,महसूल विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम ते महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे अर्जावर अर्ज रखडले.सळसळते रक्त असल्याने त्याच्या अर्जातील भाषा बघून महापौरांनी त्याला ’हे खूपच गरम आहे थोडा विनंतीवजा थंड अर्ज विभागाला कर’असा ‘प्रेमळ सल्ला’दिला.

मोठ्या आशेने या तरुणाने महापौरांच्या सल्ल्याप्रमाणे ‘थंड’असा ’विनंतीवजा’अर्ज ही विभागाला ’अर्पण’केला,त्याचा हा अर्ज महापौरांनी बाजार विभागाकडे पाठवलाही मात्र या विभागाने तरुणावरील रोषामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या तसेच आत्मसन्मानाच्या एकमेव साधनाचे ‘तर्पण’करण्याची संपूर्ण ‘कायदेशीर’तयारीच करुन ठेवली होती. शेवटी गाळयाचा परवाना त्याच्या नावावर नव्हताच,त्यामुळे तरुणाचाही नाईलाज झाला त्याला आता फक्त त्याचे १२ लाख रुपये जे त्याने स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन संजय मेहर यांना दिले ते परत हवे किवा गेल्या ४ महिन्यांपासून ६० गाळ्यांपैकी त्याच्याच ‘एकमेव’ गाळ्यावर जे कूलूप ठोकण्यात आले ते उघडून पुन्हा आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्याला चालवायचा आहे.
त्याचे संपूर्ण सामान देखील दूकानाच्या आतमध्येच आहे,गेल्या ४ महिन्यांपासून तो मनपा मुख्यालयाच्या चकरा मारुन व सत्ताधारी भाजपच्या नेत्यांच्या चौकटीवर नाक घासून पुरता कासाविस झाला आहे.अखेर त्याने ॲड.आशिष चरणदास वासनिक यांच्यामार्फत मनपाच्या बाजार विभागाला चक्क नोटीस पाठवली.
या नोटीसीला २४ आँंंंगस्ट २०२१ रोजी मनपाने दिलेल्या उत्तराप्रमाणे मनपातर्फे काेणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसून उलटपक्ष्ी आपल्या अशिलाने नियमबाह्यरित्या दूकानाचा ताबा घेतला असून मनपाने नियमानुसार ते गाळे परत घेतल्याचे नमूद केले.एवढंच नव्हे तर आपला अशील हा मनपाचा परवानाधारक नसल्याने त्याला या प्रक्रियेची माहिती देणे नियमानुसार गरजेचे नसून सदर दूकानाचा परवाना हा कायदेशीरित्या रद्द केला असून हे दूकान आता मनपाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. एवढंच नव्हे तर तुमच्या अशिलावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो,अशी ‘कायदेशीर’ तंबी ही दिली.
संपूर्ण मनपा हद्दीतच मनपाच्या गाळ्यांची लाखोंच्या व्यवहारात परस्पर विक्री होत असताना तसेच परवानाधारक दूसरेच मात्र प्रत्यक्ष्ात गाळ्यांमध्ये व्यवसाय करणारे दूसरेच असा संपूर्ण कारभार सुरु असताना, लाखोंचे वारे-न्यारे होत असताना मनपाच्या बाजार विभागाला मात्र या नियमांचे उल्लंघन होताना किवा अवैध कारभार होताना कधीही दिसत नाही.
संजय गुलाबराव मेहर यांनी परवानाधारक शंकर.क.पवई यांच्याकडून केलेला विक्रीचा करारनामा हा देखील कायद्याच्या चाकोरीत न बसता बेकायदीशीरच होता,मग बाजार विभाग अश्या संपूर्ण बेकायदेशीर गाळेधारकांवर तसेच ओटे धारकांवरही ‘कायदेशीर‘कारवाई करुन गाळे आणि ओटे ताब्यात घेणार आहे का?हा प्रश्न मात्र तरीही अनुत्तरीत राहतो.
गेल्या ५ वर्षांपासून या तरुणाच्या नावाने वीज मीटर सुरु असून हे दूकान संजय मेहर यांच्याकडून त्याला कायदेशीररित्या हस्तांतरीत झाले आहे,या भाबड्या विश्वासात तो जगत होता मात्र मनपाच्या भ्रष्ट नोकरशाहीच्या भ्रष्ट कारभारात एक होतकरु,प्रामाणिक तरुण गेल्या ४ महिन्यांपासून चक्क बेरोजगार झाला आणि याचे कोणतेही सोयरसूतक ‘गल्ली ते दिल्ली’वाल्यांना नाही.




आमचे चॅनल subscribe करा
