फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपंतप्रधान,प्यारे खान,मुस्लिम समाज आणि राजकारण

पंतप्रधान,प्यारे खान,मुस्लिम समाज आणि राजकारण

Advertisements


विदर्भ मुस्लिम इंटलएक्च्यूअल्स फोरमचे चर्चासत्र

नागपूर,ता.४ फेब्रुवरी २०२४ : देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात मुस्लिम समाजाची आजपर्यंतची दशा आणि दिशा ठरविणाच्या उद्देशाने गठीत विदर्भ मुस्लिम इंटलएक्च्यूअल्स फोरमची स्थापना करण्यात आली.या फोरमसोबत मुस्लिम समाजातील बौद्धिक वर्ग मोठा प्रमाणात जुळला असून ,विविध शहरात या फोरमद्वारे बौद्धिक चर्चासत्र पार पडत आहे.नागपूरात आज रविवार दिनांक ४ फेब्रुवरी रोजी सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथील सभागृहात हे चर्चासत्र पार पडले.‘मुल्क में खत्म होती मुस्लिम सियासत और उसकी वजूहात’या विषयावरील या चर्चासत्रात बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे ट्रस्टी व सुप्रसिद्ध उद्योजक प्यारे खान यांनी देखील सहभाग नोंदवला.याप्रसंगी त्यांनी अनेक बाबींना स्पर्श केला.

सुप्रसिद्ध अधिवक्ते व फोरमचे समन्वयक ॲड.फिरदोस मिर्झा यांनी काही प्रश्‍नांची उत्तरेही जाहीर मंचावरच त्यांना मागितली,त्या प्रश्‍नांची उत्तरे दिलखुलासपणे प्यारे खान यांनी दिली.

याप्रसंगी मुस्लिम समाज,भारतीय जनता पक्ष व राजकीय परिपेक्षातील संदर्भ देताना प्यारे खान यांनी एक अनुभव सांगितला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासारख्या एका मुस्लिम व्यक्तीला दिलेली वागणूक ,याविषयी ते बोलले.दिल्लीत जेव्हा पंतप्रधानांसोबत प्यारे खान यांची भेटीची वेळ ठरली तेव्हा केंद्रिय मंत्री स्मृति इराणी यांनी हेच सांगितले, की मोदी हे दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ देत नाहीत.परिणामी फक्त दोन मिनिटात मी पंतप्रधानांसोबत काय बोलणार,स्वत:विषयी काय सांगणार हा गहन प्रश्‍न माझ्या समोर उभा राहीला.मी पंतप्रधानांचे सचिव हिरेन जोशी यांनाच माझ्याबद्दल सांगण्याची विनंती केली असता, त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला एक क्लिप दाखवली त्यात माझा ऑटो चालक पासून तर करोना काळ,ऑक्सीजनचा लढा तसेच बाबा ताज ट्रस्टच्या विश्‍वस्त पदाची संपूर्ण कारकीर्द होती!

लॉनमध्ये आम्ही सर्व वीस निमंत्रित पंतप्रधानांची वाट पाहत बसलो.पंतप्रधान आले आणि त्या वीस निमंत्रितांपैकी सर्वात आधी माझ्या जवळ आले आणि ‘प्यारे खान जी मेरे लिये नागपूर से आप ऑक्सीजन लेकर आये है क्या?’अशी मिश्‍किली त्यांनी केली.भाजप आणि मुस्लिम संबंधांविषयी सांगण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

आपल्या भाषणाची सुरवात प्यारे खान यांनी कवि इकबाल यांच्या ’सारे जहाँ से अच्छा हिंदूस्ता हमारा,हम बुलबुले है इसकी ये गुलसिताँ हमारा’या राष्ट्रभावनेने ओतप्रोत गीताच्या पंक्तीने केली.आजच मला दिल्लीला जाणे गरजेचे होते.नागपूर ते दिल्लीचे विमान १२.५५ चे होते त्यामुळे फोरमचे समन्वयक ॲड.फिरदोस मिर्झा यांना या कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकणार नसल्याचे कळवले मात्र,त्यांनी माझ्यासाठी खास त्यांच्या प्रयत्नातून चार्टड विमानाची सेवा उपलब्ध करुन दिल्याने मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो असे सांगून त्यांनी फिरदोस मिर्झाचे विशेष आभार मानले.

आजच्या या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षातील अनेक राजकीय विभूती उपस्थित आहे मात्र,मी राजकीय व्यक्ती नसून फक्त एक उद्योजक असल्याचे ते म्हणाले.या फोरमचा उद्देश्‍यच आहे की मुस्लिम समाजासाठी काही तरी करायला हवे मात्र,नेमकं काय करायचं?देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली.देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात मुस्लिम कौमने देखील आपले रक्त सांडले आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या हातात सत्तेची बागडोर आली त्यांची मुस्लिमांप्रति अत्यंत चुकीची नीती व मुस्लिम समाजाला गुलाम समजण्याच्या मानसिकेतेने शिक्षण, रोजगार आणि राजकारणाच्या बाबतीत सर्वात खालच्या स्तरावर मुस्लिमांना ठेवले.ज्याची फळे आताही मुस्लिम समाजाला भोगून द्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.आज मुस्लिम समाज खूप जास्त गरीबीच्या छायेत आपले आयुष्य घालवत आहे.सच्चर समितीने देखील मुस्लिम समाजाच्या अत्यंत हलाकीच्या जीवनाबाबतचा अहवाल सत्ताधा-यांना सोपविला होता.जिथे मुस्लिम समाजातील मुलांच्या डाेक्यावर शाळा व हातात लेखणी हवी होती, आज त्या समाजाच्या मुलांच्या हातात ऑटो रिक्शा आहे,पंचर सुधारण्याची यंत्रे आहेत,त्यांच्याकडे पानाचा ठेला,चहाचा ठेला आहे,त्यांच्या हातात पाणे पेंचिस देण्यात आली आणि दूर्देवाने मुस्लिम समाजाला एखाद्या उम्दा इमाम(नेता)देखील मिळाला नाही.मुस्लिम समाजाच्या चांगल्या परिस्थितीसाठी सत्ताधा-यांशी लढणारा नेताच आजपर्यंत आपल्या समाजाला आतापर्यंत मिळाला नसल्याची खंत प्यारे खान यांनी व्यक्त केली.

याचा परिणाम हा झाला की सत्तेमध्ये मुस्लिम समाजाची भागीदारी ‘शून्य’ झाली.मात्र,आता नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.मुस्लिम समाजाला शिक्षण,रोजगार आणि राजकारणातील सहभागिता वाढवावीच लागेल असे सांगत,‘नजर को बदलो तो नजारे बदल जाते है,सितारो को बदलो तो सितारे बदल जाते है,कश्‍तीयाँ बदलने की जरुरत नही,दिशा काे बदलो तो किनारे खूद ब खूद बदल जाते है’हा शेर त्यांनी ऐकवला.मुस्लिम हा प्रत्येक गोष्ट ही खूप प्रामाणिकपणे करतो.आज आपल्या देशात मुस्लिम समाज देखील सरकारला ‘कर’(जकात) देत असतो,तर आपण धोरणात्मक निर्णय(पॉलिसी) का घेत नाही?असा सवाल त्यांनी केला.प्रत्येक मुसलमान सरकारला कर देतो,काही प्रत्यक्ष कर भरतात,काही अप्रत्यक्ष कर भरतात.हजारो,कोट्यावधी रुपये.मी देखील यावर काम सुरु केलं आहे की मुसलमान सरकारला किती कर देतो.मग तो ताजुद्दीनबाबा ट्रस्टच्या माध्यमातून असो,पर्यटनच्या माध्यमातून असो,जामा मज्जिदच्या माध्यमातून असाे.आपल्या समाजात ‘ज्ञानचंद’ची कमतरता नाही तर ’करमचंद’ची कमतरला असल्याची मिश्‍किल कोटी त्यांनी केली.अनेक ज्ञानचंद हे जाहीर कार्यक्रमात खूप बोलतात मात्र कार्यक्रमानंतर समाजासाठी काहीच करत नाही,त्यामुळेच मी अश्‍या कार्यक्रमात जाणे टाळतो.आम्हाला ज्ञानचंदांऐवजी करमचंदांची आज खरी गरज आहे जे समाजाला काही देऊ शकतील आणि समाजासाठी काही करु शकतील,असे प्यारे खान म्हणाले.

२८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूरात दिघोरी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वर्धापन सोहळा पार पडला.मंचावर शेकडो नेते उपस्थित होते मात्र,एकही मुस्लिम नेता काँग्रेसच्या मंचावर उपस्थित नव्हता.इतकंच नव्हे तर संपूर्ण शहरात या कार्यक्रमाचे हजारो प्रसिद्धी फलक लागले होते त्या फलकांवरही एक ही मुसलमानाचे छायाचित्र नव्हते.मी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिस अहमद यांना फोन लावला व त्यांना सांगितले की मी तुम्हाला २५ लाख रुपये देतो संपूर्ण नागपूरात मुस्लिमांचेही प्रसिद्धी फलक लावा.त्यांनी उत्तर दिले ‘मी असे करु शकत नाही,वरुन आदेश नाहीत!’मी त्यांना सांगितले मी तुम्हाला भाजपचे फलक लावण्यास सांगत नाही,मुसलमान काँग्रेसींचे फलक लावण्यास सांगत आहे.तुम्ही मुसलमानांना मोठे तर करा मात्र,असे घडले नाही.

याप्रसंगी प्यारे खान यांनी ‘मॉब लिंचिंग’यासारख्या संवेदनशील विषयाला देखील हात घातला.अनेकांनी या मंचावरुन विविध देशातील कायदे कानूनचा पाढा वाचला.भारत सरकारने देखील मॉब लिंचिंगवर कायदा केला असून, प्रत्येक मॉब लिंचिंगमध्ये मृत पावणारा हा मुसलमानच असतो असे नाही.पालघरमध्ये चार साधूंची मॉब लिंचिंग होऊन हत्या झाली ते मुसलमान नव्हते.मराठवाडामध्ये ज्यांची हत्या झाली ते देखील मुसलमान नव्हते.आपल्याला आता या मानसिकतेतून वर उठावं लागेल.आपल्यासोबत जातीवाद,धर्मवादाचा खेळ खेळला जातो असा आरोप केला जातो.माझा अनुभव मात्र वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.माझी तर सुरवातच शून्यातून झाली,आज मी एक हजार कोटींचा उद्योग उभारला असल्याचे प्यारे खान म्हणाले आणि यात मी मुसलमान असल्याचे कधीही माझ्या प्रगतीच्या आड आले नाही.माझ्याकडेही ईडीची धाड पडली,आयकर विभागाने धाडी टाकल्या,जीएसटीवाले धडकले,मला तर अटक नाही झाली कारण,मी काहीही चुकीचे काम केले नाही.ज्या दिवशी मी चुकीचे काही करेल मला केंद्रिय तपास यंत्रणांशी घाबरण्याची गरज वाटेल.लोक सांगतात या देशात मुसलमानांना कर्ज मिळत नाही.माझा आज ही पत्ता तोच आहे.माझ्या आरओसीवर कंपनीचा ८३,आजाद कॉलोनी झोपडपट्टीचा पत्ता आहे जिथे माझा जन्म झाला.या मंचावर उद्योग जगतामध्ये जी आकडेवारी मुस्लिम समाजाची दाखवली जात होती त्याच बँकांनी मला ६०० कोटींचे कर्ज दिले.त्यामुळेच मी हे ठामपणे सांगू शकतो की या देशात मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा कोणी शत्रू जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त मुसलमानच आहे,जो मुसलमानांना समोर जाण्या पासून थांबवतो असा आरोप त्यांनी केला.पहले पासूनच ते आपल्याला इतके घाबरुन देतात की आपण मुस्लिम आहोत त्यामुळे आपल्याला तर कर्जच मिळत नाही,नोकरी मिळत नाही.याशिवाय जी काही थोडी फार आपल्यात कमतरता असते तेव्हा आपल्याला सांगितले जाते ‘जातीवादा’मुळे आपल्यासोबत असं घडतं!

पण तथ्य हेच आहे आपण प्रयत्नच करीत नाही.आज सर्वदूर आपण ऐकतो अनेक राज्यात ‘डबल इंजिन’ची सरकार आहे पण मुसलमानांसमोर तर ‘इंजिनच’नाही.ते स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी देखील प्लॅटफॉर्मवरच उभे आहेत.कधीतरी कूठून तरी वा-याची झुळूक आली तर इंजिन नसलेले त्यांचे डबे थोडे पुढे सरकतात,असे मार्मिक भाष्य त्यांनी केले.

मी फिरदोस मिर्झा यांना विनंती केली आहे की फोरमच्या या मंचावर अनिस अहमद,वझाहत मिर्झा आदी समाजातील शीर्षस्थ व्यक्तीमत्वांनाही बोलवा,हा फक्त मुस्लिमांचा विषय आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नाही.मी कधीही तुम्हाला सांगणार नाही तुम्ही भाजपला मत द्या,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीला मत द्या,पण मी तुम्हाला हेच सांगील ‘जो आपल्या समाजाला काही देईल त्यांना मत द्या’आपल्या समाजाला जे बेवकूफ बनवत आहेत त्यांना मत नका देऊ,असे नाही की मुसलमानांमध्ये प्रतिभा नाही,मुसलमानांमध्ये खूप प्रतिभा आहे,मुस्लिम हे खूप प्रामाणिक असतात,पण आम्हाला एखाद्या खुनी,गुन्हेगार,बलात्कारी,चुकीचे काम करणा-यांवर विश्‍वास आहे मात्र मुसलमानांवर विश्‍वास नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

निवडणूकीचा विषय छेडत,मध्य नागपूरात मुसलमानांचे किमान चाळीस हजार मते आहेत मात्र,कोणाला उमेदवारी दिली जाते?ज्यांच्या समाजाची पाच हजार मते आहेत त्यांना.जाफर नगरमध्ये मला एक गोष्ट ऐकू आली की कोणताही राजकीय पक्ष एकाही मुस्लिमाला उमेदवारी देत नव्हता.मला कळले इमाम फिरदौस हे एका राजकीय पक्षाकडे गेले आणि ठणकावले जर तुम्ही अमूक मुसलमानाला उमेदवारी दिली नाही तर एकही मुसलमान तुमच्या पक्षाला मत देणार नाही!परिणामी घाबरुन एका मुसलमानाला उमेदवारी देण्यात आली.ही घटना काय सिद्ध करते?तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेचा असा पण, तुम्ही सगळे मिळून समाजासाठी तर काही मागू शकता.आपली हिस्सेदारी तर मागू शकता?आज आपण देशातील दूस-या क्रमांकाची लोकसंख्या आहोत,अशी आठवण त्यांनी करुन दिली.

बाबा ताजुद्दीन दरगाह या जागतिक वारसास्थळाच्या विकासाबाबत बोलताना,ताजाबादमध्ये आता शाळा सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले.लवकरच चारशे खाटांचे रुग्णालय सुरु होणार असून सुरवातीला १७ खाटांची परवानगी मिळाली आहे मात्र,लवकरच आधी १०० व नंतर ४०० खाटांचे रुग्णालय सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सुरवातीला हे रुग्णालय केंद्र सरकारच्या सीएसआर फंडातून निर्मित होणार होतं मात्र गडकरी यांच्या प्रयत्नातून आता ६० टक्के केंद्र तर ४० टक्के राज्य सरकार फंड देणार आहे.या रुग्णालयात ५१ टक्के आरक्षण मुस्लिमांसाठी असणार आहे.या संदर्भात डॉ.चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या कार्यालयात बैठक पार पडली.त्यांनी सल्ला दिला एवढे मोठे रुग्णालय बीओटी तत्वावर चालवावे कारण, तुम्ही तर विश्‍वस्त म्हणून जास्तीत जास्त ३ किवा ६ वर्ष पदावर राहाल पण, हे रुग्णालय सुरु राहीले पाहिजे,याच दिशेने रुग्णालयाचे काम सुरु असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना,आपण खूप जास्त स्वार्थी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कोणीतरी आपल्याला समजावतोय,सांगतोय,बोलवतोय पण आपण समजण्यास तयारच नाही.‘ना समजोगे तो मिट जाओगे हिंद के मुसलमानो…दासतां में भी दासतां तुम्हारी नही होगी’अशी ओळ म्हणत,परिवर्तन हे मी,फिरदौस मिर्झा किवा या सभागृहात उपस्थित शीर्षस्थ व सन्मानीय लोकं काेणीही आणू शकत नाही.कोणी कितीही दावा केला तरी आपल्या समाजात ते परिवर्तन घडवून आणू शकत नाही.हे परिवर्तन फक्त ‘मज्जिदीतूनच’ येऊ शकतं,असे विधान प्यारे खान यांनी केले.मज्जिदीतूनच विचार पेरावे लागतील,सभागृहात फक्त ५० ते १०० लोकं उपस्थित आहे मात्र,तिथे प्रत्येक असा व्यक्ती येतो ज्याला तुम्ही समजावू शकता,असे प्यारे खान म्हणाले.

फिरदोस मिर्झांचा पहीला प्रश्‍न मसलत का मसला कैसे सुलझायेंगे?असा आहे.मी एक गोष्ट बघितली मसलत नेहमी पोलिसांच्या डंड्यानेच सुधारते.ज्याला समाजाची समज नाही,ज्याच्या दामनमध्ये हजारो डाग आहेत ते काय आपले डाग धूतील?आम्हाला समाजातून असे लोक हवेत ज्यांच्या दामनवर डाग नाहीत,जे ‘बेदाग’ आहेत.आपण आपली संपूर्ण ताकद फक्त भाजपला हरविण्यात लावतो मात्र,तीच आपली संपूर्ण ताकद आपल्या मुस्लिम समाजाला पुढे आणण्यात लावू शकू तर जास्त चांगलं होईल,असा माेलाचा सल्ला प्यारे खान यांनी उपस्थितांना दिला. याचा आपल्या समाजाला खूप चांगला फायदा होईल.आपल्या समाजाचे खूप काही प्रश्‍न आहेत.आज महाराष्ट्राचे महिन्याचे बजेट बघा,कितीतरी अधिक पटीने ताजाबादमध्ये आणण्यात आले.दहा कोटी रुपये येऊन पडले आहेत,२२४ कोटी येणार आहे.५०० कोटींचे रुग्णालय होत आहे. आयटीआय कॉलेज देखील उभारणार आहोत.काँग्रेसच्या काळात जी ट्रस्ट साढे सोळा लाख रुपये तुटीच्या मासिक बजेटमध्ये आम्हाला मिळाली होती ती, १४ कोटींच्या लाभांशमध्ये पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.विश्‍वस्त पदावरुन निवृत्त होण्यापूर्वी १०० कोटींचा लाभांश ट्रस्टला मिळवून देण्याचे माझे ध्येय असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले.माझा अजेंडाच ३० लाख रुपये मासिक उत्पन्न ट्रस्टची झाली पाहिजे,हा आहे.मी आणि इतर विश्‍वस्त ट्रस्टच्या पैशांनी पाणि देखील पित नाही,चहा तर खूप दूरची गोष्ट आहे.पूर्वीच्या ट्रस्टीचे चहा-पाण्याचे बिलच दीड लाख रुपये मासिक यायचे असा आरोप त्यांनी केला.ज्या समाजाने आम्हाला विश्‍वासाने ज्या पदावर बसवले आहे तो विश्‍वास सार्थकी लावत,त्या पैसांचा दूरुपयोग होता कामा नये,अशी आमची नीती असल्याचे प्यारे खान म्हणाले.

या देशाचा मुस्लिम देशातील सर्वात मोठा करदाता होऊ शकतो कारण, त्यांना नोकरीपेक्षा उद्योगधंद्यांमध्येच अधिक रुची असल्याचे प्यारे खान म्हणाले.फक्त त्यांना वाणिज्यिक गणिते समजता आली पाहिजे.कोणतेही शिक्षण न घेता इंजिन बनविणारा माणूस हा इंजिनिअरपेक्षाही मोठा असतो.गरज आहे मुस्लिमांना पॉवरफूल बनविण्याची व पॉलिसीमध्ये आणण्याची.आज नागपूरात किमान चार लाख मुस्लिम मते असावीत.चार लाखांमध्ये आपल्याला चाळीस हजार मते देखील मिळविता येत नाही.ही सर्व मते एक झाल्यास चांगल्यात चांगल्या पक्षाला देखील घाम फोडू शकतात.फक्त समाजाची गोष्ट करणा-याला निवडून द्या,मी विश्‍वास देतो असे घडले तर एक हजार कोटींचे काम मी समाजासाठी करुन देईल,असे आश्‍वासन याप्रसंगी प्यारे खान यांनी दिले.

मुस्लिम समाजातील समस्यांचे निराकरण ताेपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण आपल्या समाजाला सुशिक्षीत करणार नाही.पॉवरफूल करणार नाही.कोणताही राजकीय पक्ष बघा त्या पक्षात मुस्लिम समाजातील लोक फक्त वर्षानुवर्ष सतरंज्या उचलण्याचेच काम करीत आहे कारण आजपर्यंत आपण त्यांच्याशी आपली गोष्टच केली नाही.मग ते तरी आपल्याकडे कशाला येतील?कशाला विचारतील तुम्हाला काय हवे?मी आज ताजाबादचा विश्‍वस्त असल्याने मी गडकरींना सांगितले मला ऑक्सीजन हवे तर ऑक्सीजन मिळाले.पाण्याची समस्या आहे तर पाच लाख लीटरच्या पाण्याची टाकीच दिली.लहान मुलांना खेळण्याचे साधन नाही तर एक कोटींची खेळण्याची सामग्रीच त्यांनी पाठवली.मी माझ्यासाठी तर काहीच नव्हते मागितले,मी माझ्या समाजासाठी त्यांच्याकडे मागणी केली होती,असे प्यारे खान यांनी सांगितले.

याप्रसंगी ॲड.फिरदोस मिर्झा यांनी प्यारे खान यांना काही प्रश्‍ने जाहीरपणे विचारली.भाजप मुस्लिमांना उमेदवारी का देत नाही?असा प्रश्‍न केला असता,असे नाही की भाजप मुस्लिमांना उमेदवारी देत नाही मात्र, तुम्ही त्या योग्यतेचे उमेदवार तर पाठवा.मला विचारणा झाली होती प्रदेशाध्यक्षांकडून,मी नकार दिला.एका वृत्तपत्राने तर मध्य नागपूरातून प्यारे खान निवडणूक लढणार असल्याचे चुकीचे वृत्त छापले.मी त्या पत्रकाराला खूप रागवलं, माझा व्यवसाय तू सांभाळणार आहेस का?चार हजार कुटूंब माझ्यावर निर्भर आहेत,मी निवडणूक लढून राजकारणात जाईल तर त्यांचे काय होणार?माझ्या समाजात चांगल्या लोकांची कोणतीही कमतरता नाही.प्रामाणिक लोकही खूप आहेत पण,ते पुढेच येत नाही.ही आपली चूक नाही का?आपला विकास जिथे शक्य आहे आपण तिथे गेलो पाहिजे.आपल्याला हा विचार नाही करायचा हा भाजप आहे, काँग्रेस आहे,शिवसेना आहे,त्यांच्यासोबत तुम्ही बारगेनिंग करा,मागा त्यांना तुम्ही आम्हाला हे द्या तर आम्ही तुमच्यासोबत असू. आपल्या समाजात नेतृत्वाची कोणतीही कमतरता नसल्याचे प्यारे खान म्हणाले.वीस वीस वर्ष ज्यांनी समाजासाठी खूप केले मात्र,निवडणूका येताच ते दूर पळून जातात तर त्या कामांचे मूल्य काय राहीले?असा प्रश्‍न प्यारे खान यांनी केला.जो राजकारणाचा जाणकार आहे त्यांना आपण तिथे पाठवत नाही.डॉक्टरला विमान चालवण्याचे काम सोपवले तर कसे होईल? समाजाने मिळून राजकीय दबाव निर्माण केला पाहिजे.जो या राजकीय क्षेत्रातून आहे त्याने पुढे यावे आणि समाजासाठी मागावे,असे उत्तर प्यारे खान यांनी दिले.

येणा-या निवडणूकीत काय वाटतं आपण कोणती ‘स्टेट्रेजी’ राबविली पाहिजे?असा प्रश्‍न केला असता,जो समाज के हित में है,प्यारे खान किवा फिरदोस मिर्झा काय बोलत आहे याला महत्व नाही असे ते म्हणाले.आपल्या समाजाची भलाई कशात आहे?हे आधी तपासा.आपण ‘कट्टरतावाद’जोपासू तर समाजासाठी ते फार वाईट ठरेल,‘धर्मनिरपेक्ष’बनू तर खूप चांगलं होईल.हीच आपल्या धर्मंग्रंथाची शिकवण देखील आहे.आज इतर देशांचा इतिहास तपासा ज्यांनी कट्टरतावाद जोपासला.त्यांनी देशच बर्बाद करुन टाकला.तिथे कोणताही विकास आढळत नसल्याचे प्यारे खान म्हणाले.

येणा-या निवडणूकीत बेवकूफ बनू नका,असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.कोणी पाच लाख मत घेत आहे हे तुम्ही बघता आहात तर त्यालाच आपले ही मत द्या,इतराला दहा हजार मते मिळत असलेली बघूनही तुम्ही दहा हजारवाल्यालाच मत द्याल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही,निदान पाच लाख मते घेणा-याला तुम्ही पण मत दिले आहे हे बघून तो उमेदवार तुमच्याही विकासासाठी धोरणे राबविल,असे सूचक उत्तर त्यांनी ‘स्टेट्रेजी’विषयीच्या प्रश्‍नावर दिले.

याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष शकील सत्तार,सचिव परवेज सिद्धीकी,समन्वयक ॲड.फिरदोस मिर्झा तसेच विदर्भातील मुस्लिम समाजातील गणमान्य लोक उपस्थित होते.

………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या