Advertisements

गडकरींसमोर मनपा अधिका-यांची बोलती बंद:दटकें ऐवजी प्रकरण बावणकुळेंवर ढकळले!

सत्ताधारी आमदाराचं प्रशासकीय अधिका-यांवर दडपण
मनपाने पाठवली चुकीची नोटीस
फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्याला पत्र!
नागपूर,ता.२७ ऑगस्ट २०२५: प्रा.सचिन शंकरराव काळबांडे हे आपल्या स्वमालकीच्या नझूल प्लॉट क्र १०३ खसरा क्र.१४५ जूना बगडगंज रोड महाल नागपूर येथे सध्या बांधकाम करीत आहेत.नियमानुसार मनपा,नझूल इत्यादी सर्व प्रशासकीय संस्थांचे लाखो रुपये भरुन त्यांनी बांधकामास सुरवात केली मात्र,काळबांडे यांच्या प्लॉटमधील ४०० चौ.फूटांच्या जागेवर शेजारचे विजय सोनटक्के नावाचे घरमालक यांचा अवैध ताबा असल्यामुळे आणि त्यांना तो सोडायचा नसल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्याकडे दाद मागितली,दटके यांनी काळबांडे यांच्या नियमानुसार केल्या जाणा-या बांधकामाची कोणतीही चौकशी न करता, मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना फोन करुन एका दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले,त्यांच्या दबावाखाली काळबांडे यांना गांधी नगर झोनचे कार्यकारी अभियंता कोटांगळे,उप अभियंता राजेश तेलरांधे व सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी ते अनाधिकृत बांधकाम करीत असल्याची १ ऑगस्ट २०२५ रोजी नोटीस जारी केली.मात्र,नोटीसमध्ये काळबांडे यांचा पत्ता रामबाग येथे मिलिंद बौद्ध विहार नमूद केला.नोटीस मात्र काळबांडे यांच्या नझूल प्लॉट क्र.१०३,खसरा क्र.१४५ बगडगंज येथील बांधकाम होत असलेल्या लोखंडी गेटवर चिकटवली!सत्ताधारी आमदाराच्या दहशतीत संपूर्ण यंत्रणा नागपूरात ज्याप्रकारे काम करतेय ते बघता नागपूरचे आता बेकायदेशीर भूखंडांच्या गुन्हेगारीत ‘बीड‘जिल्हा झाला असल्याचा संताप पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा.काळबांडे यांनी व्यक्त केला.

(छायाचित्र : मनपाची नोटीस चुकीच्या पत्त्यावर!)
या नोटीसमध्ये १५ दिवसात खुलासा करण्याची धमकी देण्यात आली असून काळबांडे यांच्या बांधकामाला ‘अनाधिकृत‘ठरवून ३२.६५ चौ.मी.बांधकामाला का पाडण्यात येऊ नये?असे नमूद करण्यात आले.काळबांडे यांनी या तिन्ही मनपा अधिका-यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नोटीसमधील पत्ता चुकीचा असल्याने माझ्या घरावरील गेटवर ही नोटीस चिकटवण्याचे औचित्य काय?अशी विचारणा केली.मिलिंद बौद्ध विहाराजवळ,प्रभाग क्र.१७ मध्ये माझे कोणतेही बांधकाम नाही,असेल तर मला दाखवा,असा लेखी खुलासा सादर केला.मात्र,त्याची कुठलीही दखल न घेता पुन्हा ८ ऑगस्ट रोजी बांधकाम थांबविण्याची व महाराष्ट्र झोपडपट्टी अधिकनियम कलम (९७१)३z२(६) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची दुसरी नोटीस दिली!यावर काळबांडे यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी ज्यात मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी,उपायुक्त(सामान्य प्रशासन विभाग)पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन दाद मागितली.
यावर बावणकुळेंनी जिल्हाधिकारी व उप विभागीय अधिका-यांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याचे पत्र दिले. तरी देखील १४ ऑगस्ट २०२५ रोजी मनपाच्या स्लम विभागात हे प्रकरण पंजीबद्ध करुन काळबांडे यांना सुनावणीची कुठलीही संधी न देता प्रकरण आदेशित करण्यात आले व काळबांडे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला गेला!या सर्व प्रकरणात आमदार दटके यांचा दबाव असल्याचा आरोप प्रा.काळबांडे यांनी केला.

(छायाचित्र : मनपाची प्रा.काळबांडे यांना दूसरी नोटीस)
मूळात ही ११३५ चौ.फू.जागा मूळ मालक ७६ वर्षीय केशव रामचंद्र सोनटक्के यांची होती.या जमिनीचा सौदा साेनटक्क़े यांनी तीन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसोबत २०१२ मध्ये केला होता.या तिन्ही गुन्हेगारांची मोडस ऑपरंडी ही गोर गरीबांच्या मालमत्तेवर डोळा ठेऊन त्यांची फसवणूक करणे हाच होता.खोटे धनादेश देणे,खोटे करारनामे बनवणे याच वृत्तीतून या तिघांनी केशव सोनटक्के यांच्यासोबत देखील या जमीनीचा सौदा साढे तेरा लाखांमध्ये केला.यातील एका गुन्हेगाराने सोनटक्के यांना दीड लाख रुपये दिले.मात्र,२०१८ पर्यंत या तिघांनीही सोनटक्के यांना एक ही पैसा दिला नाही.सोनटक्के आता ८० वर्षांचे झाले असल्याने त्यांच्या निधनानंतर आपोआप ही जमीन बळकावता येईल,असा या तिघांचा कयास होता.५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कब्जा पत्र एवढाच करारनामा मूळ मालक व या तिन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये झाला होता.२०१८ मध्ये या तिघांमध्येही वाद निर्माण झाला.काळबांडे यांनी ही मालमत्ता सोनटक्के यांच्याकडून ३५ लाख रुपयात खरेदी केली.यातील दोन गुन्हेगारांनी काळबांडे यांच्याकडून भाडेकरु रिकामे केले व दीड लाख रुपये दिले असल्याने आठ लाख रुपये वसूल केले.मात्र,तिसरा गुन्हेगार याने काळबांडे यांना २० लाख रुपयांची खंडणी मागितली त्याशिवाय ताबा सोडणार नसल्याचे सांगितले.

(छायाचित्र : बांधकामाचा मंजूर नकाशा)
२०१९ मध्ये काळबांडे व मूळ मालक ८० वर्षीय सोनटक्के यांच्यात रितसर करार होऊन जागेची रजिस्ट्री त्यांनी काळबांडे यांच्या नावे करुन दिली.या विरोधात तिसरा गुन्हेगार हा दिवाणी न्यायालयात गेला.त्याने मूळ मालकाला दहा लाख रुपये दिले असल्याचा खोटा दावा केला.खोट्या रसीद बनवल्या.त्याचे ऑटोमोबाईलचे काम असून सेकेंड हॅण्ड गाड्या विकणे,खोट्या चेसीज क्रमांक बनवणे असे २५ च्या वर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे.१८ लाखांच्या भरपाईसाठी या गुन्हेगाराने दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरु आहे.
काळबांडे यांच्या प्लॉट शेजारी विजय सोनटक्के यांचा २०० चौ.फूटांचा प्लॉट आहे.पावसाळ्यात पाणी घरात येत असल्याने त्यांनी मूळ मालक केशव रामचंद्र सोनटक्के यांच्या ११३५ चौ.फूटांच्या प्लॉटपैकी ४०० चौ.फू.रिकाम्या भूखंडावर टिना टाकल्या होत्या.मात्र,काळबांडे यांनी हा भूखंड खरेदी केल्यावर त्यांनी त्या टिना काढून टाकल्या व संपूर्ण भूखंड आपल्या ताब्यात घेतला.
मंजूर नकाशाप्रमाणे सोनटक्के यांचा अतिरिक्त ४०० चौ.फूटांच्या प्लॉटवरचा दावा न्यायलयाने देखील फेटाळला.यानंतर त्यांनी भाजप आमदार प्रवीण दटके यांच्याकडे धाव घेतली.सोनटक्के यांच्या या २०० चौ.फूट जागेवर फक्त एक भाडेकरु राहत होते मात्र,दटके यांच्याकडे सोनटक्के यांच्या पत्नीच्या सांगण्यावरुन १८-२० महिलांनी गा-हाणे मांडले,असा आरोप काळबांडे यांनी केला.दटके यांनी काळबांडे यांची कोणतीही बाजू ऐकून न घेता मनपा उपायुक्त मिलिंंद मेश्राम यांना काळबांडे यांना चोवीस तासात नोटीस पाठवण्याचे फर्मान सोडले.दटके यांच्या दबावात झोन अधिका-यांनी नोटीस टाईप केली मात्र,घाईघाईत त्यात चुकीचा पत्ता टाकला!नोटीस चिकटवली मात्र काळबांडे यांच्या बांधकामाच्या जागेवर!गांधीबाग भागा ऐवजी धंतोली झोनमधील रामनगर भागात त्यांचा पत्ता नमूद केला.
इतकंच नव्हे तर तक्रार करणा-या सोनटक्केंची जागा २०० चौ.फू.ऐवजी ८०० चौ.फूट करण्याची सूचना दटके यांनी संबंधित अधिका-यांना केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत काळबांडे यांनी केला.झोपडपट्टीतील घरांचे सर्वेक्षण करणारी जी खासगी कंपनी असते त्यांनी दटके यांच्या सूचनेप्रमाणे मूळ मालक चिंधूजी सोनटक्के यांची जागा २०० ऐवजी ८०० चौ.फूट वहिवाटमध्ये नमूद केली!मूळात ही सर्वेक्षण करणारी खासगी कंपनी कोणाची आहे?याचा देखील शोघ घेणे गरजेचे असल्याचे काळबांडे नमूद करतात.

(छायाचित्र : मनपाच्या स्लम विभागाने प्रा.काळबांडे यांना जारी केलेली नोटीस)
या सर्वेक्षणाची नाेंदणी पुढे न्यायालयात दाखवण्यासाठी उपयोगी पडत असल्याने सीडीएसडी एजंसीने सोनटक्के यांची २०० चौ.फू.ची जागा ८०० चौ.फू.नमूद केली.या विरोधात काळबांडे यांनी पुन्हा मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याकडे आक्षेप नोंदवला.मेश्राम यांनी संगणकावर तपासले असता सोनटक्के यांच्या नावे फक्त २०० चौ.फूट जागा असल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी झोपडपट्टीतील घरांचे सर्वेक्षण करणा-या खासगी कंपनीच्या कर्मचा-यांना या विषयी जाब विचारला.ही जागा नझूलची असून सर्वेक्षणाची नोंदणी नझूलमध्ये होत असून त्या आधारावर नझूलकडून पट्टे वाटप होत असतात.नझूलची करामात म्हणजे दटके यांच्या एका ‘खास एजेंटने’ सोनटक्के यांना संपूर्ण ८०० चौ.फूट जागेवरील ८ हजार ८०० रुपयांची डिमांड भरण्यास सांगितले व सोनटक्के यांनी ते तातडीने भरले देखील!
एकीकडे न्यायालयाने सोनटक्के यांचा दावा फेटाळला आहे.कर पावतीमधील इंडेक्समध्येही सोनटक्केंची फक्त २०० चौ.फूटांची जागा नमूद आहे.मात्र,काळबांडे यांनी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्याकडे आक्षेप नोंदवल्यानंतर देखील सुधारित पत्र काढले ३२.६५ चौ.मी.बांधकामाला का पाडण्यात येऊ नये? एवढंच नव्हे बांधकाम न थांबवल्यास कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.

(छायाचित्र : २०० चौ.फूट जागेचे ‘शासकीय’गौडबंगाल!)
भाजप आमदार यांच्या या सातत्याच्या अन्यायाला कंटाळून काळबांडे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपली व्यथा मांडली.त्यांनी गांधी नगर झोनचे तिन्ही अधिकारी कोटांगळे,राजेश तेलरांधे व गणेश राठोड यांना बोलावून घेतले व चुकीच्या नोटीसवर जाब विचारला.यावर या अधिका-यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे काळबांडे यांच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाईचे पत्र असल्याचे सांगितले व दटके यांचा बचाव केला.दटके यांचे नाव समोर येऊ दिले नाही.यावर बावणकुळेंना माझे नाव सांगा असे गडकरी यांनी या तिन्ही मनपा अधिका-यांना बजावले,अशी माहिती प्रा.काळबांडे यांनी दिली.
एका आमदाराचा अंहकार वैध गोष्टीला ऐनकेन प्रकरणे अवैध ठरविण्याचा असून यासाठी त्यांनी संपूर्ण शासकीय यंत्रणेवरच दबाव आणला असल्याचा आरोप याप्रसंगी काळबांडे यांनी केला.महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी मी बांधकाम करीत आहे त्या संपूर्ण ओळीत कोणाकडेही बांधकामाची मंजूरी नाही!त्यांचे नकाशे मंजूर नाहीत.अनेकांनी शासनाची सार्वजनिक जागा ताब्यात घेऊन एक ही फूट जागा रस्त्यासाठी सोडली नाही.मी मात्र,नियमाप्रमाणे आठ फूट जागा सोडली असल्याचे काळबांडे सांगतात.गांधी बाग झोनच्या या ‘कर्तव्यनिष्ठ’अधिका-यांना नियमांचे हे थेट उल्लंघन दिसत नाही का?असा सवाल ते करतात.मनपा गांधी नगर झोनच्या या तिन्ही अधिका-यांवर काळबांडे यांनी तीन लाख रुपये लाच मागण्याचा धक्कादायक आरोप पत्रकार परिषदेत केला.या संबंधीची तक्रार त्यांनी अर्जाद्वारे मनपा आयुक्तांना देखील केली मात्र,आयुक्तांनी नेहमीसारखेच ’अगतिक’असल्याचे सांगून हात वर केले!

(छायाचित्र : नझूलचे पत्र)
१४ ऑगस्ट २०२५ रोजी काळबांडे यांनी मनपाच्या स्लम प्राधिकरणने पंजीबद्ध केलेल्या आदेशाच्या विरोधात तक्रार दाखल केली इतकंच नव्हे तर न्यायालयाने नुकतीच काेतवाली पोलिस ठाण्यात काळबांडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणात नोटीस जारी केली आहे.फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्याला पत्र पाठवण्यात आले होते.परंतु पोलिसांनी उप अभियंता तेलरांधे यांना बयाण घेण्यास बोलावले होते परंतु,बयाण नोंदविण्यास ते गेलेच नाही!काळबांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन सुरु असलेला दबाब बघून,गुन्हा दाखल होण्या पूर्वीच प्रा.काळबांडे यांनी न्यायालयात अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता.
प्रा.काळबांडे हे सामाजिक कार्यकर्ता असून निराधार मुलांसाठी शाळा चालवतात.आरटीई फाऊंडेशन संघटनेचा अध्यक्ष या नात्याने अनेक गरीब,गरजू मुलांना खासगी शाळांमध्ये त्यांचा हक्काचा शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी कायदेशीर लढा देतात.समाजासाठी काम करणा-या व सर्व नियमांचे पालन करणा-या एका सामाजिक कार्यकर्त्यावर केवळ एक बाजू ऐकून सत्ताधारी आमदाराचा इतका पराकोटीचा अन्याय करण्यास सरसावणे याचा काय अर्थ आहे?असा सवाल ते करतात.नागपूरचं हळूहळू ‘बीड’ होत चाललं आहे का?याचा विचार आता नागपूरकर मतदारांनीच करावा,असे आवाहन त्यांनी केले.
कागदपत्रे खोटे नाही बोलणार:आ.प्रवीण दटके
या भागात ६०-७० कुटूंब हे गेल्या शंभर वर्षांपासून रहात आहेत.त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.पत्रकारांनी जिल्हाधिकारी,नझूल,मनपाचा स्लम विभाग अश्या शासकीय संस्थांमधील दोन्ही कडील कागदपत्रे तपासावी,कागदपत्रे खोटे नाही बोलणार.मी नियमांच्या आधारे कारवाईचे आदेश दिले होते.
शासकीय संस्था न्यायालयापेक्षा मोठे आहेत का?काळबांडे
सोनटक्के हे न्यायालयात हरले आहेत.न्यायमूर्तींनी अवघ्या एका दिवसात त्यांची याचिका रद्द केली.जिल्हाधिकारी,स्लम विभागाचे अधिकारी किवा मनपा आयुक्त हे न्यायालयापेक्षा मोठे आहेत का?सोनटक्के यांची २०० चौ.फूटाची जागा ८०० चौ.फूट करण्याचे आदेश कोणी दिले होते?जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त ,नझूल किवा स्लम विभागाचे अधिकारी हे अखेर कोणाची भाषा बोलतील?सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्याची कि सत्ताधारी आमदाराची?राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार दटके हे सातत्याने सावलीसारखे उभे असतात. त्यांनी एक तक्रार केल्यास या अधिका-यांवर गारपीट कोसळेल,हे त्यांना माहिती नाही का?नझूलचे अधिकारी हे उप विभागीय दंडाधिकारी असतात मात्र,ते न्यायालयापेक्षा मोठे नाहीत.केवळ आमदार दटके यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वाट्टेल तशी व नियमबाह्य कारवाई माझ्यावर करुन मोकळे झाले आहेत.फौजदारी कारवाईचे पत्र पाठवून ही ते माझ्यावर कोणतीही कारवाई करु शकले नाहीत कारण,त्यांना देखील हे माहिती आहेत दटके यांना जे अपेक्षीत आहे ते नियमात कुठेही बसत नाही.पुढे न्यायालयात त्यांना देखील पक्षकार व्हावे लागले असते.मी अंतरिम जामीनसाठी अर्ज केल्यावर न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यातील अधिका-यांना नोटीस बजावली आहे.
२०१८ पासून तर आता २०२५ पर्यंत या भूखंडासाठी मी काटेकोरपणे सगळे नियम पाळले आहेत.नझूलचे १७ लाख रुपये भरले.मनपाचे अडीच लाख रुपये भरले.ज्या सोनटक्केंची बाजू आमदार दटके घेत आहेत,त्यांची पावती तरी दटके यांनी तपासली का?१०० वर्षांपासून दुस-यांच्या जागेवर राहणे म्हणजे ताबा प्रस्थापित होणे नसतं,हे आमदारांनी लक्षात घ्यावे.मी एका शाळेचा मुख्याध्यापक असल्याने मला अध्यापन सोडून दटके यांनी पराकोटीच्या मानसिक त्रासात ढकळले आहे,मात्र न्यायाची लढाई मी अखेरपर्यंत लढणार आहे.
………………………………….
तळटीप:-
शहरातील खासगी बस थांबा यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नियोजन भवनात बैठक घेतली होती.या बैठकीत खासगी बस मालकांनी त्यांच्या अनेक अडचणींचा उहापोह त्यांच्या समोर केला व समस्येच्या निराकरणासाठी अधिक वेळ देण्याची विनंती केली.यावर उग्र होत आमदार दटके यांनी बैठक संपल्यानंतर संबंधित अधिका-यांना उद्देशून ,मला एक ही नियमबाह्य खासगी बस शहरात दिसायला नको अन्यथा मी ५० बसेस उभ्याने पेटवून देईल….असा इशारा दिला!एका आमदाराच्या तोंडी जाळपोळीची अशी भाषा ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला….!
……………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
