फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपत्रकारितेचं काळं जग...

पत्रकारितेचं काळं जग…

Advertisements

दहा लाखांच्या खंडणीच्या आरोपात पत्रकाराला अटक

संपादकाच्या विरोधात महिला पत्रकाराची विशाखा समितीत तक्रार

नागपूर,ता.२९ जानेवरी २०२४ :गुन्हेगारी म्हणजे समाजमान्य वर्तनाच्या चौकटीबाहरेचं वर्तन ज्यामुळे इतरांना शारीरिक,आर्थिक इजा पोहोचत असेल तर असं वर्तन कायद्याच्या कक्षेत शिक्षेस पात्र ठरतं मात्र ,पत्रकारितेच्या जगात गुन्हेगारी म्हणजे मूल्य,नीती व तत्वे यांनाच हरताळ फासून केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर करणा-यांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या एवढ्या प्रदीर्घ काळातही कोणत्याही कठोर शिक्षेचे प्रावधान नाही,हीच खरी शोकांतिका आहे.पत्रकारितेच्या आड लपून मंत्र्यांपासून तर नेत्यांपर्यंत,औषध विक्रेत्यापासून तर अगदी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदा घेणा-यांकडून पैसे लुबाडणा-या नव्हे तर ‘लृटणा-या’पत्रकारांना काय म्हणावे?कुठे नेऊन ठेवली उपराजधानीतील पत्रकारिता?हे शब्द,हा उपहास देखील न्यून ठरावा अशी कृती..नव्हे..असे कृत्य नागपूरात पत्रकारितेच्या जगात सातत्याने घडताना दिसत आहे.

नागपूरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नावाजलेले नाव क्राईम रिर्पोटर रविकांत कांबळे हे असून आज गडचिरोलीतील पोलिसांनी त्याला अटक केली.हनी ट्रॅपमध्ये गडचिरोलीतील एका शासकीय कार्यालयात कार्यरत अभियंतालाच या पत्रकाराने व एका पोलिस कर्मचा-याने फसवून खंडणीची रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला!

दिनांक २९ जानेवरी २०२४ रोजी गडचिरोली येथील पोलिस ठाण्यात एका शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक ३ जानेवरी २०२४ रोजी ते शासकीय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील एक आरोपी फिर्यादीचा जुना मित्र असून त्या सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील एका हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिली.यावेळी फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी फिर्यादीच्या खोली मध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावुन त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली.

या घटनाक्रमातून पिडीत फिर्यादीने आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास २८ हजार रुपये तसेच २ ते ३ लाख रुपये नगदी रक्कम दिली. मात्र,तरी देखील सर्व आरोपींनी संगनमत करुन बेकायदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचे कट कारस्थान रचले व फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोदर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन, बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन, हे प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर धाकदपटशाही केल्याची तोंडी तक्रार दिली.या तक्रारीवरुन अप क्र. ६०/२०२४ कलम ३८४,३८९, १२० (ब) भादवि अन्वये पोलिस ठाणे गडचिरोली येथे गुन्हाची नोंद करण्यात आली.

१० लाख रुपये खंडणीतून वसूल करण्यासाठीच्या या गुन्हात चक्क एक पोलिस कर्मचारी व एक पत्रकारच सहभागी असल्याने सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपींचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने, गोपनीय सुत्रधारांकडुन खात्रीशीर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे १) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, २) रविकांत कांबळे रा. नागपूर, ३) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर ४) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन गडचिरोली यांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यातील एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे. वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली.

सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत. .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुन फेगडे यांच्या नेतृत्वात स्था.गु.शा. गडचिरोलीचे सपोनि. राहुल आव्हाड, पोहवा.,अकबर पोयाम, मपोहवा,लक्ष्मी विश्वास, मपोअं,वालदे, पोअं बोईनार, पोअं परचाके, पोअं प्रशांत गरुफडे, चापोहवा १६८१ मनोहर तोगरवार चापोना माणिक निसार, चापोअं दिपक लोणारे यांनी पार पाडली.

अशी प्रेस नोट पोलिस विभागाकडून प्राप्त होताच आज पुन्हा एकदा नागपूरातील पत्रकारितेच्या विश्‍वात मोठी खळबळ माजली.रविकांत कांबळे यांच्या आई व दीड वर्षाची चिमुरडी राशी, यांची काहीशा पैशांसाठी निघृण हत्या करण्यात आली आहे.एक व्यक्ति म्हणून नागपूरच्या पत्रकारितेच्या जगात रविकांत कांबळे यांच्या पाठीशी संपूूूर्ण पत्रकारितेचं जग उभं झालं.त्यांच्या न्यायासाठीच्या लढाईत बातमीच्या स्वरुपात सर्वच प्रकारच्या माध्यमांनी ठलक दखल घेऊन वृत्त प्रसारित केले मात्र,आपल्या जीवनात इतकी मोठी त्रासदी घडल्यानंतर,जिने जन्म देऊन जगात आणले ती आईच व जिला जन्म देऊन जगात आणले ती चिमुरडी राशीच अशा रितीने जगातून निघून गेल्यावर एखादी इतर कोणी व्यक्ति असती तर त्याच्या जीवनात विरक्ती आली असती.इतका मोठा आघात सहन केल्यानंतर पैसे,लोभ,स्वार्थ,चंगळवाद अशा भावनांपासून दूर राहीली असती मात्र….!पैसा,लोभ माणसाला नीतीशून्य करतो हे तर सगळीच धर्मशास्त्रे सांगतात पण इतकं भावनाशून्य ही करतो,याचे उदाहरण उपराजधानीत आज पत्रकारितेच्या जगतात बघावयास मिळाले,हे खरे दूर्देव.

ज्या डिजिटल माध्यमात हा पत्रकार काम करीत होता,त्याच्यात अर्धी भागीदारी असलेल्या एका काँग्रेसच्या नेत्याला ‘सत्ताधीश’ने यातील तथ्य विचारले असता,आम्ही त्याला कामावरुन तात्काळ निलंबित केले असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेवरुन नागपूरातील पत्रकारितेच्या जगातील काही वरिष्ठ व सन्मानीय माजी संपादकांनी काही माध्यमांच्या मालकांच्या अतिशय भ्रष्ट कारभाराचा पाढाच वाचून दाखवला.

मंत्र्यांपासून तर नेत्यांपर्यंतच्या ओळखीतून त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यात गुंतलेले काही माध्यकर्मी,त्यातून स्वत:साठी जमवलेली अफाट माया,जमीनी,पुन्हा स्वत:चा पैसा पांढरा करण्यासाठी पत्रकारितेचा घेतलेला ‘वसा’नव्हे तर ‘आडोसा’यावर बरीच आगपाखड पत्रकारितेला समर्पित या काही माजी संपादकांनी खासगीत केली.

नागपूरातील पत्रकारितेच्या या काळ्याकुट्ट जगात फक्त खंडणी,वसुली अशा आर्थिक गुन्ह्यांचाच समावेश नसून आपल्या कार्यालयात काम करणा-या महिला पत्रकार किवा महिला कर्मचा-यांच्या,बापाची जागीर समजून, लैंगिक शोषणाचा प्रयत्न, इथपर्यंत मजल संपादकाची गेलेली आढळते!संपूर्ण नैतिकता गुंडाळून संपादक पदावरील एक सन्मानीय(अति सामान्य) व्यक्ती स्वत:ला ‘कामदेवचा’ अवतार समजू लागली व स्वत:च्या कार्यालयात काम करणा-या एका तरुण महिला पत्रकाराला दोन-दोन तास केबिनमध्ये बसवून ठेऊ लागली.तिला हे सांगत की ती का बरं आनंदी दिसत नाही?तिच्या जीवनात लैंगिक सुख ती भरभरुन का घेत नाही?तिला हवं असेल तर तो संपादक……!

पश्‍चिम महाराष्ट्रात नंबर वन चा दावा करणा-या या वृत्तपत्राच्या विदर्भ आवृत्तीत नेमके याच पदावर बसणारे काही महाभाग संपादक त्या खूर्चीवर बसताच ‘कामदेवचे अवतार’कसे होऊन जातात?यावर खरं तर जनसंवादच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करुन आचार्य पदवी मिळवायला हवी.विदर्भ आवृत्तीच्या संपादक पदावरील एक नव्हे तर दोन-दोन माजी संपादक हे चिखलद-याच्या रम्य पर्यटनस्थळावरील हॉटेलमध्ये आपल्याच कार्यालयातील महिला कर्मचा-यांसोबत(अर्थात त्यांच्या सहमतीने)जीवनाचा परमोच्च आंनद कसे घेत होते,याचे किस्सेच नागपूरातील पत्रकारितेच्या जगात आजही चवीने चर्चिले जातात.

त्या दोन्ही माजी संपादकांनी फक्त ती सन्मानीय खूर्चीच कलंकित केली नाही तर त्या माजी संपादकांची मजल राज्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या फार मोठ्या नेत्याकडून २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकी पूर्वी पाऊण-पाऊण कोटींच्या ‘सेटिंग’चे किस्से ही तितकेच जगप्रसिद्ध आहेत.याच सेटिंग-गेटिंगमुळे त्यांची पदावरुन गच्छंती झाल्यानंतर(अद्यापही त्यातील दोन तरलेत एक नेत्याच्या कृपेने तर दूसरा त्याच्या आवृत्तीचा मूळ मालक हा परदेशात बसल्याकारणाने)त्याच खूर्चीवर या नंबर वन च्या पुण्यातील मालकाने असा संपादक खूर्चीवर बसवला ज्याची लायकी जिल्हा प्रतिनिधी होण्याची देखील नसल्याची खोचक टिका केली जात असते! अकोल्याचा ‘टायटॅनिक’ बुडविल्यानंतर देखील बढती देऊन ‘पुणे तिथे काय उणे’करांनी या महाभागाला चक्क विदर्भ आवृत्तीच्या संपादक पदी बसवले.संपादक झाल्यानंतर त्यांच्या कार्यातील प्रगतीचा कोणताही आलेख ते पुणेकर तपासण्याची तसदी देखील घेत नाही,हे विशेष!

समुद्रातून चार तांब्यांची गंगाजळी विदर्भ आवृत्तीमुळे वाहून गेली तरी मालकाला जेव्हा काहीच फरक पडत नसतो तेव्हा अश्‍या कृतिशून्य,लिंगपिसाट,कर्तृत्वहीन व्यक्ति इतक्या जवाबदार पदावर नियुक्त होत असते ,या वृत्तपत्राचे मालक हे आपल्या कृतीतून सिद्ध करतात आणि हे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर वारंवार या वृत्तपत्राच्या बाबतीत घडताना दिसूनही पडतंय मात्र,तरीही … कार्यालयात काम करणारी काेणतीही तरुणी,महिला हिच्या आत्मसन्मानासोबत खेळण्याचा हक्क कोणत्याही संपादकाला मिळत नाही,भारताचा संविधान त्याला पुरुषसत्ताक समाजरचनेचा माज दाखविण्याची परवानगी देत नाही.

या तरुणीने विशाखा समितीमध्ये या संपादकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून नागपूरातील संपूर्ण पत्रकार जगतात ही घटना माहिती आहे.त्या कामपिपासू संपादकाविरोधात पत्रकार जगतात तीव्र संताप दिसून पडतोय.फक्त त्या संपादकाची मर्जी राखण्यास त्या तरुण महिला पत्रकाराने ठामपणे नकार दिल्याने तिची कोणतीही बातमी प्रसिद्ध केली जात नाही.तिची होणारी घुसमट,मानसिक ताण-तनाव,तक्रार केल्यामुळे नोकरी गमावण्याची भीती,मालकाच्या सारासार विवेकबुद्धीवरील विश्‍वासाची जीवघेणी प्रतिक्षा हेच तिच्या वाटेला आले असून, स्त्री म्हणून या भूतलावर जन्म घेण्याचंच जणू ‘प्राक्तन’ ती सध्या भोगत आहे.

विशाखा समितीसमोर हे महाभाग ‘बयाण’देऊन आले असले तरी अद्याप खूर्चीवरच विराजमान आहेत.मार्चनंतर यांच्याही गच्छंतीची चर्चा असली तरी एखाद्या स्त्रीच्या आत्मसन्मानाच्या प्रश्‍नावर मालकाकडून तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा आजही पुरोगामी महाराष्ट्रात घडू शकत नाही,हेच खरं. ११ महिन्यांचा करार तात्काळ रद्द करण्याचा अधिकार मालकाला आहे.मात्र,तो रद्द करण्यासाठी मनाचा कणखरपणा मनगटात उतरावा लागतो, तो आजकालच्या ‘व्यवसायजीवी’माध्यमकर्मी मालकांच्या मनगटात आढळत नाही,हे वास्तव कोण नाकरु शकेल?

नुकतेच एका माध्यम सम्राट मालकाला चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली .चार दिवस कारागृहात राहून जामीनावर हे माध्यम सम्राट आजही बाहेर वावरत आहेत.भूखंडाचे श्रीखंड लाटण्याची किमया त्यांनी लिलया साधली असल्याने, त्यांना ही शिक्षा भोगणे क्रमप्राप्तच आहे.मात्र,आज पत्रकारितेचं जग हे पूर्णपणे काळंकुट्ट झालेलं दिसून पडतंय.चांगल्या चारित्र्याची माणसे ज्याप्रकारे राजकारणात जाण्यास धजत नाही तीच स्थिती आज पत्रकारितेची झाली आहे.

एक संपादक महोदय नुकतेच सत्ताधा-यांच्या पात्रता-अपात्रेच्या निर्णयावर एका सार्वजनिक कार्यक्रमात भरभरुन बोललेत.लोकशाही,संविधान,जनतेची जागरुकता,ईव्हीएम इत्यादी विषयावरील त्यांचं ज्ञान ते उपस्थितांसमोर भरभरुन पाझरत होते व टाळ्याही घेत होते मात्र,पाऊण कोटी घेणा-याच्या यादीत त्यांचेही नाव समाविष्ट होते हे मात्र ते विसरले असतील तरी काही चाणाक्ष पत्रकार विसरले नव्हते…!चंद्रपूरच्या नेत्याची कृपा…‘तेरी बख्शिश के भरोसे खताऍं की हैं….तेरी रहमत के सहारे ने गुनहगार किया ’हे पत्रकारितेसारख्या मूल्याधिष्ठित व्यवसायात स्वीकार्य नाही…कधीही स्वीकार्य होऊ शकत नाही..!तुर्तास इतकंच.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या