

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रोड शो ला अभूतपूर्व प्रतिसाद
नागपूर: शनिवार दि. १९ ऑक्टोबर हा प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने सर्वच पक्ष्ातील उमेदवारांनी प्रचार रॅलीवर भर देऊन मतदारांशी संवाद झाला.संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष् लागलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रचार रॅली सकाळी ९ वा. माटे चौकातून सुरु झाली. हजारोंच्या गर्दीने रस्ते फूलून गेले होते. संदल,ढोल-ताशे, लेझिम, दांडपट्टा, भगवे वस्त्र, डोलाने फडकणारे पक्ष्ाचे झेंडे,कार्यकर्त्यांचा जोश,महीलांची लक्ष् णीय संख्या,भगव्या टोप्या,टाळ्या,फुगड्या,लहान मुलांची आकर्षक वेशभूषा, ज्येष्ठांचा अोसंडून वाहणारा उत्साह ,मुख्यमंत्र्यांचे हातात डोलणारे कटआऊट्स,मध्येच मोदी आणि शहांचे झळकणारे कटआऊट्स,संपूर्ण भगव्या रंगा व्यापलेल्या झेंड्यामध्येच झळकणारे नीळे झेंडे,फूलांनी सजलेला रथ आणि लाऊड स्पीकरवरील देशभक्ती गाणे यांच्यासोबतच ‘पुन्हा आणूया आपले सरकार’चा दक्ष्णि-पश्चिमध्ये निनादणारा गजर असा अभूतपूर्व नजारा शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत नागपूरकर नागरिकांनी अनुभवला.
फूलांनी सजलेल्या रथावर प्रथम पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे आरुढ झाले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अमृता फडणवीस,सुलेखा कुंभारे रथावर चढलेत आणि रॅलीला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांचा नेहमीचा सुहास्य वदन असणारा चेहरा, विजयाचा ओसंडून वाहणारा विश्वास,हात उंचावून कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत करीत होता. रॅली ज्या ज्या मार्गावरुन जात होती,घरांच्या गॅलरीतून सजलेल्या-नटलेला मातृ वर्ग मुख्यमंत्र्यांवर फूलांचा वर्षाव करीत होता. रंगबिरंगी फूगे अासमंतात सोडली जात होती. ४ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात मुख्यमंत्री हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात उमेदवारी अर्ज भरण्यास गेले असता जो उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता, तेवढाच उत्साह प्रचाराच्या अंतिम दिवशी देखील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता. रॅलीमध्ये तरुणाईची स्कूटर रॅलीही डोक्यावर हेलमेट घालून सहभागी झाली होती. वाहनांच्या ताफ्याने रस्ते फूलले. ठिकठिकाणी रॅलीतील ज्येष्ठ महिला व सळसळती तरुणाई हे एकसाथ फुगडी खेळताना लोकांचे लक्ष् वेधत होती. कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवत होते तर ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती’या सारखी देशभक्तीपर गीते तरुणाईमध्ये रोमांच भरत होती. रॅलीतील ढोल-ताशे पथकांनी तर अभूतपूर्व असे सादरीकरण करुन नागरिकांचे मन जिंकले.
माटे चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून ‘रोड शो’ ची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, नागपूर मनपाचे सत्तापक्ष पुढारी संदीप जोशी, भाजप पुढारी मुन्ना यादव, भाजपचे नगरसेवक अविनाश ठाकरे, माजी महापौर प्रवीण दटके, भाजपचे दक्षिण-पश्चिम मतदार क्षेत्राचे अध्यक्ष रमेश भंडारी यांसह पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर ‘महाजनादेश रोड शो’ यात्रा दक्षिण-पश्चिम नागपुरातील गोपाल नगर, पडोळे चौक, विद्यानगर, भेंडे ले-आऊट परिसरातून फिरली. या दरम्यान मुख्ममंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या दरम्यान भगिनींनी मुख्यमंत्र्यांची आरती . काही भागात मुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शोचे’ पुष्पवर्षावाने स्वागत करण्यात आले. ‘महाजनादेश रोड शो’ दरम्यान काही जिगरबाज खेळाडूंकडून महाराष्ट्राच्या मर्दानी संस्कृतीचे प्रतिक असलेले लेझीम, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ भेंडे ले-आऊट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महाराजांना वंदन केले. यानंतर त्यांनी आयोजित सभेत नागरिकांना संबोधित केले.
२४ ऑक्टोबरला ‘कमळ’ फुलणार – मुख्यमंत्री
येत्या २४ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतगणनेत राज्यात ‘कमळ’च फुलणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथील भेंडे ले-आऊट भागात आयोजित जनसभेत व्यक्त केला आहे. ‘महाजनादेश रोड शो’ दरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.
सभेत मुख्ममंत्री म्हणाले, आपण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला असून नागरिकांनी येत्या २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा निश्चय केला आहे. राज्यात भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप आणि रयत क्रांती यांच्या युतीतून मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी अधिकाधिक जागा जिंकून आणू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, आम्ही मागील ५ वर्षांच्या कार्यकाळात आपण पारदर्शी पद्धतीने राज्यकारभार करून प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. दीन-दलित, इतर मागास वर्गीय, गोरगरीब, आदिवासी बांधव, महिला, शेतकरी- शेतमजूर या सर्वांची सेवा करून राज्याचा चेहरा-मोहरा पालटविला. आम्ही मागील ५ वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोगा घेऊनच नागरिकांपुढे जात आहोत. ‘महाजनादेश रोड शो’ यात्रेत नागरिकांनी आपल्याप्रति व्यक्त केलेले प्रेम पाहून ‘मतदारराजा’ पुन्हा एकदा भाजपला बहुमताने विजयी करेल, असा आपल्याला विश्वास आहे.
पुढे ते म्हणाले ‘ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील ५ वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रासह संपूर्ण नागपुरचा चेहरा-मोहरा बदलला आहे. आम्ही नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करताना या विकासकामांचा दाखलाही सादर करीत आहोत. नागरिकांनी येत्या २१ ऑक्टोबरला जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत दक्षिण-पश्चिम भागात निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणारे संदीप जोशी, अविनाश ठाकरे, मुन्ना यादव रमेश भंडारी , सर्व महामंत्री यांच्यासह सर्व भाजप नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.




आमचे चॅनल subscribe करा
