

‘अटॅम्प टू मर्डर’गुन्ह्या दाखल होण्या ऐवजी कोतवाली पोलिस ठाण्याची कराटे प्रशिक्षण संचालक व प्रशिक्षकाला ‘क्लिन चिट!’जन्मदात्रीचा आरोप
‘देश का झंडा,देश का झंडा’फडकवण्याचे स्वप्न बाळगणारा ईशित ३ सप्टेंरपासून तीव्र वेदनेत बेडवरच
नागपूर,ता. ४ ऑक्टोबर २०२२: लहान मुलांचं वयच हे अनुकरणीय असतं त्यामुळे कुटुंबातील मोठे जे काही करतात तसंच करण्याची,वागण्याची उपजत ईच्छा घरातील लहानग्यांनाही होत असते किंबहूना ते मोठ्यांसारखेच वागण्याचा,जगण्याचा अट्टहास ही करत असतात,जाटतरोडी येथील एका अतिशय सामान्य कुटुंबातील अवघ्या पाच वर्षाचा ईशित देखील आत्या व काका हे कराटे करीत असल्याचे बघून, आपण ही त्यांच्यासारखंच कराटे शिकावं म्हणून आईच्या मागे लागला.कोणतीही कला शिकणे हे चांगलंच असून यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त मुलांच्या कौशल्यात भरच पडते,हे या जागरुक आईला माहिती असल्याने तिने ईशितच्या आत्यासोबतच रेशिम बाग येथील ‘कराटे चॅम्पीयन्स’या संस्थेत ईशीतला कराटेची शिकवणी लाऊन दिली मात्र प्रजापती नावाच्या कराटे प्रशिक्षकाने अवघ्या पाच वर्षाच्या ईशितच्या जांघेवर जोरदार पंच मारला अन..ईशितचे हाड कायमचे मोडले!
तेव्हापासून हा चिमुरडा अंथरुणावरच सगळ्या विधी करण्यास बाध्य झाला असून,देश का झंडा,देश का झंडा फडकवणार,लष्करात जाणार असे सांगत सतत घराजवळील गल्ली बोळ्यात बागडणारा ईशित हा मोठेपणी आता लष्करात भर्ती तर सोडा,साधे मैदानी खेळ देखील खेळू शकणार नसल्याचे डॉक्टरांनी त्याच्या वैद्यकीय अहवालात सांगितले!
आपल्या पोटच्या मुलासोबत कराटे प्रशिक्षकाने जे क्रोर्य केले ते ईशितच्या आईला सहन होणे शक्यच नव्हते.महत्वाचे म्हणजे ती नऊ महिन्यांची गरोदर असून तिचं बाळंतपण कधीही होऊ शकतं,मात्र या जन्मदात्रीचा जीव अडकला आहे तो ईशितमध्ये कारण तिच्याशिवाय ईशितचं घरी करणारं कोणीही नाही आणि ईशित अद्यापही अंथरुणातच आहे!

ईशितला प्रशिक्षक प्रजापतीने ज्या क्रूरतेनी पंच मारला व जबरीने एक वेळ नव्हे तर दोन वेळा स्ट्रेचिंग करण्यास लावले,ते बघता त्याच्यावर व त्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या संचालक इंगोले यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी ईशितच्या जन्मदात्यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली.ज्यावेळी ईशितला प्रशिक्षकाने घरी पोहोचवून दिले त्यावेळी त्यांची मांडी पूर्णपणे सूजली होती,रक्त गोठलं होतं,मूत्र अडकून पडलं होतं,त्याला मूत्र विसर्जनासाठी खूप वेदना होत होत्या.काळपट डाग आणि चट्ट्यांनी त्याची इवलीशी मांडी प्रशिक्षकाच्या क्रोर्याची आणि निष्काळजीपणाची साक्ष देत होते.
मात्र घटना रेशिम बाग येथील असल्याने हे प्रकरण इमामवाडा पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात वर्ग केले.कोतवाली पोलिस ठाण्यात प्रशिक्षक प्रजापती व संचालक इंगोले यांना बोलवण्यात आले.त्या पूर्वी त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर पोलिसांनी ‘व्हिजिट’ही दिली.यानंतर अचानक पोलिसांना ‘उपरती’झाली की ही एक ‘शैक्षणिक’घटना आहे!शाळेत होणा-या घटनेला संचालक जबाबदार नसतात,त्या मुळे ईशितसोबत झालेल्या घटनेबाबत प्रशिक्षक तसेच संचालकाला दोषी धरता येत नाही!

ईशितची आई ज्याेत्सनाने प्रतिवाद केला.शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत मारहाण करने हा कायदेशीर गुन्हा झाला असून अनेक शिक्षकांना यासाठी शिक्षा झाली आहे मग कराटे प्रशिक्षक प्रजापती यांना का शिक्षा करीत नाही?तरी देखील या नऊ महिने गर्भवती असणा-या आईची तक्रार कोतवाली पोलिसांनी नोंदवलीच नाही.
आमची चूक झाली आम्ही इतक्या लहान वयात ईशितला कराटे शिकण्यास पाठवले,असे ज्योत्सना सांगते.मात्र त्यांच्या केंद्रात ईशितला क्लास लावण्यापूर्वी इतक्या लहान वयाच्या मुलांनाही कराटे शिकविलं जातं का?अशी विचारणा आम्ही केली होती,असं त्या ‘सत्ताधीश’ला सांगतात.त्यावेळी ते आमच्याशी खोेटे बोलले,ईशितच्या वयाचा एक ही विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात नव्हता.एकच विद्यार्थी आहे जो आठ वर्षाचा आहे हे आम्हाला नंतर कळले,असे त्यांनी सांगितले.
आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेऊन दोन हजार रुपये प्रवेशाचे भरले,यानंतर महिन्याकाठी पाचशे रुपये शुल्क दिले.ब्लॅक ब्लेटसाठी आणखी पाचशे रुपये मागत होते मात्र त्याला फक्त त्याच्या अावडीच्या कलेत आम्हाला गुंतवूण ठेवायचे होते त्यामुळे आम्ही ब्लॅक बेल्टचे पैसे भरले नाही.त्याचे वडील केबलचं काम करतात,माझी सासू वातमुळे पिडीत असून त्यांच्याकडून उठणे-बसणे होत नाही,सासरे यांना डोक्याचा ट्यूमर आहे. माहिती असते ईशितसोबत या ठिकाणी एवढे भयंकर क्रोर्य घडणार आहे तर मी ईशितला नजरेआड केले नसते,मला फक्त न्याय हवा आहे.
आमच्याकडे ईशितच्या शस्त्रक्रियेसाठी पंचवीस हजार रुपये नाहीत,पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आम्हाला दहा हजार रुपयांची लाच देखील देण्याचे आमिष दाखवण्यात आले मात्र आम्हाला ईशितच्या उपचाराचा संपूर्ण खर्च हवा असून न्याय देखील हवा आहे.
माझ्या घरी आता कधीही दूसरं बाळ येणार आहे,ईशित हा देखील सीझेरियननेच झाला,दूसरं ही बाळ सीझरनेच करावं लागेल असे मेडीकलच्या डॉक्टरांनी मला आधीच सांगितले आहे.सीझर नंतर माझं ही करणारं कोणीही नाही,त्यात मी कुटुंब नियोजनाचाही फॉर्म आधीच भरला,माहिती नव्हतं ईशितसोबत असं काही घडणार आहे.३ सप्टेंबरला सायंकाळी साढे सहा ते पावणे सात दरम्यान एवढ्या लहानश्या मुलासोबत ‘चॅम्पीयन कराटे प्रशिक्षण केंद्रात’जे काही घडले,ते बघता अशी प्रशिक्षण केंद्रे बंद झाली पाहिजे,आज माझ्या मुलासोबत हे घडले,उद्या दुस-या कोण्या मुलांना आयुष्यातून ते पंगू बनवतील.
पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही,आमची बाजू ऐकून घेतली नाही,गुन्हा नोंदवून घेतला नाही,अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो त्याप्रमाणे हा जरी अपघात असला तरी एका चिमुरड्यासोबत क्रूर असा गुन्हा घडला आहे,त्याची शिक्षा त्या दोघांनाही झालीच पाहिजे,अशी मागणी ज्योत्साना पाटणकर करतात.
पोलिसांनी ३२६ आणि ३०७ कलमांतर्गत गुन्हा नोंदवावा-ॲड.सुधीर माळादे(ज्येष्ठ विधीतज्ज्ञ,सत्र न्यायालय)
प्रशिक्षण असो किवा कोणताही खेळ,त्याचे काही नियम असतात.ईशितला कराटे शिकवताना त्याच्याच वयाच्या मुलाकडून पंच मारणे, शिकवणे अपरिहार्य होते ,ना की एवढ्या मोठ्या वयाच्या प्रशिक्षकाकडून एवढ्या लहान मुलाला पंच मारणे अपेक्ष्त होते,प्रशिक्षक हा ईशितपेक्षा वयाने फार मोठा असून त्याचा देह हा या खेळामुळे कठोर झाला असल्याने त्याचा पंच ईशितला कायमचा पंगू बनवून गेला.त्यामुळेच कोतवाली पोलिसांनी कराटे प्रशिक्षक रामकृष्ण प्रजापती व संचालक इंगोले यांच्याविरुद्ध ’अटॅम्प टू मर्डर’अर्थात कलम ३२६ आणि ३०७ लावून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवणे गरजेचे होते मात्र या घटनेत पोलिसांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नाही,असे दिसून पडतं.परिणामी ईशितच्या वडीलांनी ईशांत पाटणकर व आई ज्योत्सना पाटणकर यांनी पोलिस आयुक्तांकडे रितसर तक्रार नोंदवावी.प्रशिक्षकाकडून चूकून ईशितच्या मांडी ऐवजी प्रायव्हेट पार्टवर पंच बसला असता तर त्याच ठिकाणी ईशितचा मृत्यू झाला असता,हा प्रशिक्षणाचा भाग होऊच शकत नाही,प्रशिक्षकाची ही चूक कायद्याच्या दृष्टिनेही अक्षम्य असून न्यायालयातून पाटणकर कुटूंबियांना दाद मागता येईल व दोषींना शिक्षा करता येईल.
…………………..
घ्या ईशितच्या मदतीसाठी पुढाकार-
अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी ईशितच्या मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झाले,त्याच्या उपचारावर पंचवीस हजारांचा खर्च डॉक्टरांनी सांगितला असून ईशितच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे.समाजातील दानदात्यांनी पुढे येऊन ईशितच्या उपचारासाठी पुढाकार घेण्याची आज खरी गरज आहे.
ईशांत पाटणकर संपर्क क्रमांक-9561132341




आमचे चॅनल subscribe करा
