फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमफसवणूक!ती ही भारताचे राष्ट्रीय प्रतीक वापरुन!

फसवणूक!ती ही भारताचे राष्ट्रीय प्रतीक वापरुन!

Advertisements


अनिरुद्ध होशिंगची सामान्यांना लृटणारी मोडस ओपरेंडी

मुख्य सूत्रधार मीरा फडणीसला अटक का नाही?पिडीतांचा सवाल

हीच का संघाची शिकवण?पिडीतांचा टोला

नुसत्या महाराष्ट्रातच पाच कोटींच्या वर फसवणूक इतर राज्यातील आकड्यांचं काय?

नागपूर,ता.२३ जानेवरी २०२४: मूळ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील अनिरुद्ध होशिंग नावाचा भामटा हा सध्या नागपूर कारागृहात कच्च्या कोठडीत आहे.या भामट्याने नागपूर,यवतमाळ,कामठी इत्यादी अनेक शहरातील सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करुन कोट्यावधींची माया जमवली.विशेष म्हणजे स्वत:ला केंद्रिय पर्यटन विभागाचा अधिकारी सांगणा-या या भामट्याने चक्क भारताचे राष्ट्रीय प्रतीक अशोकचिन्हाचा खोटा वापर लेटरहेडवर करुन अनेकांचा विश्‍वास संपादित केला होता.

विशेष म्हणजे होशिंगसोबत पिडीतांची ओळख राष्ट्रीय सेविका समितीच्या माजी प्रांत अधिकारी मीरा फडणवीस यांनी करुन दिल्याने, होशिंगसोबत पिडीतांनी संघाच्या राष्ट्रीय मूल्यांवर विश्‍वास ठेऊन आर्थिक व्यवहार केला होता.मीरा फडणीस या मूळ यवतमाळच्या असून जवळपास दोन-तीन दशकांच्या ओळखीचा फायदा त्यांनी फसवणूकीसाठी घेतला,असा आरोप पिडीत सुभाष मंगतानी,सचिन धकाते,प्रसाद अगरकाढे व माणिक पांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

होशिंग तसेच मीरा फडणीस यांच्या विरोधात नागपूर तसेच यवतमाळ येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.यवतमाळ येथील मीरा फडणीस यांनी अनिरुद्ध होशिंग ज्याने स्वत:ला पर्यटन विभागाचा अधिकारी म्हणून स्वत:ला प्रस्तुत केले,त्याची ओळख करुन दिली.त्याने एक योजना पिडीत गुंतवणूकदारां पुढे ठेवली.होशिंग याने केंद्रिय पर्यटन विभागाच्या विविध योजना सांगितल्या व लाभाचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास प्रेरित केले.

मीरा फडणीस यांनी देखील पिडीतांना तिने स्वत: देखील या योजनेत पैसे गुंतवले असल्याचे सांगितले त्यामुळे पिडीतांचा विश्‍वास होशिंगवर बसला.पर्यटन विभागात विविध प्रवाशी गाड्यांची मागणी असते तसेच रेल्वे विभागात लिनेन क्लिनिंगच्या कामाचे आमिष होशिंग तसेच मीरा फडणीस यांनी पिडीतांना दाखवले.तुमच्या गाड्या मी लाऊन देतो यामुळे तुम्ही कोट्यावधीचा नफा मिळवाल आणि अवघ्या काही महिन्यातच तुमची मूळ रक्कम देखील तुम्हाला परत मिळू शकेल असे आमिष होशिंगने पिडीतांना दाखवले.आर्थिक परिस्थिती नसतानाही कोणी कर्ज घेऊन,कोणी एफडी मोडून तर कोणी शेती विकून या योजनेत पैसे गुंतवले.

हे पैसे पिडीतांनी अनिरुद्‌ध होशिंग यांनी सांगितलेल्या विविध खात्यात जमा केली.पैसे जमा होताच लगेच सर्वांचे करारपत्र होतील व सर्वांना उत्पन्न देखील सुरू होईल असे त्याने सांगितले.त्यासाठी कराराच्या तारखा देखील जाहीर केल्या.पण दरवेळी या तारखा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या.आजपर्यंत हे करार झालेले नसून,त्यांनी म्हटलेले उत्पन्न देखील सुरु झाले नाही.
होशिंग यांनी जाहीर केलेल्या एका कार्यक्रमात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले!

सर्वात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या शीर्षस्थ नेत्यांसोबत पर्यटन विभागाची सल्लागार म्हणून कार्यक्रम पत्रिकेत मीरा फडणीस यांनी स्वत:चे नाव छापून घेतले!या मुळे देखील पिडीतांचा मीरा फडणीस व अनिरुद्ध होशिंग वर विश्‍वास बसला. इतकेच नव्हे तर भारत सरकारच्या राष्ट्रीय प्रतिकाचा वापर करुन निमंत्रण पत्रिका तयार केली!

याच पत्रिकेचे वाटप नागपूरच्या रेडीसन ब्लू मध्ये दोन दिवसीया शिबिरात केले. जे लोक पत्रिका घेण्यासाठी नागपूरला पोहचू शकले नाही त्यांच्या गावात म्हणजे यवतमाळ, औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला विमानाने पोहोचून मीरा फडणीस व अनिरुद्ध होशिंग याने स्वतः जाऊन पत्रिका दिली! त्यामुळे या दोघांनीही लोकांची फसवणूक करण्यासाठी पंतप्रधानांच्या नावाचा देखील गैरवापर केला हे स्पष्ट होते,यामुळेच या गुन्ह्याची व्यापी ही आणखी गंभीर होते,असे मंगतानी यांनी सांगितले.

अनिरुद्ध होशिंग व मीरा फडणीस यांनी या सर्व गुंतवणूकदारांची आर्थिक, भावनिक फसवणूक केली असल्याचा आरोप पिडीतांनी केला.याप्रसंगी होशिंग यांनी पिडीतांना दिलेले दिल्ली, वाराणसी व लखनऊ येथील पत्ते, ज्या बैंक खात्यांमध्ये त्याने पिडीतांना पैसे जमा करायला सांगितले ते अकाउंट डिटेल्स, गुंतवणूकदारांची यादी आदी पत्रकार परिषदेत पिडीतांनी सादर केली.

या प्रकारात आर्थिक फसवणूक झालेल्यांपैकी सुमारे पंचवीसपेक्षा अधिक लोकांनी नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविलेल्या बयाणात,त्यांनी केलेली गुंतवणूक ही फक्त मीरा फडणवीस यांना अनेक दशकापासून ओळखत असल्याने व त्यांच्यासोबतच्या प्रगाढ परिचयातून विश्‍वास ठेऊन केल्याचे बयाण नोंदवले.असे असतानाही नागपूर किवा यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखने मीरा फडणवीस यांना बोलावून कोणतीही चौकशी केली नाही.मीरा फडणीस यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या असत्या.पण पोलिसांनाही मीरा फडणीस यांची चौकशी करण्याची गरज वाटली नाही,या मागे कोणाचा दबाव आहे?त्या संघाचा असल्याने व सध्या राज्य व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे का?असा प्रश्‍न केला असता,काहीही सांगता येत नाही असे मंगतानी यांनी सांगितले.

पोलिसांना मुख्य सूत्रधार मीरा फडणीस यांच्या चौकशी ची गरज वाटली नाही ही बाब संशय निर्माण करणारी असल्याचे पिडीतांनी याप्रसंगी सांगितले.महत्वाचे म्हणजे या केसमध्ये लखनऊचा आमीर,ज्याने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे होशिंगच्या सांगण्यावरुन विविध खात्यात फिरवले,तो नागपूरात येऊन पोलिसांना भेटून गेला.नागपूर पोलिसांनी त्याला सहज जाऊ दिले.यवतमाळ पोलिसांनीही आमिरला लखनऊमध्ये गाठले मात्र,त्यांचेही आमिरच्या बयाणावर समाधान झाले!

अनिरुद्ध होशिंगने दिलेल्या बयाणानुसार त्याला या संपूर्ण फसवणूकीत सहकार्य करणा-यांची नावे घेतली,त्या संशयितांची चौकशी व तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप यावेळी पिडीतांनी केला.हीच बाब आम्ही नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार,आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त आदी यांच्या लक्षात आणून देण्यासाठी निवेदनही दिले मात्र,एवढ्या गंभीर फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलिस विभागाला काहीही करण्याची गरज वाटली नाही.फक्त होशिंगला अटक करुन कारागृहात डांबण्यात आले,ज्याने त्याच्याकडे कोणाचेही पैसे नसल्याचे सांगून हात वर केले,अशी खंत पिडीतांनी व्यक्त केली.

कालपर्यंत सातत्याने अनिरुद्ध होशिंगच्या स्कीममध्ये पैसे गुंतविण्यासाठी हिरीरिने ओळखीच्या लोकांमध्ये पुढाकार घेणा-या मीरा फडणीस या स्वत: अटकेपासून संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेत आहे.नुकतेच यवतमाळच्या सत्र न्यायालयाने त्यांची अटक पूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावली.या विरोधात मीरा फडणीस यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे .अतिशय महागडे वकील मीरा फडणीस यांनी त्यांच्या केसमध्ये लावले असून,पिडीतांच्या पैशांवरच ही चैन मीरा फडणीस करीत असल्याचा आरोप पिडीतांनी केला.मीरा फडणीसला आरोपी होशिंगने दिलेल्या अनेक महागड्या भेटवस्तू,केलेल्या परदेस वा-या,मुलीच्या बँक खात्यात २७ लाखांची रक्कम,हि-याचा नेकलेस इत्यादीची चौकशी करुन या दोन्ही मायलेकींना तात्काळ अटक करण्याची मागणी याप्रसंगी पिडीतांनी केली.मीरा फडणीस यांनी तर दिल्ली येथे त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू असल्याचे सांगून व्हीव्हीआयपी वागणूक मिळवून घेतली,असा आरोप याप्रसंगी माणिक पांडे यांनी केला!

त्यामुळेच,अनिरुद्ध होशिंगने त्याच्या बयाणात सहकारी म्हणून ज्यांची ज्यांची नावे घेतली त्यांना तात्काळ अटक करुन त्यांची चौकशी करावी.त्या सर्वांवर ‘एमपीआयडी’ कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.पोलिस विभागाने सर्वसामान्य असलेले तक्रारकर्ते यांच्या आयुष्यभराच्या जमा पुंजी व उचलेल्या कर्जाचा विचार करुन, हे प्रकरण तात्काळ गांर्भीयाने मनावर घ्यावे व त्यांना न्याय द्यावा.पिडीत गुंतवणूकदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणेने या प्रकरणात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करु नये.लवकरच हा खटला न्यायालयाचा बोर्डावर येईल त्यावेळी मायबाप सरकारने पिडीत गुंतवणूकदार यांच्या पाठीशी उभे राहावे,अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी नागपूरातील फसवणूक झालेले माजी ज्येष्ठ संपादक असेलेले व सध्या एका स्थानिक वृत्त वाहिनीचे संपादक असलेले, यांची देखील उपस्थिती होती.प्रताप नगर पोलिस ठाण्यात या संपादकांनी देखील होशिंग तसेच मीरा फडणीस यांच्या विरोधात लाखो रुपयांच्या आर्थिक फसवणूकीची तक्रार दिली आहे,हे विशेष!

…………………………………..

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या