(वलेंटाईन डे स्पेशल(भाग-७)
नागपूर,ता.१३ फेब्रुवरी २०२६: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सिनेमांची जितकी चर्चा होते,तितकीच चर्चा त्यांच्या अयुष्याचीही झाली आहे.गेल्या अनेक दशकांपासून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अशोक सराफ यांना एक खूप गहिरं नातं असणारा भूतकाळ देखील आहे,हे नवीन पिढीला माहती असणं शक्यच नाही.प्रेम म्हणजे फक्त ‘मिळवणं’नाही तर प्रेम म्हणजे सर्वस्व ‘गमावणं’आणि त्यानंतर ‘सावरणं‘ देखील असतं हे जगभर प्रेम दिवस साजरा करणा-या नवीन पिढीने अशोक सराफ आणि सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना यांच्या आयुष्याकडून शिकण्यासारखं आहे.
अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही मराठी चित्रपटसृष्टितील ७०-८० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि सुपरहीट जोडी होती.‘गोंधळात गोंधळ’पासून सुरु झालेला प्रवास ’बिनकामाचा नवरा’अशा अनेक चित्रपटांतून गाजला.उत्कृष्ट अभिनयाने या जोडीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले होते.
तब्बल सहा दशकांहून अधिक काळ मराठी रसिक-प्रेक्षकांना खळखळून हसवणारं मराठमोळं व्यक्तिमत्व म्हणजे,अशोक सराफ.अशोक सराफ याचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला.अशोक सराफचे कुटूंब कलाविश्वाशी जोडलेले होते.काही दिवसांपूर्वीच अशोक सराफ यांना भारत सरकारच्या ‘पद्श्री’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं,तर,महाराष्ट्र सरकारकडूनही प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार अशोक सराफांना प्रदान करण्यात आला.
मराठी सिनेसृष्टितील दिग्गज अभिनेते व हास्यसम्राट अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.अशोक सराफ यांनी अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत काम केलं.८० च्या दशकात अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही सुपरहिट जोडी म्हणजे मायबाप सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करीत होती.या दोघांमध्येही ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी जबरदस्त होती तितकीच ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही चांगली जमली होती.
रंजना देशमुख या त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी आणि उत्कृष्ट विनोदी टायमिंगसाठी ओळखल्या जात होत्या.मराठी सिनेजगतात रंजना यांनी विनोदी भूमिकांमधूनही स्वत:ची एक वेगळी छाप पाडली होती.अनेक सुप्रसिद्ध अभिनेते सांगतात,अभिनयात सर्वात कठीण काही जर असेल तर तो विनोदी अभिनय आहे आणि तो खूप ‘आतूनच’ यावा लागातो,अशोक सराफ आणि रंजना या दोन्ही महान कलाकारांना ही प्रतिभा उपजतच मिळाली होती.
८० च्या दशकात सुपरस्टार अशोक सराफ यांच्या सिनेमांची प्रचंड क्रेझ होती,तेव्हा त्यांना टक्कर देणारं एकच नाव होतं,ते म्हणजे रंजना देशमुख.अभिनेत्री रंजना हिच्या अभिनयानं,तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.त्यावेळी त्यांचं स्टारडम चर्चेत असायचं.अभिनेत्यांना टक्कर देणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं.फक्त गंभीर नव्हे तर विनोदी चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.रंजनाच्या रक्तातच अभिनय होता.ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या त्या कन्या होत्या.तर,प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम या रंजनाच्या मावशी होत्या तर भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांची ती नात होती.
साधं भोळं रुप,गोरा रंग,डौलदार बांधा,गोरापान रंग,धारदार नाक,गालावर असलेला मोहक तिळ आणि नजरेतील तीक्ष्णता,या निसर्गाकडून लाभलेल्या अप्रतिम सौंदर्याची देवी म्हणजे रंजना.वडीलांचे नाव गोवर्धन असून ते सुद्धा रंगमंच कलावंत होते.गुजराती रंगमंचावर ‘बालगंधर्व’ अशी त्यांची विशेष ओळख होती.तिची आई वत्सला यासुद्धा कलाकार होत्या.‘पिंजरा’या चित्रपटात वत्सला यांनी संध्या यांच्या मोठ्या बहीणीची भूमिका साकारली होती.आई-वडीलांचा घटस्फोट झाल्यानंतर रंजना व तिची भावंडे आपल्या मावशीकडे म्हणजे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्याकडे राहत होती.संध्या त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टितील एक नामांकित अभिनेत्री होत्या.‘हरिशचंद्र तारामती’या चित्रपटात रंजनाने वयाच्या पाचव्या वर्षी बाल कलाकार म्हणून भूमिका साकारली. यानंतर रंजनाने हिंदी चित्रपट ‘लडकी सह्याद्री की ‘मध्ये ही बाल कलाकार म्हणून काम केलं.
असं असलं तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ असं कधीच वाटलं नाही पण व्ही.शांताराम यांनी १९७५ मध्ये रंजनाला ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’मध्ये संधी दिली.या चित्रपटात रंजनाच्या छोट्या पण जबरदस्त भूमिकेमुळे व्ही.शांताराम यांनी रंजनाला ’झूंज’मध्ये नायिकेची भूमिका दिली.या चित्रपटात तिने ग्रामीण शाळेतील शिक्षिकेची भूमिका दमदारपणे साकारली.
यानंतर ३१ डिसेंबर १९७६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘असला नवरा नको गं बाई’या चित्रपटात एका खेडवट माणसाची भूमिका साकारणा-या राजा गोसावी सोबत तिची भूमिका प्रचंड गाजली.मात्र,‘चानी’मुळे रंजनाच्या चित्रपट कारर्कीदीला जबरदस्त कलाटणी मिळाली.एका कांदबरीवर आधारित या चित्रपटात चानीची व्यक्तिरेखा रंजना हिने तंतोतंत साकारली.मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तत्कालीन समाजाकडून नाकारली गेलेली स्त्री, रंजना हिने हूबेहूब अभिनित केली.शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भूमिकांमध्ये रंजना चपखल बसायची.तिच्यासारखी मराठी सिनेसृष्टीत वर्सेटाईल अभिनेत्री दुसरी नव्हती.
तिच्या अभिनयाचा खरा कस लागला असेल तर तो ‘अरे संसार संसार’चित्रपटातील भूमिका साकारताना.कुलदिप पवार या अभिनेत्यासोबत या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधक होती.नववधू म्हणून घरात आलेली, शेतकरी नव-या बरोेबर हलाकीचे जीवनही आनंदाने स्वीकारणारी गृहीणी,नव-याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिंमतीने उभी राहणारी आई आणि वृद्ध झाल्यावर,घरात सूना आल्यानंतर सुद्धा घराचे अंभगत्व टिकविण्यासाठी धडपडणारी सासू असा वयोपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास या एकाच चित्रपटात साकारणा-या रंजनाच्या उत्कृष्ट अभिनयाची दखल महाराष्ट्र शासनाला देखील घ्यावी लागली व तिला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करावा लागला. १९८३ साली हाच पुरस्कार रंजनाला ‘गुपचुप गुपचुप’चित्रपटासाठी मिळाला.सुशीला,गोंधळात गोंधळ,मुंबईचा फौजदार,जखमी वाघीण,भुजंग,एक डाव भूताचा, हे तिचे आणखी काही उल्लेखनीय व उत्कृष्ट चित्रपट आहेत.
अशोक सराफसोबत रंजनाचे सुशीला,गोधंळात गोंधळ,गुपचुप गुपचुप,बहूरुपी,बिन कामाचा नवरा,खिचडी,एक डाव भूताचा हे चित्रपट विशेष गाजले.या काळात मराठी सिनेरसिकांना ‘अशोक-रंजना’या नावाची भूरळ पडली होती..त्यांच्यात ऑन स्क्रीन केमेस्ट्रीसोबत ऑफ स्क्रीन केमेस्ट्री देखील खूप चांगली जुळली.या दोघांनीही गुपचुप साखरपुडा केल्याचेही बोलल्या जातं.पण या चर्चा शेवटपर्यंत चर्चाच राहील्या.पण या गोल्डन जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मराठी सिने रसिकांना लाभले नाही.याला निमित्त ठरला रंजनाचा जीवघेणा अपघात….!
रंजनाचं फिल्मी करिअर छान सुरु होतं,वैयक्तिक आयुष्याबद्दलही तिने अनेक स्वप्ने रंगवली होती,पण नियतीने वेगळाच डाव आखला होता…!१९८७ मध्ये व्ही.शांताराम यांच्या ‘झूंजार’चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं.या सिनेमाच्या शुटिंगसाठी रंजना बंगलोरला निघाल्या होत्या पण,..वाटेतच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला..!
ती वाचली..पण…या अपघातात तिचे दोन्ही पाय निकामी झाले होते..तर डाव्या हाताला देखील जबर मार बसला होता.ही घटना घडली तेव्हा तिचं वय फक्त ३२ वर्षे होतं.ऐन तारुण्यात ही महान अभिनेत्री व्हीलचेअरवर आली…!बेडवर…व्हीलचेअरवर तिने अनेक वर्षे काढली.निर्माते तिची बरी होण्याची वाट पाहत राहिले,पण…काळ हा कोणासाठीही थांबत नसतो…ना सुखांसाठी…ना दु:खासाठी…!
या भीषण अपघातानंतर रंजनाचं संपूर्ण फिल्मी करिअर उधवस्त झालं.त्याहून अधिक उधवस्त झालं तिचं आयुष्य,,जगणं…!कारण अपघाताच्या आधीच्या काही दिवसांपूर्वी रंजना हिच्या लग्नाची चर्चा सुरु होती.अभिनेते अशोक सराफ व तिच्या नात्याविषयी तर संपूर्ण मराठी सिनेजगत बोलतंच होता.रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात असून लवकरच दोघेही लग्न करणार असल्याचं भाकीत सगळेच वर्तवित होते.त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची सर्वांनाच खात्री होती.पण…या अपघातानंतर या नात्याचाही करुण अंत झाला…! रंजनाच्या अपघातामुळे दोन तरुण जीवांमध्ये फूललेलं,बहरलेलं प्रेमाचं एक सुंदर नातं संपुष्टात आलं…!
ती …अमावस्येची काळ रात्र होती ज्या रात्रीने रंजनाचे अवघे आयुष्य बदलून टाकले.रंजनाच्या आईला तिच्या रात्रीच्या प्रवासाबद्दल आधीच काळजी वाटत होती.रंजना आज अमावस्या आहे,उद्या निघालीस तर चालणार नाही का?असंही त्या म्हणाल्या,पण रंजनाचा स्वभावच मुळी ठाम होता.आई,शूटिंगचं शेड्यूल आधीच ठरलं आहे,मी नाही गेली तर निर्मात्याचं खुप नुकसान होईल आणि माझ्या न जाण्यानं किती तरी लोकांना काम थांबवावं लागेल,काम महत्वाचं आहे,असं म्हणत रंजना तडक बॅग घेऊन घरा बाहेर पडली.तिने आईला मिठी मारली अन् निघाली.पण त्या रात्री रंजनाच्या आईचं मन खूप अस्वस्थ होतं.काहीही करुन त्यांना चैन पडत नव्हतं.
रंजना नेहमीच्या कारमधून शूटिंगला निघाली,गाडी वेगाने अंधारल्या रस्त्यावरुन धावत होती.काही वेळानं चहापानासाठी गाडी थांबली व सकाळी शूटिंग स्थळी पोहोचण्यासाठी लगबगीनं पुन्हा रस्त्यावर धावू लागली.रात्र आणखी गडद झाली होती आणि अमावस्येचा काळोख सर्वत्र व्यापून होता.जाणा-या -येणा-या गाड्या गंतव्यस्थळी पोहोचण्यासाठी भरधाव धावत होत्या.अचानक एका समोरुन येणा-या गाडीचा तीव्र प्रकाश ड्रायव्हरच्या डोळ्यांवर पडला.त्याचा स्टेअरिंंगवरील ताबा सुटला,त्याने पूर्ण शक्तीनिशी अपघात रोखण्याची स्टेअरिंग फिरवलं.पण काही काळाच्या आत एक भयानक अपघात घडला.गाडी गंटागळ्या खात एका शेतात कोसळली आणि रंजना या गाडीच्या बाहेर शेतात फेकल्या गेली ….गाडीचा चेंदामेंदा झाला होता,रंजनाच्या शरिरातून रक्तस्त्राव होत होता….!
वेदनेनी भरलेली ती रात्र खूप भयंकर होती.काही वेळाने रंजनाला शुद्ध आली तेव्हा तिला शरिरात प्रचंड वेदना जाणवत होत्या. शरीर काम करत नव्हतं.. चेह-यावर ओलसर काही तरी ओघळत होतं आणि हाताने पुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जाणवलं की तिचा हातच हलवता येत नाही.ती अंधारात कण्हत पडली होती.तिला फक्त इतकंच कळत होतं की तिच्यासोबत काही तरी खूप वाईट घडलं आहे.रक्तस्त्रावामुळे तिची शक्ती कमी होत होती आणि तिला प्रचंड तहान लागली होती.ती पाणी,पाणी म्हणत होती.पण मानवी वस्ती पासून खूप लांब त्या ठिकाणी मदतीसाठी काेणीही धावत येण्याची सूतरामही शक्यता नव्हती.मात्र,अचानक चमत्कार घडला,अचानक कोणत्या तरी महिलेने तिच्या तोंडात पाणी टाकलं…!
तिच्या तहानेची तडफड थांबली.त्या महिलेने तिचा निखळलेेला हात तिच्या पदराने बांधला.तिच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि तिचं रक्त पुसलं. तिने रंजनाचं डोकं मांडीवर घेतलं व सांगितलं,’लवकरच तुला मदत मिळेल.अजून तुला जगायचं आहे,ही तुझी वेळ नाही’..अर्धवट शुद्धीवर असलेल्या रंजनाच्या कानावर शब्द घूमत होते.त्या मंद प्रकाशात रंजनाला इतकंच कळलं की ती एक वृद्ध स्त्री होती.त्या वृद्ध स्त्रीने रंजनाला खेचत आणत रस्त्याच्या कडेला आणलं आणि तिथंच झोपवलं. दुस-या दिवशी सकाळी रंजनाला मदत मिळाली पण,तोपर्यंत दूर्देवाने रंजनाचं कंबरेखालचं शरीर पूर्णपणे निकामी झालं होतं.तिचा एक हात जो त्या वृद्धं स्त्रीने बांधला होता तो शस्त्रक्रियेनंतर सांधण्यात आला…!
डॉक्टरांनी सांगितले की जर त्या वृद्ध स्त्रीनं रंजनाला मदत केली नसती तर प्रचंड रक्तस्त्रावामुळं तिचं वाचणं अशक्य होतं.पण,ती वृद्ध स्त्री होती तरी कोण,ज्या शेतात रंजना पडली होती त्या ठिकाणापासून कोसो दूर कोणतीही मानवी वस्ती नव्हती.त्या अमावस्येच्या काळ रात्री ती वृद्ध स्त्री अचानक आली तरी कूठून?मदत केल्यानंतर ती गेली तरी कुठं?रंजना यांनी अनेकदा ही गोष्ट सांगितली.तिचा या चमत्कारिक अनुभवावर पूर्ण विश्वास होता,रंजना सांगायची ती स्त्री माझ्यासाठी ‘देवदूत’होती.
अनेक जण ही घटना रंजक करण्यासाठी ती वृद्ध स्त्री पांढरे रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याचे सांगतात पण ती स्त्री कोण होती,कुठून आली होती हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलं नाही.तर अनेक लोकं रंजनाने स्वत: काही फूटांवर तुटलेला हात सरपटत जाऊन पदराशी बांधला,असेही सांगतात.रंजनाचा जीव वाचला पण वयाच्या अवघ्या ३२ सा व्या वर्षी रंजनाला तिच्या मृत्यूपर्यंत व्हीलचेअरवर आयुष्यं कंठावं लागलं.मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याला वाटत होतं की रंजनाने त्यांच्या चित्रपटात असावं,त्या अभिनेत्रीच्या जीवनात अशी वेळ यावी,नशीबाचं हे क्रोर्य शब्दात पकडण्यासाठीही शब्दकोषात शब्द सापडत नाहीत…!
अपघातानंतर तिच्या अनेक सहका-यांनी तिची साथ सोडली.फक्त कुटूंब आणि मोजकी जवळची मित्र मंडळी तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहीले.पण रंजनाने कधीही हार मानली नाही.आत्महत्येचा विचार तिला सोपा वाटला असता पण तिने स्वाभिमानाने आणि कर्मठपणे जगण्याचा मार्ग निवडला.तिने आपलं दू:खं गिळलं आणि पुन्हा ती आपल्या कलेकडे वळली.व्हीलचेअरवर असूनही ती रंगभूमीवर परतली..ती जेव्हा रंगभूमीवर आली तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभं राहून तिचं टाळ्यांच्या गजरात कडकडून स्वागत केलं.‘‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे रंजनाचे व्हीलचेअरवर बसून पुनरागमन केलेलं
नाटक मानलं जातं.
टाळ्या.. थांबतच नव्हत्या.शेवटी रंजनानेच पुढे येऊन सर्वांना बसण्यास सांगितलं.रजंनाने अपघातानंतरच्या शेवटच्या नाटकात देखील तितक्याच उत्साहाने आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मने जिंकली.तिचे हात शस्त्रक्रियेमुळे लहान मुलांसारखे बारिक झाले होते.पण तिच्या चेह-यावरील तेज आणि आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही.तिने व्हीलचेअरवर असतानाही नाटकांमध्ये काम केलं आणि आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना थक्क केलं.
रंजना हीची कहाणी केवळ एका अभिनेत्रीची नाही तर एका सशक्त मनाच्या जिद्दी स्त्रीची कहाणी आहे.तिनं आयुष्याच्या सर्वात कठीण प्रसंगातही हसत राहण्याचं धैर्य दाखवलं.त्या वृद्ध स्त्रीने त्या काळरात्री रंजनाला दिलेला ‘आधार’,रंजनाने आयुष्यभर आपल्या प्रेक्षकांना दिला.तिनं आपल्या कलेनं,सकारात्मक दृष्टिकोणानं आणि जिवनावरील विश्वासानं अनेकांना प्रेरणा दिली.
रंजना देशमुख हिचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गाथा आहे.तिने जगाला दाखवलं की कितीही संकटं आली तरी मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते.त्या काळ रात्रीच्या अपघाताने शरीर कमकुवत केलं असलं तरी तिचं मन आणि आत्मा अखेरपर्यंत सशक्त होतं.रंजना देशमुख हिची ही प्रेरणादायी कहानी मराठी चित्रपटसृष्टित कायमची अजरामर झाली आहे.ती स्वत: मराठी प्रेक्षकांच्या मनात अमर आहे.अख्खं एक दशक रंजनाने चित्रपटात आणि मराठी रसिक मनावर अधिराज्य केलं.३ मार्च २००० रोजी वयाच्या ४२ सा व्या वर्षी रंजनाचं निधन झालं.
‘फक्त एकदाच…‘मराठी नाटकातून व्हील चेअरवर असलेल्या प्रेयसीला तिचा प्रियकर सोडून जातो.अपघात व प्रेमातून झालेला भ्रम निरास..या नाटकात..तिने जणू स्वत:च्या प्रेमभंगाचीच आणि मन विषण्नं करणारी आयुष्याची कथा मांडली होती…!तिच्या चेह-याला काहीही झालं नव्हतं.तिचा चेहरा अगदी सुंदर जसाच्या तसा होता..या नाटकात स्वत:च्याच भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.त्यानंतर रंजनाच्या अभिनयाला कायमचा ब्रेक लागला.तिला शेवटच्या काळात खूप त्रास सहन करावा लागला होता.अक्षरश:पंलगावर झोपून किंवा व्हील चेअरवर बसून दिवस काढावे लागले.तिचं शरीर अपंग झालं होतं.तिच्याकडे कॉडलेस फोन होता..तो जर तिच्या हातात दिला तर तो हातातून कानाजवळ नेईपर्यंत पाच मिनिटे लागायची…!पुढे वयाच्या ४२ सा व्या वर्षी रंजनाला मुंबईतील परेल येथील घरात ह्दयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात तिचं निधन झालं.
तिच्यासारखी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टित पुन्हा जन्माला यावी अशी ईच्छाही मराठी सिनेरसिक व्यक्त करतो.रंजनासारखी अष्टपैलू अभिनेत्री व सौंदर्य परत मराठी सिनेजगताला मिळणे अशक्य आहे…!तिच्या पुण्यतिथीनिमित्त झी टॉकिजकडून दर वर्षी तिचे गाजलेले चित्रपट दाखवले जातात तर राज्य सरकारनेही तिच्या नावाने पुरस्कार सुरु केला आहे.
जर… अशोक सराफचा अपघात झाला असता तर..रंजना कधीही त्याला सोडून गेेली नसती,तिच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेक सिनेरसिक बोलून दाखवतात.ही चित्रपट नगरीच कपट कारस्थान आणि स्वार्थाने बरबटलेली असल्याचा संताप देखील व्यक्त होतो.प्रेम असो किंवा नसो एक सुंदर,संवेदनशील मैत्रीचं नातं तरी अशोक सराफला तिच्या शेवटच्या काळात तिच्यासोबत जगता आलं असतं…!अशीही अपेक्षा मोठ्या प्रमाणात सिनेरसिक व्यक्त करतात.तिच्या अपघातानंतर अशोक सराफ किती तरी वेळ रुग्णालयाच्या कॉरिडोरमध्ये तिच्या कक्षासमोर गुमसुम बसून राहत असे,पण रंजनाची आई वत्सला यांनी त्याला कधीही रंजनाला भेटू दिलं नाही उलट सतत त्याचा पाणउतारा करीत होती,असा दावा केला जातो.असं असलं तरी आयुष्य हे कोणासाठीही थांबत नसतं…अशोक सराफ याने रंजनाच्या अपघातानंतर दहा वर्षांनी १९९० मध्ये त्याच्या पेक्षा १८ वर्षे लहान मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी हिच्यासोबत प्रेम विवाह केला…!

निवेदिता जोशी ही मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहे.तिचा जन्म ११ एप्रिल १९६५ मध्ये झाला.वयाच्या दहाव्या वर्षापासून तिने बालकलाकार म्हणून मराठी रंगभूमीवर काम केलं.१९७७ साली आलेल्या ‘अपनापन‘मध्ये ज्येष्ठ चरित्र अभिनेते सुधीर दळवी यांच्यासोबत ‘आदमी मुसाफिर है ,आता है जाता है’या गाण्यामध्ये दिसलेली बाल कलकार ही निवेदिता जोशी आहे.
१९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दे दणादण’या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवले.यानंतर ‘अशी ही बनवाबनवी’,थरथराट,बाळाचे बाप ब्रम्हचारी,धुमधडाका,नवरी मिळे नव-याला’ अशा अनेक हिट चित्रपटात तिने अभिनय केला.अशोक सराफ आणि निवेदिता जोशीनी ‘नवरी मिळे नव-याला‘आणि ‘अशी ही बनवाबनवी’यासारख्या चित्रपटात सोबत काम केलं.चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे सगळं रामायण घडलं.
‘नवरी मिळे नव-याला’सचिन पिळगांवकरच्या या चित्रपटात एकत्रित काम करीत असताना अशोक सराफ व निवेदिता या दोघांमध्ये प्रेम बहरलं आणि दोघांनीही आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेतला.कधीही लग्नाचा विचार न केलेल्या अशोक सराफ, वयाचे १८ वर्षांचे अंतर मोडून लग्नवेदीवर बसला.या दोघांमधील वयाचं अंतर पहाता निवेदिताच्या घरुन या लग्नाला प्रचंड विरोध झाला.तिच्या आईला निवेदिताने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तिशी लग्न करु नये असं वाटत होतं मात्र,निवेदिता आपल्या निर्णयावर ठाम होती.निवेदिताची मोठी बहीण डॉ.मीनल परांजपे हिने अशोक सराफ याच्याशी निवेदिताचं लग्न व्हावं यासाठी पुढाकार घेतला आणि कुटूंबियांचं मन वळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
त्यानंतर गोव्यातील मंगेशीच्या देवळात जे सराफ याचे कुलदैवत आहे,तिथे या दोघांचे मंगेशीच्या साक्षीने अतिशय साध्या पद्धतीने लग्न झालं.
लग्नानंतर तब्बल १४ वर्ष निवेदिताने नाटक व सिनेमातून ब्रेक घेतला व हा वेळ आपल्या एकुलत्या एक लेकासाठी अनिकेतला सांभाळण्यासाठी घालवला.अनिकेतच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडल्यानंतर निवेदिताने पुन्हा दूसरी इनिंग सुरु केली.‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत आसावरीची भूमिका विशेष गाजली.भाग्य दिले तू मला,आई आणि बाबा रिटायर होत आहेत,तिच्या या मालिका पण खूप यशस्वी झाल्या.
अशोक सराफ याने त्याच्या ‘मी बहूरुपी’या आत्मचरित्रात त्यांच्या पहील्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.‘डार्लिंग डार्लिंग‘या नाटकादरम्यान या दोघांची पहीली भेट झाली.या नाटकात गजन जोशी म्हणजेच निवेदिताचे वडीलसुद्धा काम करीत होते.अशोक सराफ आणि गजन जोशी हे एकमेकांचे चांगले मित्र होते.या नाटकाचा प्रयोग जेव्हा शिवाजीमंदिरात झाला,तेव्हा निवेदिता तिथे आली होती.‘निवेदिता तेव्हा छोटी होतीच,पण दिसायलाही लहानखोर’,असं वर्णन अशोक सराफने केले आहे.‘ही माझी मुलगी,तुला भेटायला आलीय,’असे म्हणत गजन जोशींनी निवेदिताची अशोक सराफसोबत ओळख करुन दिली.नंतर भविष्यात हीच चिमुकली निवेदिता त्याची पत्नी बनणार यांची कल्पना तरी कोणाला येईल का?अशोक सराफचा जेव्हा ‘दोन्ही घरचा पाहूणा’चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा निवेदिता फक्त ६ वर्षांची होती.
अशोक सराफवर निवेदिताने मनापासून प्रेम केलं.निवेदिता ही एक प्रतिष्ठित आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे.गेल्या अनेक दशकांपासून निवेदिता सराफ नाटकं,मालिका व चित्रपटातून प्रेक्षकांचे भरभरुन मनाेरंजन करीत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.आता अशोक सराफने वयाची ७५ ओलांडली आहे.
अशोक सराफ याने निवेदिता सराफसोबत लग्न केलं आणि रंजनासोबतच्या नात्यातील आठवणींनाही कायमचा ब्रेक लागला.अशोक सराफ हे रंजनाच्या आयुष्यातून अपघातानंतर त्यावेळी निघून गेले असं म्हटल्या जातं…आजपर्यंत अशोक सराफने रंजनासोबतच्या आपल्या नात्याची कबुली दिली नाही…!
नुकत्याच रेडिओ सिटी मराठीला मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी दिवंगत अभिनेत्री रंजना यांचा उल्लेख केला.तसेच,तिच्यासोबतच्या पडद्यावरच्या आणि वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.या मुलाखतीत अशोक सराफने सर्वात ऑन स्क्रीन जोडी रंजनासोबत जुळली असल्याचे सांगितले.एक फाईन आर्टिसट,यात काहीच शंका नाही असे तो म्हणाला.
एका मुलाखतीत रंजना विषयी बोलताना अशोक सराफ म्हणाला. की,‘रंजना देशमुख खूप चांगली नटी होती.खूूप मेहनती होती.एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय…मी हे करुन दाखवीनच..मला हे यायलाच पाहिजे..असं तिचं असायचं..ती मला फॉलो करायची,हे तिनंच मला सांगितलं होतं..तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती,त्यामुळेच ती ते करु शकली…‘
अशोक सराफ म्हणाला की,रंजना जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीत आली तेव्हा तिनं विनोदी भूमिका केल्या नाहीत.गंभीर भूमिकांमुळं रंजनाला आघाडीची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली होती.माझ्यासोबत तिनं विनोदी भूमिका साकारल्यानंतर तिच्या विनोदी भूमिकांचही खूप कौतूक झालं.अगदी ती माझ्यापेक्षाही वरचढ ठरत होती,ती माझ्यापेक्षा सरस ठरली तरी मी तिच्यासाठी आनंदी असायचो..मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं पण ..तिच्यासारखी दूसरी नटी कोणीच नाही,तिच्यासाखी तीच’…!’
२०१२ मध्ये तळेगावजळील मुंबई-पूणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एक मोठ्या कार अपघातातून अशोक सराफ वाचले.
रंजनाच्या शेवटच्या दिवसात पत्रकार अनिता पाध्ये तिच्यासोबत संपर्कात होती.एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनिताने रंजनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.अपघातानंतरही रंजना अशोक मामांविषयी विचारत होती असे अनिताने सांगितलं…!
अशोक-रंजना-कुलदीप पवार यांच्या ’गुपचूप गुपचूप’चित्रपटातलं हे गाणं मग नकळत ओठांवर रेंगाळलं…‘पाहिले ना मी तूला तू मला ना पाहिले..न कळे कधी कुठे मन वेडे गुंतले…’
………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
