

पोलिसांनी केली मैदानातून एकाला अटक दोन फरार
जीवघेण्या नायलाॅन मांजाचा वापर करणारा पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर, ता.१३ : कालच सायंकाळी इमामवाडा पोलीस ठाण्यासमाेर प्रणय ठाकरे या २१ वर्षीय तरुणाचा नायलाॅन मांजामुळे गळा चिरुन तडफडून मृत्यू झाला. या घटनेतूनही शहरातील काही पतंगबाज तरुणांनी कोणताही बोध घेतला नाही व आज देखील नायलॉन मांजाचा वापर करीत प्लासटिकच्या पंतग नागपूरच्या आकाशात उडल्या. मात्र कालच्या घटनेने बोध घेत शहरातील काही मैदानावर पोहोचून पोलिसांनी पंतगबाजांना नायलॉन मांजा व प्लासटिकच्या पतंगीचा वापर करताना रंगेहात पकडले.
उद्या मकर संक्रांतीच्या पर्वावर शहर पोलीस तसेच मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे असे बेकायदेशीर कृत्य करणा-या पतंगबाजांवर बारिक लक्ष् राहणार आहे.नायलॉन मांजाचा वापर करणा-या या तरुणावर मनुष्य हत्येचा प्रयत्न,अश्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी समोर आली. यासोबतच त्याचे पळून गेलेले दोन साथीदार यांना देखील लवकरात लवकर अटक करुन पोलीस कोठडीत डांबावे,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी तसेच उपद्रव शोध पथकांनी शहरातील झोन निहाय मैदांनावर तसेच नागरिकांच्या गच्चीवर देखील आकस्मिक तपासणी करण्याची मागणी संत्पत नागरिक करीत आहेत.
नायलॉन मांजाला अडकून शहरातील तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. ही अत्यंत दु:खद बाब असून यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन मांजा विक्री करणा-यांसह नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणा-यांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलिस प्रशासनाद्वारे संयुक्त कारवाई सुरू झालेली असून शहरातील काही तरुणांवर बुधवारी (ता.१३) पोलिस कारवाई करण्यात आली आहे.
महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन आणि उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात प्रत्येक झोन पथकाद्वारे कारवाई सुरू आहे.
नायलॉन मांजा कारवाई संदर्भात माहिती देताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, नायलॉन मांजा विक्रीवर कारवाई करण्यासंदर्भात संपूर्ण नागपूर शहरामध्ये मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे ८१ कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय शहरातील स्वयंसेवी संस्थाही मनपाला सहकार्य करीत आहेत. मात्र शहरातील लोकसंख्येचा विचार करता ही संख्या तोकडी आहे.
त्यामुळे या सर्वप्रक्रियेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. समाजात नायलॉन मांजाचा वापर न करण्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगावे. सुती मांजाचा वापर करून पतंग उडवित असले तरी गर्दीच्या ठिकाणी टाळावे. बाहेर मैदानातच पतंग उडवावी. रस्त्यावर मांजा अडकणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रोजच नायलॉन मांजा संदर्भात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १७८ नायलॉन मांजा चक्री जप्त करून जवळपास ६३ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मांजामुळे अनुचित घटना घडू नयेत यासाठी मनपाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मात्र ऑनलाईन पद्धतीनेही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. या बाबत कारवाईसाठी मनपाचे पोलिस प्रशासनासोबत प्रयत्न सुरूच आहेत. नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून मनपाला सहकार्य करावे. कुठेही नायलॉन मांजाची विक्री आढळल्यास किंवा त्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास त्वरीत त्याची माहिती मनपाच्या झोन कार्यालयात किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये द्यावी, असेही आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.
उपद्रव शोध पथकाद्वारे १३ जानेवारी ला २४०० रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच २७८० पतंगसुध्दा जप्त करण्यात आली आहे. पथकाने १६७ चक्री जप्त केली आणि ५०४ दूकानांची तपासणी केली.
महापौरांनी शहरात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. नायलॉन मांजा संदर्भात शहरात घडत असलेल्या दुर्घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा संदर्भात कारवाईला गती देऊन नागरिकांना तसेच तरुणांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले तसेच त्यांनी मांजापासून वाहनचालकांच्या सुरक्षतेसाठी उड्डाण पुलांवर तार लावण्याचे आदेशही दिले.




आमचे चॅनल subscribe करा
