


नागपूर,२२ जुलै २०१९: प्रभाग क्र.२१ अंतर्गत येणाऱ्या बस्तरवाडीत पौनिकर सायकल स्टोर्सच्याजवळील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईन फूटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी गेल्या चार दिवसांपासून सतत सुरु आहे. दूसरीकडे या प्रभागातील नागरिकच नव्हे तर शहरातील अनेक प्रभागात पाण्याच्या थेंबासाठीही नागरिकांचा जीव मेताकुटीला आल्याचे विदारक दृष्य आहे. ओसीडब्ल्यूला याबाबत तातडीने सूचना देऊनही गेल्या चार दिवसांपासून सतत पिण्याचे शुद्ध पाणी वाहून जात आहे असे ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी पत्रकाद्वारे कळवले.
गेल्या चार दिवसांपासून प्रशासनाचे लक्ष् या गंभीर बाबीकडे वेधून देखील कोणतीही उपाययोजना तातडीने करण्यात आली नाही.शेवटी आज सोमवार दि.२२ जुलै रोजी ब्रेकर लावून व सहा-सात कर्मचारी लावून ही नासाडी थांबवण्यात आली मात्र गुरुवारी रात्री पासून पाण्याची पाईप लाईन फूटली तेव्हा शुक्रवारीच यंत्र सामग्री व कर्मचारी लावून वाहणारे पाणी का थांबवण्यात नाही आले?असा प्रश्न आभा पांडे यांनी उपस्थित केला. शुक्रवारी ओसीडब्ल्यू यांनी फक्त एक माणूस पाठवला. यानंतर शनिवारी रात्री १० वा. ब्रेकर पाठवला, प्रभागात अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच हदयरुग्ण देखील आहेत,ब्रेकरचा आवाज त्यांना सहन होणार नसल्याची तक्रार त्यांनी केली. गेल्या एक महिन्यापासूनच पाईप लाईनमध्ये समस्या होती. अत्यंत कमी दबाने नागरिकांना पाणी मिळत होते किवा गढूळ पाणी मिळायचे.शेवटी गुरुवारी रात्री पाईप लाईनच फूटली आणि हजारो लिटर पाणी हे अक्ष् रश: वाहून गेले.
महापालिकेने शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी ओसीडब्ल्यूला कोट्यावधी रुपये मोजून दिले,मात्र जेव्हापासून पाण्याचे खाजगीकरण झाले तेव्हापासून दररोज कोणती ना कोणती समस्या नागरिकां पुढे उभी राहते आहे. सोमवारी आभा पांडे यांनी आयटी पार्क येथील ओसीडब्ल्यूचे मुख्यालय गाठले, तेव्हा तेथील अधिकारी हे मनपा मुख्यालयात बैठकीत व्यस्त असल्याचे कळले. आभा पांडे यांनी मनपा मुख्यालय गाठून शेवटी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर ओसीडब्ल्यूने तातडीने सहा-सात कर्मचारी पाठवले व वाहून जाणारे पाणी थांबवले. हीच तत्परता शुक्रवारीच दाखवली असती तर हजारो लिटर पाणी वाचले असते, अनेकांची तहान भागली असती,तीन दिवस पाणी कपात करुन १८० एमएलडी पाणी प्रति दिन वाचवल्याचे सांगून, जलप्रदाय समितीचे सभापती पाठ थोपटून घेत आहेत, हजारो लिटर पाण्याच्या नासाडीवर त्यांचे काय म्हणने आहे? असा सवाल आभा पांडे यांनी केला.
…………………………




आमचे चॅनल subscribe करा
