

पारसेच्या लॅपटॉपमध्ये दडली अनेक लाभार्थ्यांची नावे!
नागपूरातील युवा रंगकर्मीलाही दिले होते पाच कोटींचे प्रलोभन
लोकल चॅनलमधली ‘ती’पारसेच्या खोटारडेपणाची ठरली बळी!
नागपूर,ता. १४ ऑक्टोबर २०२२: ‘पारसे’पुराण कालपासून सर्वच माध्यमांवर ठलकपणे झळकत असून आता यात नवनवे ‘अध्याय’ही जुळत चालले आहेत.पारसेचा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केल्यानंतर त्यात पारसेद्वारा ‘लाभार्थी’असणा-यांची नावे देखील असल्याचे बोलले जात आहे.महत्वाचे म्हणजे इतर अनेकांसोबतच पारसे याने काही माध्यमकर्मींना स्वत:च्या ‘ब्रॅण्डिंगसाठी’ जो आर्थिक लाभ पोहोचवला आहे,त्यांचीही नावे समोर येतील का?असा प्रश्न आता शहरातील काही बुद्धिजीवी उघडपणे विचारत आहे.
पारसे याने स्वत:ची ‘ब्रॅण्डिंग‘करण्यासाठी मुद्रित माध्यमातील काही पत्रकारांना पंचवीस-पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ पोहोचवल्याची चर्चा आहे.त्यामुळेच अतिशय ‘पांचट’ विषयावर देखील पारसेचे ‘सुविचार’वारंवार त्या विशिष्ट लाभार्थ्यांच्या विशिष्ट मुद्रित माध्यमात झळकत होती,त्यामुळे या चर्चेतील सत्यतेला वाव मिळत असल्याचे शहरातील बुद्धिजीवी सांगत आहेत.पोलिसांनी आता लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला ‘अपवित्र’ करणा-यांचाही शोध घ्यावा व वाचकांसमोर त्यांना उघडे पाडावे,अशी मागणी केली जात आहे.
पारसे याने सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या नागपूरातील एका युवा रंगकर्मीला देखील आपल्या ‘आरस्पानी आरश्यात’उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता,इतकंच नव्हे तर त्याच्याही व्हॉट्स ॲपवर सांस्कृतिक मंत्रालयातून पाच कोटी मंजूर झाले असल्याचे सही,शिकक्यानिशी बनावट पत्र पाठविले.तत्पूर्वी त्याने या युवा रंगकर्मीला आधी पाच लाख रुपये मागितले व सांस्कृतिक मंत्रालयातून पाच कोटी रुपये मंजूर होताच त्यातील दोन कोटी रुपये देशील,असा लोभ दाखवला होता मात्र हा युवा रंगकर्मी पारसेच्या आमिषाला बळी पडला नाही.
कालपासून झाडून पुसून सर्वच मुद्रित माध्यमे ठगबाज पारसेविषयीची ‘द ग्रेट ग्लॅम्बलर’चित्रफित ठलकपणे प्रसिद्ध करीत असल्याने या युवा रंगकर्मीलाही चांगलाच धक्का बसला.
नागपूरातील लोकल चॅनलमध्ये काम करणारी युवा तरुणी पत्रकार ही देखील पारसे याच्या लखलखत्या ‘पुरुषार्थावर‘अनावधानाने भाळली व आपल्या भाळी धोकेबाजीचे लेणे गोंदवून घेतले.आज तिची मनोवस्था शब्दातीत झाली असून,‘चुकीच्या’ पुरुषावर ‘खरं’ प्रेम करण्याची शिक्षा ती भोगत आहे.पारसे याची पार्श्वभूमी व ‘मनोविकृती’बघता कदाचित तिलाही पारसे याने ब्लॅकमेल केले असावे,असा ही अंदाज आता वर्तविण्यात येत आहे.सहन ही करता येत नाही आणि सांगता ही येत नाही,अशी अवस्था या तरुणीची आता झाली आहे.
माध्यमकर्मी आणि पारसे यांचे जिव्हाळ्याचे ‘मेतकूट’इथपर्यंतच थांबत नसून एका मराठी वृत्त वाहीनीच्या माध्यमकर्मीने पारसे याची ‘पैठ ’ विदर्भातील एका माजी मंत्र्यांच्या ‘खासगी’ बैठकीपर्यंत पोहोचवल्याची देखील चर्चा आहे.या कामाचे या माध्यकर्मीने पारसे याच्याकडून घेतले ‘फक्त’दोन लाख रुपये!अशी चर्चा आता रंगली आहे.
पारसेचे बँक खाते पोलिसांनी सील केले असून तीन कारसह नऊ वाहने जप्त करण्यात आली आहे.कोटीच्या कोटी उड्डाणे घेणा-या पारसे नावाच्या या ठगबाजाकडे कोट्यावधीचे भूखंड,सदनिका,सुपर बाजारमधील गुंतवणूकीची माहिती ही समोर आली आहे.पारसेच्या संपत्तीची माहीती मिळविण्यासाठी गुन्हेशाखा पोलिस हे दुय्यम निबंधक कार्यालयाला पत्र पाठविणार असून पारसे व त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती पोलिस, निबंधक कार्यालयाला मागणार आहेत.गुन्हेशाखा पोलिसांनी गुरुवारी पारसे याच्या तीन महागड्या कार व सहा मोटारसायकली जप्त केल्या असून त्या पैकी एका दुचाकीची किंमत १७ लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांना पारसे याच्या घराच्या झडतीत सहा बँकांचे पासबुक तसेच एका बँकेत पोलिसांना लॉकर ही आढळले.ही बँक खाती व लॉकर आता सील करण्यात आली आहेत.
महाविद्यालय सुरु करण्यासाठी पारसे याने बडकस चौकातील रहीवाशी डॉक्टर राजेश मुरकुटे व त्यांच्या नातेवाईकांची साडे चार कोटींनी फसवणूक केली.याप्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्यात पारसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र पारसे याच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्याला अद्याप अटक झाली नसल्याने अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.
कोणाच्या दबावाखाली पारसे याची अटक टाळली जात आहे?यावर दबक्या आवाजात बोलले जात आहे मात्र नागपूरातील एका हेव्हीवेट राजकीय नेत्याने‘ पारसे याला पुरता सुधरु देऊ नका, अशी खातिरदारी त्याची करा’असे आदेश दिले असल्याची चर्चा आहे.या नेत्याच्या घरी पारसे ही ‘विभूती’ सतत पडली असायची,हे विशेष!यावर कहर म्हणजे पारसे या राजकीय नेत्याला ‘मामा’म्हणून संबोधित करायचा.डॉ.मुरकुटे यांनी या नेत्याची भेट घेतल्यावर संबंधित नेत्याने, पारसेविषयीचा तिटकारा व्यक्त करीत आपल्या स्वभावानुसार, पारसेला चांगलाच धडा पोलिसांनी शिकवावा,अशी सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
पारसे हा फक्त खंडणीखाेर नसून अट्टल ड्रग्स एडिक्ट असल्याची माहिती समोर आली आहे.पारसेला अम्ली पदार्थाच्या सेवनाची लत होती,असे सांगितले जात आहे.
सध्या पारसेचे प्रकरण गुन्हे शाखेचे उपायुक्त व अतिशय प्रामाणिक पोलिस अधिकारी गणल्या जाणारे, गजानन राजमाने हाताळत आहेत.राजमाने यांनीच शहरातील कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकरची गच्ची धरत भर रस्त्यात त्याला चालवत न्यायालयापर्यंत नेले होते.नागपूरच्या जनतेच्या स्मृतितून अद्याप राजमाने यांची ही मर्दुमकी पुसली गेली नाही, त्यामुळेच पारसे याच्या प्रकरणात देखील राजमाने हे प्रकरण,कोणत्याही दबावाला बळी न पडता, तडीस नेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(छायाचित्र : पारसे याने आपल्या ‘छद्ममी’ प्रतिमेचा वापर करीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाेबतची देखील छायाचित्रे सोशल मिडीयावर अशी व्हायरल केली!)
मुद्रित माध्यमांनी पारसेची प्रतिमा इतकी उजळली की त्याची पैठ केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून तर थेट राज्यपालपर्यंत खोलवर बसली.राज्यपालांच्या कार्यक्रमात तर पारसेसाठी कोणताही प्रोटोकॉल लागू नसून तो थेट राज्यपालांसोबतच वावरत असल्याचे माध्यमकर्मींनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे!
विशेष म्हणजे,शहरातील सुप्रसिद्ध होमियोपॅथी डॉक्टर मुरकुटे यांच्याशिवाय या महाभागाने इतर ७ डॉक्टरांना देखील ब्लॅकमेल करुन खंडणी उकळल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.या डॉक्टरांनी मात्र अद्याप पारसे विरुद्ध तक्रार दिलेली नाही. पारसे याच्या ‘रागी’फाऊंडेशनच्या नावाने बँकेत खाते असून यात त्यांनी डॉक्टरांना पैसे जमा करायला सांगितल्याचे बोलले जात आहे.
मूळात प्रश्न हाच उपस्थित होतो,पारसेची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता अमाप ब्रॅण्डिंग करण्याचे काम का करण्यात आले?पारसेविषयी जनतेच्या मनात का विश्वासाहार्य प्रतिमा निर्माण करण्यात आली?रामदासपेठेत आलिशान ऑफिस असणा-या एका अट्टल सट्टेबाजाचे देखील काही मुद्रित माध्यमांनी असेच ब्रॅण्डिंग केले होते.शेअर मार्केटवर त्याची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.त्याच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन मुद्रित माध्यमांवर विश्वास असणा-यांनी या सट्टेबाजाकडे कोट्यावधीची गुंतवणूक बेदरकारपणे केली कारण या भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांना त्या सट्टेबाजापेक्षा मुद्रित माध्यमांवर विश्वास होता की ते खोटेपणा करणार नाहीत!चुकीच्या माणसाला एवढे विश्वसनीय व्यासपीठ व्याख्यानासाठी देणार नाहीत!
मात्र येथेच गुंतवणूकदारांचा घात झाला.तीन वर्षे कारागृहाची हवा खाऊन नुकताच हा सट्टेबाज बाहेर आला आहे.अल्प शिक्षा भोगून तो तर बाहेर आला मात्र गुंतवणूकदारांचे बर्बादीचे अश्रू अद्यापही वाळले नाहीत.
परिणामी ‘पारसे’प्रकरणावरुन धडा घेऊन माध्यमाच्या संचालकांनी आता तरी डोळ्यात तेल घालून किमान त्यांच्या मुद्रित तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमातून ‘पेड न्यूज‘प्रसिद्ध होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे व वाचकांचा विश्वास जपावा,हीच लोकशाही मूल्याला खरे तर्पण राहील,असा सूर समाज माध्यमात उमटला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
