फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूज’पलटूराम‘संदीप जोशी!

’पलटूराम‘संदीप जोशी!

Advertisements
वृत्त वाहिनीला दिलेल्या बाईटनंतर संदीप जोशी ट्रोल

’मुख्यमंत्र्यांचे आदेश मानणार’ यावर नेटक-यांनी केली टिका
नागपूर,ता.२० जानेवरी २०२६: ‘कुर्सी नही किमत बचाने चला हूँ..शोर नही सुकून चुनने चला हूँ..किसी और की राह रोशन हो सके..इसलिए खुद एक कदम पीछे हटा हूँ’भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी काल फेसबुकवर ही मार्मिक पोस्ट केली व राजकारणातून ‘कायमचा’संन्यास घेत असल्याचा सूतोवा केला.यावरुन काल नागपूरात राजकीय क्षेत्रात खळबळ ही माजली.राजकीय नेते,कार्यकर्ते तसेच पत्रकारांच्या जगतातही या विषयावर बरेच चर्वितचर्वण झाले.अनेकांनी जोशी यांनी उचललेल्या या पाऊलावर खेद व्यक्त केला,काहींनी संशय व्यक्त केला तर बुद्धिजीवींनी योग्य वेळ येईपर्यंत गप्प बसण्याचा मार्ग स्वीकारला मात्र,आज एका इंग्रजी माध्यमाच्या मराठी वृत्तवाहीनीला दिलेली बाईट सर्वदूर व्हायरल झाली व त्यातील जोशी यांची बदललेली भूमिका ऐकून अनेकांनी समाजमाध्यमांवर त्यांना ’पलटूराम’ही संज्ञा देत मोकळे झाले.
संदीप जोशी यांची ‘आता मला थांबायचंय’ही पोस्ट काल दिवसभर सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.अनेक वृत्तपत्रांची आज ही पोस्ट ठलक मथळा ही बनली.त्यांच्या या दीर्घ पोस्टमध्ये,सत्तेसाठी सुरु असलेले पक्षांतर,संधीसाधूपणा, निष्ठावान कार्यकर्त्यांची अस्वस्थता इत्यादीवर मार्मिक भाष्य होते,कुणीही थांबायला तयार नाही असे म्हणत येत्या १३ मे २०२६ रोजी त्यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्या नंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा ‘दावा’करण्यात आला.समाजकारणातील दीनदयाल थाली,सोबत प्रकल्प,डायग्नोस्टिक सेंटर,क्रीडा क्षेत्रातील खासदार क्रीडा महोत्सव अशा विविध उपक्रमांमध्ये मात्र पुढे ही सहभागी असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये,हे माझे प्रामाणिक मत आहे आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही,हे ‘त्रिकालबाधित’ सत्य देखील संदीप जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये शब्दबद्ध केले.‘कुर्सी नही..किमत बचाने चला हूँ’म्हणणारे संदीप जोशी आज मात्र,मराठी वृत्त वाहीनीला दिलेल्या बाईटमध्ये,मुख्यमंत्र्यांनी तुमचा हा निर्णय मागे घेण्यास सांगिल्यावर काय कराल?अशी विचारणा केल्यावर,’ते मला विहिरीत उडी घेण्यास सांगतील तरी मी निसंकोच उडी मारेल’असे उत्तर देते झाले….!
देवेंद्रजी जे म्हणतील ते मी करील,ते माझे मित्र आहेत,बंधू आहेत,ते माझे नेता आहेत,ते जे म्हणतील ते मी करील’असे ते म्हणाले.मला साध्या नगरसेवकापासून तर महापौर पदापर्यंत पक्षाने सगळी पदे दिली.त्यामुळेच मनपा निवडणूक व निकालानंतर मी माझा निर्णय जाहीर करेल हे मी सहा महिन्यांपूर्वीच ठरवले असल्याचे ते सांगतात.१५१ जागांसाठी १६०० जण उमेदवारी मागतात.त्यामुळे कुठे थांबायचं आपणच हा’आदर्श’निर्माण करावा व थांबावं असा निर्णय मी घेतला असल्याचे ते म्हणाले.
कार्यकर्ते तुमच्या कालपासून निर्णय मागे घेण्यास खूप मागे लागले आहेत,फडणवीस यांचा जर शब्द आला की हा निर्णय मागे घ्या,तर काय कराल?असा प्रश्‍न केला असता,मी हा निर्णय देवेंद्रजींना विचारुनच घेतला आहे,त्यामुळे देवेंद्रजी जे म्हणतील,ते माझे मित्र आहेत,बंधू आहेत,नेता आहेत,ते जे म्हणतील ते मी करेल,असे जोशी म्हणाले.
याचा अर्थ देवेंद्रजी जर तुम्हाला तुमची ही आमदारकीची मुदत संपल्यानंतर पुढची आमदारकी देखील देऊ करतील तर स्वीकाराल का?या प्रश्‍नावर ,त्यांनी जर मला म्हटलं की ही विहीर आहे,या विहीरीत उडी मार तर मी विहीरीत उडी मारील,एवढं माझं त्यांच्यावर प्रेम आहे,असे संदीप जोशी म्हणाले.यावर पुन्हा,यात राजकीय संन्यास घेतला आहे,असे आम्ही म्हणू शकतो की नाही?असा प्रश्‍न केला असता,मी राजकीय संन्यास घेतलाच आहे,कार्यकर्त्यांचे प्रेम आहे,ते व्यक्त करतात आहे,एवढंच मी म्हणू शकतो,असे जोशी म्हणाले.
मात्र,जोशी यांची आजची ही बदललेली भूमिका बघता त्यांना जवळून ओळखणारे,त्यांचे शुभचिंतक व अनेक कार्यकर्त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून,समाज माध्यमावर त्यांना अवघ्या एका दिवसात बदललेल्या भूमिकेवरुन ‘पलटूराम’म्हणून डिवचण्यात आले आहे.’मी राजकीय संन्यास घेतला असून अगदी देवेंद्रजी जरी मला माझी विधान परिषदेची मुद्दत संपल्यानंतर पुन्हा संधी देतील तरी मी ती ठामपणे नाकारेल,कारण आता इतरांना संधी मिळायला हवी,मला पक्षाने खूप काही दिले आहे,संदीप जोशींकडून कालची त्यांची भूमिका बघता अश्‍या उत्तराची अपेक्षा असताना,त्यांनी आज केलेले विधान कालच्या भूमिकेशी पूर्णपणे फारकत घेणारे असल्याने नेटक-यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.
’तुम्ही बाेलता एक,करता एक’.
’निर्णय घेतला आहे तर ठाम रहा ना,बहाणे कशाला करता’.
‘यांना कळलंय यांना पुन्हा विधान परिषदेची आमदारकी मिळणार नाही,त्यामुळे असे चवताळून काय होणार?
’काल थोडं सिरियस वाटलं..आज पॉलिटिकल नौटंकी वाटून राहीली…असो..शेवटी जे चाललंय ते..सत्तेसाठी..पदासाठी..चालू द्या’,
‘अबे तर नाटंक कायले केले विहिरीत उडीच मारायची होती तं!’
एका नेटक-याने तर चक्क ’जात’काढत…नको नको म्हणायचं आणि हात पुढे करायचा!अशी शेलकी टिका केली.
एका नेटक-याने,विहिरीत नको,तू तळ्यात उडी मार लवकर’असा सल्ला दिला.
‘एका नेटक-याने,त्यांनी सांगायच्या आधीच तुम्ही विहिरीत उडी मारा..त्याने तुमची स्वामी भक्ती सिद्ध होईल आणि सगळा विषयच संपेल’,अशी प्रतिक्रिया दिली.
एक नेटक-याने, चार दशके पदवीधर मतदारसंघ निवडणूक जी भाजप कधीच हरली नव्हती ती किमया संदीप जोशी यांनी पक्षाला साधून दिल्याचा खोचक टोला हाणला.
एका नेटक-याने ’झाले कळले,तुम्ही काही संन्यास घेत नाही,स्वत:ची बार्गेनिंग पावर चाचपडून बघायची आहे बाकी दूसरे काही नाही..उद्या हेच सांगतील देवेंद्रजींशी माझी चर्चा झाली,माझे समाधान झाले,आता मी हा निर्णय मागे घेत आहे’अशी प्रतिक्रिया दिली.
 तर एका नेटक-याने ’मी अगोदर सांगितले होते देवाभाऊ परत आल्यावर विचार बदलू नका’म्हणून आपल्याच आधीच्या प्रतिक्रियेची आठवण करुन दिली.
थोडक्यात,भाजपचे वरिष्ठ नेते संदीप जोशी यांनी काल राजकीय संन्यासाची जी ‘प्रगल्भ’ भूमिका घेतली,तीच आता संपूर्णत: संशयाच्या भोव-यात अडकली आहे.’कुर्सी नहीं किमत बचाने चला हूँ’सांगणा-या संदीप जोशींनी आज आपल्या अमूल्य प्रतिष्ठेशीच प्रतारणा केल्याचा आरोप अनेक नेटक-यांनी केला.
त्यांनी काल घेतलेली भूमिका व आजची भूमिका,यात त्यांची खरी भूमिका कोणती?या राजकीय गंटागळ्यात आता नेटकरीच चांगले डूंबल्याचे दिसून पडतंय,येणार काळच याचे योग्य उत्तर देईल,हेच मात्र खरे.
………………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या