Advertisements

खासगी बस धोरण
उच्च न्यायालयाची राज्याचे मुख्य सचिव,गृह सचिव,वाहतूक आयुक्त,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,शहर व ग्रामीण वाहतूक पोलिस उप आयुक्तांना नोटीस
परवाच उत्तर दाखल करण्याचे निर्देश
नागपूर,ता.२० ऑगस्ट २०२५: शहरात खासगी ट्रॅव्हल्ससाठी कोणतेही अधिकृत थांबे नाहीत ,पिकअप व ड्रॉपसाठी निर्धारित जागा नसल्याने तसेच या खासगी ट्रॅव्लसचे टर्निंग रेडियस मोठे असल्याने वळणांवर अपघात होण्याची शक्यता ,शिवाय खासगी ट्रॅव्हल्समुळे होणा-या वाहतूक कोंडी विरुद्ध अनेक लोकप्रतिनिधी,सामान्य नागरिक यांच्या तक्रारी वाहतूक कार्यालयाला प्राप्त झाल्याच्या सबबीखाली, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी १२ ऑगस्ट रोजी परिपत्रक प्रसिद्ध करुन खासगी बसेसला स्थलांतरित करुन शहरा बाहेर थांबा देण्याचा निर्णय घेतला.इतकंच नव्हे तर आज बुधवार पासून पाच वर्गीकृत खासगी बसेस सोडून इतर बसेसवर कारवाईचा बडगा देखील उभारण्यात आला मात्र,उच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीत पोलिस आयुक्तांचा हा आदेशच अवैध असल्याचे समोर आले. पोलिस आयुक्तांना अश्या स्वरुपाची कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले.
शहरातील इन रिंगरोडच्या आत खासगी बसेसच्या थांब्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.बसेस चालकांनी २० ऑगस्टपूर्वी इनर रिंगरोडच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करावी,अन्यथा कारवाई केली जाईल,असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला होता.
न्यायमूर्ती अनिल किलोर व न्या.अजित कडेठाणकर यांनी या कृतीला अवैध करार देत राज्याचे मुख्य सचिव,गृह सचिव,वाहतूक आयुक्त,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,शहर व ग्रामीण वाहतूक पोलिस उप आयुक्तांना नोटीस जारी केली व परवा शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी पुन्हा या प्रकरणावर सुनावणी ठेवली.केवळ दाेन दिवसात सबंधित अधिका-यांना यावर आपले उत्तर सादर करायचे आहे.
महत्वाचे म्हणजे याचिकाकर्ता ओम गुप्ता यांच्यातर्फे बाजू मांडताना ॲड.तुषार मंडलेकर यांनी २ जुलै २०१५ रोजी राज्य सरकारच्याच आदेशाची प्रत न्यायालयात सादर केली ज्यामध्ये ऑल इंडिया परमिट परवाना असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.याशिवाय महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक(डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस)यांनी देखील ऑल इंडिया परवाना धारक खासगी बसेसवर कारवाई न करण्याचे आदेश दिले होत.स्टेट ट्रांसपोर्ट ऑफ अथॉरिटीचे पोलिस महासंचालक व विभागीय आयुक्त दोघेही सदस्य असतात.त्यांचे हे आदेश संपूर्ण राज्याला लागू होतात.
मात्र,नागपूरचे पोलिस आयुक्त यांनी त्यांच्या या आदेशाला अव्हेरुन अचानक १२ ऑगस्ट २०२५ रोजी शहरातील खासगी बसेससंबंधी सरळ कारवाईचेच परिपत्रक जारी केले.यात ही त्यांनी खासगी बसेस मध्ये वर्गवारी निश्चित करुन, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या खासगी बसेस,शहर वाहतूकीची आपली बस,एस.टी,धार्मिक स्थळ (देवदर्शन) परिवहन करणा-या खासगी बसेस,बुटीबोरी इत्यादीसारख्या ठिकाणी अधिकारी-कर्मचा-यांची वाहतूक करणा-या खासगी बसेस यांना कारवाईतून वगळले.यामुळे ९० टक्के बसेस यांची या जाचक नियमापासून सुटका झाली.परिणामी,१० टक्के(१६०९) खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई व फौजदारी शिक्षेची टांगती तलवार धरण्यात आली.हे संविधानाच्या आर्टिकल १४ चे सर्रास उल्लंघन आहे,असा युक्तिवाद ॲड.मंडलेकर यांनी केला.
मोटर एक्टच्या कलम ११५ अन्वये खासगी बसेसचे थांबे हे शहरा बाहेर असावे.पुण्यासारख्या प्रगत शहरात खासगी बसेससाठी शहरा बाहेरच थांबे महाराष्ट्र मोटर व्हिकल एक्ट १९८९ अन्वये निर्धारित करण्यात आले आहे.पुण्यातील टॅक्सी संघटनेने खासगी ट्रॅव्हलर्सविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती.त्या खटल्यात पुणे महानगरपालिकेने खासगी बसेससाठी शहरा बाहेर थांबे निर्धारित केले आहेत.मात्र,नागपूर शहरात खासगी बस संघटनांनी वारंवार मागणी करुन देखील गेल्या दोन दशकांपासून नागपूर महानगरपालिकेने व वाहतूक विभागाने खासगी बसेससाठी शहरा बाहेर थांबे निर्धारित केले नाहीत.उलट,पोलिस आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात नसतानाही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.
शहरातील खासगी बस थांबा याविषयीची २००८ व २०२१ साली बस टर्मिनल बनवण्यासाठी संबंधित विभागांना पत्र देण्यात होते.मात्र,यावर कोणतीही कारवाई झाली नाही.वरिष्ठ पत्रकार मनीष सोनी यांनी २००८ साली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खासगी ट्रॅव्हर्ल्स टर्मिनलसाठी जनहित (५७/१०) याचिका दाखल केली होती.या प्रकरणाच्या सुनावणीत नागपूर खंडपीठाने राज्याचे तत्कालीन मुख्य सचिवांना न्यायालयात पाचारण केले होते.यानंतर खासगी बसेसच्या थांब्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीत विभागीय आयुक्तांसह,जिल्हाधिकारी यांचा देखील समावेश होता मात्र,सतरा वर्षांचा काळखंड उलटला तरी समितीने नागपूर शहरातील खासगी बस थांब्यासाठी कोणतीही पावले उचलली नाही.माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देखील खासगी बस थांब्याचे धोरण ठरविण्याची जवाबदारी मनपा आयुक्तांवर निश्चित केली होती.पोलिस आयुक्तांना या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार नाही,असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील ॲड.तुषार मंडलेकर यांनी आज सुनावणी दरम्यान केला.
पुण्यातील टॅक्सी संघटनेच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हे ठलकपणे विशद केले होते,की शहरातील खासगी बस थांबे याविषयी महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील.याशिवाय म्यूनसिपल कॉरर्पोरेशन एक्टमध्ये देखील या विषयी स्पष्ट उल्लेख आहे.तरी देखील नागपूर पोलिस आयुक्तांनी खासगी बसेस चालकांवर थेट कारवाईचे आदेश देणे हा फौजदारी गुन्हा असून पोलिस आयुक्त खासगी बसेस जप्त करु शकत नाही ,बस चालकांवर गुन्हा दाखल करु शकत नाही किंवा दंड देखील आकारु शकत नसल्याचा युक्तिवाद ॲड.मंडलेकर यांनी केला.
यावर,आज उच्च न्यायालयाने परवाच या प्रकरणावर सुनावणी ठेवीत संबंधित अधिका-यांना नोटीस जारी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज एकूण १२ खासगी बसेस चालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३,२८५ अन्वये कारवाई करण्यात आली तर महाराष्ट्र व्हीकल एक्ट अंतर्गत १५ खासगी बसेस चालकांवर अनाधिकृत पार्किंगसाठी कारवाई करण्यात आली आहे.
पालकमंत्री बावणकुळेंच्या आदेशाचीही अवहेलना-बाबा डवरे
आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन खासगी बस संघटनेच्या सदस्यांनी पोलिस आयुक्तांच्या थेट कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत,परवा पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी पोलिस आयुक्त व मनपा आयुक्तांना पर्यायी थांबे उपलब्ध करुन देण्याची सूचना केली होती,तोपर्यंत कोणतीही कारवाई करु नये,असे आदेश दिले असताना,पोलिस आयुक्तांनी आजपासून कारवाईचा धडाका लावला असल्याने,पोलिस आयुक्त पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशाची देखील अवहेलना करीत असल्याचा आरोप संघटनेचे सचिव संजय माेहता यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून नव्हे तर दोन दशकांपासून आम्ही संबंधित प्रशासनाला शहरात अधिकृत बस थांब्यासाठी वारंवार निवेदन दिले मात्र,कोणतीही अधिकृत तसेच पर्यायी थांबे न देता थेट कारवाई केली जात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाबा डवरे यांनी सांगितले.ज्यांच्यावर कायद्याने जवाबदारी निश्चित केली आहे त्या नागपूर महानगरपालिकेने कायम आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले,कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप महेंद्र मुळे यांनी केला.पोलिस आयुक्तांच्या या तुघलकी कारवाईमुळे दररोज या शहराबाहेर येणे-जाणे करणारे पंचवीस-पंचवीस हजार प्रवासी अडचणीत आले आहे तर पाच हजार बसेस मालक व चालकांची आर्थिक कोंडी झाली असल्याचे ते म्हणाले.
शंभर टक्के पैकी फक्त पाच टक्के बस मालकांकडे चार ते पाच खासगी बसेस आहे,९५ टक्के मालकांकडे फक्त एक खासगी बस असून त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांसमोर भयंकर आर्थिक अडचण निर्माण झाली असल्याचे महेंद्र घुले म्हणाले.पिकअप व ड्रॉप थांबे न देता आमच्यावर थेट कारवाई करणे अनैतिक व बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेच्या सदस्यांनी केला.मायबाप सरकारने या तुघलकी कारवाईतून मार्ग काढून देण्याची मागणी निखाडे ट्रॅव्हल्सचे मालक देवाबाबू निखाडे यांनी या प्रसंगी केली.
……………………………..
तळटिप:-
शहराबाहेर खासगी बसेसला थांबे दिल्यानंतर शहरात येण्यासाठी महानगरपालिकेने पर्यायी वाहतूकीची व्यवस्था करने अत्यंत गरजेचे अाहे,परवा पार पडलेल्या बैठकीत तश्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळेंनी मनपा अायुक्तांना दिल्या मात्र,शहरात ‘आपली बस’च्या माध्यमातून सार्वजनिक परिवहनाची जी दूर्दशा सामान्य प्रवासी भोगत आहेत ते बघता,रात्री-अपरात्री शहरा बाहेरुन प्रवाश्यांना उत्तम परिवहनाची सोय उपलब्ध करुन देणे मनपा आयुक्तांसाठी दुरापस्तच आहे परिणामी,खासगी टॅक्सी,ऑटो व कॅब चालकांच्या मनमानी लृटीला सामान्य प्रवाशांना सामोरे जावे लागेल,त्यामुळेच सर्वसामान्य जनतेशी निगडीत कोणतेही ‘सरकारी’ किंवा ‘नोकरशाही’धोरण राबविताना जनतेची सुविधा याकडे दूर्लक्ष होता कामा नये)
Advertisements

Advertisements

Advertisements
