तेलंगखेडी येथे फुटाळा तलाव परिसर तसेच,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या(माफसू)जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हे बांधकाम या ठिकाणी आहे मात्र,गेल्या दोन वर्षांपासून कमलेश चौधरींच्या अतिक्रमणाबाबत आमदार विकास ठाकरे व ज्वाला धोटे यांनी आवाज उठवला आहे.विकास ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी शहरातील अतिक्रमणावरुन सरकारला घेरले होते.बावणकुळे यांनी फुटाळ्याचा मुद्दा गांर्भीयाने घेतला व सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली.तलावाचा काही भाग व पाणलोट क्षेत्र माती टाकून भराव भरण्यात आला व त्यावर २०२२ मध्ये पहिली निवासी इमारत बांधली,यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याला लागून आणखी एक इमारत बांधली.१२ फेब्रुवरीच्या बैठकीत बावणकुळे यांनी मनपा,माफसू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले.तीन दिवसात लॉन हटवून तलाव मूळ स्वरुपात आणण्याचे तसेच पाणलोट क्षेत्राचा ताबा परत घेण्याचे आदेश दिले.
या आदेशाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तलावाच्या माेजमापसाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे अर्ज केला तर माफसूने पाणलोट क्षेत्राच्या माेजणीची मागणी केली.याशिवाय या विभागांनी एमएसईडीसीएल कडे पत्रे लिहून,कमलेश चौधरी आणि त्यांच्या कुटूंबियांनी बांधलेले अवैध घर आणि लॉनचा वीज पुरवठा बंद करण्याची मागणी केली आहे.भूमी-अभिलेख विभागाच्या सिटी सर्व्हे कार्यालयाच्या चमूने आज तलावाचे ६३.४३ एकर आणि त्याच्या पाणलोट भागाचा एक भाग मोजून पूर्ण केला .सकाळी ९ वा.ही चमू फुटाळ्याला पोहोचली व सायंकाळी ५ वाजता त्यांनी मोजमाप पूर्ण केले.फुटाळा तलावाचे मोजमाप गेल्या शंभर वर्षात प्रथमच करण्यात आले!याप्रसंगी मोठ्या संख्येने पोलिसही तैनात होते.
कमलेश चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात हॉकर्सना त्याच्या घराजवळ जमण्याचे, माहिती मिळाल्याने गिट्टी खदान पोलिसांनी कमलेश चौधरीला ताब्यात घेऊन,सरकारी कामात अडथळा निर्माण करु नये या सबबीखाली मोजमाप पूर्ण होईपर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले.
खसरा क्रमांक-१८ असलेल्या तलावाचे ५७.३ एकर,मौजा तेलंगखेडी आणि उत्तरेकडील पाणलोट भागाचे ६.१३ एकर(खसरा क्र.१९ आणि २०)मोजले गेले.या मोजमापाचे निष्कर्ष आणि क-प्रत उद्या गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.हे अवैध लॉन व इमारतीचे बांधकाम पाडण्याची संपूर्ण शक्यता असून नंतर,मोजमापाच्या निष्कर्षांच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभाग व माफसूद्वारे या भागाचा कब्जा घेतला जाईल.कमलेश चौधरी यांनी जमिनीचे मालकी हक्क नसताना,इमारत आराखड्याची मंजूरी न घेता भोगवटा प्रमाणपत्राशिवाय लॉन व दोन अवैध इमारती बांधल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या १९ डिसेंबर २०१४ च्या निर्देशानुसार कोणत्याही भाेगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना वीज व पाणीसारख्या सेवा पुरवठा करणा-या शासकीय विभागांनी सेवा पुरवू नये असे आदेश दिले होते.या अनुषंगाने आता कमलेश चौधरी यांच्या इमारतींच्या व लॉनचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र माफसू व सार्वजनिक बांधकाम विभागाने एमएसइडीसीएलला दिले आहे.
फुटाळा तलावावरील या सर्व अतिक्रमणाच्या घडामोडीवर समस्त पर्यावरणवाद्यांचे लक्ष असून याच हॅरिटेज तलावावरील महामेट्रोद्वारे करण्यात आलेले संपूर्ण बांधकाम विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती आणली आहे,हे विशेष.८ मार्च २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या स्थगितीला मुदतवाढ दिली होती,मात्र,त्यांच्या याचिकेत कमलेश चौधरी यांच्या अतिक्रमणाचा समावेश नाही.

(छायाचित्र : फूटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्राचे मोजमाप करताना)
कमलेश चौधरी यांच्याशी त्यांच्या अवैध बांधकामाबाबत विचारणा केली असता मूळात या जागेवर १४० वर्षांपासून त्यांचे पूर्वज राहत असल्याचे त्यांनी सांगितले.ही आमची चौथी पिढी असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसा बारा वर्षांपर्यंत एखाद्या जागेवर राहत असणा-यांना त्या जागेपासून विमुख करता येत नाही असे ते म्हणाले.पंजाबराव कृषि विद्यापीठाने या पूर्वी देखील १९८४ व त्यानंतर १९८५ साली या जागेवर दावा केला होता मात्र,न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला असल्याची माहिती ते सांगतात.नुकतेच २०२४ मध्ये देखील त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.या विभागाच्या अधिका-यांना कायदेशीर बाबींसाठी व अपीलात जाण्यासाठी वेळ नाही.दावा ते टाकतात आणि न्यायालयात सुनावणीसाठी मात्र हजर राहत नाही.आता अचानक त्यांना पुन्हा जाग आली.
२०१८ मध्ये ही पाणलोट क्षेत्राचे मोजमाप करण्यात आले होते.त्याच वेळी तलावाच्या या भागावर आमचा हक्क त्यांनी मान्य केला असून त्याचे रितसर कागदपत्रे ही माझ्याकडे आहे,ती (क)प्रत माझ्याकडे आहे,असा दावा त्यांनी केला.त्या वेळी तर त्यांना मोजमाप करण्यासाठी देखील मीच मदत केली होती,सिटी सर्व्हेवाल्यांना तर पॉईंट्स देखील माहिती नव्हते. असा दावा देखील त्यांनी केला.पेपर क्रिएट करण्यासाठी आज पुन्हा एकदा ते मोजमाप करत आहेत,ते ही मला पोलिस ठाण्यात डांबून,असा आरोप त्यांनी केला.
आता माझे आक्षेप या सर्व विभागांकडून सरसकट फेटाळून लावण्यात आले असून,न्यायालयाचा स्थगन आदेश असताना ते आमचे बांधकाम पाडू शकत नाही,शासनाचा कोणताही विभाग हा न्यायालयाच्या आदेशाला बांधिल असून, बांधकाम पाडल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल असे ते सांगतात.कलम १०६ अन्वये त्यांना माझ्या आक्षेपांची दखल घेऊन सुनावणी पार पाडावीच लागेल.मूळात सार्वजनिक बांधकाम विभागाचा तर या क्षेत्राशी संबंधच नाही तरी त्यांनी मला नोटीस दिली.सात बारा काढा किवा ४८१/२ त्यांना काहीही निष्पन्न होणार नाही.
मूळात काँग्रेसचे ‘एक्सीडेंटल’ एमएलए असणारे विकास ठाकरे यांच्या मदतीची परतफेड करण्यासाठीच बावणकुळे हे त्यांच्या तक्रारीवर माझ्याविरुद्ध कारवाई करीत असल्याचा आरोप कमलेश चौधरी यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केला!विकास ठाकरे यांनी तपास न करता खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले.विधान सभेत अतिक्रमणाचा मुद्दा उचलायला त्यांना आपल्याच पक्षाचा एक नगरसेवकच दिसला का?असा प्रश्न कमलेश यांनी केला.
कमलेश हे प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्या जवळचे असून प्रफूल्ल गुडधे पाटील हे सुनील केदार गटातले मानले जातात.विकास ठाकरे व सुनील केदार यांच्यातील गटातटाच्या राजकारणाशी सर्वपरिचित आहेत,तुमच्यावरील कारवाई मागे केदार यांना शह देण्याचा उद्देश्य आहे का?असा सवाल करता विकास ठाकरे यांनी शहराध्यक्ष असल्याने माझी तिकीट कापली.मी अपक्ष म्हणून निवडून आलो.मला मनपाच्या सभागृहात महापौर पदी राहीलेले व आताचे आमदार विकास ठाकरे बघू शकत नाही,तेव्हा पासून ते माझ्या विरोधात आहेत.मूळात बावणकुळे यांच्या पुत्राने लोकमत चौकातील हॉटेल सेंटर पॉईट समोर तीन कोटींच्या भरधाव कारने जी जीवघेणी धडक दिली होती,त्या प्रकरणात विकास ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवशेन सुरु असतानाही कोणताही आवाज उठवला नाही,हे प्रकरण दाबण्यात अनेकांनी बावणकुळे यांची मदत केली असून,आता त्याची परतफेड बावणकुळे करीत असल्याचा स्पष्ट आरोप कमलेश चौधरी यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नागपूरातील वृत्तपत्रे एकच बाजू छापत आहेत.हा देखील सत्ताधा-यांचा प्रभाव असावा.माझी देखील बाजू असू शकते,जी मला जनते पुढे मांडायची आहे मात्र,पूर्वीसारखी पत्रकारिता आणि पूर्वीसारखे नीतीमान पत्रकार आता नाही,अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
कमलेश चौधरी यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांविषयी आमदार विकास ठाकरेंशी संपर्क केला असता,त्यांनी कॉल रिसिव्ह केले नाहीत.
याबाबत ज्वाला धोटे यांच्याशी संपर्क साधला असता,विकास ठाकरेंचा या प्रकरणाशी कोणताही संबध नसून, सर्व शासकीय विभागांना माझ्या नावाने तक्रारींचे पत्र गेल्याचे त्या सांगतात.पंजाबराव कृषि विद्यापीठाशी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी प्रदीर्घ लढा दिला होता.मराठवाडा येथील राऊरीला हे विद्यापीठ घेऊन जाण्याचा घाट तत्कालीन सरकारने घातला असता माझ्या वडीलांनी तीव्र आंदोलन उभारले होते.त्या आंदोलनात ९ जण हुतात्मा झाले.त्यांच्या हौतात्म्यावर पंजाबराव कृषि विद्यापीठ नागपूरात आले.आज त्याच विद्यापीठाच्या जागेवर कमलेश चौधरी याने अतिक्रमण केले असून, ती जागा विद्यापीठाच्या संशोधनासाठी आहे.माफसूने त्या जागेवर त्यांचे विद्यार्थी मत्स्यपालनाचे संशाेधन करणार असल्याचे पत्र दिले आहे.पंजाबराव कृषि विद्यापीठाशी माझी भावनिक नाळ जुळली असून, केवळ फूटाळाच नव्हे तर शहरातील इतरही जमिनींवर ज्या पांढरपेश्यांनी अतिक्रमण केले आहे,ती जागा परत मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारणार असल्याचे ज्वाला धोटे सांगतात.’फूटाळा तो केवल झलक है पिक्चर अभी बाकी है’असे सांगत काचीपुरा असो किवा इतर जागा,पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या जागांवर काँग्रेसच्या काळात अतिक्रमण झालं आहे.कमलेश चौधरीला दुग्ध व्यवसायासाठी फूटाळा येथील ही सात एकर जागा देण्यात यावी हे आघाडी सरकारमध्ये दुग्ध व पशुपालन मंत्री असताना सुनील केदार यांनीच माफसूला पत्र दिले आहे!
ते पत्र माझ्याकडे असून माध्यमांना मी ते सध्या तरी देणार नाही मात्र,मी पुराव्यानिशी बोलत आहे.सुनील केदार हे बिडचे धनंजय मुंडे आहेत तर कमलेश चौधरी हा वाल्मीकी कराड आहे,सुनील केदार आका तर कमलेश चौधरी हा भू-माफिया असल्याची घणाघाती टिका ज्वाला धोटे यांनी केली.कमलेश चौधरी याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत,त्याचा भाऊ याच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल आहे,माझ्या प्राणाला भीती असून मी जांबुवंतरावांची लेक आहे,त्यामुळे मी अश्या गुंडशाही विरोधात लढताना कोणतीही सुरक्षा घेत नसल्याचे ज्वाला धोटे सांगतात.
पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अतिक्रमण झालेल्या जागा मोकळ्या करणार मात्र,शहरात केवळ ’आकाच’ नव्हे तर अनेक मोठमोठे नेते यांनी देखील पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केले आहे,२८६ एकर मध्ये पसरलेले बॉटनिकल गार्डन याचे ज्वलंत उदाहरण आहे,त्याचे काय?फूटाळा सारखेच अतिक्रमण अनेक तलावांवर झाले आहे,त्या विषयी काय धोरण आहे?असा सवाल केला असता,फूटाळा तलाव संरक्षण समिती गठीत करुन तलावांचा श्वास मोकळा करण्याची सुरवात केली आहे.हा माझा वैयक्तिक लढा नाही.शासनाची जागा शासनाला परत मिळावी,त्या जागेचा सदुपयोग व्हावा,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना बळ मिळावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मी आवाज उठवित आहे.पुढे ही हा लढा कायम राहणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.
खरं तर कमलेश चौधरी हा लोकप्रतिनिधी आहे.त्याचे आई व वडील हे दोघेही नगरसेवक होते.
लोकप्रतिनिधी या नात्याने सरकारची जागा सरकारला परत करायला हवी होती,नैतिकतेने ती जागा आपल्या नागपूरातील विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सोडायला हवी होती मात्र,सपशेल खोट्या बाबींचा आधार घेत ही शासनाची जागा चौधरी याला लाटायची आहे जे आता मुळीच शक्य नाही,हे अतिक्रमण भुईसपाट होईपर्यंत ज्वाला धोटेचा लढा संपणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
थोडक्यात,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला फूटाळा तलावावरील बंद पडलेले कोट्यावधीचे रंगीत संगीतमय कारंजे,कारंजाचे वायर खाणा-या किड्यांच्या जातीचा शोध,फूटाळा तलावाच्या आत तरंगते रेस्टॉरेंटचा अट्टहास,त्यासाठी हॅरिटेज फूटाळा तलावाच्या अगदी मधोध महामेट्रोचे लोखंडी स्थायी बांधकाम,त्याला न्यायालयात दिलेले आव्हान,फूटाळा तलावाच्या संरक्षणासाठी सत्र,उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला नागपूरातील पर्यावरणवाद्यांचा लढा,फूटाळालगतच्या तेलंगखेडी येथे १६ मजली पार्किंगसाठी पंजाबराव कृषि विद्यापीठाची जागा नियमबाह्यरित्या अधिग्रहीत करने,त्यावर अर्धवट बांधकाम करुन सोडून देणे इत्यादी सर्व घटनांवर न्यायालयीन लढा सुरु असताना,आता पुन्हा एकदा नागपूरातील तरुणाईचे अतिशय प्रिय ठिकाण असलेले फूटाळा,पुन्हा एकदा अतिक्रमण व त्यावरुन होणा-या ‘राजकारणातून’ चर्चेत आले आहे.
……………………………………….
तळटीप:-
पत्रकारितेत बातमीच्या संदर्भात दोन्ही बाजू प्रसिद्ध करने अभिप्रेत असून, प्रस्तुत बातमीत कमलेश चौधरी यांनी ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना अनेक बाबींचा उहापोह केला.फूटाळ्याचे पाणलोट क्षेत्र असो किवा मोजमापाविषयी त्यांनी केलेले विधान,ज्वाला धोटे यांच्याशी या संबंधी चर्चा करीत असताना,त्याचे असत्य कथन तुम्ही जर छापले तर तुमच्या बातमीवर देखील मी आक्षेप घेईल,असा इशार त्यांनी ‘सत्ताधीश’ला दिला,जे कदापि पत्रकारितेत अपेक्षीत नाही.अलीकडे पत्रकार हे वारंवार अश्या असहिष्णूतेचे बळी ठरतात आहेत,हे देशात घडणा-या अनेक घटनांवरुन सिद्ध होतं.बातमी ही सत्य की असत्य , याचं तारतम्य सुजाण वाचकांना निश्चितच असतं.पत्रकारितेला यासाठी वेठीस धरणे योग्य नाही,असे प्रामाणिक मत ‘सत्ताधीश’चे आहे.