फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजफुटाळाच्या गंगाजळीत प्रदुषणाचा समुद्र:हजारो मासे मृत्यूमुखी

फुटाळाच्या गंगाजळीत प्रदुषणाचा समुद्र:हजारो मासे मृत्यूमुखी

Advertisements

ज्वाला धोटे यांच्या पुढाकारात ’फूटाळा तलाव संरक्षण समितीचा’ प्रशासनाला इशारा
बॉटनिकल उद्यानाच्या जागेवरील सत्ताधा-यांच्या अतिक्रमणालाही करणार विरोध
कृषि विद्यापीठासाठी विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंच्या समर्थकांचे रक्त सांडले:विद्यापीठाच्या जागेसाठी लढण्याचा इशारा
नागपूर,ता.१६ जून २०२४: महाराष्ट्राच्या उपराजधानीला ‘सिटी ऑफ लेक’अशी ओळख होती मात्र,हळूहळू शहरातील सर्वच तलावांवर अतिक्रमण झाले तर काही तलावांचा सौंदर्यीकरणाच्या नावाने कायमचा सत्यानाश करण्यात आला असून फूटाळा तलावाच्या बाबतीत मात्र,असे घडू देणार नसल्याचा निर्धार अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी व्यक्त केला.फूटाळा तलावातील किना-यावर आज शेकडो मासोळ्या मृत आढळून आल्या. यानंतर ’फूटाळा तलाव संरक्षण समितीच्या’ वतीने फूटाळा येथे आज भेट देत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.यावेळी राजे मुधोजी भोसले,काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ज्वाला धोटे म्हणाल्या,की शहरातील अनेक तलाव हे पूर्णपणे सुखले मात्र, फूटाळाचे हे वैशिष्ठ आहे याचे पाणी कधीही आटले नाही.याचे कारण या तलावाला प्राप्त झालेले अनेक नैसर्गिक झरे.या तलावाला तिन्ही बाजूने विविध वनस्पतीचे कोंदण लाभले असून त्या वनस्पतीच्या स्पर्शाने एकेकाळी फूटाळ्यातील पाणी हे ‘गंगाजल’मानले जात असे.या वनस्पती संजीवनी बुटीचे काम करीत असून फूटाळ्या जवळील परिसरातील नागरिकांचे आर्युमान हे शंभरी पलीकडे राहत असे.
आज मात्र शेकडो वर्ष मानव जातीला संजीवनी पुरविणारा फूटाळा तलाव स्वत:मरणप्राय अवस्थेत पोहोचला आहे.नागपूरकर नागरिकांनी विचार करावा शहराच्या या वैभवाला वेंटिलेटरवरुन बाहेर काढायचे की मृत होऊ द्यायचे.आज फूटाळ्यातील हजारो मासे मृत झालीत,दर वर्षी उन्हाळ्याच्या या दोन महिन्यात फूटाळ्यासह शुक्रवारी तलावातील मासे देखील मृत पावतात,फूटाळ्याला लागूनच माफसूचे विद्यापीठ आहे,शहरात नीरी सारखी संशोधन संस्था आहेत मात्र,कधीही या संस्थांना या सजीवांच्या मरणामागील कारणे शोधण्याची गरज का वाटली नाही?

फूटाळा हे कोण्या प्रशासन,राजकारणी किवा खासगी मालमत्ता नसून नागपूरकरांच्या पर्यटनाचे एकमेव स्थळ आहे.याचे संरक्षण,संगोपन आणि शुद्धीकरणासाठी नागपूरच्या जनतेलाच पुढे यावे लागेल.शासन,प्रशासन आणि राजकारण्यांनी शहरातील या वैभवापासून फक्त आर्थिक फायदा लाटला आणि फूटाळा तलावात शेकडो टन लोखंडांचे बांधकाम करीत सौंदर्यीकरणाच्या नावाखाली रंगीत कारंजे उभारले,त्यासाठी शेकडो वायरिंग पाण्याखाली जोडण्यात आल्या,परदेशातून तज्ज्ञांना बोलावून काम करण्यात आले मात्र,गेल्या दोन शतकांपासून म्हणजे दोनशे वर्षांपासून फूटाळामध्ये जो गाळ साचला आहे,तो उपसलाच गेला नाही,आधी तो गाळ काढावा,तलावाचा श्‍वास प्रदुषणापासून मुक्त करावा,तलावातील सजीवांचे जीवन वाचवावे,हे धोरण प्रशासन किवा राजकारणी यांना का राबवासे वाटले नाही?याची  परिणीती फूटाळा आपल्या अंतिम श्‍वासाकडे वळण्यात झाला.
पुंजीपतींच्या नयनसुखासाठी रंगीत कारंजे उभारणारे हे विसरले की भारत देश हा गरीबांमध्येच नांदत असतो.नागपूरातील गरीब माणूस आपल्या मुलांना घेऊन फूटाळ्यातील प्रेक्षक गॅलरीचे तिकीट काढून आनंद लृटू शकत नाही.ही रंगीत कारंजाची लयलृट फक्त पुंजीपतींसाठीच असून,ज्यांच्या खिशात गांधी आहेत त्यांचाच हक्काचे फूटाळा झाले.‘फूटाळा तलाव संरक्षण समिती’ असे घडू देणार नाही,असा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.

नागपूरचे नैसर्गिक वैभव असणा-या फूटाळ्याचे कृत्रिम रुपात परिवर्तन करुन शासनाच्या तिजोरीत किती भर पडली?असा सवाल त्यांनी केला.मूळात फूटाळ्याच्या कृत्रिम सौंदर्यीकरणासाठी विदेशातून कोट्यावधींचे जे कर्ज घेण्यात आले त्या पैशांची परतफेड कोण करणार?नागपूरातील किती पिढ्या अश्‍या स्वरुपाच्या ‘विकासकामांसाठी’कर्जात बुडणार आहेत?फूटाळावर अधिपत्य  नेमके कोणाचे?नासुप्र,मनपा किवा सार्वजनिक बांधकाम विभाग यात सामान्य नागपूरकरांना काडीचाही रस नाही,फक्त फूटाळ्यातील गाळ काढून ते खत म्हणून विदर्भातील शेतक-यांना देण्याची मागणी याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केली.शासनाला यातून महसूल ही मिळेल व फूटाळ्याचा कोंडलेला श्‍वासही त्यातून मोकळा होईल,असे त्या म्हणाल्या.

मृत मासोळ्यांचे  शवविच्छेशन करुन खरे कारण नागपूरकरांपुढे प्रशासनाने आणावे.आपल्याला अगदी लहानपणापासून ‘मछली जल की है रानी,जीवन उसका है पानी’हे तत्वज्ञान शिकवलं जातं,फूटाळ्यातील पाण्याच्या देखील याच मासाेळ्या राणी आहेत,उत्तराधिकारी आहेत,मग कोणत्या अधिकाराने विकासपुरुषांनी लाखो टन लोखंड फूटाळ्याच्या आत्म्यावर उभारले?मूळात फूटाळा ही त्यांची खासगी मालमत्ता आहे का?ज्या राजे मुधोजी भोसले यांच्या पूर्वजांनी हा तलाव बांधला,त्यांना देखील कोणतीही विचारणा कररण्यात आली नाही?शहरातील गांधी सागर,सोनेगाव,सक्करदरा आणि फूटाळा तलाव ही तलावे राजे यांची नागपूकरांना देण आहे.त्यांच्या पूर्वजांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना फक्त तलावांची देखरेख आणि संरक्षणाचा अधिकार दिला होता.व्यवसायिकरणाचा नव्हे.प्रशासन आणि या तथाकथित विकासाच्या विरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली असून,न्यायालयात हा खटला प्रलंबित असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.फूटाळ्याच्या संरक्षणासाठी आज राजे मुधोजी भोसले हे समितीची मुख्य म्हणून अवार्जून उपस्थित होते.
फूटाळा आणि गांधी सागर तलावातील मासोळ्याचे कंत्राट देण्यात येते.फूटाळात तर अनेक पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्त्रोतच मासोळ्या वाहून जाऊ नये यासाठी कंत्राटदारांकडून बुजवण्यात आले.याचा परिणाम तलावातील प्रदुषण वाढण्यात झाले.पाण्यात प्राणवायूची पातळी कमी झाली.अमोनियाचा स्तर वाढला.जून आणि जुलै महिन्यात अमोनियाचा स्तर उच्चांक गाठतो,त्यावेळी मासोळ्या मृत होतात,हे शहरातील प्रशासन,लोकप्रतिनिधी व संशोधन संस्थांना माहिती असून देखील मासोळ्यांचे जीवन वाचवण्यासाठी मुर्दाड मने काहीही करत नाही,असा तीव्र संताप त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
फूटाळ्याच्या संरक्षण भिंतीची डागडूजी तर अतिशय हास्यास्पद असून फक्त बाहेरच्या बाजूनी डागडूजी करण्यात आली आहे.नागपूरात गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी अंबाझरी ओव्हर फ्लो झाला तेव्हा फूटाळा देखील आेसंडून वाहीला होता मात्र,फूटाळ्याच्या पाण्याचा प्रवाह हा सर्वत्र विखुरला गेल्याने नागरिकांच्या घरात शिरला नाही,अंबाझरीचे पाणी वाहून जाणा-या प्रवाहाचे सगळेच स्त्रोत मनपाने स्वामी विवेकानंद स्मारक बांधून तर महामेट्रोने सेव्हन वंडर्सचे बांधकाम करुन बंद केले आहेत.
फूटाळ्यातील विकासकामांचा फायदा नेमका कोणाला झाला?या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीच्या तिकीटाची वसूली कोणाचा कंत्राटदार करणार आहे?या ठिकाणी असलेल्या दूकानांचे भाडे कोण वसूल करतोय?नागपूरात  काँग्रेस व भाजप दोघांचीही सत्ता नागपूरकरांनी अनुभवली.त्यामुळे जो फूटाळ्याचा श्‍वास मोकळा करेल,फूटाळ्याचा प्रदुषणमुक्त करेल,त्याच्याच सोबत या पुढे नागपूरची जनता असेल,असा दावा यावेळी ज्वाला धोटे यांनी केला.
काँग्रेसमध्ये स्वत:ला किंग मेकर समजणारे आमदार सुनील केदार यांचा उजवा हात असलेले नगरसेवक कमलेश  चौधरी यांनीही फूटाळ्याच्या उदरात अनाधिकृत घर व सभागृह बांधून जे अतिक्रमण केले आहे व सभागृह लग्न समारंभ इत्यादीसाठी भाड्याने देऊन बक्कळ कमाई केली जात आहे,त्याचाही हिशेब न्यायालयात ’फूटाळा  तलाव संरक्षण समिती’घेणार असल्याचा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला.वेटलॅण्डच्या कायद्याचे सर्वाधिक आणि सर्रास उल्लंघन आम्ही खपवून घेणार नसल्याचे त्यांनी  सांगितले.
कश्‍मीर डल सरोवर ज्याप्रमाणे कमळाच्या फूलांनी बहरलेले असते अगदी तसेच सौंदर्य फूटाळ्याच्या एका किना-याला लाभले आहे.याच ठिकाणी कश्‍मीर वस्ती वसलेली असून गेल्या ७० वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत.कमळाची फूले विकून अनेक जण आपला उदर निर्वाह करतात.मात्र,उद्दाम प्रशासनाने त्यांनाच वस्ती खाली करण्याची नोटीस बजावली आहे!प्रशासनाला फूटाळ्याच्या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचा-यांचे अनाधिकृत अतिक्रमण दिसत नाहीत का?गरीब व सामान्य जनतेला रोजगार देण्या ऐवजी आहे ती छतच उधवस्त करायला प्रशासन कोणाच्या सांगण्यावरुन तत्पर झाले आहे?असा सवाल त्यांनी केला.

जल,जीवन आणि रोजगार यावर पहीला हक्क धनदांडग्यांचा नसून गरीबांचा असल्याचे त्या म्हणाल्या.फूटाळ्याची परिक्रमा करीत असताना पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या २५६ एकर जागेवर वसलेले बॉटनिकल गार्डनचाही फेरफेटका मारला असता त्या ठिकाणी चक्क सिमेंट-

कॉक्रिटचा रस्ता बांधला जात आहे.भिंती उभारल्या जात असल्याचे दिसून पडले.या बांधकामांमुळे फूटाळ्याचा उर्वतिर श्‍वास देखील येत्या काही वर्षात कायमचा संपेल कारण बॉटनिकल गार्डनमधील नैसर्गिक झ-यांमधूनच फूटाळ्यात बाराही महिने पाणी भरलं राहतं.मूळात पंजाबराव कृषि विद्यापीठ हे विदर्भा ऐवजी मराठवाड्यात नेण्याचा घाट त्या काळी राजकारण्यांनी घातला असता,माझ्या वडीलांनी विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंनी तीव्र आंदोलन केले.यात त्यांच्या ९ आंदोलनकर्त्यांना प्राणाला मुकावे लागले.त्यामुळेच कृषि विद्यापीठ हे विदर्भातील अकोल्यात आले.त्यांच्या या आंदोलनामुळेच आचार्य अत्रेंनी त्यांना ‘विदर्भवीर’ही उपाधी दिली.आज त्याच कृषि विद्यापीठाच्या शेकडो एकर जागेवर नागपूरातील काही मोठ्या नेत्यांचा डोळा असून,कृषि विद्यापीठाची बॉटनिकल गार्डनची जागा ही कोणत्याही परिस्थितीत व्यवसायिक संकूलांसाठी खासगी कंत्राटदारांना देऊ देणार नाही,असा निर्धार यावेळी ज्वाला धोटे यांनी व्यक्त केला.
फूटाळ्याच्या अस्तित्वासाठी या तलावाच्या चारही बाजूचे नैसर्गिक वैभव ‘फूटाळा तलाव संरक्षण समिती’जपणार असल्याचे त्यांनी सांगितले.यासाठी नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरण आणि तलाव वाचविण्याच्या या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी फूटाळा तलाव संरक्षण समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन अंबाझरी पोलिस ठाण्याला दिले.फूटाळा तलावाचे ऐतिहासिक महत्व याप्रसंगी राजे मुधोजी भोसले यांनी विशद केले.
याप्रसंगी बोलताना आ.विकास ठाकरे म्हणाले की,या आंदोलन समितीच्या अनुषंगाने नागपूर शहरातील जागरुक नागरिक,जनप्रतिनिधी मला पाहायला मिळाले.नागपूरातील सगळ्याच तलावांची दूर्दशा झाली आहे.गाेरेवाडा तलाव देखील हळूहळू प्रदुषित होत आहे.शहरातील सर्वच तलावातील सांडपाणी थांबवणे मनपाचे काम आहे.येणा-या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मी यावरच लक्षवेधी लावणार आहे आणि राज्यशासनाकडून उत्तर मागणार असल्याचे आ.विकास ठाकरे म्हणाले.या भागाचा मी आमदार आहे,या भागातील जनतेने मला निवडून दिलं आहे,या भागातील ज्या-ज्या कामांची जनतेला अपेक्षा आहे ते करने माझे कर्तव्य असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले.
सर्वात पहीले तर फूटाळा तलावाच्या भिंतींचे मजबुतीकरण झाले पाहिजे.गाळ उपसला पाहिजे,सांडपाणी रोखले गेले पाहिजे.याशिवाय फूटाळा तलाव जवळील वसत्या हटवणे हा पर्याय नसून गेल्या ७० वर्षांपासून या ठिकाणी नागरी वसत्या आहेत.आयुष्याची जमापुंजी घरादारावर त्यांनी खर्च केली आहे.आता प्रशासनाला जाग येऊन रस्ता किवा तलावासाठी वस्त्या हटवणे योग्य नाही.शासनाचे निर्णय हे स्लमधारकांच्या बाजूने आहेत,हे विशेष.येत्या अधिवेशनात मी जनप्रतिनिधी म्हणून फक्त फूटाळा नव्हे तर शहरातील सर्वच तलावांचा प्रश्‍न उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महत्वाचे म्हणजे जनप्रतिनिधी म्हणून माझे हे कामच असले तरी सामाजिक जाणीवेतून हे आंदोलन पुकारले गेले असल्याने अश्‍या लढ्या पुढेच सरकार नमत असते असे सांगून ,विकास ठाकरे यांनी फूटाळा तलाव संरक्षण समितीच्या पुढकाराचे कौतूक केले.नागपूरकर जनतेलाही आपल्या शहरातील तलावांप्रती सर्तक आणि दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले.उमेदवार हा फक्त निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षाचा असतो मात्र,निवडून आल्यावर तो उमेदवार संपूर्ण जनतेचा होत असतो,मी भाजप,बसप इत्यादी पक्ष न बघता काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
……………………..
(संपर्क क्रमांक- ज्वाला धोटे ८६०५४५९५९०)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या