फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनप्रत्येक पत्रकाराने व मराठी प्रेक्षकांने बघावा असा ‘सलाते- सलानाते’

प्रत्येक पत्रकाराने व मराठी प्रेक्षकांने बघावा असा ‘सलाते- सलानाते’

Advertisements

श्‍याम पेठकर
(सुप्रसिद्ध पटकथा लेखक)
येत्या ७ फेब्रुवरी रोजी होणार प्रदर्शित
नागपूर,ता.२ फेब्रुवरी २०२५: आजकाल कुठलाच चित्रपट चालत नाही, लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहातच नाहीत, अशी ओरड केली जाते आणि ती सार्थही आहे. त्यातल्या त्यात मराठी चित्रपटाबाबत तर चिंताजनक परिस्थिती आहे. चित्रपटही तसेच केले जातात. सोशल मिडियावर प्रचाराचा धुमाकूळ घातला जातो. पहिल्या दोन दिवसात चित्रपट उडतो… काही संस्थानिक होऊन बसलेले मराठी चित्रपटकर्ते आपला चित्रपट चालला हे दाखविण्यासाठी खोटे आकडेही जाहीर करतात…!
विषय तो  नाही… बऱ्याच दिवसांनी ‘चित्रपट’ म्‍हणावा, असा चित्रपट बघायला मिळाला. संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित आणि निर्मितही केलेला हा चित्रपट दोनेक महिन्यांपूर्वी एका खासगी बैठकीत बघण्याचा योग आला. सहज म्‍हणून बघायला बसलो आणि नंतर या चित्रपटाने खिळवून ठेवले. मध्यंतरासाठीही उठावेसे वाटले नाही. आम्ही सात-साठ जण होतो साऱ्यांनीच चित्रपट कंटीन्यू करायला लावला…
एक वेगळं कथानक, घोटीव अशी पटकथेची बांधणी, नेमके आणि नेटके संवाद (नाहीतर बहुतांश चित्रपट हे बोलपट असतात.) आणि वेगवान असे सादरीकरण… अगदी पहिल्या फ्रेमपासून कॅमेरा तुम्‍हाला खूप झपाटल्यागत चित्रपटासोबत धावायला लावतो. एक वेगळं टेकींग या चित्रपटाला आहे.
कथाच भन्नाट आहे. म्‍हटलं तर चित्रपटाच्या कर्त्यांनी म्‍हटल्याप्रमाणे ही नात्याच्या व्याकरणाची गोष्ट आहे… पण, हे नाते केवळ नवरा- बायको झालेल्या प्रियकर- प्रेयसीचे नाही. माणसाचे पर्यावरणाशी असलेले नाते, सामान्य माणसाचे माध्‍यमजगताशी असलेले नाते, पत्रकाराचे समाजाशी असलेले नाते, राजकारण्यांचे अर्थकारण, सत्ताकारण आणि मग पत्रकारांश असलेले नाते… या सगळ्या नात्यांची छान गुंफण कथा, पटकथाकारानी तर घातलीच; पण दिग्‍दर्शकानी ही गुंफण अजिबात सैल होऊ दिली नाही. विशेष म्‍हणजे अनेक विषय आणि त्यांच्यातले अनबिंध मांडत असताना कुठेच सैलपणा आला नाही. अनेक विषयांमध्‍ये आषय हरवला नाही. या चित्रपटात अनेक तत्व सहजपणे मांडली आहेत-
– पत्रकार स्‍वत: घडत जातो आणि मग ही व्यवस्था  त्याचा वापर करत त्याला बिघडवते.
‘कभी चांदीके, कभी सोने के कलम आतें है, ना जाने क्‍या क्‍या लिखवाना है मुझसे?’ असा प्रश्‍न पत्रकाराला पडला आणि तो सत्य बोलणार, हे लक्षात आल्यावर ही व्यवस्था त्याला गपगार करते.
– सत्य सांगण्याचं कर्तव्यच असणाऱ्या प्रत्‍येकासोबतच  सखी म्‍हणून विवेक नांदत असतो. चित्रपटाचा नायक तेजसला कचानक भेटलेली तशी तोतरी बोलणारी नायिका तेजसला प्रश्‍न विचारून जागे करते आणि मग व्यवस्थेने त्याला तो सत्य उजागर करणार, हे लक्षात आल्यावर अपघात घडवून गप्‍प केल्‍यावर नायिकेचा कणखार आणि स्‍पष्‍ट आवाज लागतो… हे मेटॅफर खूप छान आलं आहे.
– ही तशी एका वाघीणीचीही गोष्ट आहे. चंद्रपूरकडे मारल्या गेलेली वाघीण आणि एका पत्रकाराच्याही नात्याची ही गोष्ट आहे. पत्रकाराच्या पत्रकारितेची सुरुवात, वरच्या दिशेने सुरू झालेला प्रवास आणि मग अंतही या वाघीणीच्या त्याने दिलेल्या बातम्‍यांनी झालेला आहे. त्या संदर्भातच मुंबईला चॅनलच्या ऑफिसला जातो तेव्हा त्याला नायिका भेटते…
उत्तम पर्यावरणाचे लक्षण हे सुदृढ वाघ असतात, तसेच निकोप व्यवस्‍थेचे लक्षण हे निर्भिड पत्रकार असतात… हे तत्‍व हा चित्रपट अगदी सहजपणे उजागर करून जातो. आज सुदृढ वाघ आणि निर्भिड पत्रकार दोघांचीही तोंडं कशी बंद केली जातात, हे वास्‍तवही हा चित्रपट मांडतो.
– पत्रकार आणि पोलिसांच्या नात्याचीही ही गोष्‍ट आहे. छाया कदम यांनी वठविलेली ठाणेदार नायकाला सतत सावध करत असते. तुझा वापर होऊ शकतो, हेही सूचित करते आणि मग त्याच्या घडवून आणलेल्‍या अपघातानंतर सत्यापर्यंत तीच पोहोचते…
या चित्रपटाची कथा अशी सांगता येत नाही अन्‌ ती तशी सांगू देखील नये… इतकंच की अचानक खूप आनंद देणारी गोष्‍ट आपल्याला सापडावी, असे हा चित्रपट अचानक पाहण्याचा योग आल्‍यावर माझं झाले. प्रेमात पडावा असा हा चित्रपट आहे. एकही गाणे नसतानाही मनोरंजनात कुठेही कमी पडत नाही. फेस्‍टीव्हल्‍स आणि तिकिट बारी दोन्हीवर चालावा असा हा चित्रपट आहे. खूप दिवसांनी असा चित्रपट आला आहे.
आता समाजमाध्‍यमांवरूनच कळलं की हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. शुक्रवारी लागला आणि शनिवारी संपला, असे या चित्रपटाचे तरी होऊ नये यासाठी या भिंतीवर हे लिहून टाकले.
लेखन, दिग्‍दर्शन, अभिनय, तंत्र या सर्वच बाबतीत सरस असलेला हा पूर्ण चित्रपट आहे. श्रीकांत बोजेवार यांची पटकथा आणि संवाद मस्‍तच आहेत. सायंकित कामत, रीचा अग्‍नीहोत्री ही जोडी नवी आहे; पण सोबत छाया कदम, उपेंद्र लिमये यांच्यासारखी तगडी मंडळीही आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण विदर्भातील चंद्रपूर जिल्‍ह्यात झाले. वर्‍हाडी बोलितच बहुतांश संवाद आहेत. विदर्भातील कलावंतही अर्थातच यात आहेत. पद्मनाभ बिंड, रमेश चांदणे या कलावंतांनी मान्यवरांच्या तोडीस तोड काम केले आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्‍यावर समीक्षण वाचून प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळेतपर्यंत मराठी चित्रपट निघून गेलेला असतो. यात चित्रपटाचे नुकसान आहे तसेच ते प्रेक्षकांचेही आहे. चांगले चित्रपट टॉकीजमध्‍ये जावून पाहणे, ही संधी, ते सुख त्यांना मिळत नाही.
एक सर्वांगसुंदर चित्रपट अचानक बघायला मिळाला, तो प्रदर्शित होतो आहे तर इतरांनाही तो आनंद मिळावा, यासाठी हे लिहले आहे.
………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या