

नागपूर,१९ ऑगस्ट २०१९: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी पोकलेनच्या मदतीने पूनम आयनॉक्स मॉलच्या मागील भागातील शिकस्त भाग अखेर जमीनदोस्त केला. विभागातील कर्मचाऱ्यांनी शिकस्त भाग आधी दोरीने बांधला यानंतर पोकलेनच्या मदतीने ओढून तो भाग पाडण्यात आला.
लकडगंज झोनचे सहायक आयुक्त विजय हूंमणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार अतिक्रमण दलाने शिकस्त भिंती,बीम व कॉलम तोडण्यात आले. मॉलच्या मागील भागातील धोखादायक भाग सतर्कतेने आधी पाडण्यात आला,हे काम सकाळी ११ वा. पासून तर सायंकाळी ५.३० पर्यंत पोकलेन व टर्न टेबल लेडरच्या मदतीने सुरू होते. उद्या मंगळवारी देखील सकाळी ११ वा. पासून इमारतीचा शिकस्त भाग पाडण्याचे काम सुरू राहील. मागील भाग पाडल्यानंतर इमारतीचा पुढचा भाग पाडण्यात येईल हूंमणे यांनी सांगितले इमारतीचे स्टकचरल ऑडिटही करण्यात येईल.
लकडगंज पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव पूनम आयनॉक्स मॉल समोरील एका भागाची वाहतूक बंद केली होती. कार्यकारी अभियंता चंद्रकांत गभणे, सहा. आयुक्त अशोक पाटील,अधीक्षक संजय कांबळे,झोनचे उप अभियंता मंगेश गेडाम यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला. अग्निशमन दलाची चमू देखील उपस्थित होती.
वर्धमाननगरातील पूनम मॉलच्या इमारतीचा भाग पडल्याने महापालिका प्रशासनाने या मॉलची इमारत २४ तासांत पाडण्याची नोटीस मालक एन. कुमार यांना बजावली होती. त्यानंतरही त्यांनी तो पाडला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मॉल पाडण्याला रविवारपासून सुरुवात केली. मात्र, मॉलची उंची अधिक असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला आल्यापावलीच परतावे लागले होते.
आयनॉक्स पूनम मॉलची भिंत आणि सज्जा शुक्रवारी रात्री उशिरा पडला व त्यात एका चौकीदाराचा मृत्यू झाला. तर, भिंतीच्या मलब्याखाली दबून एका महिलेसह तिघे जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाने याची पाहणी करून मे. इंडो पॅसिफिक सॉफ्टवेअर अॅण्ड एन्टरटेन्मेंट लिमिटेडला नोटीस बजावत २४ तासांच्या आत मॉलमधील जीर्ण भाग पाडण्याचे आदेश कंपनीला दिले होते. मात्र, त्यानंतर मॉलचे बांधकाम पाडण्यात आले नाही. त्यामुळे रविवारी दुपारनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरुवात केली. यासाठी कार्यकारी अभियंता चंद्रकांत गभणे व सहाय्यक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्वात दोन जेसीबी मशिनींसह ताफ्याने कारवाईला सुरुवात केली. मात्र, मॉलच्या इमारतीची उंची अधिक असल्याने ती पाडण्यास अडचण येत होती. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या टीटीएल (टेबल टॉप लॅडर) मशिनचे सहाय्य घेण्यात आले. मात्र, आजूबाजूची कमी जागा व मॉलची अधिक उंची यामुळे कारवाई करण्यात अडचण येत होती. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या ताफ्याला कारवाई न करताच परतावे लागले होते. सोमवारी पोकलेन मशिनच्या सहाय्याने इमारत तोडण्याचे काम करण्यात आले.
(बातमी संबंधित व्हिडीयो sattadheesh official youtube चॅनलवर)




आमचे चॅनल subscribe करा
