

मनपा आयुक्तांचा करणार घेराव:प्रशांत पवार यांचा इशारा
नागपूर,ता. ६ मे: करोना महामारीत मनपा सत्ताधा-यांनी भ्रष्ट कारभाराची कमाल केली असून आता लोकांचे जीव वाचवणा-या लसींच्या बाबतीतही पक्ष्ीय राजकारण करुन कमाल केली आहे,एकीकडे नागपूरात मनपाच्या सर्वच लसीकरण केंद्रांवर या शहराचा ज्येष्ठ नागरिक आपल्या दुस-या डोजसाठी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात वणवण भटकत असताना त्यांना एकाही केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे सांगून हाकलून देण्यात येते दूसरीकडे मनपाचा जनसंपर्क विभागच प्रसिद्धीसाठी पत्रक देतो ‘आज ही ४५ वर्षे वयोगटा वरील नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही फक्त महाल येथील स्व.प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्रावरच कोव्हेक्सीन लस उपलब्ध असणार आहे’याचा काय अर्थ आहे?राज्य सरकारकडून नागपूर महानगरपालिकेला ज्या लसी पुरविल्या जातात त्या साठ्यावर मनपाचे माजी महापौर व भाजपचे आमदार प्रवीण दटके यांचाच सर्वाधिकार आहे का?असा प्रश्न ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला.
गाेर,गरीब,गरजू रुग्णांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणा-या मेडीकल रुग्णालयालाही मेडीकलची ५ हजार लसींची मागणी असताना मनपा फक्त ४०० लसी पुरवते जी एका तासात संपते आणि स्व.प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्राला २४ तास कोव्हेक्सिन उपलब्ध राहते,मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांचा आरोग्य विभागावर काही वचक आहे का?की ते धृतराष्ट्र होऊन हा सर्व भोंगळ कारभार बघत आहेत?त्यांना मराठी माणसांच्या आणि नागपूरकरांच्या वेदना या भयंकर महामारीच्या काळात ही कळत नसतील तर ठाकरे सरकारने हे ‘पार्सल’साऊथमध्ये परत पाठवावे,असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मुंबईचे माजी मनपा आयुक्त प्रवीण परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘पोपट’असल्यामुळे व कोविडची परिस्थिती त्यांनी योग्यरित्या न हाताळल्यामुळे गेल्या वर्षीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची उचलबांगडी केली,व चहल यांच्या हातात मुंबई मनपाची सूत्रे दिली.आता नागपूरातील अश्या निष्क्रिय मनपा अायुक्तांची देखील मुख्यमंत्र्यांनी उचलबांगडी करावी व या भयंकर महामारीवर योग्य नियंत्रण आणनारा आयुक्त तातडीने द्यावा,अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली.
आज शहरात मनपाच्या सर्वच लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत असताना मनपात सत्ता भाजपची असल्यामुळे व मनपा प्रशासनावर देखील भाजपच्या या नेत्याचे सर्वस्वी वर्चस्व असणा-या दटके यांच्या रोग निदान केंद्रावर लसींचा मुबलक साठा कसा असतो?वरुन केंद्राला मुबलक लस देत नाही म्हणून कंठशोष करायचा केंद्राने लस पुरवली तर ती स्वत:च्या राजकीय फायदासाठी दाबून ठेवायच्या?पुढील निवडणूकीत याचा फायदा लाटायचा,महालकरांना आम्ही लस दिल्या म्हणून?अाणि त्यांची मते घ्यायची?जनतेच्या जीवावर उदार होणारे हे असले दटके यांचे घाणेरडे राजकारण आमची संघटना अजिबात चालू देणार नाही,असा सज्जड दम प्रशांत पवार यांनी दिला.
मनपा आयुक्तांच्या डोळ्याखाली अारोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी नागपूरकर जनतेला एका राजकीय नेत्यासाठी असे वेठीस धरत असतील तर ‘जय जवान जय किसान ’संघटना हे खपवून घेणार नाही,नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल,आयुक्तांनी लसींचा हा भ्रष्ट कारभारत तातडीने थांबवून मनपाच्या इतर ही सर्वच लसीकरण केंद्रांवर तसेच मेडीकलमध्येही मुबलक साठा न दिल्यास आयुक्तांचा घेराव करण्यात येईल,असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
