“काना मागून आला आणि तिखट झाला” ही म्हण भंडार्याच्या भाजप जिल्हाध्यक्षाबद्दल सध्या सतत चर्चिली जात आहे. याचे कारण देखिल तसेच आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुनील मेंढे यांच्या पराभवाच्या नैतिक जबाबदारीतून स्वतःला दूर सारुन हे महाशय स्वतःचे पर्व साकार करायला निघाले आहेत. साकोली,भंडारा आणि तुमसर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असूनही अध्यक्ष महाराजांनी स्वतःचे संपूर्ण लक्ष साकोली विधानसभा मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. पक्षाकडून कुठलीही घोषणा झाली नसतांना जिल्हाध्यक्ष हे मी स्वतःच उमेदवार या अविर्भावात वावरत आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणूकीत भंडारा जिल्ह्यात भाजपची जी पिछेहाट झाली त्याची अनेक कारणे असली तरी जिल्हा अध्यक्षांकडे नसलेले संघटन कौशल्य हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. एककल्ली कारभार, कार्यकर्त्यांशी विसंवाद, सर्वांना सोबत घेण्याची कला नसल्यामुळे वर्षानुवर्ष तळागाळात काम करणारे कार्यकर्ते दुरावल्या गेले आहेत.
साकोली विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी कमालीची सक्रियता ते सध्या दाखवत आहेत. साकोली विधानसभेत आधी लाडकी बहीण समितीवर नियुक्तीसाठी स्वतःचेच अभिनंदन आणि आता तर गावोगावी “एकच पर्व प्रकाश पर्व” छापलेल्या रंगीबेरंगी टी-शर्ट झळकू लागल्या आहेत. यातून काय साध्य होईल असा सवाल जनता विचारत आहे.
एकीकडे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्ष जो उमेदवार देईल त्याचे प्रामाणिकपणे काम करा असे उपदेश नेत्यांकडून दिले जात आहेत, दुसरीकडे खुद्द जिल्हाध्यक्षांनीच या उपदेशाला हरताळ फासला आहे. पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष साहेब स्वतःला उमेदवार समजून स्वतःचाच प्रचार करण्यात व्यस्त आहेत. खरंतर पक्ष जो उमेदवार देईल त्यामागे उभा राहण्याचा पवित्रा जिल्हाध्यक्षाचा असावा व त्यांनी तो कार्यकर्त्यांमध्ये देखील बिंबवावा परंतू हे महाशय पक्षांतर्गत कुरघोड्या करण्यातच व्यस्त आहेत. मी म्हणेल तसा पक्ष चालेल या अविर्भावात त्यांनी संघटन, कार्यकर्ते व कॅडरला दुखावले आहे.
लाडकी बहीण योजनेचा फ्लॅगशिप कार्यक्रमात देखील त्यांनी फक्त स्वतःलाच प्रोजेक्ट केले. तुमसर आणि भंडारा हे दोन्ही महत्वाचे मतदारसंघ जाणिवपूर्वक वगळून मुद्दामून हा कार्यक्रम साकोलीत आयोजित केला. कार्यक्रम जिल्ह्याचा होता पण फक्त साकोली विधानसभेतूनच गाड्या लावून महिला भगिनी कार्यक्रमात आणल्या गेल्या, मुख्य म्हणजे इतर कोणाही संभाव्य उमेदवारास त्यांनी या कार्यक्रमात भटकू दिले नाही. जिल्हा महामंत्री, तालुका अध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी कुणीही कार्यक्रमात येऊ नये याची जाणिवपूर्वक काळजी घेतली. इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये महिला भगिनींसोबतच पक्षाचे इतर नेतेही कार्यक्रमाला उपस्थित होते. साकोलीत मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना हे एकट्याचेच पर्व आहे असा अनुभव आला.
भंडारा जिल्हा ऐकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पक्षासाठी जीव ओतून काम करणारे देव दुर्लभ कार्यकर्ते आणि आपल्या कार्यकर्त्यांची तेवढीच काळजी घेणारे नेते असे समीकरण भंडारा जिल्ह्यात सातत्याने पहायला मिळत होते. मात्र जेव्हापासून या जिल्ह्याला बाहेरचा अहंकारी वारा लागला तेव्हापासून जिल्ह्यात पक्षासाठी बुरे दिन सुरु झाले आहेत. सामुहिक नेतृत्व व सर्वांना सोबत घेऊन चालणार्या नेतृत्वाची वानवा असल्यामुळे कार्यकर्त्यांना आता पक्षाचे नव्हे तर वेगवेगळ्या नेत्यांचे पर्व पहावे लागत आहेत. पक्षाच्या नेतृत्वाने वेळीच याची दखल घेतली नाही तर विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्याचे तिन्ही मतदारसंघ काॅंग्रेसला आंदण दिले जातील अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.
………………………………..
(निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय चर्चा, गमतीजमती, किस्से, उखाळे पाखाळे काही खमंग चर्चा खास ‘सत्ताधीश’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध केली जात आहे..लेखक,वाचक कोणीही असू शकतो)