Advertisements


सायबर क्राईमवर आधारित थरारक ‘विकेंड क्लब’आता ओटीटीवर
नागपूरात पत्रकार परिषदेत दिली माहिती
नागपूर,ता.१४ ऑक्टोबर २०२५: गेल्या वर्षी २०२४ या एकाच वर्षात सायबर गुन्ह्यात ३६ लाख लोकं हे भरडले गेले.या एकाच वर्षात २२ हजार ८०० सायबर गुन्हे घडले.अशा गुन्ह्यात कधीही गेलेला पैसा परत मिळत नाही मात्र,सायबर क्राईमच्या अनेक घटनांमध्ये लोकांचे जीव गेले,अनेकांनी आत्महत्या केल्या.पैसा गमावला तरी चालेल मात्र जीव गेला तर तो कधीही परत मिळत नाही,असे विधान सायबर क्राईमवर आधारित वेब सिरिज बनवणारे व मूळ नागपूरचे असलेले निर्माता किरण लांजेवार यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
याप्रसंगी अभिनेत्री निया त्रिपाठी उपस्थित होत्या.या प्रसंगी बोलताना लांजेवार म्हणाले,की मी स्वत: सायबर क्राईमला बळी पडलेला असून मित्राचे शैक्षणिक शुल्क ५० हजार रुपये वेबसाईटवर भरले मात्र,ती वेबसाईट फेक निघाली,खूप शोध घेेतल्यानंतर देखील या गुन्ह्याचा छडा लावता आला नाही.‘विकेंड क्लब’ही पाच मित्रांच्या आयुष्यातील सायबर क्राईमवर बेतलेली थरारक कथा असून एकूण सहा सिरिजमध्ये ती प्रेक्षकांना बघता येईल.प्रत्येक सिरिज ही अर्धा तासांची आहे.ही वेब सिरिज प्रेक्षकांना ‘हंगामा प्ले’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल.दिग्दर्शन हिरेन अधिकारी यांचे असून निया त्रिपाठी,अमिका साईल,फरझान कर्जानिया,जिग्ना त्रिवेदी तसेच सिमा कुलकर्णी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.याशिवाय मूळ नागपूकर जयंत गडेकर यांची देखील प्रमुख भूमिका या वेबसिरीजमध्ये नागपूरकरांना बघता येईल.
मुंबईतील आयुक्तांच्या तरुण नातेवाईकाने सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली.ही घटना माझ्या मनावर खोलवर बिंबवल्या गेली.अडीच वर्षांपासून या विषयावर मी काम करीत असल्याचे लांजेवार यांनी सांगितले.तरुणाईचा कोणताही दोष नसताना अश्या गुन्ह्यात युवा पिढी असेच आयुष्य संपवित राहीली तर याचे गंभीर परिणाम आपल्या समाजावर व पर्यायाने देशावर होईल.त्यामुळे सायबर क्राईमविषयी युवा पिढीमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या ध्येयातून या वेबसिरीजची निर्मिती केली असल्याची माहिती लांजेवार यांनी दिली.
हा विषय आजच्या तंत्रयुगाच्या काळात खूप महत्वाचा असल्याचे सांगून, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात अश्या सायबर क्राईममध्ये भरडले जात आहेत.यात देखील निवृत्त झालेले ज्येष्ठांची संख्या यात सर्वाधिक आहे.याशिवाय दररोजच्या प्रचार-प्रसार माध्यमात ‘डिजिटल अरेस्ट’च्या घटनांची बातमी ही असतेच.
पुढील काही महिन्यांनंतर दहावी,बारावीची परिक्षा आटोपल्यानंतर पालक आपल्या पाल्यांच्या हातात मोबाईल देतील मात्र,मोबाईलमध्ये या नवतरुणांच्या आयुष्यासाठी किती घातक व गंभीर गोष्टी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांनी वाढून ठेवल्या आहेत याची या तरुणांना कल्पना नसते.अनेक तरुणी कोणताही विचार न करता फक्त क्षणिक आंनदासाठी आपली विविध छायाचित्रे विविध समाज माध्यमांवर टाकतात ज्याचा अनेक वाईट गोष्टींसाठी एआयच्या माध्यमातून वापर केला जात असतो.या सर्व परिणामांची जाणीव युवा वर्गाला व्हावी हा सामाजिक उद्देश्य ठेऊन या वेब सिरीजची निर्मिती केली असल्याचे लांजेवार सांगतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारीवर आपण नियंत्रण आणू शकत नाही मात्र,एकच गोष्ट आपल्या हातात असते ती म्हणजे जागरुकता.युवा वर्गाला या गुन्हेगारीविषयी जागरुक केल्यास मोठ्या प्रमाणात यावर आळा बसू शकतो.याच उद्देशाने पुणे,मुंबईतील अनेक महाविद्यालयात आम्ही भेट दिली व या वेब सिरीजविषयी त्यांना माहिती दिली.
अजित वर्तक याने या विषयावर खूप खोलवर अभ्यास केला असून काही काल्पनिक भागाचा समावेश वेबसिरीजमध्ये असल्याचे लांजेवार सांगतात.भारतात सायबर क्राईमचे गांर्भीर्य यावरुन ओळखले जाऊ शकते की चारशे गुन्ह्यांपैकी फक्त दोन गुन्ह्यात खरे आरोपी पकडले जात आहेत!एकदा तुमचा पैसा गेला की तो कधीही परत मिळत नाही. मुंबईत सायबर सेलचे प्रमुख यशस्वी यादव यांच्या सहकार्याने ३ ऑक्टोबर रोजी सायबर सप्ताह साजरा करण्यात आला यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग नोंदवला.आज नागपूरात व्हीएनअायटी कॉलेजमध्ये भेट देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना निया त्रिपाठी म्हणाल्या की,सायबर क्राईम व त्याला बळी पडलेले निरपराध लोकं हा विषय सामाजिक दृष्टया खूप महत्वाचा आहे.जागरुकतेच्या अभावी लोक सायबर क्राईमला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत.कला हे एक सशक्त माध्यम असतं,किरण लांजेवार यांनी एक खूप महत्वाचा व गंभीर विषय वेब सिरीजसाठी निवडला याचे खरंच कौतूक आहे.या प्रभावी माध्यमाचा मोठ्या प्रभाव महाविद्यालयीन युवा वर्गावर होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एका प्रश्नाच्या उत्तरात लांजेवार म्हणाले,की ‘विकेंड क्लब’सेशन एक असून लवकरच सेशन दोन देखील निर्मित करणार आहे.या वेबसिरीजचे चित्रीकरण सुरत,मुंबई,लोणावळा इत्यादी ठिकाणी झाले असून मी मूळ नागपूरचा असल्याकारणाने पुढील सेशनचे चित्रिकरण नागपूरात करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.येत्या काळात सायबर क्राईमची टक्केवारी इतकी वाढेल की ती देशाच्या जीडीपीचा दर गाठेल,अशी शंका व्यक्त करुन,सायबर क्राईमच्या संदर्भात देशाचा कायदा कितीही कठोर असला तरी आंतरराष्ट्रीयस्तरावर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मर्यादा येतात.यातून होणा-या आत्महत्या,येणारे नैराश्य यात देश होरपळून जाऊ नये,यासाठी ‘विकेंड क्लब’हे एक पाऊल असल्याचे लांजेवार सांगतात.
नागपूरकरांनी मूळ नागपूरकराच्या या क्रियाशीलतेला हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर भेट देऊन भरभरुन प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements

Advertisements

Advertisements
