

पुन्हा चार गर्भवतींना काेरोनाची बाधा!
नागपूर, ता.१३ मे: कोराेना विषाणूचा प्रादुर्भाव हा आता समुह संसर्गाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असल्याचे निर्दशनास येत असून संपर्कातून संसर्ग साखळीचा टप्पा जणू कोराना विषाणूने कधीचाच ओलांडला असल्याचे दररोज वाढत जाणा-या बाधितांच्या आकड्यांवरुन दिसून पडत आहे. बुधवार दि.१३ मे रोजी बाधितांच्या संख्येत आणखी १० रुग्णांची भर पडली असून नागपूरात आता कोरोना बाधितांची संख्या ही ३१४ वर पोहोचली आहे. बाधितांमध्ये ४ गर्भवती महिला असल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील ‘हॉट स्पॉट’ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमिनपुरा भागातील विलगीकरणातील हे रुग्ण असून विलगीकरणातील संशयित हे मोठ्या संख्येने बाधित असल्याचे आढळून येत आहे. मंगळवारी शहरातील बाधितांची संख्या ही ३०४ वर पोहोचली होती. यात बुधवारी सकाळी आणखी १० रुग्णांची भर पडली. आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये मोमिनपु-यातील ९ तर सतरंजीपुरा येथील १ बाधिताचा समावेश आहे. आतापर्यंत मोमिनपुरा येथील १५३ बाधितांपैकी ११ रुग्ण बरे झाले आहेत तर सतरंजुपुरा येथील १०१ बाधितांपैकी ५४ रुग्ण हे बरे झाले आहेत. शांतीनगरातील ८ पैकी ४ रुग्ण तर खामला येथील सर्व ७ रुग्ण बरे झाले आहेत. जरिपटका येथील सर्व ५ रुग्ण हे बरे झाले होते.
मेयामध्ये आज २११ सॅम्पल तपासण्यात आले. त्यात ४ पॉझिटीव्ह आले तर १ बाधित हा आधीपासूनच मेडीकलमध्ये उपचार घेत आहे. मेयोमध्ये आता एकूण ८५ कोरोना बाधित रुग्ण भरती आहेत. यातील दोन रुग्णांचा त्रास थोडा गंभीर आहे. सारीचे दोन रुग्ण असून २१ वर्षीय मुलीला थैलिसिमियाचाही त्रास अाहे. मेयोच्या कोव्हिड वार्डात १२६ रुग्ण असून त्यांचे अहवाल उद्या सकाळपर्यंत प्राप्त होतील अशी माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी दिली.
मेडीकलमध्ये आज ६ नवे कोरोना बाधित रुग्ण भरती झाले असून यात मोमिनपुरा येथील ३६ वर्षीय महिला,५० वर्षीय महिला,२० वर्षीय तरुणी,३५ वर्षीय महिला,७३ वर्षीय महिला तसेच ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज मेडीकलमधून काेरोनापासून बरे होऊन सुटी झालेल्यांमध्ये शांतीनगर येथील ३५ वर्षीय महिला,मोमिनपुरा येथील ३२ वर्षीय महिला,मोमिनपुरा येथील ३ वर्षीय चिमुरडी तसेच २ वर्षीय चिमुरडा व २३ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३ व २ वर्षीय चिमुकल्यांनी यशस्वीपणे कोरोना संसर्गावर मात केली असून ही अत्यंत दिलासा देणारी आणि तेवढीच प्रेरणादायी बाब आहे. मेडिकलमध्ये चौदा दिवसांपूर्वी दोन आणि तीन वर्षांचे दोन चिमुकले कोरोनाबाधित आढळले होते. या दोघांवरही योग्य उपचार झाले. या चिमुकल्यांसह त्यांचे आईवडील होते. ते कोरोनाबाधित नव्हते.
मेडीकल रुग्णालयात आज दि. १३ मे रोजी सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंत १७३ कोराेनाचे रुग्ण भरती होते.यापैकी ५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.दोघांचा मृत्यू झाला तर ११७ हे रुग्णालयात भरती आहेत. मेडीकलच्या वॉर्ड क्र.४९ मध्ये एकूण ११ रुग्ण तर ट्रामा सेंटरमध्ये ८२ रुग्ण असून वॉड.क्र.१ मध्ये २४ रुग्ण भरती असल्याची माहिती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी दिली.मेडीकलमध्ये आज ६ नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची भरती झाली असून आज ५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
बुधवारी पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून ५, मेयोतून ४ तर एम्स आणि मेडिकलमधून प्रत्येकी १ जणाचा अहवाल कोरोनाबाधित आढळला आहे.
विलगीकरणात २ हजार २५३ व्यक्ती-
सध्या ज्या वस्त्यांमध्ये संचारबंदी आहे, अशा वस्त्यांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. मोमिनपुरा, पार्वतीनगर, शताब्दीनगर, सतरंजीपुरा, जवाहरनगर अशा वस्त्यांमधील २ हजार २५३ व्यक्ती उपराजधानीतील विविध विलगीकरण केंद्रात आहेत. या विलगीकरणातीलच व्यक्ती कोरोनाबाधित आढळणार आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.
उपराजधानीत आढळून येणारे बाधित हे विलगीकरणातील असल्याने तूर्तात शहरातील सामुदायिक प्रादुर्भावाचा धोका कमी आहे,असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सुमारे ९ दिवस लक्षणे नसलेल्या व्यक्तींना दहाव्या दिवशी सुटी होणार असल्याचे रुग्णांना घरी सोडण्याचे नवीन धोरण असल्याचे सांगण्यात आले. सामुदायिक प्रादुर्भाव परसरल्यानंतर हे धोरण अंमलात येईल. तूर्तास चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच बाधिताला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याच्या सूचना प्रशासनाने बैठकीतून दिल्या असल्याची माहिती आहे. यामुळे मेयो, मेडिकलमधून सुटी होण्यापूर्वी कोरोनाबाधितांची चाचणी निगेटिव्ह येणे हीच अट असल्याचे सांगण्यात आले.विशेष असे की, मागील दोन दिवसांपासून शहरातील पाचही प्रयोगशाळांमध्ये पाचशेपेक्षा जास्त चाचण्या होत असल्यामुळे येत्या आठ दिवसांत विलगीकरणात असलेल्या सर्व व्यक्तींचे नमुने तपासले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
१४ दिवसांनंतर नवजात कन्या आईच्या कुशीत-
प्रसूतीच्या टेबलवर प्रसूतीसाठी घेतल्यानंतर “ती’ माता कोरोनाबाधित असल्याचा धक्कादायक अहवाल आला होता. डॉक्टरांनी देवदूत बनून कोरोनाबाधित मातेची सुरक्षित प्रसूती केली. मात्र, नऊ महिने पोटात वाढवलेल्या तान्हुलीला जन्मतःच आईच्या कुशीपासून दूर करण्यात आले. त्या प्रसूत मातेची आपल्याच हाडा मासाच्या अर्भकाला फक्त लांबूनच डोळे भरून बघता आले होते. मायलेकीची कोरोनाने ताटातूट केली.. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या मातेने समाधान मानले. दुरूनच लेकीला बघितलं. तब्बल १४ दिवसांनंतर ती माता कोरोनाच्या विळख्यातून आज मुक्त झाली आणि तान्हुली त्या मातेच्या कुशीत आली. तान्हुलीला छातीशी कवटाळयानंतर त्या मातेचे डोळे भरून आले. हे दृश्य बघून येथील डॉक्टर, परिचारिकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. यावेळी मेयोतील डॉक्टरांनी मायलेकीला सोडताना टाळ्यांचा गजर केला. व्हीलचेअरवरून जाताना दोन्ही हात जोडून त्या मातेने डॉक्टररूपी देवदूतांचे आभार मानले. बुधवारी मेयोतून ५ तर मेडिकलमधून ५ अशा १० जणांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. आतापर्यंत ११३ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.
मेयो रुग्णालयात २९ एप्रिल रोजी या मातेची प्रसूती झाली. गर्भवती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल स्त्री व प्रसूती विभागाच्या शस्त्रक्रियागारात टेबलवर घेतल्यानंतर प्राप्त झाला. त्यावेळी प्रसूती करण्यासाठी उपस्थित सारेच निवासी डॉक्टर हादरले. मात्र, वैद्यकीय व्यवसायाचं पावित्र्य लक्षात घेत मेयोतील स्त्री व प्रसूतीरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी आव्हान स्वीकारत प्रसूती केली. विशेष असे की, प्रसूतीनंतर विलगीकरणात जाणार हे मनात पक्के करून या डॉक्टरांनी प्रसूती केली. मेयोतील या प्रसूत मातेसह कमाल चौकातील ३३ वर्षीय तर सतरंजीपुरा येथील ४५ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली. याशिवाय सतरंजीपुरा येथील २८,, ३८ वर्षीय व्यक्तींनीही कोरोनाला हरवले.
“ये मेरा दुसरा जनम है’ मातेचे कृतज्ञ शब्द-
महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागले. त्या निवासी डॉक्टरांबद्दल आदरभाव व्यक्त करीत त्या मातेने दोन्ही हात जोडून मेयोतील सर्वच डॉक्टरांचे आभार मानले. हात जोडताना मोमिनपुरा येथील त्या मातेने “ये मेरा दुसरा जनम है’ असे भावस्पर्शी शब्द म्हटले,हे म्हणताना तिचे डोळे पाणावले होते. यावेळी उपस्थित डॉ. मृणाल हरदास यांनी त्या मातेच्या पाठीवरून हात फिरवत व तिला धीर दिला. लेकीची काळजी घ्यावी यासाठी सल्ला दिला.




आमचे चॅनल subscribe करा
