फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश‘परिवर्तन’ ज्यांना पटले त्यांनी केले सारासारविवेकबुद्धीने मतदान!

‘परिवर्तन’ ज्यांना पटले त्यांनी केले सारासारविवेकबुद्धीने मतदान!

Advertisements

उपराजधानीत काँग्रेस अध्यक्षीय पदाच्या निवडणूकीच्या मतदारांचा कोणाला गेला कौल?

मतदान निष्पक्षच!श्रेष्ठींचा दाव्यात तथ्य किती?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ ऑक्टोबर २०२२: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठीचे मतदान आज पार पडले.काँग्रेस अध्यक्ष निवडणूकीसाठी राज्यात ५६० मतदार होते तर विदर्भात १८२ मतदरांची संख्या होती.नागपूर जिल्ह्यात ९३ मतदार होते तर नागपूरात एकूण १८ मतदारांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा हक्क बजावयाचा होता,याचा कानोसा घेतला असता ‘परिवर्तन’ज्यांना पटले त्यांनी सारसारविवेकबुद्धिीने मतदान केले ‘असावे’….असा सूर कानी पडला.

एकीकडे ×८० वर्षीय मल्लिकार्जून खरगे जे गांधी घराण्याचे उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे होते तर दुसरीकडे, तरुण उम्दा व्यक्तिमत्वाचे धनी व अध्यक्षीय निवडणूकीबाबत तेवढीच विचारांची,संकल्पनांची स्पष्टता असणारे शशी थरुर यांच्यात ही थेट लढत आज पार पडली,विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये तब्बल बावीस वर्षांनंतर संघटनात्मक निवडणूक होत असून, आपल्या प्रचाराची सुरवात थरुर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीपासून केली व सेवाग्राम या महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट देऊन अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला.

दीक्षाभूमीत थरुर यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात सर्वात महत्वाचे वाक्य जर कोणते म्हटले असेल ,तर विद्यमान व्यवस्थेत प्रदेशाध्यक्षांनाही साध्या एखाद्या जिल्हाध्यक्षांचीही नेमणूक करायची असेल तर त्यांना ‘दिल्ली’ची परवानगी घ्यावी लागते! अध्यक्ष पदी माझी निवड झाल्यास मी या व्यवस्थेत नक्कीच बदल करील व स्थानिक नेतृत्वास सर्व अधिकार प्रदान करेल!’हे ते वाक्य होते.

ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान बहाल केले,ज्या संविधानात ‘लोकशाही’मूल्याची व सत्तेच्या विकेंद्रीकरणाची कास धरली त्याच डॉ. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवरुन थरुर यांचे, अगदी खालच्या स्तरापर्यंत ‘सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे’आश्‍वासन, हे प्रसंगोचित होते,असा सूर थरुर यांच्या आगमनानंतर उमटला.

दूसरीकडे काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एका ‘दलित‘ नेत्याकडे अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्याचा निर्धार केला असल्याचे ‘डिमडिम’ देशाच्या राजधानीत वाजवण्यात आले मात्र असे असले तरी काँग्रेसच्या इतिहासात एका दलित नेत्याला अध्यक्ष पद मिळण्यास तब्बल ५१ वर्षांचा कालावधी का लागला?याचे उत्तर मात्र काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांकडूनही अखेरपर्यंत मिळाले नाही.

पक्षातील निवडणूक अधिकारी हे आज जरी अध्यक्षीय पदाची निवडणूक निष्पक्षपणे पार पडली असल्याचा दावा करीत असले तरी निवडणूक प्रचारादरम्यान थरुर यांनी व्यक्त केलेली खंत या तथाकथित निष्पक्षतेवर पाणी फेरणारीच होती.‘काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जून खरगे यांंचे ते जिथे जातात तिथे राज्य संघटनांतर्फे स्वागत करण्यात येते,माझ्याबाबतीत असे होत नाही,२२ वर्षांपासून पक्षीय निवडणूक न झाल्यानेच व्यवस्थेत हा दोष निर्माण झाला आहे….’थरुर यांच्या या व्यथेतच काँग्रेसच्या ‘निष्पक्षपाती’ निवडणूकेच्या दाव्याचे ‘थडगे’ रचल्या गेल्याचे दृष्टिक्षेपात येतं.

प्रचारादरम्यान शेजारच्या मध्य प्रदेशात तरी थरुर यांच्या स्वागताला प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री कमलनाथ,विरोधी पक्ष नेते गोविंद सिंह उपस्थित होते मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नाना पटोले यांनी, एवढे देखील सौजन्य दाखविण्याची तसदी घेतली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे,एवढा जबरदस्त गांधी घराण्याचा ’भीतीचा’पगडा त्यांच्या ‘अंतरआत्म्यावर’पडला असल्याची टिका त्यामुळेच समाज माध्यमातही उमटली.माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मात्र थरुर यांच्यासोबत भेट नाकारली नाही,हे विशेष.

उपराजधानीत थरुर यांच्यासाठी प्रचाराचा नारळ फोडण्यात काँग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ.आशिष देशमुख हे अग्रस्थानी होते.काँग्रेस पक्ष सध्या एकाच ठिकाणी थांबला आहे,पक्षाला सध्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या शस्त्रक्रियेची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.ही शस्त्रक्रिया करण्यासाठी थरुर हे उत्तम सर्जन ठरु शकतात.पक्षातील ’हायकमांड कल्चर’ संपवण्याचा मुद्दा थरुर यांच्या प्रचारात आहे त्यामुळे या निवडणूकीत पक्षातील मतदारांनी थरुर यांना मतदान करावे,असे आवाहन देशमुख यांनी आपल्या जाहीरपत्रातून केले होते.

थरुर उल्लेख करुन गेले त्याप्रमाणे,गेल्या अनेक दशकांपासून गांधी घराण्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात नागपूरातील काँग्रेसच्या आमदारांनी व पदाधिका-यांनी काँग्रेस श्रेष्ठींचे ’लकवा धोरण’ अनुभवले आहेतच.विदर्भात देखील एखाद्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करावयाची झाल्यास श्रेष्ठींची परवानगी अत्यावश्‍यक असते. गल्लीतल्या ब्लॉक अध्यक्षाची नेमणूक देखील गांधी घराण्यातील संमतीशिवाय करने, स्थानिक पातळीवर शहरातील काँग्रेसचे आमदार किवा पदाधिका-यांना शक्य नसतात.

त्यात ही दिल्लीवरुन ‘योग्य’ निर्णय येईलच याची कोणतीही खात्री नसते,याशिवाय निर्णय येण्यास प्रचंड विलंब होत असलेला देखील नागपूरकर अनुभवतच आहे.काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याचे सांगितले जाते मात्र ‘एकच व समान’ विचारधारेचा पक्ष असूनही हा पक्ष किमान महाराष्ट्राच्या उपराजधानीत किती ‘गटात’विभागला गेला आहे,याची मोजणी करायला गेल्यास हातावरील बोटे ही कमी पडतील,हे देखील धगधगते वास्तव नजरेआड करता येणार नाही.

विदर्भात एकेकाळी तीन खासदार चार आमदारांचे वर्चस्व असणा-या या पक्षाला ‘गटातटाचे’ जे ग्रहण लागले आहे ते विदर्भात भारतीय जनता पक्षाला घट्ट पाय रोवण्यास कसे कारणीभूत ठरले,हे सांगण्यास कोण्या ज्योतिषाची गरज नाही.मूळात काँग्रेस पक्षात गांधी घराणेशाही आल्यानंतर आमदार,खासदारांच्या कामाचं मूल्यमापन ही प्रथाच बंदच पडली.निर्णय हे जरी गांधी घराणे घेत असले तरी ’सल्ले’देणारे दूसरेच कोणी असतात,हे विशेष!

तिसरी महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षात स्वत:च्या कामाच्या मेरीटवर कोणी आमदार किवा खासदार निवडून येत असेल तर काँग्रेसचे शीर्ष नेते त्या आमदाराला किवा खासदाराला बळ देण्या ऐवजी त्याच्या विरोधातील नेत्यांना बळ देण्याचे काम करीत राहीलेत,याची शेकडो उदाहरणे नागपूरातच या पक्षात सापडतील.हे काम गांधी घराणे प्रत्यक्षरित्या जरी करीत असले तरी त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणारे ‘जनरल इन्चार्ज सेक्रेटरी’म्हणजे राज्याचे प्रभारी हे मोलाची भूमिका बजावत असतात,हे विसरता येत नाही.

पंजाबमध्ये देखील हेच घडलं.ऐन निवडणूकीच्या तोंडावर गांधी घराण्याचे या प्रभारी वफादारांनी फार चुकीचे इनपुट्स त्यांना दिले.अमरिंदरसिंग यांची उचलबांगडी करुन सिद्धुसारख्या बेभरवश्‍याच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली व मुख्यमंत्री देखील बदलवला.या सल्ल्याने पंजाबमध्ये काँग्रेसची नैय्या पार बुडाली.पंजाबसारखे देशातील एक मोठे राज्य काँग्रेसच्या हातातून अलगद निसटले.महाराष्ट्रात देखील गांधी घराण्याच्या वफादार पदाधिका-यांचे सल्ले हे ‘धोकादायक‘वळणावरचेच असतात,याची देखील अनेक उदाहरणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनुभवली आहे.

राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद घोषित करताच या सहाही जिल्ह्यांमध्ये त्यांनी शिबिरांचे आयोजन केले.आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी मात्र त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही असे शिबिर घेण्याचे सौजन्य किंबहूना कल्पकता दाखवली नाही.हाच ठळक फरक आहे काँग्रेस व भाजपाच्या कार्यपद्धतीमध्ये.

दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना गल्लीतील वस्तुस्थिती ही फक्त ‘मध्यस्थांच्या’ मार्फत कळत असते.हेच मध्यस्थ काँग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये आपापसात भांडणे लाऊन देतात व दूरु, हात शेकत उभे राहतात,यामुळे पक्षाची अपरिमित हानी होते,परिणामत: काँग्रेस पक्षच आज देशात फक्त दोन राज्यांपुरता मर्यादित राहीला आहे,हे जळजळीत वास्तव दूर्लक्षीत करता येणार नाही.

नऊ वर्षांपूर्वी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन शिबिर झाले होते त्यात एकशे पसतीस वर्ष जुन्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व राहूल गांधीनी करावे,यावर शिक्कामोर्तब झाले होते.त्यानंतर देशात दोन लोकसभेच्या निवडणूका झाल्या त्यात काँग्रेसचे पानीपत झाले.विधान सभेच्या निवडणूकीतून अनेक राज्य देखील काँग्रेसच्या ताब्यातून निसटली.मधल्या काळात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक दशके काँग्रेसशी एकनिष्ठ असणा-या ज्येष्ठ नेत्यांनी ‘जी-२१’गटाची स्थापना देखील केली.या गटाच्या सूचना अर्थातच गांधी घराण्याला न पटणा-या व न रुचणा-याच होत्या.

यानंतर या वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या तीन दिवसीय उदयपूरच्या अधिवेशनात काँग्रेसने अनेक ठराव पारित केले.यातील एक ठराव म्हणजे ’एक व्यक्ती एक पद’हे होय.याच शिबिरात उदयपूर नवसंकल्प जाहीरनामादेखील प्रसिद्ध करण्यात आला.याच शिबिरात पूर्णवेळ अध्यक्ष पदाची मागणी देखील पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी लावून धरली होती.

महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पक्षात २४ वर्षात निवडणूकाच झाल्या नाहीत,अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.नव्या रक्ताला वाव देणे आता नितांत गरजेचे असल्याची गर्जना देखील केली होती,काँग्रेसला नवीन अध्यक्ष हवा आहे,तो निवडून आलेला हवा,भले तो कोण्याही परिवाराचा सदस्य असो,अशी मागणी केली होती,तेच पृथ्वीराज चव्हाण ,आता गांधी घराणे पुरस्कृत ८० वर्षीय खरगे यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रस्तावक बनतात, त्यावेळी हेच का ते ज्यांनी नवीन रक्ताची गरज पक्षाला वाचविण्यासाठी व्यक्त केली होती,असा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडतो.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ज्यापक्रारे मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीवर चिकटून राहण्यासाठी अध्यक्ष पदाच्या निवडणूकीला बगल दिली ती देखील थक्क करणारीच होती.अशा वेळी सात राज्यांच्या प्रदेश काँग्रेसकडून अध्यक्ष पदी राहूल गांधीच हवेत असा ठराव मंजूर होतो,यात सगळे काही आले.गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला तरणोपाय नाही,या मानसिकतेतून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच आपल्या देशभरातील आपल्या २० टक्के मतदारांना बाहेर काढण्याची एक नामी संधी आजच्या या पक्षांतर्गत निवडणूकीने काँग्रेसला दिली होती,हे मान्य करावेच लागेल.

राहूल गांधींना पक्षाचे नेतृत्व नको मात्र निर्णयकर्ते म्हणून आपला ‘एकाधिकार’ देखील त्यांना सोडायचा नाही,हे स्पष्ट आहे.यासाठीच एवढ्या जुन्या पक्षातील अध्यक्ष पदासाठी त्यांनी ‘होयबा’असणारे ऐंशी वर्षीय खरगे यांची निवड केली.मनीष तिवारी,शशी थरुर व कार्ती चिदंबरम यांनी अध्यक्ष पदासाठीची निवडणूक निष्पक्ष व पारदर्शकपणे राबविण्यासाठी मतदारयाद्या सार्वजनिकरित्या जाहीर करण्याची मागणी केली होती ज्याला काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनी केराची टोपली दाखवली.काँग्रेसचे मतदार हे प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रतिनिधी असल्याने,त्यांची यादी फोनवरही मिळू शकते,ही यादी सार्वजनिक करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतेच नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी व राहूल गांधी यांची ईडी चौकशी झाली आहे.याच प्रकरणात ते जामीनावर बाहेर आहेत.काँग्रेस पक्षावरील मजबूत पकड हाच त्यांच्या सूटकेचा एकमेव मार्ग ही ठरतो.परिणामी काँग्रेस पक्षाच्या फेररचनेची निवडणूक ही शेवटी गांधी घराण्या भोवतीच फिरत ठेवायची की त्याला नवे आयाम द्यायचे याची एक सुवर्ण संधी काँग्रेसच्या पक्षांतर्गत मतदारांना चालून आली आहे.गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष देशावर राज्य करु शकतो,हे राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर अपघाताने पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पी.व्ही नरसिंहराव यांनी दाखवून दिले होते.

अश्‍याचरितीने सत्तेच्या विकेंद्रिकरणाची तसेच काँग्रेसच्या पुर्नज्जीवनाची नामी संधी या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या माध्यमातून काँग्रेसच्या पदाधिका-यांना मिळाली मात्र दोन तुल्यबळ उमेदवारांमधील ही निवडणूक होती असेही म्हणता येणार नाही कारण एक गांधी घराणे ‘अघोषित’पुरस्कृत उमेदवार होते तर एक स्वतंत्र विचारांचा उमेदवार ही निवडणूक लढत होते.

गांधी घराण्याने कोणत्याही उमेदवाराची बाजू उघडपणे घेतली नसली तरी थरुर यांना अनेक राज्यांमध्ये प्रचारासाठी गेल्यानंतर ज्याप्रकारे उपेक्षेचा सामना करावा लागला,त्यांच्या मंचावर स्थानिक संघटनांच्या पदाधिका-यांनी बसने ही टाळले ते बघता काँग्रेस या पक्षात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी ‘लोकशाही’ रुजण्यास अद्याप अनेक दशकांचा कालावधी लागणार आहे,असेच आता म्हणावे लागेल.

थोडक्यात १९ तारखेच्या मतमोजणीनंतरच मतदारांचा ‘छूपा’ कौल कळणार असून,खरगे यांची निवड निश्‍चित मानली जात असतानाच थरुर यांची निवड देखील ‘अशक्य’ गणली जात नसल्याने, काँग्रेस पक्षाचा खरा भविष्यकाळ १९ तारखेलाच देशातील जनतेसमोर येऊ शकेल,व उपराजधानीत काँग्रेस अध्यक्षीय पदाच्या निवडणूकीच्या मतदारांचा कोणाला गेला कौल?हे देखील कळू शकेल,हे मात्र निश्‍चित.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या