फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबहुमजली इमारतीसाठी आता स्वतंत्र नळजोडणी

बहुमजली इमारतीसाठी आता स्वतंत्र नळजोडणी

Advertisements

जलप्रदाय समिती सभापती झलके यांची घोषणा

नागपूर, ता. १३: एका वसाहतीतील अऩेक बहुमजली इमारतींसाठी आतापर्यंत एकच नळजोडणी बंधनकारक होती. त्यामुळे पाणीबिलावरून अनेकदा वाद निर्माण होऊन महापालिकेच्या तिजोरीलाही फटका बसत होता. आता मात्र एका वसाहतीतील वेगवेगळ्या बहुमजली इमारतींसाठी स्वतंत्र नळजोडणी घेणे शक्य होणार असल्याचे जलप्रदाय समिती सभापती व स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांंनी आज पत्र-परिषदेत सांगितले.

महापालिकेच्या जलप्रदाय समितीची बैठक आज सिव्हिल लाईन येथील मुख्यालयात पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. वसाहतीत प्रत्येक बहुमजली इमारतीला स्वतंत्र नळजोडणी देण्यात येणार असल्याने देयकाबाबतचे वसाहतीअंतर्गत वाद कमी होतील. शिवाय एका इमारतीतील नागरिक सहज पाण्याची बिले भरू शकतील. त्यामुळे वर्षानुवर्षे अंतर्गत वादामुळे थकीत राहणाऱ्या रकमेच्या प्रकरणात घट होईल, असा दावा झलके यांनी केला.

मात्र, यासाठी प्रत्येक बहुमजली इमारतीला जलसाठ्यासाठी भूमिगत टाके तयार करावे लागणार आहे. महापालिकेतर्फे या टाक्याची तपासणी करण्यात येईल. ते योग्य पद्धतीने बांधले असेल तरच स्वतंत्र नळजोडणी देण्यात येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दरम्यान, अमृत योजनेंतर्गत ४२ जलकुंभाचे काम प्रस्तावित होते. यापैकी १२ जलकुंभांचे काम सुरू आहेत. ३० जलकुंभांसाठी आरक्षण आदीमुळे जागाच उपलब्ध न झाल्याने ते रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले.

१ लाख घरांत चोविस तास पाणी-
शहरात नळजोडणी असलेले ३ लाख ३० हजार ग्राहक आहेत. यापैकी २२ जलकुंभांतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील १ लाख ग्राहकांपर्यंत २४ तास पाणी पोहोचत असल्याचे झलके म्हणाले. ओसीडब्लूने आतापर्यंत सर्व ६८७ किमीच्या जुन्या जलवाहिन्या बदलल्या असून ५० हजार घरांच्या जोडण्या अद्ययावत केल्या.

१९५ कोटी थकीत-
पाणी करातून वर्षाला दीडशे कोटी रुपये महापालिकेला मिळते. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ७२ कोटी २६ लाख रुपये पाणी करातून मिळाले. याशिवाय नागरिकांकडे १९५ कोटी रुपये पाणी करापोटी थकीत आहेत. यात जुन्या थकीत रकमेचा समावेश असून या वसुलीवर भर देण्यात येत असल्याचे झलके म्हणाले.

लकडगंज झोन टँँकरमुक्त-

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिन्यांचे जाळे नसलेल्या भागात २० किमीच्या जलवाहिनी बसविण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फायदा लकडगंज झोनला होणार आहे. आता १ नोव्हेंबरपासून या झोनमधील ३५ टँकरच्या ३०० फेऱ्या बंद होतील. लकडगंज झोन टँकरमुक्त झाल्याचा दावाही त्यांनी केला.
.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या