
राज्याचे गृहमंत्री घेणार का जबाबदारी?आंबेडकरी पॅर्थंसचा आक्रोश
११२ डायल करने पडले महागात!
नागपूर,ता.८ डिसेंबर २०२२: ज्यांनी या देशाला जगातील सर्वोकृष्ट संविधान बहाल केले,लोकांनी,लोकांसाठी,लोकांचे राज्य, ही लोकशाही व्यवस्था बहाल केली,याच लोकशाही व्यवस्थेतील पोलिस या विभागासाठी ‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे मूल्य प्रस्थापित केले त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी अर्थात परवा मंगळवारी नरखेड सारख्या पुरोगामी महाराष्ट्राच्या एका छोट्याश्या तालुकाच्या ठिकाणी दोन आंबेडकरी तरुण ११२ क्रमांकावर डायल करण्याची ‘गुस्ताखी’ करतात मग‘सिंघम’स्टाईलने जाकीर शेख व रवि साठवणे हे दोन पोलिस शिपाई जीप मधून उतरतात आणि कोणी फोन केला होता?अशी विचारणा करतात,पवन गजबे हा विशीतला तरुण पुढे येताच पोलिस शिपाई रवि साठवणे सरळ त्याला थापडा मारायला लागतात!शुभम गोंडाणे हा दुस-या सामाजिक तरुण कार्यकर्ता पोलिस शिपायाला, पवनला का मारहाण करता?अशी विचारणा करताच जाकीर शेख नामक दुसरा पाेलिस शिपाई त्याच्यावर तुटून पडतो आणि मग भारतीय लोकशाही ही लोकांची, लोकांसाठीची राज्य व्यवस्था राहत नसून शासकीय विभागांची लोकांवर राज्य करणारी कायदेशीर व्यवस्था झालेली दिसून पडते!
एकीकडे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह ,महामानवाला विनम्र अभिवादनाची लाखो रुपयांची जाहीरात वृत्तपत्रांवर फूलपेज झळकत होती,दूसरीकडे त्याच बाबासाहेबांच्या दाेन तरुण अनुयायांवर खाकी वर्दीतील दोन पोलिस शिपाई ‘खाकी वर्दी’चा गैरकायदेशीर रुबाब दाखविण्यात मग्न होती!
कश्याप्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे,कश्याप्रकारे स्मारकाचे प्रवेशद्वार,इमारत,व्याख्यान वर्ग,ग्रंथालय,तळमजल्यामधील वाहनतळाचे काम ५० टक्क्यांपेक्षा पूर्ण झाले आहे,कश्याप्रकारे या स्मारकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा २५ फूट भव्य पुतळा बसवण्याची तयारी पूर्ण होत आहे,कश्याप्रकारे ४.८ हेक्टर क्षेत्रफळ जागेवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी १०९० कोटींचा खर्च राज्य सरकार करीत आहे,कश्याप्रकारे भारतीय संविधानाच्या या शिल्पकारच्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाचे ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले जाणार आहे इत्यादी..इत्यादी मजकूराने भरलेली पानभर जाहीरात म्हणजे मायबाप सरकारच्या लेखी बाबासाहेबांना खरे विनम्र अभिवादन असेल ही,पण त्या ‘महामानवासाठी’ सरकारच्या या पानभर जाहीरातरुपी कोरड्या अभिवादनापेक्षा, त्यांच्या आंबेडकरी जनतेवरील प्रशसानरुपी होणारा अन्याय अत्याचार निखंदून काढण्याचा प्रयत्न, ही जास्त प्रभावी आदरांजली ठरली असती मात्र,असे घडले नाही.
नरखेड येथील सामाजिक कार्यकर्ता पवन गजबे याने रात्री १०.१५ मिनिटावर तेथील बसस्टॉप चौक येथे अस्ताव्यस्त पार्क केलेल्या शेकडो गाड्यांच्या संदर्भात,अपघात होऊ नये म्हणून पोलीस हेल्प लाईन ११२ क्रमांकावर कॉल केला.तक्ररीनंतर नरखेड पोलिस ठाण्यातून फाेन आला व विचारणा झाली,‘फोन कोणी केला?’यावर पवन गजबे याने ‘फोन मीच केला व सद्या मी बसस्टॉप चौकातच उभा आहे’असे सांगितले’.
‘तिथेच थांबा,आम्ही येतो आहोत’असे पवनला सांगण्यात आले.थोड्याच वेळात पोलिसांची जीव बसस्टॉप चौकात आली.जीप मधून उतरुन रवि साठवणे यांनी पवनला जवळ बोलावले व का तक्रार केली म्हणून कोणतीही विचारणा न करता ,थापडा मारण्यास सुरवात केली!यामुळे ‘तुम्ही याला का मारता’म्हणून शुभम गोंडाणे या पवन सोबत असलेल्या दुस-या सामाजिक कार्यकर्त्याने विचारणा करताच, जाकीर शेख नावाच्या दुस-या शिपायाने शुभम याल मारहाण करण्यास सुरवात केली….!
एकीकडे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला मायबाप राज्य सरकार,गृहमंत्री विनम्र अभिवादनात अख्खा दिवस विविध कार्यक्रमात व्यस्त राहतात,दुसरीकडे बाबासाहेबांच्या या दोन विशीतल्या दलित पँथर्सना गृहमंत्र्यांच्याच अखत्यारितीत असलेल्या पोलिस विभागातील दोन पोलिस शिपाई,कोणताही गुन्हा नसताना बेदन मारहाण करतात..!
ही संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमरामध्ये रेकॉर्ड ही झाली.कश्याप्रकारे ‘सज्जानांचे रक्षण आणि दूर्जनांचे निर्दालन’करणा-या पोलिस विभागातील दोन शिपाई या दोघा तरुणांना पोलिस जीपमध्ये कोंबून पोलिस ठाण्यात आणतात,जीपमध्येही मारहाण करतात,पोलिस ठाण्यात आणून कश्याप्रकारे विविध कलमा लावण्याचा धाक दाखवून आपले ‘संवैधानिक’कर्तव्य पार पाडतात,या तरुणांच्या को-या कागदावर स्वाक्ष-या घेतात व या पुढे कुठलीही तक्रार करायची नाही,असा सज्जड दम देऊनच सोडतात,ही भारत नावाच्या संवैधानिक लोकशाही असणा-या देशासाठी जणू ‘भूषणावह’बाब होते!
हे दोन्ही शिपाई टून्न अवस्थेत म्हणजे दारु पिऊन असल्याचा दावा हे दोघे तरुण नागपूरातील पत्रकार भवन येथे पार पडलेल्या पत्र परिषदेत करतात.या मारहाणीने आहत होऊन दुस-या दिवशी नरखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपालसिंग गिरासे यांना लिखित तक्रार दिली जाते मात्र गिरासे हे त्या दोन्ही दोषी पोलिस शिपायांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात,यामुळे हे दोघे तरुण रिपब्लिकन युवक संघाचे अध्यक्ष राहूल गजबे यांच्याकडे दाद मागतात.गजबे यांनी पोलिस ठाणे गाठून दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सुद्धा तक्रार देण्यात आली,डिवायएसपी नागेश जाधव यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवली मात्र दोन दिवस उलटून देखील पोलिस विभागाकडून कायदेशीर कारवाई दाेषींविरुद्ध करण्यात आली नाही. पोलिस अधिकारी आपल्या दोषी कर्मचा-यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप राहूल गजबे यांनी पत्र परिषदेत केला.
पवन गजबे व शुभम गोंडाणे हे पँथर सेनेचे कार्यकर्ते असून गावातील अवैध धंदे पोलिसांच्या संगमताने जे चालतात त्या विरोधात सातत्याने मोठ्या पोलिस अधिका-यांकडे निवेदन देत असतात,याचीच खुन्नस या दोन्ही पोलिस शिपायांनी काढली असल्याचा आरोप राहूल गजबे यांनी केला.या तरुणांचे मनोबल खच्चीकरण करुन या पुढे त्यांनी अवैध धंधे या बाबत तक्रार करु नये,यासाठीच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.या संदर्भात एसपी यांच्याकडे देखील दोषींवर कारवाई व निलंबन करण्यासाठी निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदन दिले असून सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौ-यामध्ये व्यस्त आहे मात्र राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी तातडीने या गंभीर घटनेची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लीकन युवक मंच व पँथर सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राहूल गजबे यांनी दिला.
थोडक्यात बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांनी देशात साश्रू नयनांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांचा आठव केला,बाबासाहेबांनी त्यांची अख्खी हयात दीन दलितांवर होणा-या अन्याय,अत्याचाराविरोधात पराकोटीचा संघर्ष करण्यात घालवली,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देखील बाबासाहेबांच्या निर्दोष अनुयायांवर तसेच अन्याय,अत्याचार, ते ही एखाद्या शासकीय विभागाद्वारेच होत असेल तर….हा देश खरंच परतंत्र नसून संविधानानुसारच चालत आहे,हे पुन्हा एकदा तपासून बघण्याचीच गरज आहे,असेच आता म्हणावे लागेल…..!




आमचे चॅनल subscribe करा
