फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपन्नास लाख कोटींचे केले काम पण एक ही भ्रष्टाचाराचा डाग नाही:गडकरी

पन्नास लाख कोटींचे केले काम पण एक ही भ्रष्टाचाराचा डाग नाही:गडकरी

Advertisements

निवडणूक प्रचार कार्यालयाचे थाटात उद् घाटन

नागपूरात केले दहा वर्षात एक लाख कोटींचे काम:हे तर ट्रेलर आहे,पिक्चर अभी बाकी है

‘जे मत देतात त्यांचेही काम करील आणि जे मत नाही देत त्यांचेही काम करील.’

’हजार नामर्दो के साथ लडने की बजाय दस मर्दो के साथ लडने मे मजा!’

नागपूर,ता.२३ मार्च २०२४: माझे विविध राजकीय पक्षातील अनेक नेत्यांशी सोहाद्रपूर्ण संबंध आहेत.साम्यवादी पक्षाचे बर्धन यांना मी दिल्लीत भेटायला गेलो होतो कारण श्रेष्ठत्व,कर्तृत्व आणि प्रामाणिकपणात त्यांची तोड नव्हती.या गुणांचा संबध कोणत्या पक्षाशी किवा त्या पक्षाच्या विचारधारेशी नसून व्यक्तीशी असतो.निवडणूकीत राजकारण्यांना दाबण्याचा विचार मनात येत नाही.मी आजपर्यंत मंत्री म्हणून पन्नास लाख कोटींची कामे केली मात्र,एक ही भ्रष्टाचाराचा डाग नसल्याचे विधान केंद्रिय मंत्री व नागपूरातून तिस-यांदा भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळालेले नितीन गडकरी यांनी केले.ते गणेश पेठ येथील निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद् घाटनाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा डाग सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडून देईल.आज मी जे काही राजकारणात बनलो आहे ते कार्यकर्त्यांमुळेच बनलो असल्याचे त्यांनी सांगितले.उमाताई पिंपळकर या सर्वात जुन्या कार्यकर्त्या आज येथे उपस्थित आहेत. सर्वात मोठी पुंजी माझी हे जनतेचं प्रेम आहे. अरुणाचल प्रदेशात गेले असता तेथील टेक्सी चालकाने नागपूरवरुन गेलेल्या व्यक्तीकडून पैसे घेतले नाही.याचे कारण त्याने सांगितले गडकरी यांनीच अरुणाचल मधील रस्ते इतके चांगले बनवले असून त्यांचा धंदा यामुळे खूप चांगला होतो..श्रीनगर येथील एका ढाबेवाल्याने देखील नागपूर मधून गेलेल्या पर्यटकाकडून नागपूरचे नाव ऐकून, पैसे घेतले नाही.माझा ढाबा खूप चालतो कारण गडकरी यांनी हा राष्ट्रीय महामार्ग बनवला,असे तो म्हणाला.

मी जगात कुठे ही गेलो तरी माझ्या नागपूरला मी विसरत नाही आणि विसरणार ही नाही,असे त्यांनी सांगितले.दहा वर्षात माझ्याकडून जेवढी कामे झाली आहे त्याचा हिशेब केला असता एकट्या नागपूरातच मी एक लाख कोटींची कामे केली असल्याचे ते म्हणाले.हे तर ट्रेलर आहे,पिक्चर अभी बाकी है,अशी म्हण त्यांनी उधद्रुत केली.जगात नागपूरचे नाव मला पोहोचवायचे आहे.अवघ्या साढे तीन तासात ताडोबाला पोहोचतो.नागपूरातच झिरो माईल आहे.मुंबई ते कलकत्ता,दिल्ली ते चेन्नईत जाताना नागपूर हा मधला टप्पा असतो.नागपूर ऑरेंज सिटी आहे.मदर डेअरीला सांगितले आहे संत्र्यांची बर्फी तयार करुन संपूर्ण देशात पाेहचावी.लवकरच लॉजिस्टिक हब तयार होणार असून यासाठी फडणवीस यांनी १२०० कोटी रुपये दिले आहेत.आम्ही देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक पार्क निर्माण करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

७ वर्षां पूर्वी अनिल सोले हे महापौर असताना सांडपाणी शुद्ध करुन कोराडी,खापरखेडा वीज प्रकल्पांना देण्याची सुरवात करण्यात आली,यातून मनपाला ३०० कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.महाल येथी भवनात जेव्हा मनपाच्या सर्वसाधारण सभा पार पडत असत त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सभागृहासमोर मटके फोडण्याचे आंदोलन करीत होतो.आता शहरात ‘चोवीस बाय सात’या योजनेद्वारे ८९ पाण्याची टाकी बनविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.७९ टाक्या निर्माण झाल्या असून २ टाक्यांसाठी जागा मिळाली नाही तर आमदार मोहन मतेंच्या मतदारसंघात नुकतेच ७ टाक्यांचे भूमिपूजन पार पडले असल्याची माहिती त्यांनी दिली.नागपूरातील ७५ टक्के जनतेला चोवीस तास सात ही दिवस पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.आता डिप्टी सिग्नलच्या झोपडपट्टीतही घरात पाण्याचे ड्रम्स ठेवण्याची गरज नाही.मध्य प्रदेशच्या तोतलाडोह येथून नागपूरला पाणी पुरवठा होतो.हायड्रो पावरने पाणी आणल्या जातं.१३०० कोटी रुपये खर्च करुन पाईपलाईनद्वारे गोरेवाडा येथे पाणी आणण्यात येते.येत्या ६ महिन्यात नागपूरातील एक ही वस्ती अशी नसणार जिथे पाणी नसणार नाही.येणारी २५ वर्ष ही नागपूरात पाण्याची कोणतीही कमतरता नसणार,असे गडकरी म्हणाले.मिहानचा पहले विरोध झाला होता असे सांगून, माझे वारसदार माझी मुले नसून माझं काम,अधिकारांवर कार्यकर्त्यांचा हक्क असल्याचे गडकरी यांनी सांगितले.राजकारणात यायचे असल्यास आधी भिंतींवर पोस्टर चिपकवा,माझी राजकारणातील सुरवात तिथूनच झाली होती असे मी माझ्या मुलांना सांगतो.

करोनाचा काळ खूप कठीण होता,असे ते म्हणाले.ऑक्सीजन अभावी माणसे मरत होती.माझा शाळेतील फार जवळचा मित्र करोनामुळे गेला.याचं मला फार वाईट वाटलं.त्याच वेळी पत्नीला सांगितलं,सत्ता,संपत्ती ही काहीही कामी पडत नाही.१०० कोटी खर्च करुन ८० ॲम्ब्यूलेंस,७ लाख रुपये प्रति वेंटिलेटर्सची खरेदी विशाखापट्टनम येथून केली.५०० वेंटिलेटर्स विदर्भातील अनेक शहरातील रुग्णालयांमध्ये नि:शुल्क पाठविण्यात आली.नागपूरात ऑक्सीजन प्लॅन्ट बसविण्यात आला.त्यावेळी ना जात बघितली ना धर्म.भाषा,लिंग,पक्ष न बघता मदत केली.ताजबाग येथेही सांगितले,‘जे मत देतात त्यांचेही काम करील आणि जे मत नाही देत त्यांचेही काम करील.’जातीवादाला माझ्याकडे थारा नाही.नागपूरकर हेच माझे कुटूंब असून माझ्या आईकडून हेच शिकलो,सेवा करीत रहा.नुकतेच ९० इलेक्ट्रीक ट्राय सायकल्स मी दिव्यांगांना वाटल्या.३५० दिव्यागांना कृत्रिम पाय बसविण्यात आले.आता ते फूटबॉल खेळतात,बुलेट चालवतात.यात ही कधी धर्म,जातीच्या आधारावर भेदाभेद केला नाही.‘सबका साथ,सबका विकास’हे जे मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दिले आहे मी त्यावरच चालत असल्याचे याप्रसंगी गडकरी यांनी सांगितले.

कवाडे यांनी आपल्या भाषणात संविधानाबाबत एक आव्हान केले आहे.डॉ.बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेले संविधान हे या देशाची आत्मा आहे.संविधानातील स्वातंत्र्य,समता,बंधूता ही मुल्ये,जीवन मिशन आहेत त्यामुळेच भाजप पूर्ण बहूमताने पुन्हा सत्तेत आली तर संविधान संपुष्टात आणेल,हा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे.देशात आणिबाणिच्या काळात ८० वेळा संविधानात संशोधन केल्या गेले होते,त्याचे काय?लोकांना ’कन्वींस’ नाही करु शकत तर ’कन्फ्यूज’करा ही नीती विरोधकांनी स्वीकारली असल्याची टिका यावेळी गडकरी यांनी केली.

आपल्या कामातूनच आपली ओळख निर्माण होत असते असे सांगून आमदार,खासदार,नगरसेवक,मंत्री हे नेहमीच ‘माजी’होतात मात्र,कार्यकर्ता हा कधीही माजी होत नाही.२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हेच माझ्या कार्याचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.

जॉर्ज फर्नाडीस हे देशाचे संरक्षण मंत्री राहून चुकले आहेत.त्यांच्या साधेपणाविषयी मला प्रचंड आदर वाटत होता.ते नागपूरात येत होते तेव्हा कोणीही त्यांच्या स्वागतासाठी हारतुरे ,पुष्पगुच्छ घेऊन जात नसत.मला ही तसाच साधेपणा आवडतो मात्र मंत्री झाल्यानंतर मला झेड प्लस सुरक्षेतच वावरावं लागतं.माझ्या येण्या आधी श्‍वान येत असतो पण मला साधेपणाच आवडतो.जनतेवर प्रेम करा जनताच तुम्हाला मोठं करुन देते,असे गडकरी म्हणाले.

लोकसभेचे अधिवेशन सुरु असताना एकदा मला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा फोन आला व कुठे आहात म्हणून विचारणा झाली.मी त्यावेळी नागपूरात एका कार्यक्रमात व्यस्त होतो व राज्यमंत्र्यांना सांगितले होते की माझ्या विभागाशी संबंधित प्रश्‍नांची उत्तरे संसदेत ते देतील.बिर्ला यांनी सांगितले की लोकसभेत गडकरी यांनी उपस्थित राहायला हवे होते कारण ७५ खासदारांनी लोकसभेत माझ्या कामाचे कौतूक केले होते,त्यामुळेच बिर्ला यांनी मला फोन करुन कुठे आहात म्हणून विचारणा केली होती,असे गडकरी यांनी सांगितले.एका ही खासदाराने माझ्या विरोधात लोकसभेत बोलले नाही.सर्वांनी गडकरी यांनी आमच्याही मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले,असेच कौतूक केले.रस्ते बनविणे,शिक्षणाच्या क्षेत्रात काम करताना किवा ,विकासाची कामे करताना राजकारण करणे योग्य नसतं.दलित,पिडीत,शोषितांची कामे करा,दरिद्र नारायणाची सेवा केल्याने,इच्छित कार्य पूर्ण हाेतं असे गडकरी म्हणाले.

माझ्या आईसोबत मी महाल येथील या तिळक पुतळ्याजवळ येत होतो त्यावेळी सर्वदूर सायकल रिक्क्षा चालायचे.त्याच वेळी मला यावर समाधान शोधावसं वाटायचं.ई-रिक्क्षा रस्त्यावर धावू लागल्यानंतर मुलायम सिंह यांनी देखील माझे कौतूक करीत,राम मनोहर लोहिया कहते थे,पं.दिनदयाल उपाध्याय कहते थे जिस दिनसे इंसान,इंसानो को ढोने का काम बंद करेगा वो सुवर्ण दिन होगा,गडकरी जी ने ये कर दिखाया,असे मुलायमसिंह यादव म्हणाले होते,अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.माझ्या जीवनात मी सर्वात चांगलं काम कोणतं केलं,हा प्रश्‍न मला विचारला जातो तेव्हा मी सायकल रिक्क्षा रस्त्यावरुन हद्दपार करने,हेच सांगतो,असे गडकरी म्हणाले.

याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आव्हान करीत,प्रत्येक बूथवर ७५ टक्के मतदान झाले पाहिजे असे सांगितले.यावेळी कोणतेही ‘इलेक्शन मॅनेजमेंट’ होणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे व आ.प्रवीण दटके यांना मी अश्‍या मॅनेजमेंटची गरज नसल्याचे सांगितले आहे.‘खाना मिलेगा मगर पीना नही मिलेगा’असे सूचक विधान करुन,’हजार नामर्दो के साथ लडने की बजाय दस मर्दो के साथ लडने मे मजा आता है‘असे विधान त्यांनी केले.यंदा पाच लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला.‘निश्‍चयाचा महामेरु।बहूत जनासी आधारु।अखंडस्थितीचा निर्धारु।श्रीमंत योगी।परोपकाराचीया राशी।उदंड घडती जयाशी। त्याचे गुण महत्तवासी।तुळणा कैची।यशवंत कीर्तिवंत।सार्मथ्यवंत वरदवंद।पुण्यवंत नीतिवंत।जाणता राजा।या समर्थ रामदासस्वामींच्या ओवी त्यांनी उद्धुत केल्या.

२७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याल माल्यार्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज भरण्यात जाणार असल्याचे गडकरी यांनी सांागितले.तोपर्यंत मतदार यादीत ज्यांची नावे सुटली आहे त्यांची नावे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता १२०० विद्यार्थी हे नवमतदार असल्याचे कळले असे सांगत मला बघायचं आहे दहा वर्षात ज्या प्रामाणिकपणाने मी काम केले त्याची पावती देण्यासाठी किती कार्यकर्ते आणि नागपूरकर मी नामांकन अर्ज भरेल तेव्हा स्वत:च्या दुचाकी,चारचाकींनी संविधान चौकात पोहोचतील,हे लोकशाहीचे यज्ञ असून इतक्या मोठ्या संख्येने माझ्या प्रचार कार्यालयाच्या उद् घाटनाप्रसंगी तुम्ही आलात ते बघून खूप आनंद झाला असल्याचे गडकरी म्हणाले.ही फार चांगली सुरवात आहे,असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत पवार म्हणाले,की मी पहिल्यांदा भाजपच्या मंचावर उपस्थित झालो आहे.आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार,प्रफूल्ल पटेल, सुनील तटकरे,राजीव जैन यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांना समर्थन जाहीर करण्यासाठी मी या मंचावर उपस्थित झालो असल्याचे पवार यांनी सांगितले.गडकरींना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे.गडकरींनी दहा वर्षात नागपूर शहराचा जो विकास केला आहे त्याला तोड नाही.माझ्यावर नेहमीच हा आरोप केला जातो की मी विकास विरोधी आहे,गडकरींनवर टिका करतो.मात्र,वास्तव असे नाही.खंर पाहिलं तर कांचनताई गडकरी या माझ्या बहीण लागत असून गडकरी हे जावई आहेत कारण माझ्या बहीणीची वर्ग मैत्रीण कांचन ताई होत्या व मी अनेकदा कांचन यांना घरी सोडून देत होतो,अशी आठवण प्रशांत पवार यांनी सांगितली.गडकरींनी शहरात मेट्रो आणली,सिमेंट रसत्यांचे जाळे विणले.क्रीडा संकुले बांधली,मिहानमध्ये उद्योग धंदे उभारण्यास पुढाकार घेतला.माध्यमकर्मी मला विचारतात,मी गडकरींचा विरोधक होतो आता कसा प्रचार कराल?२०१४ च्या निवडणूकीत गडकरी हे माझ्या कार्यालयात आले होते त्यावेळी ही मी त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन फिरत होतो,हे माध्यमकर्मींना माहिती नाही.काँग्रेसने नागपूरचा कोणताही विकास केला नाही असा आरोप करीत,यावेळी उत्तर नागपूरातून गडकरी यांना प्रचंड मत मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.पश्‍चिम तसेच मध्य नागपूरात देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्राबल्य असून त्याही मतदारसंघातून गडकरींना जास्तीत जास्त मत मिळवून देणार असल्याचे प्रशांत पवार यांनी घोषित केले.गडकरी हे पाच लाख मताधिक्यांनी विजयी होतील असे सांगत अजूनही गडकरींच्या विरोधात कोण उभे राहणार?तो उमेदवारच दिसत नसल्याची कोटी त्यांनी केली.आज फक्त गडकरींच्या प्रचार कार्यालयाचे उद् घाटन आहे तर एवढी प्रचंड गर्दी जमली आहे,ज्या दिवशी गडकरी पाच लाख मताधिक्यांनी विजयी होतील,त्यावेळी यापेक्षाही जास्त गर्दी असणार आहे,असे भाकीत त्यांनी वर्तवले.

यावेळी बोलताना बहूजन रिपब्लीकनच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांनी सांगितले की,भाजपच्या पहील्या यादीत गडकरींचे नाव नव्हते तेव्हाच मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मॅसेज केला की गडकरी यांची उमेदवारी घोषित हो किवा नाही हो आपल्याला त्यांना जिंकवायचं आहे.गडकरींना नागपूरात कोणताही पर्यायच नाही.ते एकमेव असे उमेदवार आहेत ज्यांची फक्त नागपूरलाच नव्हे तर संपूर्ण भारतालाच त्यांची गरज आहे.देशाचा पंतप्रधान कसा असावा तर गडकरींसारखा असे सांगत,मी काही भाजपची कार्यकर्ती नाही त्यामुळे मनमोकळं बोलण्यासाठी माझ्यावर कोणतीही बंधने नाहीत,असे त्या म्हणाल्या.मी बुद्धगया ते सारनाथ,कुशीनगर या बौद्धतीर्थस्थळांना मागील वर्षी डिसेंबरमध्ये भेट दिली असता,मला जपान,थायलंड,म्यामार,बर्मा इत्यादी देशातील पर्यटक भेटले व त्यांनी खास बौद्ध तीर्थस्थळे रस्ते महामार्गाने जोडल्यामुळे गडकरींसाठी आभाराचे संदेश पाठवले.जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला आणि निर्वाण झाले त्या बुद्धगयांकडे गडकरींनी लक्ष दिले,यासाठी ते फार आनंदी होते.नागपूरकर खूप भाग्यवान आहेत जे अश्‍या लोकप्रिय व्यक्तीला नागपूरमधून निवडून देतात.गडकरी हे भारतासाठी खूप अनमोल अाहेत असे सांगत,संपूर्ण भारतात सर्वाधिक विक्रमी मतांनी जो उमेदवार लोकसभेत निवडून गेला ते गडकरी आहेत,हा संदेश या निवडणूकीतून गेला पाहिजे,असे आवाहन सुलेखा कुंभारे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना भारिपचे जोगेंद्र कवाडे म्हणाले,की गडकरी हे दूरदृष्टि असणारे नेते आहेत.त्यांच्यामुळे जगात नागपूरची ओळख पोहोचली.नागपूरला संपूर्ण देशाशी जोडण्याचं काम गडकरी यांनी केले.हा महारथी सेवेचं व्रत घेऊन,कोणताही भेदभाव न करता सर्वांची कामे करतो.सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करतो.त्यांच्या कार्याची जाणीव फक्त नागपूरकरांनाच नव्हे तर पंतप्रधानांना देखील असल्याचे कवाडे यांनी सांगितले.कोणत्याही नेत्यामध्ये विचारशून्यता असता कामा नये.तीन ‘डी’हे महत्वाचे असून डिटरमिनेशन,डिसीप्लीन आणि डेडीकेशन हे तीन ‘डी’च माणसाला यशस्वी बनवित असतात.गडकरींमध्ये या तिन्ही ‘डी‘चा पक्का निर्धार आढळतो.देश संपन्न झाला पाहिजे,दलित,मुस्लीम सर्वांची फिकीकर करुन कार्य करणारा नेता म्हणजे गडकरी आहेत.‘हयात लेके चलो,कायनात लेके चलो,चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो’ही उक्ती म्हणत,शत्रूच्या खांद्यावरही आपुलकीने हात ठेवणारा नेता म्हणजे गडकरी आहेत,असे गौरवोद्गार कवाडे यांनी काढले.याप्रसंगी त्यांनी एक अपेक्षाही व्यक्त  केली व गडकरींवर मी संविधानाच्या संरक्षणाचे काम देखील सोपवित असल्याचे सांगितले.ज्या संविधानाने भारत मातेला अखंड ठेवण्याचे काम केले आहे,त्या संविधानाचे संरक्षण करण्याची जवाबदारी गडकरींवर असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी मंचावर ज्येष्ठ नेते दत्ता मेघे,माजी आमदार सुधाकर देशमुख,आ.कृष्णा खोपडे,मोहन मते,विकास कुंभारे,आ.प्रवीण दटके,मा.आ.डॉ.मिलिंद माने,आशिष देशमुख,भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे,मा.खा.डॉ.महात्मे,राष्ट्रवादीचे ईश्‍वर बाळबुधे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केले.

याप्रसंगी मोठ्या एलईडी स्क्रीनवर खास गडकरी यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले सुप्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेले ‘अबकी बारी विजय तिलक की करो तयारी,विजयी भव:नितीन गडकरी’’या गीताचे प्रमोशन करण्यात आले.यावेळी आगा खान यांच्यासह काही नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला.
……………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या