फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपुढच्या पिढीला चांगली माणसेच दाखवली पाहिजे:सलील कुलकर्णी

पुढच्या पिढीला चांगली माणसेच दाखवली पाहिजे:सलील कुलकर्णी

Advertisements


एकदा काय झालं..’चित्रटपटामागील उलगडली प्रेरक कथा

मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही….

‘अंगाई’ म्हणजे गाणं नव्हे तर आई-बाळामधील स्पंदनं

हा बालचित्रपट नाही तर मोठ्यांनी बघण्या व शिकण्यासारखा

नात्यांवर प्रकाश टाकत अलगद धागे विणणारा चित्रपट

माणूस नसतं तेव्हा कळते नात्यांची किंमत:उलगडली नात्यांमधील गुंफण

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२१ जुलै २०२२: सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंदूलकर यांचे बंधू मंगेश तेंदूलकर हे मोठे व्यंगचित्रकार आहेत.एकदा त्यांनी एक अप्रतिम व्यंग साकारले,त्या टेबलवर कुंचले पाण्यात बुडविण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी ही होते,तेवढ्यात त्यांची नात धावत त्या ठिकाणी आली आणि ते पाणी त्यांच्या त्या व्यंगचित्रवार सांडलं!मंगेश तेंदूलकर यांनी त्या नातीचा लाड करुन परत पाठवले मात्र याच ठिकाणी त्यांचा स्वत:चा मुलगा असता तर…कानाखाली एक वाजवली असती असा त्रागा ही त्यांनी केला.हेच नातं असतं आजाेबा व नातीमध्ये,याचं कारण, नाती बाबत कोणताही अंदाज येत नाही,कुठल्या क्षणी ती लग्न होऊन कोणत्या घरी जाणार,त्यामुळे नातीसोबतचं नातं जगताना कोणाताही क्षण खराब होऊ नये,अशी ती नात्याची गुंफण असते.आयुष्य म्हणजे नेहमी चांगलं जे घडलं ते लक्षात ठेवणं,मनातले विचार हे देखील एक चित्रपटच असतात,चांगल्या माणसाच्या आयुष्यात तर खूप चढ-उतार असतात,चांगल्या माणसांचा चित्रपट ज्यांना सूचत नाही तेच खलनायकाला घेऊन चित्रपट बनवतात मात्र पुढच्या पिढीला चांगली माणसेच दाखवली पाहिजे,असा विचार सुप्रसिद्ध लेखक,दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी यांनी बोलून दाखवला.

ते सायंटिफिक सभागृहात आज नागपूर शहरातील सुप्रसिद्ध प्रसुतीतज्ज्ञ डॉ.चैतन्य शेंबेकर व भूलतज्ज्ञ डॉ.मनीषा शेंबेकर यांच्या ’ओमेगा’ रुग्णालयाच्या २५ सा व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त आयोजित, डॉ.सलील कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ’एकदा काय झालं...’या अगामी ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणा-या मराठी चित्रपटानिमित्त गप्पा गोष्टी व गाण्यांच्या कार्यक्रमात बोलत होते.

नागपूरातील सुविख्यात निवेदिका रेणूका देशकर यांनी सलील कुलकर्णीमधील दिग्दर्शक,संगीतकार,लेखक याचे विविध पैलू अलगद उलगडले.मानवी नाती,नात्यातील संवेदनशीलता,नात्यांची गरज,नात्यांचं हरवणं,हरवलेली नात्याची किंमत यावर सलील भरभरुन बोलला. साढे सहा वर्षाचे असतानाच सलील हे बाबांच्या प्रेमाला पोरके झाले त्यामुळे त्यांच्या नात्याची घट्ट विण ही आईसोबत राहीली आहे.बाबा प्रेमळ असतात तर आई ही कर्तबगार असते.या चित्रपटात देखील मुलगा बाबांवर अवलंबून आहे तर आई खंबीर आहे.

बाबांच्या प्रेमाला मुकल्यामुळेच सलीलच्या लेखणीतून ’दूर देशी गेला बाबा ’यासारखी गीतरचना उमटली.लहान मुलांपासून खूप काही शिकलो,अशीही प्रांजळ कबुली सलील देतो.झी-मराठी वाहीनीसाठीच्या ’मधली सुटी’च्या निर्मितीच्या वेळी लहान मुलांशी सहज गप्पा मारताना त्यांच्या मुखातून असं काही निघून जायचं ते मेंदूत ही घट्ट बसलं असे सलील म्हणाला.कोणती गोष्ट आवडत नाही,असा प्रश्‍न एकदा या मुलांना विचारला असता,आई-बाबा परस्पर निर्णय घेतात,ही गोष्ट आवडत नाही असे एका मुलाने सांगितले.त्यांना जेव्हा वाटतं त्यावेळी ‘अनिवार्यपणे’ आनंद घ्यायचा का?सुटीच्या दिवशी फिरायला जाण्याच्या बेतात,निर्णयात आम्ही लहान मुले सहभागी कुठे असतो?आम्हाला फक्त त्या ‘अनिवार्य’आनंदात सहभागी होणे एवढंच हातात असतं.

माझा स्वत:चा २१ वर्षांचा भाचा आहे तो मला सांगतो,मामा मी मोठ्यांची फक्त सुरवातीची दोनच वाक्य काळजीपूर्वक ऐकतो अन्…पुढील त्यांचं सगळं प्रवचन,आम्ही अमूक केलं,तमूक केलं,आमच्या वेळी असं होते,तसं होते…पुढील सगळी वाक्य फक्त ’ड्याऊं ड्याऊं’मेंदूत जातं,शब्द नाही जात,यामुळेच आपल्या मुलांना चांगलं-वाईट सांगताना,शिकवताना ‘सलग ’ शिकऊ नका,मध्ये-मध्ये पॉझ घेत जा,अशी मिश्‍किली सलील याने केली.

चित्रपटाविषयी बोलताना सलील याने सांगितले ,की त्यांच्या या चित्रपटात एक ही दृष्ट माणूस नाही,माझ्या कोणत्याही चित्रपटात कोणताही खलनायक,खोटारडेपणा,कुरघोडी नसते.आजकालच्या मालिकांमध्ये अगदी दूधात विष टाकून मारण्याचा प्रयत्न दाखवला जातो,एका घरी गेलो असता दार उघडल्यानंतरही त्या घरातील महिला वाहिन्यावरील मालिकामध्येच मनाने गुंतली होती,चक्क ती मालिकेतील कथानकासोबत संवाद साधत होती व स्वत:च्या घरातील दिवाणखान्यातून दिशानिर्देश देत होती,असं कर,तसं कर,ती स्वत:च त्या मालिकेतील एक पात्र झाली होती,अशी देखील घटना याप्रसंगी सलील याने विशद केली.

म्हणूनच पुढच्या पिढीला अश्‍या कुरघोड्या दाखविण्यापेक्षा ते आजोबा बघ किती चांगले आहेत,हे जग असं खूप चांगलं असतं,पुढच्या पिढीला चांगली माणसे दाखवली पाहिजे,न की लग्न झाल्याबरोबर तिजोरीच्या किल्ल्या मिळवणारी सून,असा उपरोधिक टोला ही सलील यांनी लगावला.

चित्रपटातील संगीतकार म्हणून भूमिकेविषयी विचारले असता,या चित्रपटात चार गाणी आहेत,दोन मी लिहले तर दोन संदीप खरेनी लिहली आहे,पाचवं गाणं आम्ही दोघांनी मिळून लिहलं,असं त्याने सांगितले.माझ्यातला संगीतकाराला संधी मिळावी या हेतूने गाणी रचली नसल्याचे, परखडपणे सलील याने सांगितले.चित्रपटात गाणी अशी असावी की ती ऐकताना श्रोत्यांनी व्हॉट्स ॲप उघडू नये,असे घडले तर आपण हरलो.या चित्रपटात ’भीमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारोती’या समर्थ रामदास स्वामींच्या अारतीचा उपयोग आजचे संदर्भ घेत अप्रतिम गीत समीर सामंतने लिहले असल्याचे सलील याने सांगितले.

हे गीत इतके लोकप्रिय झाले आहे की लहान-लहान मुले ही गाऊन दाखवतात.अगदी लंदन,मेलबॉर्नमधील भारतीय मुले ही ती गात असतात.या गीताची स्पेशल लाँचिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या घरी करावे,असा ही सल्ला मला गमतीने देण्यात आला.समीर सामंतने खराखरंच ‘भीमरुपी’ची फार सुंदर गीत रचना केली असल्याचे सलील याने सांगितले.मी समीर याला फक्त संदर्भ सांगितला की समर्थांच्या या आरतीमध्ये मला आजचा संदर्भ हवा आहे.त्याने लगेच ‘विश्‍वासाची संजीवनी घेऊ न दे शंका,द्वेषाची अविचाराची दहन होऊ दे लंका,ह्दयाला जोडणारा एक सेतू बांध तू’अशी शब्द रचना करुन दिली.

सायंटिफिक सभागृहातील श्रोत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सलील याने संवादिनीचे सूर साधत, हे गीत माय-बाप श्रोत्यांना गाऊन दाखवले.कवियत्री शांता शेळके या देखील नेहमी म्हणत,संतांचे काव्य याच ख-या कविता.कितीही लिहलं तरी सतांचेच अस्सल काव्य पुर्नलिखित करतोय,असं वाटतंय,असे शांता शेळके म्हणत असत.

या चित्रपटातील दूसरे गीत आहे ‘मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही’एका दृष्यात लहान मुलगा आईलाच म्हणतो,मी घर सोडून निघून जाईल,आई विचारते,कुठे?तो म्हणतो,समोरच्या पप्पूच्या बंगल्यात आणि तो खरंच पप्पूकडे निघून जातो मात्र तो आजच्या काळातील हूशार मुलगा आहे,रात्र झाली,आईशिवाय भीती वाटते पण आईलाच सांगतो,बाबा टूरवर गेले आई तुला भीती वाटेल.‘एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई,म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही’यावर आई देखील ‘बरं झालं आलास सोन्या काही खोटं नाही,कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई,मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही,कुशील नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई’असे उत्तर देते.
या चित्रपटासाठी बच्चे कंपनी कशी जुळवली,यावर बोलताना सोशल मिडीयावर जाहीरातच दिली असल्याचे सलील याने सांगितले. वेगवेगळ्या राज्यातूनही तब्बल १७०० मुले पुण्यात ऑडीशनसाठी आली.या चित्रपटात एक प्रसंग आहे की शाळेतले सर सांगतात,आपल्याला नाटकात डोळ्यातली भूक दाखवायची आहे,घरी जाऊन सराव करा.यावर एक श्रीमंत विद्यार्थी घरी जाऊन आपल्या बाबांनाच म्हणतो,तुमच्यामुळे मला ती भूमिका नाटकात मिळाली नाही कारण तुम्ही मला कधी भूक अनुभवूच दिली नाही!

याच वेळी ‘मी आहे शाम मित्र माझा राम,मी जातो शाळेमधीं राम्या करी काम’‘माझ्या घरी पाच खोल्या त्याच्या घरी एक,माझ्या घरी चित्रे, त्याच्या भिंती वरती भेग,पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो,पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो,आठवड्याला गणवेशाचे दोन मला जोड,राम्याकडे वर्षाकाठी चड्डया फक्त दोन,थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाली सात,रामू मात्र घाली काखेत दोन हात,त्याला मला दोन डोळे हात पाय कान,त्याला मला एक पोट पाठ डोके मान,तरी माझ्या ओठी कसे रोज हा सुखे,आणि त्याच्या डोळ्या मध्ये कायमचे तळे,तरी देवे पुढे मीही हात जोडे आणि तो ही हात जोडे,मी आहे शाम मित्र माझा राम’हे गीत शुभंकर कुलकर्णी याने अप्रतिमरित्या गायले असल्याचे सलील याने सांगितले.

यूट्यूबवर हे गीत ऐकण्यास उलब्ध असल्याचे देखील ते म्हणाले मात्र हा बालचित्रपट नसून मोठ्यांनी बघण्यासाठी व शिकण्यासाठी असल्याची पुश्‍ती त्याने जोडली.या चित्रपटाच्या कास्टींगसाठी माझी एकच अट होती,चित्रपटात मला सुमीत राघवन या बाबासाठी त्याच्याच सारखा दिसणारा बाल कलाकार हवा होता.१७०० मुले रांगेत होती मात्र मला अखेर चाळीसगावातील मुलगा सापडला.तो बालनाट्य कलाकार नव्हता,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती त्यामुळेच मी त्याच्याकडून सहज अभियनय करुन घेऊ शकलो,असेही सलील याने सांगितले.

डोळ्यात भूक दाखवणारा मुलगा मला पुण्यात रेणू गावस्कर यांच्या आश्रमातील सापडला.त्याने अप्रतिम काम केले.त्याचा सहज,सुंदर अभिनय पाहून,चित्रपटात आजोबा व आजीची भूमिका करणारे डॉ.मोहन अगाशे व सुहास जोशी मलाच चित्रकरणाच्या वेळी विचारायची,कुठून आणलीस ही मुले!या मुलांच्या आयुष्यातून मला माझा शाळेत जगलेला एक-एक क्षण आठवतो,असेही सलील याने सांगितले.

हा चित्रपट म्हणजे नात्यांवर प्रकाश टाकत अलगद धागे विणणारा चित्रपट आहे.हा चित्रपट बघून तुम्हाला खूप काही गवसणार असल्याचे तो म्हणाला.

दिग्दर्शक म्हणून भूमिकेविषयी विचारले असता,मी माझा मुद्दा सोडत नाही मात्र सांगण्याची पद्धत जरा वेगळी असल्याचे सलील याने सांगितले.चिडल्यामुळे वातावरण खराब होतं,तेच वेगळ्या पद्धतीने सांगितल्यास समोरच्यांना पटतं.लोणावळ्याला मी या चित्रपटापूर्वी तीन दिवसीय वर्कशॉप घेतली.पालकांना वाटलं आता पहाटेच मुलांना उठवलं जाईल पण,सुमीत राघवन तसेच इतर कलाकारांसोबत लहान मुलांना ओळखीतून आपलेपणा वाटायला हवा,चित्रिकरण करताना मुलांना ते कलावंत अनोळखी वाटायला नको म्हणून आधीच त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं मी निर्माण केलं.

मुलांना मजेची भाषा कळते,कोणत्या दृष्यात चेह-याचे कसे हावभाव पाहिजे हे मी त्यांना ‘सेक्शन वन,सेक्शन टू’अशा रितीने शिकवले.सेक्शन वन मध्ये चेह-यावर हास्य पाहिजे,सेक्शन टू मध्ये डोळे उतरले पाहिजे,ही भाषा मुलांना पटकन कळत होती व ते तसाच अभिनय करायचे.एका मुलाने विचारले ’विश्‍वास’म्हणजे काय?झाडावर चढल्यानंतर खाली उडी मारतोस तेव्हा खाली बाबा झेलणारच,हा जो विश्‍वास असतो त्यालाच विश्‍वास म्हणतात,असे मुलांना शिकवले.

सलील याच्यातील संवेदशनशील मनाचे उदाहरण विचारले असता,चाळीसगाव मधील ज्या मुलाने चित्रपटात शुटींग केले त्याचे आई,वडील व आजी तिघेही डॉक्टर आहेत.शुटींगच्या वेळी आजीच मुलाला घेऊन येत असे.शुटींग संपली मात्र करोना सुरु झाला.आजी खूप आजारी पडली पण तिला हा नातवाचा चित्रपट बघायचा होता,मुलाच्या डॉक्टर आई-बाबांनी मला तशी विनंती केली.इंटरनेटवर चित्रपट पाठवंण खूप जोखिमेचं होतं.दाेन दिवस विचारातच गेले मात्र,मनाने कौल दिला,इतक्या संवेदनशीलतेने चित्रपट बनवला,आता आजीला तो न पाठवून असंवेदनशील होता येणार नाही,त्या डॉक्टर दाम्प्त्यांना सांगितले,चित्रपट बघून डिलीट करा,आजीने तो चित्रपट बघितला आणि अंथरुणावरुनच आडवी पडली असताना,खूप छान चित्रपट बनवला,माझ्या नातवाचा चित्रपट आहे म्हणून सांगत नाही तर डॉक्टर म्हणून सांगते,खूप छान चित्रपट बनवला,अशी दाद दिली.यानंतर खरोखरंच आठ दिवसांनी त्या आजी देवाघरी गेल्या!मात्र मला समाधान हेच आहे,या चित्रपटाला त्यांचे आर्शिवाद लाभले.

प्रतिष्ठित अश्‍या पुणे फिल्म फेस्टीवलमध्येही या चित्रपटाला सगळ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली.एक मुलगा मात्र फोनवर बाेलत बसला होता.सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले.३० सेकेंदानंतर त्याने फोन ठेवला आणि म्हणाला,हा चित्रपट बघून मला माझ्या आई-बाबांचा आवाज एकदा तरी ऐकण्याशिवाय राहावले नाही!
नाती ही अशीच असतात.त्यांना मनापासून जपलेच पाहिजे.आजी काय असते,ती आहे तोपर्यंत कळत नाही,ती आहे तोपर्यंत नातवंडांनी तिच्याकडून गोष्टी ऐकून घ्यावात,असा भावनिक सल्ला देत,माणूस नसतो तेव्हा काय,किती किंमत मोजावी लागते,याची जाणीव होते.

मला मुंबईत सांगतात,नागपूरला का जातो आहेस?तिथे मराठी चित्रपट चालत नाहीत मात्र मला कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही शहरे खूप आवडतात.मला या शहरांमध्ये भरभरुन प्रेम मिळतं.गेल्या सतरा वर्षांपासून मी या शहरात येतोय मला दरवेळी कांकणभर जास्तच प्रेम मिळतं.या चित्रपटाचे काही विशेष शो,पालकांनी व मुलांनी एकत्रित बसून बघावे,यासाठी नागपूरकरांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन देखील सलील याने केले.हा चित्रपट यशस्वी करा,असं नको व्हायला की माझ्यासारख्या दिग्दर्शकाला ’प्रेम कथा‘करायला होती,असा विचार करण्याची वेळ आणू नका.

या चित्रपटातील गाजलेल्या अंगाई गीताबाबत बोलताना सलील याने सांगितले की शंकर महादेवन व माझी
ईच्छा होती या चित्रपटातील अंगाई सुनिधी चौहानने गावी.तिला याबाबत विचारले असता तिने कधीही अंगाई गायली नव्हती मात्र दोन वर्षांपूर्वी जेव्हा तिच्या आवाजात ही अंगाई रेकॉर्ड झाली तेव्हा तिचा मुलगा अडीच वर्षांचा होता. आता तो साढे चार वर्षांचा झाला आहे तरी कितीही हिंदी गाणी ऐकली तरी ही अंगाई ऐकूनच तो झोपतो,अशी आठवण स्वत: सुनिधीनेच मुंबईत एका शो मध्ये सांगितली असल्याचे सलील म्हणाला.यावेळी त्यांनी संवादिनीवर अंगाई सादर केली.

याप्रसंगी बोलताना ओमेगाचे संचालक डॉ.चैतन्य शेंबेकर यांनी मेगाची सुरवात,वैशिष्ठे,भावी वाटचाल विशद केली.ओमेगाला लाभलेले हे यश सहकारी डॉक्टर्स,स्टाफ,आई-वडीलांचा आर्शिवाद व ईश्‍वराची कृपा यातून लाभले असल्याचे ते म्हणाले.येत्या गुढीपाडव्याला ओमेगाच्या शंभर बेड्सच्या चौथ्या रुग्णालयाचे उदघाटन ‘ओमेगा २.० चे’ उद् घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

(छायाचित्र:डॉ.चैतन्य शेंबेकर व डॉ.मनीषा शेंबेकर)

याप्रसंगी सायंटिफिक सभागृह रसिक श्रोत्यांनी भरगच्च भरले असून शहरातील अनेक प्रतिष्ठित डॉक्टर्सनी या कार्यक्रमाला वर्णी लावली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या