फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपानिवडणूक नागपूर महानगरपालिकेची,भाजप सांगणार कामे केंद्राची!

निवडणूक नागपूर महानगरपालिकेची,भाजप सांगणार कामे केंद्राची!

Advertisements

विकसित भारताच्या अमृतकाळातील सेवा,सुशासन,गरीब कल्याणाच्या पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षातील योजनांची देणार नागपूरकरांना माहिती

१२ जून पासून भाजपतर्फे विविध कार्यक्रम होणार सादर: २५ जून आणिबाणिच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांची सांगता

भाजप शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची पत्रकार परिषदेत माहिती

नागपूर,ता.१० जून २०२५: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूकीचे बिगूल वाजले असून आज महाराष्ट्र शासनातर्फे महानगरपालिकांंच्या प्रभाग रचना बाबतचे आदेश निर्गमित झाले.येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान निवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगातर्फे होण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे प्रचाराची मुहूर्तमेढ आज हॉटेल सेंटर पॉईंट रामदासपेठ येथे आयोजित पत्रकार परिषदेतून झाली.येत्या १२ जून ते २५ जूनपर्यंत भाजपतर्फे विविधस्तरावर होणा-या कार्यक्रमांची माहिती भाजपचे नागपूर शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.

सुरवातीलाच काँग्रेस पक्षावर प्रहार करीत देशावर या पक्षाने ६० वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले मात्र,’गरीबी हटाव‘चा नारा देत केंद्राची सत्ता हस्तगत करीत राहील्यानंतर देखील देशातील गरीबांची संख्या कमी झाली नाही उलट त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली,अशी टिका त्यांनी केली.दूसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात २६ कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे जीवनमान सुधारले असा दावा त्यांनी केला.वीज,पाणी,सुलभ शौचालये,पंतप्रधान आवास योजना,राेजगार यासारख्या गरीबांच्या मुलभूत गरजा मोदी यांच्या कार्यकाळातच पूर्ण होऊ शकल्या,असे कौतूक त्यांनी केले.

देशातील महिलांसाठी,तरुणाईसाठी मोदी यांनी मग ते कोणत्याही जाती किवा समाजाचे असो त्यांच्या सामाजिक उत्कर्षासाठी अनेक योजना मोदी यांनी राबवल्या,त्या योजना घरोघरी पोहोचवल्या.प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराची साखळी खंडित करुन लाभार्थ्यांना सरळ त्यांच्या बँक खात्यात लाभ मिळू लागला.
मोदी यांची देश-विदेशातील ११ वर्षांची कारर्कीद नागपूरकर जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.‘विकसित भारत का अमृतकाल-सेवा,सुशासन,गरीब कल्याण के ११ साल बेमिसाल’या शीर्षकाखाली सर्वात पहीला कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ जून रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे पत्रकार परिषद घेऊन होईल.यानंतर नागपूर महानगर संघटनेअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील २० मंडळ जे कार्यरत आहेत त्यातील प्रत्येक मंडळ हे जनतेमध्ये जाऊन १० जनसंवाद सभा आयोजित करतील.या २०० सभेच्या माध्यमातून घरोघरी मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी पोहोचवली जाईल.

या २० मंडळामध्ये ‘संकल्प से सिद्धी तक’या विषयावर २० मोठ्या सभा घेतल्या जातील,या सभांमध्ये केंद्र,राज्य तसेच नागपूर महानगरपालिकेद्वारा केलेल्या जनकल्याणाच्या योजना नागरिकांसमोर मांडल्या जातील.

नागपूर शहरातील विधी क्षेत्रातील अधिवक्तांचे संमेलन होईल ज्यामध्ये मोदी यांनी विधी क्षेत्रात दिलेले योगदान यावर सकारात्मक चर्चा केली जाईल तसेच न्यायालय परिसरात केलेले बांधकाम व उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा यांचा देखील उहापोह केला जाईल.

शहरातील चार्टेड अकाऊंट,कंपनी सेक्रेटरी व फायनान्सच्या क्षेत्रात कार्यरत कन्सलटंट यांचे संमेलन पार पडेल व यामध्ये मोदी यांची आर्थिक नीती यावर सकारात्मक चर्चा पार पडेल.

केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रात केलेले सुधार व धोरणे यावर नागपूर शहरातील शिक्षकांचे संमेलन देखील पार पडेल.याशिवाय ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची तरुणाई यांना जे स्वालंबन व आर्थिक विकासाचे द्वार केंद्राच्या योजनांनी उघडले अश्‍या यशस्वी श्रमजीवींचे देखील संमेलन भरवले जाईल,अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.

भाजपच्या नागपूर महानगर आयटी सेलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी ‘डिजिटल मिडीया स्पर्धे’चे देखील आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत रचनात्मक रिल्स,ब्लॉग,लघुचित्रफितीचे सादरीकरण स्पर्धा होईल.१२ जून रोजी या स्पर्धेसाठी,स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी.२४ जून पूर्वी त्यांनी आपली रचना जमा करावी,असे आवाहन त्यांनी केले.या स्पर्धेविषयीची माहिती bjpnagpur.in यावर उपलब्ध राहील.या स्पर्धेत प्रत्येक गटासाठी आकर्षक पारितोषिक दिले जाईल.

याशिवाय केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळ नागपूरकर नागरिकांना कळण्यासाठी चित्रप्रदर्शनी देखील शहरातील सहाही विधान सभा क्षेत्रात प्रदर्शित केली जाईल.केंद्र व राज्य सरकारतर्फे दिल्या जाणा-या  विविध जनकल्याण योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी २० मंडळे शिबिर आयोजित करतील.सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या प्रतिष्ठितांसोबत शासनाच्या कामगिरीवर चर्चा केली जाईल,तसेच मिडीया पॅनल चर्चेचे देखील आयोजन होईल.

सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील विविध बगिचे,चौक तसेच मॉलमध्ये ‘चौपाल’ आयेाजित करण्यात येणार असून मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळावर सर्वसामान्य जनतेसोबत संवाद साधल्या जाईल.याशिवाय २१ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरेश भट सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर घेतील.
तसेच केंद्र,राज्य व नागपूर मनपातर्फे करण्यात आलेले लोकाभिमुख,लोकहितकारी धोरणांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पत्रकाद्वारे ‘घर चलो अभियान’अंतर्गत पोहोचविले जाईल.
देशावर आणिबाणि ज्या दिवशी लादण्यात आली त्या २५ जून रोजी या उपक्रमांची सांगता होईल.या दिवशी ‘मिसा’कायद्यातंर्गत तुरुंगात डांबण्यात आलेले सेनानी यांचा किंवा ते हयात नसल्यास त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान करण्यात येईल.त्यांच्या कुटूंबियांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना प्रमाणपत्र सोपवतील.
या सर्व स्पर्धा सकारात्मक बाबींवरच असून लोकशाही देशात विरोधी मतांना देखील एक मूल्य आहे त्यामुळे मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारर्कीदीवर विरोधात व्यक्त होणा-यांना देखील या डिजिटल स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार का?असा प्रश्‍न केला असता,विरोधात व्यक्त होणा-यांना संधी आहे मात्र पारितोषिक नाही,असे उत्तर दयाशंकर तिवारी यांनी दिले.हे पारितोषिक फक्त विषयांच्या अनुषंगाने ‘सकारात्मक’ बोलण्यासाठी असल्याचे ते म्हणाले!
उद्यान,मॉल,मुख्य चौक इ.ठिकाणी होणा-या चौपालचे सादरीकरण पोर्टलवर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली,यावर चौपालामध्ये तरी विरोधात बोलणा-यांचे म्हणने लाईव्ह दिसेल का पोर्टलवर?असा प्रश्‍न केला असता,विरोधात बोलणा-यांचे देखील लाईव्ह टेलिकास्ट होईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.
थोडक्यात,येत्या तीन ते चार महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणूका असून गेल्या १५ वर्षांपासून भाजप नागपूर महानगरपालिकेत सत्तेत आहे मात्र,स्थानिक स्तरावरील निवडणूकीमध्ये देखील भाजपसारख्या बलाढ्या आणि आर्थिकरित्या सक्षम राजकीय पक्षाला, केंद्रातील मोदी यांचाच चेहरा व त्यांचेच उपक्रम प्रसिद्धीसाठी व मतांसाठी वापरावे लागत असल्याचे बघून ’ही निवडणूक महानगरपालिकेची मात्र,भाजप सांगणार कामे केंद्राची’अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली.
हे आहेत समितीचे संयोजक-
यावेळी दयाशंकर तिवारी यांनी या सर्व उपक्रमांसाठी समितीतील प्रमुखांची व सदस्यांच्या नावाची घोषणा केली.नागपूर महानगर समितीचे संयोजक आमदार प्रवीण दटके असून ,कायदा क्षेत्र संमेलनाच्या संयोजन अध्यक्ष पदी ॲड.उदय डबले,आर्थिक क्षेत्र संमेलनाचे संयोजक मिलींद कानडे,व्यापारी संमेलनाचे विकी कुकरेजा,शिक्षक संवादाचे राजेश गादेवार,युवा उद्योजक संवादाचे सुलभ देशपांडे,विकसित भारत संकल्प सभेचे प्रमुख संजय बंगाले,केंद्र शासनाच्या योजना व शिबिराचे आयोजक  आ.कृष्णा खोपडे,मोहन मते,प्रविण दटके व आ.संदीप जोशी असतील.मिडीया पॅनलचे प्रमुख ॲड.धर्मपाल मेश्राम असून शिवाणी दाणी,सुमित मिश्रा व चंदन गोस्वामी हे सहयोगी आहेत.डिजिटल स्पर्धेचे संयोजन केतन मोहितकर,रोहीत हिमते,डी.पी.बजाज,शिशिर त्रिपाठी,समर्थ रागीट करतील.डिजिटल स्पर्धेत ‘एक भारत प्रगतिशील भारत’ही रिल स्पर्धा,बदलता भारत-माझा अनुभव हा मिनी VLOG स्पर्धा,भारत के बडते कदम-एक जनभागीदारी ही फोटो स्पर्धा तसेच बढता भारत-माझा अनुभव ही ब्लॉग स्पर्धा अशी चार गटात आयोजित करण्यात आली आहे.
………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या