

‘मी निर्मोही’तर्फे सुरांची अप्रतिम बरसात
दानदात्यांचाही केला सत्कार
नागपूर,ता. १४ जून:‘ मी निर्मोही ’ संस्थेतर्फे नुकतेच शनिवार दि.१२ जून रोजी कविवर्य भट सभागृहात मराठी व हिंदी गीतांचा ‘श्रावण सरी’हा सुरेल नजराणा सादर झाला.तब्बल १४ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर नागपूर शहरात सूरांच्या या सुरेल सरी बरसल्या आणि श्रोते ही यात चिंब-चिंब भिजले.
‘मी निर्मोही’ ही एक सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे ती निरंतर झटत असते कलावंताच्या उत्थानासाठी.
वर्ष २०१२ साली झाडीपट्टीतील नाट्य कलावंताच्या गाडीला अपघात होऊन त्या गाडीत असलेले सर्वच कलावंत मृत्युमुखी पडले होते!.
ज्यांचा उदरनिर्वाहच कले वर अवलंबून होता, त्या घरातला कर्ताच जर मृत पावला असेल तर त्याच्या परिवाराला किती संकटांना सामोरे जावे लागते हे त्या परिवारातील सदस्यांनाच माहिती असतं .
त्या अपघातात नागपूरचेही शेषराव मोहूर्ले, मोहन धांडे व निखिल मते हे तीन कलावंत मृत्यूमुखी पडले होते. त्या परिवारांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली तेव्हा त्यांना मदत करायला समोर आले काही मित्र आणि उभी झाली एक संस्था ‘ मी निर्मोही ’ .
८ जून २०१२ ला ’ मी निर्मोही ’ ची स्थापना झाली आणि त्याच वेळी निर्णय झाला जर एखाद्या कलावंताला मग तो कुठल्या ही क्षेत्रातला असला आणि त्याला कधी काही मदत लागत असेल आणि ती ‘ मी निर्मोहीला’ कळली तर हे निर्मोही मित्र सर्वच भेदाभेद सोडून त्या कलावंत मित्राच्या मदतीला धावून जातील.याच उदात्त भावनेतून या संस्थेने मृत पावलेल्या झाडीपट्टीतील त्या तिन्ही कलावंताच्या कुटुंबियांना ५१ हजार रुपयांची मदत केली हाेती,एवढंच नव्हे तर चिटणीस पार्क येथे सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर व उत्तरा केळकर यांचा सांगितीक कार्यक्रम घेऊन तो निधी गरजू कलावंतांच्या भविष्यासाठी उपयोगात आणला.
हजारो कलावंतांचे सदस्यत्व असणा-या निर्मोहीने गत सोळा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे कलावंतांच्या जगण्यातला उधवस्तपणा जवळून अनुभवला. प्रदीर्घ काळातील कार्यक्रम बंदीमुळे अनेक कलावंत रस्त्यावर आलेत. होतं ते पदराचं कधीच संपलं, पण जगण्यासाठी माणसाला अन्न वस्त्र निवारा लागतोच.
वस्त्र आणि निवारा एक वेळी कमी असला तरी भागतं पण, अन्न हे लागतच त्या वाचून कुणी ही राहू शकत नाही . ही जाण ठेवून परत एकदा कलावंताच्या मदतीला कोरोना लाॅकडाउन काळात ज्या लोकांनी ‘मी निर्मोही’ धाऊन आली.
गेली सोळा महिने कोरोनाच्या या लाॅकडाउनमुळे सर्वच कलावंत घरी बसले काही एक काम नाही. नाटक, गीत संगीत सर्वच कार्यक्रम मायबाप सरकारने बंद ठेवली.
मुंबईची मायानगरी चित्रपट सृष्टी जेमतेम निम्म्याहून अर्ध्या कलावंत आणि इतर सहकार्यांची मदत घेवून कशीबशी चालत आहे. पण उर्वरित महाराष्ट्राचे काय ? कलावंतांचे काय ?
यावर सरकारनेही लक्ष दिले नाही . मग अश्या कठीण समयी नागपूरच्या ‘मी निर्मोही’ ने ठरवलं आमच्या कलावंत बंधू बांधवाना काही तरी थोडी फार जेवढं शक्य होइल तेवढी मदत करू.
याच हेतूने ‘मी निर्मोही’ ने एक साद घातली ती नागपूरच्या मित्रांना आणि बघता बघता मदतीला नागपूरातील अनेक मित्र धावून आले.
अनेकांनी आप आपल्या परीनं आपल्या कलावंत मित्रांना मदत पुरवली ती या हाताची त्या हाताला कळणार नाही या वृत्तीने.
कोणी आर्थिक मदत केली तर कोणी धान्य पाठवले तर काहींनी इतर रोज लगाणाऱ्या वस्तू पाठवल्या. तब्बल चार हजारच्यावर धान्य आणि इतर साहित्य असलेल्या किट तयार झाल्या . त्या किट अत्यंत गरजवंताला देण्यासाठी एक चमू तयार करण्यात आली आणि ज्यांना खरंच गरज होती अश्या कलावंत परिवाराला त्या वाटण्यात आल्या, तर काहींना आर्थिक मदतीचा हात भार लावला.
बघता बघता जवळपास पंधरा महिन्या नंतर चार दिवसांपूर्वी सरकार ने काही बंधने शिथील केली, गीत संगीत नाटकांचे कार्यक्रम परत सुरु होतील असे घोषित केले.एक आनंद आणि उत्साह पुन्हा सर्व कलावंतामध्ये संचारला .आणि परत या वेळी ही ‘मी निर्मोही’धावून आली या कलावंताच्या मदतीला.सर्व कलावंतामध्ये तोच उत्साह कायम व्हावा हे उद्दिष्ट समोर ठेवून नागपूरच्या संगीत क्षेत्रातील काही कलावंताना घेवून हा मराठी हिन्दी गीत संगीताचा बहारदार कार्यक्रम स्थानिक कवीवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला.
वास्तविक श्रावणाला अजून अवकाश आहे तरी पाउस सुरु झाला आहे. पावसाळ्यात चिंब भिजून जसं आपण मन मोकळेपणाने गाणं म्हणतो तसंच आज या श्रावण सरीच्या सूरांनी श्रोत्यांना चिंब भिजवलं.
नागपूरचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला परिचित असले की-बोर्ड वादक श्रीकांत पिसे यांच्या संगीत नियोजनात या बहारदार कार्यक्रमाला “वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभं” या श्री गणेशाच्या स्तुती ने सुरुवात झाली.ज्यष्ठ निवेदक किशोर गलांडे यांचे उत्कृष्ट असे निवेदन आणि ख्यातनाम गायकांची प्रस्तुती आणि त्याच तोडीचे साथ संगत करणारे वादक कलावंत असले तर कार्यक्रमात बहर येतोच हे निर्विवाद सत्य आहे.आकांक्षा नगरकरने पावसाळ्यात भिजवायला सुरवात केली ती, “ॠतू हिरवा ॠतू बर्वा” , या गीताने.
खरंच निसर्ग किती गमतीदार आहे, उन्हाळ्यात कोरड्या जमिनी वर रोज किती ही पाणी ओतले तरी त्या जमिनी वर हिरवाई येत नाही पण, पावसाळ्यात पावसाच्या दोन चार सरी जरी आल्या तरी ती जमिन हिरवीगार होते, शेतकरी आनंदी होतो. तसंच कलावंत ही आनंदी झाले कारण सवा वर्षा नंतर परत रंगमंचा चा पडदा उघडला होता.
या आनंदात दुसरं गाणं झालं ते राज कपूर नर्गिस वर चित्रित चोरी चोरी या चित्रपटातलं सुपरहिट “ये रात भीगी भीगी” अनुजा सावजी आणि भूषण जाधव यांनी प्रेक्षकांना एकदम ब्लॅक एन्ड व्हाईटच्या काळात घेवून गेले.अमिताभ बच्चन यांच्या देश प्रेमी या चित्रपटातलं गाणं “मेरे देशप्रेमियो ” च्या चालिवर चिरंजीव नावाच्या एका नवोदित गीतकाराने कोरोना वॅक्सीनेशन लावण्यावर एक पैरोडी लिहिली, ती नागपूर चे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड वर नमुद करणारे प्रख्यात गायक सुनील वाघमारे ने सादर केले .
“1942 अ लव्ह स्टोरी” अनिल कपूर मनीषा कोईराला यांचा सुपरहिट सिनेमा पण या चित्रपटातलं सुपरहिट गाणं “रिमझिम रिमझिम” आर डी बर्मन ने जेवढ्या दमाने तयार केलं तितकच दमदारपणे कलावंत मुकुल पांडे आणि अंकिता टकले यांनी सादर केलं.आर डी ने संगीतबद्ध केलेलं गाण गातांना गायकांचा ही चांगला कसब लागतो तो कसब या दोघांनी आपल्या सादरीकरणात दाखवला.नागपूरच्या ज्या कलावंतांनी पार विदेशात जाऊन अमेरिका पासून तर ऑस्ट्रेलिया पर्यंत आणि दक्षिण अफ्रिका पासुन तर युरोप पर्यंत सर्वच ठिकाणी “डंके की चोट ” , पर कार्यक्रम सादर केले तेनागपूरच्या सुरभी ढोमणे या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिकेच्या नावावर अमेरिकेत “सुरभी ढोमणे फॅन क्लब आहे” हे बहुतेक नागपूरकर मंडळीला माहिती नसेल.”रिमझिम गिरे सावन” या गिताला न्याय दिला तो सारंग जोशीने.
पावसाची रिपरिप म्हंटलं की एक गोष्ट आवर्जुन आठवते ती म्हणजे आल्हाददायक गारवा,अश्या वेळी गजल ऐकण्याचा मूड होतो, ती गझल ऐकण्याची मुराद पुर्ण केली ती नागपूर चे सुप्रसिद्ध गझल गायक प्रसन्न जोशी याने.”बिन कामाचा नवरा ” या चित्रपटातलं मधु कांबीकर , कुलदीप पवार वर चित्रित गाणं आकांक्षा नगरकर ने सादर करुन पावसाळ्यात सर्वांना भिजवावं तसं गात चिंब ओलं केलं.
यात भरीस भर म्हणून निरंजन बोबडेनी छलिया चित्रपटातलं राज कपूर चे शंकर जयकिशन ने संगीतबद्ध केलेलं , “डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा” सादर करतांना एक दम मुकेशची आठवण श्रोत्यांना करून दिली आणि खरं आहे ज्या वेळी आभाळ भरून येतो त्या वेळी कवि मन एखादी रचना करतो ती अप्रतिम असते.प्रशांत भिंगारे आणि वीणा उकुंडे यांनी ज्या वेळी , ” घटा छा गयी” गायला सुरुवात केली त्याच वेळी मस्त आभाळा सारखं सभागृह भरून आलं. गाणं संपत नाही तोच, वन्स मोअर च्या निनादात सभागृह भरून गेलं आणि ज्या गाण्याला प्रेक्षक माय बापांनी ” वन्स मोअर ” केलं. ते गाणं किती मस्त झालं असेल याची पावती असते.
अंकिता टकले हिने सादर केलेलं , ” अधीर मन झालं” , अजय अतुल यांचं , नव्या दमाचं संगीत ज्या वेळी श्रेया घोषाल ही बंगाली गायिका सादर करते त्यावेळी ती बंगाली होती की मराठी हे कळत नाही कारण रोसोगुल्ला गालात भरून बोलणारी ही बंगाली मुलगी आपल्या महाराष्ट्र च्या पुण्यात लहानाची मोठी झाली तेव्हा ती “आभाळ” ला “आभाळ” च म्हणते “आभाड किंवा आभाल ” म्हणत नाही हे विशेष कौतुक करण्यासारखे आहे .शेवटी मेघांची गर्दी ओसरायला लागली आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यातलं गीत “मेघा रे मेघा रे “, आकांक्षा आणि संकेत नागपूरकर यांनी भैरवी सादर केली.
या सर्व गायकांना दमदार साथ दिली , श्रीकांत पिसे याच्या संगीत नियोजनात तयार झालेला कार्यक्रमाला बांसरी वर अवघ्या महाराष्ट्राला भगवान श्रीकृष्ण प्रमाणे आपल्या वेणू वादनाने वेड लावणारे अरविंद उपाध्ये, गिटारीस्ट गौरव टांकसाळे, बेस गिटार राकेश वानखेडे, की बोर्ड वर अजीत भालेराव, ऑक्टोपॅड महेन्द्र वाटूळकर, तबला प्रशांत नागमोते, ढोलक प्रमोद बावने, पंकज यादव आणि छोटे छोटे अनेक वाद्य वाजवण्यात निष्णात असलेले विक्रम जोशी यांनी.
या सर्व कलावंताचे स्वर आणि सूर तितक्याच कर्ण प्रिय रुपात प्रेक्षकांना पोहचवणारे म्हणजे ध्वनी क्षेपण व्यवस्था सांभाळणारे बंडू पदम आणि त्यांचे सहकारी, सर्व कलावंताना आपल्या लख्ख प्रकाशात भिजवणारे लकी खान या सर्वांनीच आपली जबाबदारी हा कार्यक्रम ’माझा’ आहे या भावनेने पार पाडली .
या संपूर्ण कार्यक्रमात पडद्या मागे उभे राहून रंगमंचाचा पडदा उघडायला लावणारे अविनाश सोनुले, वीरेंद्र लाटणकर,महेश कुकडेजा,
संदीप बारसकर, अनुपमा भोजराज, विलास पुजारी, प्रफुल्ल माटेगावकर, निरंजन बोबडे,सचिन ढोमने, गजानन रानडे आणि ‘मी निर्मोही’ चे असंख्य सभासद यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले.
दानदात्यांचा सत्कार-
संस्थेला कुठल्याही प्रकारची ज्यांनी-ज्यांनी मदत केली अश्या सर्व दानदात्यांचे सत्कार महापौर दयाशंकर तिवारी यांचे हस्ते कार्यक्रमादरम्यान पार पडला हे विशेष.‘ती निर्मोही’ला वेळोवेळी मदतीचे हात देणारे संदीप बारसकर, दादू गडेकर,देवेंद्र दोडके, अनुपमा भोजराज, विलास पुजारी, प्रफुल्ल माटेगावकर, निरंजन बोबडे,सचिन ढोमने, गजानन रानडे यांचा सत्कार या प्रसंगी महापौरांच्या हस्ते पार पडला.




आमचे चॅनल subscribe करा
