

सीए मार्गावरील (रिच-४) प्रकल्पाच्या कार्याची केली पाहणी
नागपूर, २८ नोव्हेंबर २०१९: नागपूर शहरात मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही कॉरीडोर (नॉर्थ-साऊथ व ईस्ट-वेस्ट कॉरीडोर) अंतर्गत चारही मार्गीकांवर (चारही रिच) नागरिकांना निर्धारित वेळेत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महा मेट्रो कटिबद्ध आहे. उल्लेखनीय आहे की, वर्धा मार्गावर सिताबर्डी ते सिताबर्डी दरम्यान (रिच-१) नागरिकांसाठी मेट्रोची सेवा उपलब्ध असून नुकतेच ही सेवा ताशी ८० किमी वेगाने प्रत्येक १५ मिनिटांनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर हिंगणा मार्गावर सिताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान (रिच-२) प्रवासी सेवेसाठीचे कार्य पूर्ण झाले आहे. याशिवाय उर्वरित कामठी मार्ग आणि सीए मार्ग अश्या दोन्ही मार्गावर (रिच-३ आणि रिच-४) प्रकल्पाचे कार्य नियोजित वेळेनुसार पूर्ण होत आहे.
बुधवार, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर सिताबर्डी ते प्रजापती नगर दरम्यान (रिच-४) प्रकल्पाच्या कार्याचा आढावा घेतला. सुरवातीला डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी या मार्गावरील दोसर वैश्य चौक, चितार ओळी, टेलिफोन एक्सचेंज, प्रजापती नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. प्रवाश्यांच्या दृष्टीने स्टेशनवरील सर्व कार्याचे निरीक्षण त्यांनी केले. आवश्यक सुचना अधिकार्यांलना देत कार्याचा वेग कायम ठेवण्याचे सांगितले. तसेच मेट्रो मार्गीकेचे कार्य आणि एनएचएआय व मेट्रो मार्ग इंटरकनेक्टचे कार्याबद्दलची माहिती जाणून घेतली.
या संपूर्ण कार्याची पाहणी करतांना डॉ. ब्रिजेश दिक्षित यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. येत्या काळात या मार्गावरील कार्याचे नियोजन कसे असेल याची चौकशी केली. शेवटी एकूण सर्व कार्याचा वेग कायम ठेऊन नियोजित वेळेत कार्य पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पाहणी दौऱ्यात संचालक (प्रकल्प) महेशकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक श्री. अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प अधिकारी श्री. राजदीप भट्टाचार्य व अन्य अधिकारी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
