फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूरकरांनो तरुण कलावंतांच्या धाडसाला दाद द्या

नागपूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूरकरांनो तरुण कलावंतांच्या धाडसाला दाद द्या

Advertisements

राष्ट्रभाषा भवनात उद्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे दिग्दर्शित ‘शब्दांची रोजनिशी’या ‘इंडिमेन्ट’ प्रयोगाचे होणार सादरीकरण

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १ एप्रिल २०२२ :पुणे,मुंबई किवा पश्‍चिम महाराष्ट्रातील कोणतेही वृत्तपत्र उघडून बघा त्यात आतील पानांवर जवळपास पाऊन पान किवा कधीकधी तर पान भरुन नाटक व संगीताच्या कार्यक्रमांची जाहीरात झळकते.यावरुन तेथील रसिक वर्ग हा किती चोखंदळ आहे हे लक्षात येतं. महाराष्ट्राच्या उपराजधानीत मात्र नाट्यसृष्टिबाबत तेवढेच कर्मदारिद्र्य असलेले दिसून पडतं.नागपूरात अनेक नाट्य संस्था आहेत जे आपापल्या परीने नागपूरची रंगभूमी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात मात्र ’आपापला ईगो’कायम ठेऊनच!एक नाट्य संस्था शहरातील शहरातील दुस-या नाट्य संस्थेच्या नाटकांना आपला मंच उपलब्ध करुन देण्याच्या मानसिकतेतच नसते मात्र नागपूरात तरुणाईची अस्सल अशी एक संस्था आहे ज्याला इतर नाट्यसंस्थांची नाटके आपल्या मंचावर सादर करण्यास कोणतेही वावडे नाही.या नाट्य संस्थेचे नाव आहे ‘राष्ट्रभाषा परिवार’.रुपेश पवार या तरुण अवलिया कलावंताने अनवट वाट चोखाळत नागपूरची रंगभूमी सातत्याने समृद्धच केली असून आता तो नाटकघर पुणे निर्मित व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे दिग्दर्शित ’शब्दांची रोजनिशी’हे नाटक नागपूरकरांसाठी घेऊन आला आहे.

अतुल पेठे….बस नाम ही काफी है.यूट्यूबवर फक्त हे नाव टाईप करा..कोण आहे नेमका हा अवलिया?या माहितीचा धबधबाच अंगावर कोसळेल आणि…….तुम्ही त्यात चिंब भिजून निघाल.स्वत:नसिरुद्दीन शाह यांनी हा स्वत:ला माझा शिष्य जरी म्हणवतो तरी मला असा शिष्य लाभल्याचा सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.पेठे यांच्यासाठी नाटक म्हणजे काय?रंगभूूूूूूमी म्हणजे काय?नाटकाची संहिता म्हणजे काय?पात्र म्हणजे काय?संवाद म्हणजे काय?प्रायाेगिक नाटक म्हणजे काय?व्यवसायिक नाटक म्हणजे काय?हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाला यूट्यूबचाच आधार घ्यावा लागतो असे थोर व्यक्तिमत्व या विभूतीचे आहे.

रुपेश पवार नागपूरच्या या तरुण कलावंतांनी नागपूरकर रसिकांसाठी खास पेठे यांचे ‘शब्दांची रोजनिशी’हे इन्टिमेट नाटक घेऊन आला आहे..इन्टिमेट म्हणजे जे सरळ नजरेला भिडणे.अश्‍या नाटक़ात रसिक प्रेक्षक आणि कलावंतांच्यामध्ये थोडं देखील अंतर नसतं.रंगमंच असतो मात्र तो रसिकांच्या अगदी जवळ असतो,यालाच ‘समीप(इन्टिमेंट) रंगमंच’ असे म्हणतात.यामुळे प्रेक्षक आणि कलावंत हे जणू नाटकाशी एकरुप होतात.देशपांडे सभागृह असो किवा भट सभागृह,प्रेक्षकांसोबतचे कलावंतांचे अंतर मंचापासून हे खूप जास्त असतं.पेठे यांनी आपल्या प्रायोगिक नाटकांमध्ये हेच अंतर नाहीसे केले.त्यांच्या संहिता प्रेक्षकांना बांधून ठेवीत असतात,खिळवून ठेवीत असतात आणि अत्यंत प्रभावी असतात.

नागपूरात पेठे हे त्यांच्या आठ कलावंतांसोबत उद्या प्रयोगासाठी येत आहेत.नागपूरची गर्मी,ती ही एप्रिल महिन्याची याचे दडपण रुपेश पवार व त्यांच्या तारुण्याने भारलेल्या चमूवर आले आहे.रुपेश यांनी पेठे यांना नागपूरातील गर्मी,उकाडा याविषयी सांगितले असता,नाटकांवर नि:स्सीम प्रेम करणा-या त्या अवलियाने काय म्हणावं?गर्मीची तू चिंता करु नकोस,तू टेंशन घेऊन नकोस,प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ही माझ्या नाटकाची जबाबदारी आहे!’केवढा हा दुर्दम्य आत्मविश्‍वास!असा हा आत्मविश्‍वास येण्यासाठी माणसात उपजत कौशल्य,मनस्वीपणा आणि दूरदृष्टि असावी लागते जी अतुल पेठे यांच्यात कणाकणात सामावलेली दिसून पडते.

रुपेश पवार यांनी या प्रायोगिक नाटकासाठी अल्प दर ठेवले आहेत,या नाटकाचे दोन प्रयोग होणार आहेत,पुण्याहून या नाटक़ासाठी आलेल्या कलावंतांची नागपूरात राहण्याची,जेवणाची सोय एवढाच खर्च यातून निघू शकणार आहे.त्यात उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवनात सादर होणा-या या दोन्ही प्रयोगासाठी जागेची अडचण ही फार मोठी समस्या त्यांच्या समोर आ वासून उभी आहे.मात्र हा प्रयोग ‘समीप’ रंगमंचाचा असल्याने नागपूरातील देशपांडे किवा भट सभागृह हे या तरुण कलावंतांसाठी नाटकाच्या सादरीकरणासाठी निरुपयोगीच ठरतात.ही तरुणाई काल पासून आपल्या राष्ट्रभाषा भवनातच नेपथ्य,खूर्च्या,प्रेक्षकांसाठी कूलर,रंगरंगोटी यात गुंतली आहे.एवढ्याशा जागेवरील २ आणि ३ एप्रिल म्हणजे शनिवार व रविवार रोजी सायंकाळी ७ वाजताचे दोन्ही प्रयोग आताच हाऊसफूल झाले आहेत त्यामुळे ३ एप्रिल रोजी दूपारी ४ वाजताचा एक डिमांड शो आयोजित करावा लागला असल्याचे रुपेश सांगतो.

नागपूरात एकच अवाढव्य सुरेश भट सभागृह बांधण्याऐवजी आमच्यासारख्या प्रायोगिक नाटकांवर प्रेम करणा-या कलावंतांसाठी शहरातील सर्व विधान सभा क्षेत्रात लहान-लहान सभागृह बांधण्यात आले असते तर नागपूरची रंगभूमी ही पुणे-मुंबईसारखीच समृद्ध झाली असती असे रुपेश सांगतो.

आम्ही राष्ट्रभाषा भवनात शहरातील इतर नाट्यसंस्थांच्या नाटकांना आमच्या प्रेक्षकांसाठी आमंत्रित करतो तर ते रस दाखवत नाहीत.ही जागा प्रयोगासाठी त्यांना उत्तम वाटत नाही.या भवनात त्यांचे मन रमत नाही मात्र दूसरीकडे पुणे- मुंबईचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे यांना मात्र अश्‍या या भवनाशी काहीच वावडे नाही!कारण त्या समर्पित विभूतीची बांधिलकी आपल्या नाटकाशी आहे,मंचाशी नाही!हेच कारण आहे पश्‍चिम व विदर्भातील नाट्यजगतात एवढ्या अंतराची,अशी हतबलता रुपेश खास ’सत्ताधीश’कडे व्यक्त करतो.

२००२ पासून रुपेश पवार सारखा तरुण कलावंत रंगभूमीशी जुळला आहे.नागपूरात रंगभूमी जिवंत ठेवायची असेल तर लहान लहान नाट्यगृहे बांधणे खूप गरजेचे असल्याचे तो सांगतो.आधीच चित्रपट तसेच वाहीनीवरच्या मालिकांनी नाटकाचा मायबाप प्रेक्षक वर्ग हिरावला आहे,त्यात नाट्यगृहांची सोय नसल्याने उपराजधानीत प्रायोगिक नाटकांचा जीव गुदमरतोय असे ताे सांगतो.महाराष्ट्राची रंगभूमी ही प्रायोगिक नाटकातूनच समृद्ध होत गेली आहे.’घाशीराम कोतवाल’व यासारखी अनेक नाटके याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.अतुल पेठे यांच्यामुळेच मला प्रायोगिक नाटकांची दिशा मिळाली.अतुल पेठे यांचे ‘समाज स्वास्थ‘ तसेच ’किमया’ही नाटके या पूर्वीच नागपूरात सादर झाली आहे.’किमया’हे नाटक़ तर सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या घरी सादर झाले.‘समाज स्वास्थ’हे नाटक़ दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सादर झाले.नागपूरकरांनीही आता पुणे-मुंबईच्या प्रेक्षकांप्रमाणे मोठमोठ्या रंगमंचावरच नाटके पाहण्याचा अट्टहास सोडावा.मोठ्या रंगमंचावरच ग्लॅमर आहे हा विचारच चूकीचा आहे.कुठेही एक बल्ब लावला तरी नाटक सुरु होऊ शकतं.

रुपेश पवार याच्या राष्ट्रभाषा परिवारात पुष्पक भट,निकीता ढाकूलकर,शुभम गौतम,अक्षय खोब्रागडे,ऋतूजा वानखेडे,सौरभ बिंबरवार व यांच्यासारखे अनेक तरुण कलावंत आपली निष्ठा व श्रद्धा अर्पण करीत आहेत.कोणतेही मानधन नाही,कोणतेही उत्पन्न नाही मात्र रंगभूमीची साधना या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाईला नागपूरकर मायबाप रसिक प्रेक्षकांची मात्र मोलाची साथ हवी आहे.एवढ्या मोठ्या कलावंतांचा व गाजलेला ‘शब्दांची रोजनिशी’प्रयोग खास नागपूरकरांसाठी या तरुणाईन नागपूरात आणला.याच्या यश-अपयशाची जवाबदारी देखील नागपूरकर रसिकांवरच निर्भर आहे.

अतिशय कमी शुल्कात हे प्रयोग सादर होणार आहे मात्र केवळ हाच प्रयोग नाही तर राष्ट्रभाषा परिवारातर्फे सादर होणा-या सर्वच प्रयोगाला प्रचार-प्रसार माध्यमे व रसिकांची मोलाची मदत हवी असल्याचे रुपेश सांगतात.

पुण्याच्या नाट्य संस्थेच्या या प्रयोगाला नाममात्र शुल्क ठेवले असले व यातून पुण्याहून येणा-या कलावंतांच्या राहण्या,जेवणाचाच खर्च भागविणे जिकरीचे झाले असताना फक्त आम्ही शुल्क ठेवले त्यामुळे ’फूकट’प्रसिद्धी करणार नाही,असे धोरण प्रसार माध्यमे राबवतात.आपल्या प्रयोगांसाठी जाहीरातदार आम्ही तरी कूठून आणनार?नागपूरकर रसिकांना काहीतरी वेगळे देण्याचा आमचा प्रयत्न असतो.यात चूका ही होऊ शकतात,आपलेच म्हणून आम्हाला सांभाळून घेण्याची अपेक्षा आम्ही नागपूरकरांकडून करु शकत नाही का?एकदा थोडासा पैसा खर्च करुन हे नाटक बघा तरी,पुणे-मुंबईतील रसिक ’समीप रंगभूमीवरील’डोळ्यांना डोळा भिडवणा-या नाटकांचा ’रोमांच’नेहमीच अनुभवतात,आपण आपली नाटकांप्रतिची प्रगल्भता कधी बदलणार आहोत?असा उद्विग्न प्रश्‍न रुपेश पवार हा तरुण दिग्दर्शक करतो.

नुकतेच राष्ट्रभाषा परिवारातर्फे सायंटिफिक सभागृहात पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत ’लोहिया अध्ययन केंद्र आणि मेराकी थिएटर तर्फे ” तू वेडा कुंभार” या नाटकाचे सादरीकरण झाले तर राष्ट्रभाषा परिवार मार्फत “ जडे ” या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले .उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवनाची इमारत या तरुणाईच्या अथक परिश्रमाची जणू साक्ष देतात.राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत गेलेल्या नाटक़ांना राष्ट्रभाषा भवनात सादरीकरणासाठी आमंत्रित केल्या जातं मात्र इतर नाट्य संस्था हे राष्ट्रभवनाचे नाव ऐकताच नाके मुरडतात!या ठिकाणी मन लागत नाही!अशी कारणे सांगतात.एकीकडे नागपूरकर नाट्यकलांवतांची ही ’शेखी’तर दूसरीकडे जगप्रसिद्ध अतुल पेठे हे आपली चमू घेऊन सरळ राष्ट्रभाषा भवनात सादरीकरणास तयार!याचा आता नागपूरकर नाट्यकलांवतांनीच विचार करण्याची वेळ आली आहे असेच आता म्हणावे लागेल.

येत्या ९ व १० एप्रिल रोजी राष्ट्रभाषा परिवारातर्फे नागपूरकर रसिकांसाठी अगदी नि:शुल्क अश्‍या दोन बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

लेखक – दिग्दर्शक :- संजय गायकवाड यांचे बालनाट्य “ गोष्ट एका रात्रीची ” हे १० एप्रिलला आणि ९ एप्रिलला अंभृणी सेवा संस्थेमार्फत , गौरव खोंड लिखित आणि असिधारा लांजेवार दिग्दर्शित ” पहाटेचा मृत्यू “ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण ‘ शुभास्ते पंथान ‘ या नाट्यमहोत्सवात सादर होणार आहे.मायबाप रसिकांनी आपापल्या पाल्यांसोबत हे दोन दिवस तरी नेहमीच्या रटाळ मालिका सोडून या बालनाट्यांचा आनंद घेण्याचे आवाहन ही तरुणाई करते.

राष्ट्रभाषा परिवाराच्या या क्रांतीकारी व समर्पित नाट्यकलांवतांशी जुळण्यासाठी-९३७२१६१३१७ रुपेश पवार यांना संपर्क साधावा.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या