फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबंदी असलेल्या अंदाजे तीन टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

बंदी असलेल्या अंदाजे तीन टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

Advertisements

अर्बन सेलच्या पुढाकाराने एन डी एस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने लावले कारखान्याला सील .

नागपूर,ता.२१ जुलै : राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू करून दोन वर्षांचा अवधी उलटला असला तरी नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन सुरू आहे. नागपूर कळमना क्षेत्रात येथील एका कारखान्यात महापालिका एनडीएस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी श्रीकांत शिवणकर यांच्या तक्रारींची दखल घेत छापा टाकला व कारखान्यातून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा तीन टन साठा जप्त केला.

शहरात प्लास्टिकचे सर्रास उत्पादन सुरू असून उत्पादन करणाऱ्यांना कायदा आणि यंत्रणेचा धाक नसल्याचेही यातून समोर येत आहे.पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्याचा निर्णय घेतला मात्र ,त्यानंतरही बाजारात बेधडक प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. तसेच अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर बंदी असलेल्या उत्पादनांची मोठी निर्मिती केली जात आहे.

प्लास्टिक निर्मितीबाबत नागपूर शहराला लागून असलेला भाग सर्वात आघाडीवर असल्याचे गेल्या काही महिन्यांत दिसून येत आहे . अर्बन सेल मार्फत या साठी अनेक दिवसांपासून मोहीम हातात घेत , वारंवार मनपाला तक्रारी केल्यामुळे या साठी एनडीएस मार्फत कारवाई सुरु करण्यात आली आहे .

अर्बन सेलला कळमना परिसरातील जगदंबा प्लास्टिक या नावाने एका काखान्यात छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची निर्मिती केली जात आहे असे कळल्यावर त्यांनी हि माहिती महानगर पालिकेला दिली .याबाबत माहिती मिळताच नागपुर महानगर पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कारखान्यात ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशव्यांचा ३ टन साठा सापडला आहे.

या कारखान्यातील प्लास्टिकचा सर्व साठा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने जप्त केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण कायद्यांतर्गत कारखानदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागपूर मध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकचे साठे वारंवार सापडत असल्याने, शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची निर्मिती होत असल्याचे या कारवायांमधून समोर येत आहे.

याप्रसंगी मनपा घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद लोणे , उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे, अर्बनसेल शहराध्यक्ष श्रीकांत शिवणकर,एकनाथ फलके , मेहबूब पठाण ,सुशांत पाटणेकर ,सुनील उके ,संजय जोशी , संदिप खंगार ,हेमंत यादव , मंगेश सावरकर ,संदिप सुरडकर आणि महानगरपालिका कर्मचारी , एनडीएस चमू हजर होती .

अशा प्रकारची कारवाई पुढे देखील केली जाणार असून, नागरिकांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

आर्थिक हितसंबंध की राजकीय दबाव?

राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली असली, तरी नागपूर शहरात गेल्या वर्षभरात महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईतून शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिकची निर्मिती होत असल्याचे समोर येत आहे, मात्र वारंवार कारवाई करूनही निर्मिती सुरू असल्याने, संबंधित सरकारी विभागांच्या आर्थिक हितसंबंधातून हे कारखाने बंद होत नाहीत,अशी शंका श्रीकांत शिवणकर यांनी उपस्थित केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या