
धार्मिक वातावरण बिघडवणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करणार:पोलिस आयुक्तांचा इशारा
नागपूर,ता. १८ एप्रिल २०२२: सध्या देशातील विविध शहरात धार्मिक दंगली घडत असून रामनवमी व हनुमान जयंतीच्या मिरवणूकीत एका विशिष्ट समुदायातर्फे झालेल्या दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूरात पूर्णपणे धार्मिक सहिष्णूता असल्याचे सांगितले.
आज पत्र परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले.नागपूरात पूर्णपणे शांतता नांदत आहेत.सर्व समुदायाचे नेते,हितकारक,धार्मिक नेते यांच्यासोबत विस्तृत चर्चा विविध पोलिस ठाण्यांच्या स्तरावर पोलिस अधिका-यांच्या तसेच आमच्यास्तरावर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.जे काही मतभेदाचे मुद्दे असतील ते चांगल्यारितीने व शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे व कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याचे निराकारण करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नागपूर शहरात निर्माण होणार नाही याचा आम्हाला संपूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले.मात्र कोणीही कोणतीही अनुचित घटना घडविण्याचा प्रयत्न केल्यास किवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागपूर पोलिस पूर्णपणे सज्ज आहे तसेच असे कृत्य करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा देखील त्यांनी दिला.
नागपूरातील पोलिस दल हाय-अलर्टवर असल्याचे त्यांनी सांगितले मात्र आज नागपूर शहरात जे सामाजिक,धार्मिक सोहाद्र्याचे वातावरण आहे ते बघता नागपूरात अशा प्रकारची घटना होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भोंगा लावण्याच्या परवानगीविषयी विचारले असता जे काही शासनाचे नियम व दिशानिर्देश आहेत त्याचे पालन केले जाईल मात्र फक्त या एकाच मुद्दावर कोणी कायदा सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करु नका असे आवाहन त्यांनी केले.
आमचा एकमात्र उद्देश्य आज हाच आहे शहरातील धार्मिक वातावरण बिघडू नये,त्यात बाधा येऊ नये मात्र असे करण्याचा जो काही प्रयत्न करेल त्यांची ओळख पटवून कारवाई करण्यासाठी आमचे पोलिस दल संपूर्णरित्या तयार व अलर्ट मोडवर असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत व पोलिस दलाच्या कावाईबाबत तपशीलवार माहिती दिली.




आमचे चॅनल subscribe करा
