
‘ब्रेक द चेन’ निर्देशानुसार मनपाचे कडक निर्देश
शनिवार,रविवार सगळंच बंद
नागपूर,ता. ६ एप्रिल: राज्यात करोनाच्या वाढत्या संसर्गाला थांबविण्यासाठी अंमलात आणलेल्या राज्यशासनाच्या धाेरणाअनुरुप आज पालकमंत्री नितीन राऊत तसेच मनपा आयुक्त राधकृष्णन बी.यांनी नागपूर शहराच्या संदर्भात कडक निर्बंधाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नागपूरात देखील ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवार व रविवार पूर्णत: शहर बंद राहणार असल्याचे माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
हे लॉकडाऊन नसून कठोर निर्बंध असल्याचे त्यांनी सांगितले.कठाेर निर्बंध लादून वाढत्या करोनाचा संसर्ग हा खंडीत करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.मृत्यूची वाढती व संसर्गाची वाढती संख्या बघता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मात्र सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सगळे व्यवहार सुरळीत राहतील अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
लॉक डाऊनमुळे गरीबांचे हाल होतात याची शासनाला ही जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळेच पूर्ण लॉक डाऊन न करता कठोर निर्बंध लादण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधाची अंमलबजावणी नागपुरातही होणार असून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ५ एप्रिलचे रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लावण्यात आले असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी सांगितले. रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी तसेच सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी राहणार आहे.
याशिवाय मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, बाजारपेठ बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. दरम्यान, सार्वजनिक वाहतूकही नियमानुसार सुरू राहील. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत राहणार असून नागपूरकरांनी या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
