फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपुलावरुन खाली पडताना माझी मुले घाबरुन’ममा’म्हणाले असतील....!

पुलावरुन खाली पडताना माझी मुले घाबरुन’ममा’म्हणाले असतील….!

Advertisements

दु:ख आत्मनाश करुन नाही सहन करुन संपवणार:किरण खापेकरचा निर्धार

चौकातील कर्तव्यावर असणा-या वाहतूक पोलिसांनी चौकातच ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली असती तर…..!

कार मालकालाही अटक झालीच पाहिजे:नशेत असणा-याला गाडीची किल्ली दिलीच कशी?जन्मदात्रीचा आर्त प्रश्‍न

सासूची जाण्याची ईच्छा नसताना मीच पाठवले:नणदेकडून माझ्यासाठी गोपालकाला घेऊन अर्धा तासांपूर्वीच घरी परत आल्या होत्या!

पोलिस नाही, अनोळखी तरुणाई मदतीसाठी धावली:त्यांच्याच मुळे मुलांचे चेहरे बघू शकले!

पूलावरुन जाण्याची आता खूप भीती वाटते:पूला खालून जातो:वस्तीतील महिलांचे मनोगत

गडकरींनी घेतली धावती भेट:सक्करदरा व पाचपावली दोन्ही पूल पाडणार!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २७ सप्टेंबर २०२२: गणपती विसर्जन म्हणजे अनंत चतुदर्शीचा दिवस नागपूरातील पाचपावली टिमकी येथील राहणा-या अवघ्या ३४ वर्षीय किरण खापेकर हिच्यासाठी अत्यंत दूर्देवी दिवस म्हणून उजाडला.९ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता तिचे पती,सासू आणि दोन मुले,अकरा वर्षीय वेदांत आणि साढे चार वर्षीय विवान,मोठ्या बाबांकडे गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता,परत येताना रात्री दहाच्या सुमारास सक्करदरा पुलावर नशेत असणा-या कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर ८० च्या वेगाने कार पुलावर दामटली त्यात विनोद खापेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक लागून अतिशय कमी उंचीच्या पुलावरुन, विनोद खापेकर,त्यांची आई लक्ष्मीबाई खापेकर,मुले वेदांत आणि विवान हे पूलाखाली फेकल्या गेले,एका क्षणात घरी पोहोचण्याची ओढ असणा-या या चौघांनाही नियतीने घर गाठूच दिले नाही आणि एका हसत्या खेळत्या चौकाेनी कुटूंबाची ह्दयद्रावक अशी कायमची ताटातूट झाली.

दोन तास…फक्त दोन तासांपूर्वी मुलांच्या ईच्छेमुळे मोठ्या भावाकडे गणपती विसर्जनासाठी गेलेले पती,सासूबाई आणि पोटची दोन्ही मुले यांच्या कार अपघाताची माहिती फोनवर मिळेल,अशी कल्पनाही किरणने केली नव्हती.‘सत्ताधीश‘ने आज किरणच्या राहत्या घरी टिमकी येथे भेट दिली असता,मला थोडी जरी कल्पना असती तर मी त्यांना जाऊच दिले नसते,असे म्हणत, ही दोन मुलांची जन्मदात्री ओक्साबोक्सी रडली.

(छायाचित्र: अपघातानंतर मेडीकलमध्ये मुलांची अवस्था बघता किरणने फोडलेला टाहो!)

माझी सोन्यासारखी मुले दूचाकीला कारची एवढ्या भीषणतेने धडक लागताच खूप घाबरली असेल हो…पूलावरुन खाली पडताना त्यांनी ’ममा ममा’मला हाक मारली असेल…’पण मी त्यांच्या जवळ नव्हते…मी का नव्हते त्यांच्या जवळ त्या वेळी?हा ह्दय पिळवटून टाकणारा प्रश्‍न तिला आता रक्तबंबाळ करतोय,आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतही असाच छळत राहणार!

दोनच दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी घरी आले होते.आमच्या हलबा समाजाचे मान्यवर ही भेटून गेलेत.गडकरींनाही मी हाच प्रश्‍न केला त्या वेळी चौकात बंदोबस्तासाठी असणा-या पोलिसांनी दारुच्या नशेत असणारा वाहन चालक गणेश अरुण कडबी याची तपासणी का नाही केली?पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावले असते तर यमदूत बनून माझ्या कोवळ्या पिलांच्या अंगावर धावून येणा-या त्या कारला पुलावर चढण्यापूर्वीच रोखता आले नसते का?नशेत त्या कार चालकाने आधी दोन दुचाकींना धडक दिली,यानंतर तो इतका घाबरला की ८० च्या वेगाने तो पुलावर चढला,पुलाची उंची इतकी कमी आहे की माझ्या कुटुंबियांना सावरायला कुठेही जागाच मिळाली नाही.किमान एखादी जाळी जरी असती तर?किवा पुलाची उंची जास्त असती आणि माझे कुटुंबिय जखमी होऊन पुलावरच पडले असते तर?मी ते ही सहन केलं असतं पण?माझी मुले ६०-७० फूटांवरुन खाली फेकल्या गेली,मला ही वेदनाच सहन होत नाही,ते आजारी पडले असते,आजारी पडून मृत्यूच्या दारावर पोहोचले असते तरी मी ते सहन केलं असतं पण?माझ्या मुलांनी ती भीती,ते दु:खं,तो मार कसा सहन केला माझ्याशिवाय?

करोनाच्या दोन वर्षांनंतर मायबाप सरकारने निर्बंधमुक्त जल्लोष साजरा करण्याची परवानगी दिल्याने दोन वर्षांची कसर मिरवणूक काढणा-यांना याच वेळी भरुन काढायची होती.पोलिसांचा सगळा बंदोबस्त मिरवणुकीकडे लक्ष देण्यात,माझ्या पतीच्या तर प्रेता जवळ वाहतूक पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभा होता!

गणपती विसर्जन म्हणजे दारु,डीजे,मिरवणूक,र्निबंधमुक्त उत्साहाची उधळण…!अनोळखी तरुण मुले धावली मदतीसाठी.सर्वात आधी माझ्या मुलांना उचलून ऑटोमध्ये टाकले.माझा अकरा वर्षाचा मुलगा हा वजनाने जडच होता!तरी देखील त्या तरुण मुलांनी एकमेकांना वेदांतला पास करीत मेडीकलच्या ट्रामा केअर यूनिटपर्यंत पोहोचवले.

(छायाचित्र: : मृत्यूचा सापळा ठरणारी हिच ती कार,हाच तो पूल,हीच त्या पुलाची उंची!)

विनोद यांना पायाला जबर मार लागला होता.रक्ताने त्यांचा पाय माखलेला होता.मी त्यांना म्हणाले,अहो तुम्हाला फक्त पायालाच लागले आहे,तुम्ही लंगडे झालात तरी मला चालेल,मी निभावून नेईल सगळं,काळजी करु नका,डॉ.खळतकर यांच्या रुग्णालयातून त्यांना ही मेडीकलमध्ये नेण्यात आले,पण मी मेडीकलला पोहोचले तेव्हा चौघेही बोलतच नव्हते!

माझ्या सासूबाईचं कलेवर तर ऑटोमध्येच होतं!मी कुठे जाऊ?कोणाकडे जाऊ?कुठे धाव घेऊ?मी सैरभैर झाले अन मी माझ्या पिलांकडेच आधी धाव घेतली.तेथील डॉक्टरांनी वेदांत आणि विवानला सलाईन,इंजेक्शन लावणेही थांबवले तेव्हा मी त्यांच्यावर चिडले!डॉक्टर,माझ्या मुलांचा इलाज करा ना?तुम्ही का थांबले?माझ्या एका तरी मुलाला वाचवा हो!मला जगण्यासाठी एक तरी मुलगा जगवा….!माझा एक तरी मुलगा ‘पुलावर’ का नाही पडला?

मला आता फक्त न्याय पाहिजे.गडकरींनाही विचारले पुलाची उंची का इतकी कमी ठेवली?मध्ये दुभाजक का नाही लावले?ते म्हणाले पुलाची रुंदी फक्त ३० मीटर आहे.दुभाजक हे ४० मीटर रुंदी असल्यावरच लावल्या जाऊ शकतात,पण!लवकरच सक्करदरा व पाचपावलीची उड्डाण पुले तोडण्यात येणार आहे.नवीन पुलांमध्ये दुभाजक आहेत व पुलाची उंची ही व्यवस्थीत आहे, मग…आदिवासी गोवारी पुलावरुन दुचाकीच्या मागे बसलेली महिला कशी कोसळून खाली पडली?आदिवासी गोवारी पुलाची रुंदी ४० मीटरची असूनही त्या पुलावर दुभाजक का नाही?या प्रश्‍नांची मात्र त्यांच्याकडे उत्तरे नव्हती.

एवढंच समाधान आहे मला की, माझी केस खूप स्ट्रांग करण्यात आली.हत्या-या वाहन चालकावर कठोर कलमा लावण्यात आल्या.पण?मला आता न्याय हवा आहे.त्या चालकाचा मालक शाम ढोमणे जो हनुमान नगरमध्ये राहतो,ज्याने मद्यधुंध अवस्थेत असतानाही आपल्या कार चालकाला कारची किल्ली दिलीच कशी?त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,त्याला ही तातडीने अटक करा,पोलिस सांगतात आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करु!

माझे घर तर सुखात नांदत होते.रात्री ८ वाजता जेवण करायला भावाकडे गेलेला माझा पती,माझी निष्पाप देवासारखी मुले,माझी इतकी चांगली सासू दोन तासात घरी परत येण्या आधी जगच सोडून निघून जातात!लहान पणी फक्त १२ वर्षांची असताना वडील देवाघरी गेले,तेव्हापासून खूप भोगलं,वयाच्या २२ सा व्या वर्षी लग्न केलं.एका वर्षात वेदांत झाला,मग विवान माझ्या जिवनात आला,फक्त १२ वर्षांचाच संसार झाला होता माझा,१२ वर्षांनी पुन्हा मला नियतीने सगळे भोग पुन्हा भोगायला लावण्यासाठी अश्‍यारितीने मजबूर केले!

किती मोठी दुश्‍मनी निभावली माझ्यासोबत त्या देवाने!मी तर दहा ही दिवस गणपतीचे उपवास करत होते.अनंत चतुर्थीच्या दिवशी त्याने माझ्या व्रत वैकल्यांचे,माझ्या त्याच्यावरील अथांग विश्‍वासाचे असे पांग फेडले?काल पासून माझ्या आईकडे देवीच्या नवरात्रीचे घट बसलेत,कशी म्हणू मी तिला ’आई!’तिला काहीच दया आली नाही माझी?एक तरी मुलगा जिवंत ठेवायला हवा होता माझा तिने,विश्‍वास उडून गेला आता देवावरचा…!

कुठे चूक झाली माझी?माझ्या चुकीची शिक्षा मलाच का नाही दिली?त्यांना वाचवायला हवं होतं…एक तरी मूल का नाही तिने जिवंत ठेवले..!३१ डिसेंबरला माझ्या विवानचा पाचवा वाढदिवस होता हो….!आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करणार होतो.माझी मुले खूप समजूतदार होती,कोणताही हट्टीपणा नाही,मोठ्यांचा आदर करीत होती,माझं म्हणनं नेहमी ऐकायची,वेदांत महालच्या राजेंद्र शाळेत जायचा,विवान तर केजी-वन मध्येच होता,खूप..खूप समंजस होती माझी मुले…आता…मला पुन्हा अशी मुले मिळणार आहे का?

माझी सासूबाई तर नणदेकडे चार दिवस राहून अर्धा तासांपूर्वीच परत आली होती.नणदेने तिला म्हटले ही होते आजच्या दिवशी राहून जा पण त्या दिवशी नणदेकडे अनंत चर्तुदर्शीनिमित्त गोपाल काला केला होता,सासूबाईला माहिती होतं,किरणला गोपालकाला खूप आवडतो,दुस-या दिवशी काल्याला आंबूस वास येईल म्हणून त्या नणदेकडे थांबल्याच नाहीत,घरी आल्या.मीच म्हटलं जा तुमच्या मोठ्या मुलाकडे गणपतीचं जेवायला.त्यांची मुळीच ईच्छा नव्हती तरी पण नातवांच्या हट्टापायी त्या विनोदच्या दुचाकीवर जाण्यास तयार झाल्या आणि….?राहून गेल्या असत्या नणदेकडेच आणखी एक दिवस तर…..!

(छायाचित्र:टिमकी:एका हस्त्या खेळत्या कुटूंबाचे शांत झालेले हेच ते घर…आता या घराला कुलूप लागले असले तरी आतले हुंदके अद्याप परिसरातील नागरिकांना ऐकू येतात!)

माझ्या साढे चार वर्षाचा विवान गाडीला धक्का लागल्यावर किती घाबरला असेल!त्याने ते कसे सहन केले,हा विचार करुनच माझं काळीज फाटतं….!त्याला एवढंस खरचटलं तरी मला वेदना होत होत्या…!दोन्ही मुले मेडीकलमध्ये माझ्याशी बोललीच नाही.नव-याच्या पायाला खूप मार लागला तरी मी मनाला समजावले होते.खूप धावा केला हो मी मेडीकलमध्ये देवाचा….!एकदा तरी माझ्या मुलांना शुद्धीवर येऊ दे….!गणपतीचा धावा केला,आई दूर्गेचा धावा केला….!मुले बोललीच नाही…कोणीच नाही बोलले माझ्याशी….!पोलिस तर मेडीकलमध्ये नंतर पोहोचली……!मदत करणारी ती अनोळखी मुले मला जर आज येऊन भेटली तर आधी त्यांच्या पाया पडील कारण फक्त त्यांच्या मुळेच मी माझ्या मुलांचे चेहरे बघू शकले…!माझ्या नव-याचे प्रेत पुलाखाली पडले होते तेव्हा तिथे कर्तव्यावर असणारा वाहतूक पोलिस फक्त दूर उभा राहून बघत बसला होता.माझ्याकडे सगळे व्हिडीयोज आहेत….!

माझ्या माईण्डमध्ये का नाही आलं असं काही तरी घडणार आहे!मी त्यांना पाठवलंच नसतं ना…!घरातून जाताना आपण चांगलाच विचार करतो ना?सुखरुप परत येतील सगळे….!ते आता कधीच परत नाही येणार,असा विचार करतो का आपण?मला देवाने दोन मुले दिली ती हिसकावण्यासाठीच का?मग दिलीच कशाला?फक्त चार वर्षाचा होता विवान,वेदांतनेही अजून आयुष्य बघितलेच कुठे होते?हिसकावयाचेच होते तर पदरात का दिली मुले?

(छायाचित्र:टिमकी:वेदांत आणि विवान आता घरा समोरील या गल्लीमध्ये पुन्हा कधीही खेळणार बागडणार नाही,त्यांच्या अस्तित्वाच्या खूणा कायमच्या पुसल्या गेलेली हीच ती सामसूम झालेली गल्ली….!….!)

माणसांना तरी कसा दोष देऊ,देव हा तर तारणहार असतो ना?खूप मोठी परिक्षा घेतली त्याने माझी…ते एकदाच मेले…मी…आता दररोज मरतेय…..!मला कशासाठी जिवंत ठेवले…..!

मोठ्या बाबांकडचा गणपती शिरवल्यानंतर माझ्या मुलांना आपल्या मम्मीला खूप काही सांगायचे असेल ना?त्यांना माझ्याकडे येण्याची खूप घाई झाली असेल ना,आता आम्ही आपल्या मम्मीकडे चाललो,गणपती विसर्जनाच्या गंमती आता मम्मीला सांगू….!असाच विचार करत बसले होते ना ते आपल्या बाबांच्या दूचाकीवर?

कधी सांगतील आता ते मला त्या गंमती……!सध्या किरण आपली आई लता जोगेश्‍वर टोपरे हिच्या घरी पाचपावली,टोपरेची विहीर,टिमकी येथे राहत असून,लहानपणापासून इतकं भोगलं आहे की आत्मनाश करुन हे ही दु:खं भोगणार नाही तर सहन करुन दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करणार,असा निर्धार व्यक्त करते व नशेबाज कार चालक आणि कार मालक या दोघांनाही कठोर शिक्षा होईपर्यंत न्यायासाठी लढत राहणार असल्याचे सांगते.

गल्ली झाली सामसूम….वस्तीत बसली पुलाची धास्ती-

वेदांत आणि विवानच्या बालक्रीडांशिवाय आता त्यांचे घर,त्यांची गल्ली सामसूम झाली आहे.९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी ती बातमीच येऊन धडकली…अपघात झाला…..!

दिवाळीनिमित्त स्वयंपाक घरात मॉड्यूलर किचन बसवणार होते.विनोदने त्या ठेकेदाराला फोन केला होता.पण त्याने उचलला नाही.मग?काळी वेळाने त्याने विनोदला फोन केला.पोलिसांनी अपघातानंतर त्याच नंबरवर कॉलबॅक केला व घरी अपघाताविषयी सांगायला लावले.ठेकेदाराने इतकंच सांगितलं,घरी परत येताना सक्करदरा पुलावर चौघांना अपघात झाला…..!

ही बातमी जरी सुन्न करणारी होती तरी किरणचं मन धजत नव्हतं हा अपघात तिच्या जिवनावरचा एवढा मोठा आघात असेल!तिला वाटलं किरकोळ मार लागला असेल,त्यातही तिची पिल्ले ही तर सुखरुपच असतील,पण?

या बातमीने संपूर्ण परिसर,शेजारी,ओळखीचे हादरले.बबीता गांजाखेतवाले,कल्पना मैदमवार,भारती गांजाखेतवाले,पुष्पा खापेकर या महिला ‘सत्ताधीश’ला सांगतात,गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या गल्लीत श्‍मशान शांतताच होती.आता नवरात्रात घट बसलेत तर थोडं बरं वाटत आहे.पुष्पा खापेकर ही लसून,आल्याचा ठेला चालवणारी महिला सांगते,मी तर पंधरा दिवस या रस्त्याने ठेलाच आणला नाही!विवानच्या आठवणींने महिलांचे डोळे ही पाणावले.लहान श्‍वानाच्या पिल्लासोबत तो नेहमी खेळायला येत होता.सर्वांच्या घरी तो जायचा.सासू लक्ष्मीबाई यांचा ही स्वभाव खूप मनमिळावू होता.सासू-सुनेचे कधीच भांडण ऐकू आले नाही.खूपच वाईट घडलं….!

आतापर्यंत त्या धक्क्यातून वस्तीत कुणीही सावरले नाही….!खरंच असं कसं घडू शकतं एका हसत्या खेळत्या कुटूंबासोबत?साढे पाच वर्षाची महेक ही चिमुरडी आताही विवानची आठवण काढते.दोघेही सायकल चालवित होते.अगदी घट्ट मैत्री होती त्यांच्यात..!तिला विचारले,तुझा मित्र कुठे गेला तर ती सांगते ‘जय जयकडे!’म्हणजे देवाकडे…..!

आता पुलाची खूप धास्ती वाटते.कालच त्या भागातून गेलो तर पुला खालूनच गेलो.खापेकर यांच्या घराकडे बघण्याचा नूरच पालटला.आता किरणकडे बघतो तर ’ती रडत तर नाही आहे ना!’याच भावनेने बघत असतो.किरण तू इथंच राहशील ना?की आईकडेच राहणार आहेस ती तर जिंदगीभर नवरा,मुले,सासूला विसरणार नाही!

आमच्यासोबत पुलावर अशी घटना बेतली असती तर?हा विचारच खूप जीवघेणा आहे….!किरणकडे,तिच्या घराकडे आता बघवत ही नाही….!गणपती विसर्जनानंतर विनोद हा ६०० रुपये किलोंचे खूर आणनार होता खायला…..!
आता शहरातील सगळ्याच पुलांची भीती वाटते….!मेट्राचे पुल ही असेच पडणार आहेत एक दिवस….असं किरणच्या शेजारणी सांगतात….!

……………………………………………………………..

(विशेष सहकार्य:प्रकाश शुंकलवार व विलास पराते)

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या